आपल्याकडे एक वाईट प्रथा आहे, एखाद्या कलाकाराचे एखाद्या विशिष्ट कलाप्रकारात नाव झाले की त्या कलाकाराची तीच ओळख कायम राहते, अगदी वज्रलेप म्हणावा अशी होते. त्यामुळे त्या कलाकाराची इतर वैविध्यपूर्ण अंगे दुर्लक्षित होतात. खरतर अशी प्रतिमा, कलाकार आणि कला या दोन्ही अंगाने दुर्दैवी म्हणायला लागेल. ख्यातनाम हिंदी चित्रपट गायक मन्ना डे, दुर्दैवाने याचे बळी झाले आहेत. आजही त्यांची ओळख ही "शास्त्रोक्त संगीतावर आधारित" गाणारा गायक अशीच रूढ झाली आहे. अशी एकांगी ओळख होणे चूकच आहे. ख्यातनाम गायक/संगीतकार के.सी. डे हे मन्ना डे यांचे काका. अर्थातच त्यामुळे प्रथम संगीतशिक्षण हे काकांकडे झाले. याचा फायदा असा झाला, हिंदुस्थानी संगीताच्या जवळजवळ सर्व मुख्य प्रकारांशी या गायकाचा परिचय झाला.
पुढे न्यू थिएटर्स - मुंबई इथे आल्यावर लगोलग आपले का आणि संगीतकार एस.के. दास यांच्याकडेसहाय्यक म्हणून कामाला सुरवात केली. हे करत असताना, पार्श्वगायक म्हणून त्यांनी १९४३ मध्ये संगीतकार शंकरराव व्यासांकडे (चित्रपट - रामराज्य) प्रथम गायन केले. त्या चित्रपटातील दोन गाणी (अजब निधी का लेख + त्यागमयी तू गयी) ही गाणी गंभीर तत्वविचारांनी भरलेली आणि रागाधारीत होती.
त्यांना गायक म्हणून पहिली ओळख मिळाली ती "उपर गगन विशाल (मशाल) या गाण्याने. तेंव्हापासून त्यांचा प्रवास सुरु झाला तो १९९१ मधील "हमारी मुठ्ठी में आकाश" (प्रहार - १९९१) पर्यंत अथकपणे सुरु होता. १९५० - ६० या दशकात त्यांनी जवळपास सगळ्याच अभिनेत्यांसाठी गायन केल्याचे आढळते. परंतु कुठल्याच अभिनेत्याशी त्यांचा आवाज निगडित झाला नाही आणि त्याची किंमत त्यांना मोजायला लागली. एक मात्र खरे, बंगाली चित्रपट सृष्टीत त्यांचा आवाज उत्तमकुमार या ख्यातनाम अभिनेत्याशी जुळला.
जरा बारकाईने मन्ना डे यांची कारकीर्द न्याहाळली तर त्यांनी अभिजात शास्त्रीय संगीत ते ट्विस्ट, या सर्व शैलीची गाणी गायली आहेत आणि नुसतीच गायली नसून त्या गाण्यांवर आपली अमीट छाप उमटवली आहे. त्यावरून त्यांच्या सादरीकरणाचा आवाका व विस्तार ध्यानात येईल. उदाहरणार्थ, "तू है मेरी प्रेमदेवता (राग ललित - ओ.पी. नैय्यर), "केतकी गुलाब जुही (बसंतबहार - शंकर/जयकिशन), ट्विस्ट शैलीतील "आओ ट्विस्ट करे", अगदी हलकेफुलके "एक चतुर नार (पडोसन - राहुल देव बर्मन), गांभीर्याने भावपूर्ण "ऐ मेरे प्यारे वतन" (काबुलीवाला - सलील चौधरी), घोष गायन " अब कहां जाये हम (उजाला - शंकर/जयकिशन) ही गाणी ऐकावीत. काही वेळा टवाळीने "क्लासिकल स्पेशालिस्ट"असा त्यांचा उल्लेख केला जातो आणि अशांनी वरील गाणी बारकाईने ऐकावीत.
आपण आता मन्ना डे यांनी गायलेल्या गाण्याचे थोडे वर्गीकरण करून विश्लेषण करूया.
पछाडलेली गीते : - "पूछो ना कैसे मैंने" ('तेरी सुरत मेरी आँखे) ही रचना अहिर भैरव रागावर आधारित आणि "अद्धा" या त्रितालाच्या उपभेदात रचलेली आहे. ही रचना एक चांगले गीत वाटते - छोटा ख्याल नव्हे. या विशेषांचा या गायकाने अतिशय सुरेख उपयोग करून घेतला आहे. शब्दांच्या भावच्छटांना धुंडाळणारा भावपूर्ण लगाव सर्वत्र ठेवला आहे - आपण रागविस्तार शोधात आहोत असा आव कुठेही डोकावत नाही (हल्ली बऱ्याच रचनांबाबत गायकांचा असा दृष्टिकोन असतो आणि स्वररचना डागाळतात)
"कौन आय मेरे मन के द्वारे" (देख कबिरा रोया) ही देखील अशीच आवाहकतेची आहे. मुळात बागेश्री/रागेश्री रागापासून सरकत सांगाल वेळ शब्दसंहितेकडे लक्ष वेधत राहते आणि आशय सघन होत जातो.
