१९८० मधील दिवस असतील, नवीन मते नव्याने फुटण्याचे दिवस होते, तरुण होतो आणि त्यामुळे "माझे मत" याविषयी काहीशी घमेंड, आत्मविश्वास वगैरे गुण चिकटले होते. काही काळ तबला शिकण्यात घालवला होता, त्यामुळे संगीताविषयी समज (अजूनही खरेतर अपसमज जास्त) नको तितकी वाढीव होती. आपल्याला संगीतातील बरेचकाही कळते, समजले आहे अशी आत्मप्रौढी देखील भरपूर होती ( हे सगळे आज लिहिताना आठवत आहे) आणि त्याच धुंदीत असताना, मी एकदा सहज म्हणून "ललित संगीत" या विषयावर काहीसे गंभीर असे लिहिले होते. "शब्दप्रधान गायकी" नावाचे पुस्तक उपलब्ध आहे, हे माझ्या गावी देखील नव्हते. त्यावेळी मी नेहमीच काहीही लिहून ठेवले की माझ्या फाईलमध्ये ठेऊन देत असे, फारतर आई, वडिलांना वाचायला द्यायचे, इतपतच शिरस्ता होता. खरतर मित्रांमध्ये माझे संगीतवेड हा प्रचंड चेष्टेचाच विषय असल्याने, मित्रांना वाचायला देण्याचा प्रश्नच नव्हता.
अशा वेळी, लायब्ररीतून मी "शब्दप्रधान गायकी" हे पुस्तक आणले आणि सलग वाचून काढले. वाचताना हेच जाणवले, मी लिहिलेल्या निबंधात आणि या पुस्तकांतील विचारात काही ठिकाणी साम्य आढळले. अर्थात, देवांची समज अधिक खोलवर आणि विस्तारपूर्वक होती. पण, लगेच मी तो निबंध (निबंध म्हणायचा का? जवळपास २० फुलस्केप पाने लिहिलेले होते) आईला वाचून दाखवला, आणि आईने पुढे नानांना वाचायला दिला. आपल्या मुलाने काहीतरी लिहिले आहे, याचाच तो खरा आनंद होता. नानांनी शांतपणे वाचला आणि मला म्हणाले "अनिल, हे सगळे तू यशवंत देवांना का दाखवत नाहीस?" मी मनातून थक्क!! डायरेक्ट संगीतकार यशवंत देव!! पण नाना म्हणाले, मी त्यांना ओळखतो आणि त्यांच्याशी बोलून, तुझी भेट घडवतो.
त्याप्रमाणे, त्यांनी माझी आणि यशवंत देवांची भेट आकाशवाणीच्या त्यांच्या कार्यालयात घडवून आणली. तो पर्यंत एखाद्या संगीतकाराला भेटायचे, असे कधीही मनात आले नव्हते (पुढे मात्र भरपूर भेटी झाल्या आणि अनेक संगीतकारांना स्वतः:हुन भेटलो). नानांनी माझे लेखन देवांना दिले. हा माणूस इतका साधा होता, मृदू भाषी होता, त्यामुळे लगेच माझा धीर चेपला आणि मी काहीसा मोकळा झालो. वास्तविक मी लिहिलेले काही "मूलभूत" वगैरे नव्हते. काही वर्षे सतत गाणी ऐकून मनात जे काही साठले होते, त्याचेच शब्दरूप होते. त्यासाठी खास अभ्यास, व्यासंग वगैरे काहीही केला नव्हता. त्यांनी माल वाटते, दोन वेळा तरी तो लेख वाचला असावा आणि परत माझ्याकडे कागद दिले.
मी काहीतरी गंभीरपणे ललित संगीतावर विचार करत आहे, याचेच त्यांना अप्रूप वाटले आणि माझा धीर वाढावा म्हणून लेखनातील त्रुटी सांगितल्या आणि मुद्दे कशाप्रकारे मांडायला हवे होते, याबाबत चार शब्द सांगितले. मजेची बाब म्हणजे खरतर त्यांच्यासमोर मी कोण होतो? कुणीही नाही. गाणी ऐकणारे तर त्यांच्या आजूबाजूला सतत वावरत असणार तेंव्हा मी ललित संगीत आवडीने ऐकतो, याचे त्यांना कौतुक असण्याचे काहीही कारण नव्हते तरीही त्यांना माझ्याबद्दल ममत्व वाटले. त्यांना मी काही दुर्मिळ मराठी आणि हिंदी गाण्यांविषयी विचारले होते आणि त्यांनी आकाशवाणीवर अशी दुर्मिळ मराठी गाणी ऐकायला मिळतात आणि तो कार्यक्रम कुठला वगैरे माहिती दिली. अनिल हवेत!!
यशवंत देवांसारख्या सव्यासाची, विचारी संगीतकाराशी तासभर गपा मारायला मिळाल्या, हाच आनंद मला तेंव्हा भरपूर होता. तरुण वयात असले काही घडले की त्याचा (भाबडा) आनंद नेहमीच आनंददायी असतो म्हणा. माल तेंव्हाही आणि आजही स्पष्टपणे आठवत आहे ते त्यांचे निर्व्याज, सोपे, खालच्या आवाजातले बोलणे. समोरची व्यक्ती काहीशी अवखळ आहे तरीही त्याला समजून घेऊन त्याच्याशी, त्याला समजेल अशाच भाषेत बोलायचे, ही हातोटी आजही माझ्या ध्यानात राहिली आहे. आता इतका मोठा संगीतकार, परत आपल्याला भेटलास तरी चालेल, असे म्हणतो म्हटल्यावर अनिल ढगात जाणारच. मला पण संगीतातला असा जाणकार माणूस परिचित व्हावा, असे वाटतच होते. पुढे मी त्यांचे काही कार्यक्रम ऐकले आणि कार्यक्रम संपल्यावर त्यांची भेट घेऊ लागलो.
