पहिल्या लेखांत आपण, हाताशी कसलाही आसभास नसताना, रचनाकाराच्या मनात स्वरबंध येऊ शकतो, ही शक्यता मान्य केली तसेच हाताशी असलेल्या शब्दांकडे ध्यान दिल्यास, डोक्यात कुठेतरी स्वररचनेचा उद्भव होऊ शकतो, ही शक्यता देखील मान्य केली. अर्थात या सगळ्या प्रक्रियेत "स्वररचना" नेमकी कशी तयार होते? किंवा त्या कृतीचा मागोवा घेणे कितपत शक्य आहे? याचाच या लेखात पडताळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ललित संगीत हे नेहमीच संगीतकोटींतील "जनसंगीत" या संगीत कोटींत समाविष्ट होते. आता "संगीतकोटी" याचा नेमका अर्थ काय? मानवसमूहाचे सामाजिक, उपसांस्कृतिक इत्यादी स्पष्टीकरणे फारशी उपयोगी पडणार नाहीत. या पार्श्वभूमीवर विचार करता, संगीतकोटी म्हणजे सामाजिक-सांस्कृतिक तथ्यांचा समूह म्हणून ज्यांची प्रचिती येते ते सर्व विशेष सामाजिक-सांस्कृतिक वास्तवाला समांतर राहणारे आणि सांगीत सौंदर्याची अनुभूती देऊ पहाणारे बंध म्हणून समोर येऊ लागतात. याच दृष्टीने, संगीतकोटी हे अनुभूतीचे पायाभूत अथवा मूलभूत साचे बनतात. संगीतकोटी ही कधीही निर्मात्यानुसार निश्चित होत नसते. त्यांचे आकलन देखील त्या अंगाने संभवत नाही. कोटींचे सांगीत रूप आणि त्यांचे सांस्कृतिक स्वरूप या दोहोंकडे त्याच क्रमाने आणि आस्थेने लक्ष दिल्याशिवाय मानवी संचित म्हणून त्यांची विचारार्हता आणि अर्थपूर्णता यांचा थांग लागणे अशक्य!!
एकुणां संगीत कोटी ६ आहेत आणि त्यातील "जनसंगीत" ही संगीतकोटी विशेष महत्वाची कारण त्यातच ललित संगीताचा आणि पर्यायाने स्वररचना याचा विचार खोलवर करता येऊ शकतो. कुठलीही कोटी सुटेपणाने काम करीत नाहीत. एकमेकांत देवाणघेवाण, परस्परप्रभाव आणि एकमेकांच्या क्षेत्रांत शिरकाव या प्रक्रिया सामान्यपणे घडत असतात. या विधानाच्या आधारे आपण असे ठामपणे म्हणू शकतो, ललित संगीतातील स्वररचनेवर इतर संगीतकोटींचा प्रभाव नक्कीच पडत असतो. अर्थात विविध अविष्कारांतर्गत होणारे सांगीत कल्पनांचे अभिसरण केंव्हा,कसे आणि किती होईल याची अटकळ बंधने अति अवघड असते. अपेक्षेनुसार भारतातील विविध प्रदेशांतील सांगीत वर्तनाचे गतिशास्त्र वेगवेगळे असते. एक मात्र सामायिक बाब आढळते आणि ती म्हणजे सांगीत आणि सांस्कृतिक. जेंव्हा आपण म्हणतो, जनसंगीत कोटीवर इतर संगीतकोटींचा परिणाम आणि प्रभाव जाणवतो त्याचाच दुसरा अर्थ, जनसंगीत कोटींतील सर्जनशीलता ही त्या अर्थी "स्वतंत्र" असणे अवघड!!
आता स्वररचना याचा स्वतंत्र अभ्यास करता, त्यात स्वन वा ध्वनी या वैशिष्ट्याची विविधता ध्यानात घेणे जरुरीचे ठरते. ध्वनी या माध्यमातील अत्यंत महत्वाच्या परिमाणाची म्हणजे स्वन वा ध्वनिवैशिष्ट्याची विपुलता. स्वररचनेचा सखोल अभ्यास करणे अवघड अशा साठीच जाते कारण जनसंगीताचा मोहरा बंडखोरीचा वा प्रस्थापितांविरुद्ध उभा राहण्याचा असतो आणि त्यासाठी मग, इतर कलाविष्काराशी हातमिळवणी करून नवीन मांडणी करण्यात जनसंगीत नेहमीच पुढे असते. याचाच दिखाऊ परिणाम म्हणजे पाश्चात्य संगीताशी झालेली संगती आणि ती करत असताना, विविधता प्रकट करण्याची उर्मी!! याचाच परिणाम असा होतो, स्वररचनेच्या सर्जनशीलतेचा अचूक आणि नेमका मागोवा घेणे दुष्प्राप्य होऊन बसते.