त्यांच्या नव्या शैलीत रचलेली उन्मादी, आनंदी गाण्यांच्या गायनात अगदी वेगळ्या मागण्या करणारे घटक असतात . खूप मोठा वाद्यवृंदध्वनी, चमकदार अकोर्डीयनचे उत्साही वादन, आघातापूर्ण लयबंध पुरवणारे वेगवेगळे पटह आणि प्रथमतः हालचाल व मग समूहाला सहभागाचे आमंत्रण करणारा संगीत जल्लोष - यांची रेलचेल नव्या शैलीत अपरिहार्यपणे असते. मन्ना डेंनी अशीही गीते दिली आहेत. "दिल का हाल सुने दिलवाला", " प्यार हुवा इकरार हुवा" (दोन्ही "श्री ४२०), "ए भाय जरा देख के चलो" (मेरा नाम जोकर), आओ ट्विस्ट करें (भूतबंगला), ये रात भिगी भिगी (चोरी चोरी) इत्यादी अनेक गीते या संदर्भात ऐकण्यासारखी आहेत.
गंभीर व गुणवंत गीते : - "तू प्यार का सागर है" ( सीमा ), "ऐ मालिक तेरे बंदे हम" ( दो आँखे बारा हाथ ), "ऐ मेरे प्यारे वतन" (काबुलीवाला),"अब कहां जाये हम" (उजाला) यांसारख्या रचनांचा एक उपवर्ग करता येऊ शकतो. गाणाऱ्या पात्रांच्या मनोवृत्तीमुळे अशी प्रार्थना गीते बनतात आणि गात्या आवाजास ही खास वृत्ती लगावांतून, उच्चांरातून प्रतितीस आणून द्यावे लागते. आपल्या स्थिर, स्वरेल आणि खुल्या आवाजाने मन्ना डे बरेच काही साधतात. मग आवाजाची फेक अशा नैसर्गिक गांभीर्याने केली जाते के आशयाचे गांभीर्य आपली सावली मागे ठेऊन जाते. उच्चारणांतून शब्दांकडे लक्ष गेल्याने शब्दसंहिता समोर येते आणि ऐकणाऱ्यास खरा अभिप्राय काय, याची नेमकी जाणीव होते.
शास्त्रोक्त तसेच त्याची टिंगल देखील : - शास्त्रोक्त संगीताचे वातावरण निर्माण करण्यासाठी हिंदी चित्रपटसंगीतात केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे प्रातिनिधिक रूप घेऊन समोर येणारी रचना म्हणून "सूर ना सजे" (बसंत बहार) हे गीत ऐकण्यासारखे आहे. प्रत्येक अंतऱ्यापाठोपाठ अनेक राग येतात. छोटा ख्याल वाटावा, अशी गीताची बांधणी आहे पसेच लोकशैलीतील अर्धाताल म्हणण्यासारखा लयबंध वापरला आहे ( याच रचनाकार जोडीने प्रस्तुत चित्रपटात पखवाज आणि त्यावर १० मात्रांचा झपताल लावला आहे) मन्ना दा गांभीर्याने, सफाईने आणि योग्य लगावाने गातात. दुसरे उदाहरण, अनिल बिस्वास यांनी बंदिश/ ठुमरीची बांधणी वापरलेली रचना "तोरे नैना रसिले" (हमदर्द) ही मन्नादा अधिक यशस्वीपणे गातात. उलटपक्षी शास्त्रोक्त म्हणजे काय याची चुकीची धारणा मनात धरून केलेली रचना म्हणून "सप्त सूर तीन ग्राम" (संगीत सम्राट तानसेन) या रचनेचा उल्लेख करता येईल. बांधणीत धृपद आणि रागसागर हे मुख्य प्रकार वापरले आहेत. सात राग आहेत (यमन कल्याण, भैरव, मालकंस, हिंडोल, श्री, दीपक आणि मेघमल्हार) आणले आहेत. जरा द्रुत लयीत पण ताल चौताल योजला आहे, दुगण, तिहाई, गुरुवंदनाचा श्लोक आणि त्याचे पठण कसेबसे बसवले आहे. अशी कृत्रिम गुंतागुंत आणि मन्नादा यांचे चाचपडते गायन यामुळे सगळं खटाटोप फसवा झाला आहे.