अशीच एक भेट आठवत आहे - मला वाटते, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा (ठाकूरद्वार शाखा) वार्षिक कार्यक्रम असावा आणि त्यांनी देवांचा कार्यक्रम ठेवला होता. एव्हाना काही मित्रांच्यात माझे संगीताचे वेड माहिती झाले होते आणि त्यातील एकानेच मला सूचना केली - अनिल, यशवंत देवांना तू काहीतरी प्रश्न विचार!! मी तिथेच एक कागद घेतला आणि जसे आठवतील तसे प्रश्न लिहून काढले आणि त्या मित्राकरवी देवांकडे पोहोचवले. देवांचा मोठेपणा असा की त्यांनी त्या कार्यक्रमात माझ्या प्रश्नांची दखल घेतली आणि कार्यक्रम संपल्यावर भेटायला ये, असे सुचवले. वास्तविक कागदावर माझ्या नावाचा उल्लेख नव्हता त्यामुळे मीच हे प्रश्न लिहिले आहेत, याची देवांना कल्पना असण्याचे काहीही कारण नव्हते. कार्यक्रम संपला आणि स्टेजच्या पाठीमागे जाऊन मी त्यांना भेटलो. त्यांनी लगेच मला ओळखले आणि याचेच मला नवल वाटले. वास्तविक मी भेटून ३,४ वर्षे झाली होती पण या माणसाने तरीही माझी ओळख ठेवली होती. अर्थात तेंव्हा माझी ओळख म्हणजे "मुकुंद गोविलकर" यांचा मुलगा अशीच होती. त्यांना एका गोष्टीचा आनंद झाला होता - मी सजगपणे ललित संगीत ऐकतो आणि त्याविषयी काही गंभीरपणे आणि ठामपणे मते मांडतो. तिथेदेखील त्यांनी माझ्या प्रश्नावलीतील काही चुका अतिशय ऋजू स्वरांत मला सांगितल्या आणि कुठल्या प्रकारे विचार व्हायला हवा, याबाबत पुन्हा एकदा चार शब्द सांगितले. माग मात्र मी त्यांना घरी जाऊन स्वतंत्रपणे गप्पा मारायचे ठरवले आणि लगोलग शिवाजी पार्क इथले त्यांचे घर गाठले.
यावेळेस मात्र माझ्यापरीने मी तयारी करून गेलो होतो आणि त्यांच्याशी ठराविक प्रश्नांवरच बोलायचे असेच ठरवले होते. तसे छोटेखानी घर पण त्यांनी अतिशय सहजपणे मला घरात घेतले. घरात करुणा देव होत्या आणि त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. त्यांनी लगेच संगीताचा विषय काढला आणि मला बरे वाटले. आणखी बरे वाटले कारण अनिल बिस्वास या संगीतकाराबद्दल त्यांना वाटणारे ममत्व. त्याचवेळी त्यांनी अनिलदांच्या संगीताची वैशिष्ट्ये सांगितली - विशेषतः: "सीने में सुलगते है अरमान" या माझ्या अति आवडीच्या गाण्यावरील त्यांचे भाष्य म्हणजे ललित संगीतावर किती अभ्यासपूर्ण पद्धतीने विचार करता येऊ शकतो, याचा मला अप्रतिम वस्तुपाठ दिला. शब्द, चाल, वाद्यमेळ आणि गायन, या तिन्ही घटकांचा या स्वररचनेत कसा समर्पक उपयोग केला आहे, याचे वस्तुनिष्ठ विवेचन केले. गाण्याचा अशा प्रकारे आस्वाद घेता येऊ शकतो याची वेगळीच नजर मला मिळाली. पुढे मला एकदा अशोक रानड्यांनी, संगीतकार मदन मोहन बाबत अशाच प्रकारे समजावून सांगितले होते. इतकी वर्षे मी अनिल बिस्वास यांची गाणी अथकपणे ऐकत होतो पण आता मला तीच गाणी वेगळ्या स्तरावरून कशी ऐकायची, याची नजर मिळाली आणि हे सगळे सांगताना कुठेही कसलाही अभिनिवेश नव्हता, आत्मर्प्रौढी नव्हती. पेळूतून सूत निघावे तसे सहजपणे त्यांचे बोलणे चालू होते.
वास्तविक मी कोण? माझी लायकी काय? असले काहीही त्यांच्या मनात देखील आले नसावे. यशवंत देवांचा तसा स्वभावच नव्हता. पुढे मी परदेशी गेलो आणि इथला संपर्कच तुटला. जेंव्हा परत भारतात परतलो, तेंव्हा इथे घडी बसवण्यात बराच वेळा गेला आणि जवळपास पुन्हा नव्याने संबंध प्रस्थापित करण्याइतका उत्साह फारसा राहिला नव्हता. यशवंत देवांची भेट घेण्याचे राहून गेले. अर्थात त्यांना भेटलो असतो तर पूर्वीची ओळख कितपत आठवली असती, याबाबत शंकाच आहे. परंतु आता देव नाहीत म्हणजे त्या शंकेचे निरसन देखील अप्राप्य!! खरतर त्यांच्या गप्पा सविस्तर मांडून आठवणी जागवणे सहजशक्य आहे पण मग मनात प्रश्न येतो, लिहिताना भावविवशता येईल का? या प्रश्नालाच मी गप्प बसतो.