भारतीय संगीत परंपरेत पाश्चात्य वाद्ये आणून, त्याला स्थिरावण्यास मदत केली, ती केवळ जनसंगीतकोटीनेच!! बरेचवेळा असे देखील आढळून येते, केवळ वाद्यांच्या साहचर्याने रचनाकारांच्या सर्जनशीलतेला मदत मिळते आणि नवनवीन स्वराकार उदयाला येतात. अर्थात त्यामुळे स्वररचनेचा पायाभूत मागोवा घेणे अधिक दुष्प्राप्य होऊन बसते पण तो भाग वेगळा. बरेचवेळा असे देखील घडते, अंगभूत प्रासंगिकता आणि बदलण्यास एका पायावर तयार राहण्याची वृत्ती, यामुळे अनेकदा जनसंगीतरचना इतक्या झपाट्याने वा अचानक बाहेर येतात की कलात्मकता, त्यासाठी सखोल विचार व काळजीपूर्वक रचना, श्रमपूर्वक केलेल्या तालमी इत्यादींचा भाषाच विसरणे क्रमप्राप्त होते. इथे एक मुद्दा ठामपणे मांडावासा वाटतो, भारतीय संगीतातील स्वररचना कितीहीवेळा परंपरेपासून दूर गेली तरी दुरान्वयाने परंपरेशी साहचर्य दिसत राहते किंवा परंपरेकडे वळते.
या प्रक्रियेत आणखी एक मुद्दा अवतरतो आणि तो म्हणजे, जनसंगिताला मिळत असलेला प्रचंड जनाधार आणि त्याचा देखील स्वररचनेच्या निर्मितीशी फार जवळून संबंध येतो. काही विचारवंतांच्या मते, कलात्मकता, बुद्धिसंपन्नता आणि सांस्कृतिक अभिरुची यांच्या संदर्भात जनता हा समूह लघुत्तम साधारण विभाजक असू शकतो!! अर्थात यामुळे इथे रचनाकारांत अगदी अननुभवी किंवा नवशिक्या सदारकर्त्यांचे प्रमाण लक्षणीय असते.
स्वररचनेवर आणखी काही घटकांचा प्रभाव दिसून येतो - १) ते सहज उपलब्ध व्हावे अशी रचनाकारांची कळकळ. त्यामागील अर्थकारण देखील ध्यानात घ्यावे लागते. २) हे संगीत समजण्यासारखे म्हणजे आकलनसुलभ हवे - भाषा, रचना, विषय, आशय इत्यादी बाबतीत सुलभता अपेक्षित असते. या सगळ्या घटकांचा, स्वररचना म्हणून स्वतंत्र विचार करताना विचार करणे भाग पडते. स्वररचना सुलभ असणे, या अत्याग्रहाचा बरेचवेळा नको तितका प्रभाव जाणवतो आणि काही रचनाकारांच्या मते, स्वररचनेच्या सर्जनशील प्रक्रियेत खीळ पडते.
एका बाजूला कलासंगीताचा प्रभाव तर दुसऱ्या बाजूला पाश्चात्य संगीताचा प्रभाव, यात बरेचवेळा स्वररचनेचा प्रवास गुंतून पडतो आणि रचनेमागील इंगित जाणून घेण्यात बऱ्याच अडचणी उद्भवू शकतात. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर या दोन्ही संगीताविष्काराने स्वररचना अधिक भरीव, आकर्षक आणि विविधतेने नटलेली आढळून येते. एक बाब नक्की, इथे संपूर्ण "स्वतंत्र" अशी निर्मिती जवळपास नाहीच, असे म्हणावे लागते. त्यामागील कार्यकारणभाव आपण वर बघितला असल्याने इथे पुनरुक्ती नको. त्याचा परिणाम असा झाला, "स्वररचना" कशी झाली? याचे उत्तर फार गुंतागुंतीचे होऊन बसते. आपण फार तर, स्वररचना कुठल्या संगीतकोटींवर बेतली आहे, इतपत(च) सांगू शकतो. म्हणूनच मी सुरवातीला म्हटले तसे, एकूणच ही निर्मिती "गूढ" होते, या वाक्याचा असाच अन्वयार्थ लावता येतो