आता, शास्त्रोक्त शैलीचे काहीसे विडंबन. "लपक झपक तोरी" (बूटपॉलिश) ही रचना लक्षात घेऊया. अडाणा रागात आहे, त्रिताल, छोटा ख्याल हा संगीतप्रकर इथे जुंपला आहे. त्याशिवाय दुगण, तिहाई, लय वाढवीत जाणे, बोलताना यांना पण स्थान दिले आहे परंतु सादरीकरण एका चेष्टेखोर स्वरांत केले आहे. त्याचबरोबर ठुमरी शैलीतील २ रचना बघूया. "हटो काहे को" (मंझिल) ही रचना लक्षात घेऊ. यात शैलीबरीबर निगडित संयमित प्रेमभावनेने यथायोग्य सादरीकरण आहे. दुसरी रचना - "फुल गेंदवा ना मारो"(दुजे का चाँद). याच प्रकारची चेष्टा वा विडंबन करणारी आहे. लक्षणीय बाब अशी आहे, या दोन्ही रचनांचे इष्ट उद्दिष्ट आपल्या गायनातून मन्नादा कार्यक्षमतेने आणि सांगीत अनुभव देत साध्य करू शकतात. असाच सांगीत मजेदारपणा "अरे किसने चिलमन से मारा" (बात एक रात की) या गाण्यात देखील जाणवते. मन्नादा हे सर्व अतिशय कुशलतेने करतात.
कव्वाली गायन : - "ना तो कारवाँ की तलाश है" आणि "ये इष्क इष्क है" (बरसात की रात) या रचनांचे गायन खास उल्लेखनीय आहे. सर्वसाधारणपणे कव्वाली गायक हिंदुस्थानी संगीताशी जवळीक दाखवतात पण तरीही सादरीकरणाचा बाज वेगळा असतो. आवाजाचा लगाव, शब्दांचे उच्चारण, वापरलेले लयबंध आणि गायनाचे असलेले नाते या सगळ्यांत कव्वालीचे आवाहकत्व प्रत्ययास येते.
याचाच वेगळा अर्थ, केवळ शास्त्रोक्त संगीताचे गायक हा जो शिक्का बसला आणि त्यामुले मन्नादा बाजूला पडले, हे तितकेसे खरे नाही. एकूण विचार करता त्यांची गाणी काय दर्शवतात?
आता थोडे विश्लेषण. मन्नादांचा आवाज खुला आणि मर्दानी आहे. त्यांचा पल्ला चांगला आहे व त्यात सर्वत्र खुलेपणा आहे आणि आवाजात ताकद राखणे जमते. त्यांचा आवाज थोडा हलका आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या ताना ते लीलया घेऊ शकतात. भारतीय शास्त्रीय संगीतात स्वच्छ "आ"काराने गायन करण्यावर भर असतो. आणि हे देखील मन्नादा व्यवस्थित करू शकतात. (अनेकदा व्यावसायिक म्हणवणाऱ्या शास्त्रोक्त गायकांना देखील जमत नाही, याचे भान ठेवावे)!! आकाराने शक्य होणारा विशेष गुण सहकंपन वा गुंजन हा परिणामतः त्यांच्या गायनात ओतप्रोत भरलेला आहे. बहुदा याचा कारणाने, त्यांच्यावर वर उल्लेखलेले लेबल चिकटवण्यात आले असावे. अन्यथा दुसरे कुठलेच कारण संभवत नाही.
या व्यतिरिक्त मन्नादांचा एक विशेष असा की त्या त्या संगीतप्रकारानुसार जी एक ढोबळ भावस्थिती परंपरेत निश्चित झालेली असते ती सुचवणारा लगाव ते देऊ शकतात. चित्रपटगीतांस सांगीत बढत प्रदान करण्याची जरुरी नसते तर एक संबंधित भावस्थिती निर्माण करून बाकीची अनेक कार्ये साध्य करायची असतात. म्हणूनच सुरेलपणा, भरीवपणा आणि यथायोग्य उच्चार हे मुद्दे अत्यावश्यक ठरतात. मन्नादांमधील गायक या सगळ्या भूमिका सहज वठवू शकतात. आपल्या अष्टपैलूत्वाचा चित्रपटीय अवतार मन्नादा घडवू शकतात.
सर्वात महत्वाचा भंबाग म्हणजे अशा भूमिका करताना मन्नादा कधीही "नाटकी" बनत नाहीत. भावनिक संतुलन करून, चित्रपट संगीत अधिक परिणाम करू शकते आणि हेच भावनिक संतुलित गायन त्यांना शास्त्रोक्त ढंग राखण्यात सहाय्य करते.
इतरांपेक्षा मन्नादा वेगळे होतात, ते याच पार्श्वभूमीवर.