मंगेश पाडगावकरांना बरेचवेळा "गीतकार"असे लेबल लावले जाते आणि खरतर त्यांच्यातील कवीला खालच्या पायरीवर ठेवले जाते. जरा बारकाईने विचार केला तर असा पंक्तिप्रपंच मांडून आपण आपल्यालाच अति हास्यास्पद केले आहे,हे समजून घेता येते. इथे केवळ मंगेश पाडगावकर नव्हे तर असे बरेच कवी उदाहरण म्हणून दाखवता येतील ज्यांना आपण "गीतकार" म्हणून खालची इयत्ता दिली आहे. थोडा विचार केल्यास, केवळ शब्दांना सुरांची जोड लाभली आणि कवितेचे गाण्यात रूपांतर झाले आणि अशी असंख्य उदाहरणे आपल्याला बघायला मिळतील. एखादे गीत लिहायचे झाल्यास गीतकाराला तितकीच प्रतिभा लागते जितके परिश्रम निव्वळ कविता लेखन करायचे झाल्यास घ्यावे लागतात. किंबहुना ज्या मुक्तछंदाचा नेहमी उहापोह केला जातो अशा मुक्तछंदातील काही शब्दरचनांना काही संगीतकारांनी चाल लावून दाखवली आहे.
आजचे आपले गाणे, कविता म्हणून बघायला गेल्यास अप्रतिम निसर्गकाव्य आहे. मंगेश पाडगावकर हे मूलतः छंदोबद्ध रचना करणारे भावकवी आहेत. "शुभ्र तुरे माळून आलेल्या निळ्या वाटा" किंवा "पहाटे दारात झुलणारे केशरी मोर" सारखी ललितरम्य प्रतीकं वाचताना डोळ्यासमोर निसर्गाचेच अवीट रूप मांडले जाते. फक्त एक बाब खटकते अर्थात ही बाब संगीतकाराच्या अखत्यारीत येते. कविता वाचताना ही कविता प्रेयसीचे भावरूप दाखवते असे सारखे वाटत राहते परंतु गायन मात्र पुरुषी आवाजात आहे. "पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे" ही ओळ एखादी प्रेयसी(च) बोलू शकते.
संगीतकार यशवंत देवांनी गाण्याची चाल भीमपलास रागावर आधारित अशी बांधली आहे. कवितेची मागणी प्रसन्नता आहे आणि तोच भाव ओळखून देवांनी चाल बांधली आहे. सतारीच्या सुरवातीच्या सुरांनी गाण्याची ओळख स्पष्ट केली आहे. गाण्याच्या वाद्यमेळात सतारीचा वापर अतिशय समर्पक केला आहे. मधल्या अंतऱ्यासाठी व्हायोलिन,बासरी सुद्धा योजले आहे. तालासाठी संगीतकार बंगाली तालवाद्य "खोल" हे लोकसंगीतात वापरले जाणारे वाद्य वापरले आहे. अर्थात त्यामुळे चालीची खुलावट खुलून येते. खरंतर बंगालमध्ये हे वाद्य शक्यतो कीर्तन,भजन इत्यादी संगीतप्रकारांसाठी योजले जाते परंतु यशवंत देवांनी प्रणय गीतासाठी वापरून गाण्याची खुमारी वाढवली आहे. संगीतकार म्हणून विचार करताना, देवांच्या चाली या नेहमीच शब्दानुकूल असतात. कवितेतील आशय नेमका आकळून घेऊन चालीची निर्मिती केली जाते. चाल बांधताना देखील, शक्यतो कवितेतील शब्द अर्धवट किंवा अर्थहीन पद्धतीने तोडला जाणार नाही यासाठी प्रयत्न असतो. अर्थात यशवंत देवांनी "आधी चाल मग शब्द" अशा मार्गाने काही स्वररचना केल्या आहेत पण त्यावेळी देखील शब्दांबाबत वाजवी काळजी घेतल्याचे दिसून येते. आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास,ज्या गायकाला/गायिकेला चाल द्यायची आहे त्या कलाकाराच्या गळ्याचा "धर्म" ओळखून ते चालीची निर्मिती करतात. त्यामुळे गायन अतिशय परिणामकारक होते. खरंतर हा व्यासंगाचा भाग झाला पण यशवंत देव यांचा अभ्यास निश्चितच कौतुकास्पद आहे. याबाबत आणखी एक विधान करता येईल जेणेकरून यशवंत देवांच्या चालींवर ठोस प्रकाश पडावा. त्यांच्या स्वररचनेतील स्वरांचा ओघ शब्दांच्या, शब्दातील अक्षरांच्या वळणाप्रमाणे जातो, जो आत्यंतिक अर्थानुसारी राखण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे एक घडते, चालींमध्ये स्वरविस्ताराला जागा जवळपास नसते आणि याचे कारण संगीतकाराचा दृष्टिकोन होय.
आपण वरती बघितले त्याप्रमाणे प्रस्तुत गीत वास्तविक पाहता स्त्री गीत आहे परंतु गायन सुधीर फडक्यांकडून झाले आहे. सुधीर फडके हे सुद्धा नेहमी कवितेतील शब्दांबाबत सजगता दाखवणारे गायक. कवितेतील प्रत्येक शब्दाचा आशयानुरूप उच्चार करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. हा विशेष ललित संगीतात फार कमी गायकांकडे आढळतो. या गाण्यात तिसरा अंतर संपताना "चांदण्यात आनंदाच्या" हे शब्द गायल्यावर लगेच एक अवघड हरकत घेतली आहे पण ती हरकत घेताना "आनंदाच्या" शब्दातील आशय अधिक खुलवून टाकलेला आहे. गायक म्हणून सुधीर फडके कसा विचार करीत असत, याचे हे सुरेख उदाहरण आहे. या गाण्यात अशीच एक उद्मेखून ऐकण्यासारखी जागा आहे. शेवटचा अंतरा गाताना दुसरी ओळ "आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना" या ओळीतील "जागताना" शब्द गाताना किंचित स्वरिक वजन दिले आहे पण तरीही स्वराचे "ओझे" होत नाही. ललित संगीत हे अशाच प्रकारे खुलत असते. अशीच दृष्टी, अस्ताईतील दुसऱ्या ओळीत दिसून येते. "तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे" हि ओळ गाताना "तुझे" शब्द असाच थोड्या ठाशीव प्रकारे गायला आहे. अर्थात याचे श्रेय संगीतकार म्हणून यशवंत देवांना देखील द्यायला लागेल कारण चाल बांधतानाच कुठल्या शब्दाला किती वजनाने उच्चारायचे, हा अधिकार संगीतकाराचा असतो.
अशी सगळ्याच दृष्टीने बांधीव रचना तयार होते तेंव्हा ती चाल कमालीची लोकप्रिय होणे क्रमप्राप्तच ठरते.
तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे
शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवून सजल्या त्या हिरव्या वाटा
त्या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे
शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे
तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे
एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे