Wednesday, 27 December 2017

दो घडी वो जो पास आ बैठे

"निकट असूनही श्वासापुरते दूर असावें
       जवळपणांतही पंखांना आकाश दिसावें
 हवे वेगळेपण कांहीतरी मिलनातही सखी आपल्यातून 
इतुके आलो जवळ, जवळ की जवळपणाचे झाले बंधन"

आपल्या सूक्ष्मकोमल भावनानुभवांचे सौंदर्य न्याहाळण्याची आणि अभिव्यक्त करण्याची शक्ती मंगेश पाडगांवकरांच्या कवितेतून वारंवार आढळते. विविध भाववृत्तीची चित्रे त्यांच्या कवितेंमधून प्रकट होताना दिसतात. मग टी कधी उत्फुल्ल असेल तर कधी उदास, खिन्न देखील असेल!! परंतु ह्या भाव-वृत्तीचे दर्शन ते ज्या प्रतिमांच्या द्वारे घडवितात, त्या प्रतिमा मात्र निसर्ग-दृश्यांच्याच असतात. प्रस्तुत कविता त्यांच्या "जिप्सी" या काव्यसंग्रहातून घेतली आहे. अर्थात, आजचे जे गाणे आहे, त्यातील कवितेच्या संदर्भात विचार करता, काहीसा दुजाभाव दिसतो पण तरीही कुठेतरी, या ओळीचे नाते आपल्याला सांगता येते, कुठे दिसते? या प्रश्नाचे उत्तर आपण जेंव्हा या गाण्याचा विवेचनाद्वारे आस्वाद घेऊ, तेंव्हा मी दर्शवीन. 
वास्तविक, हिंदी चित्रपट गीतांत प्रणयी भावनांची गीते म्हणजे स्थायीभाव ठरावा, इतक्या प्रचंड प्रमाणात आढळतात!! प्रत्येक वेळी कवींनी देखील हीच भावना कुठल्या शब्दांत आर्ततेने दर्शवायची? असा प्रश्न पडू शकतो पण तरीही हिंदी/उर्दू कवींनी ज्या प्रमाणात विविधता दाखवली आहे, तिला तोड नाही. अर्थात हा प्रश्न स्वररचना करताना, संगीतकाराच्या समोर उभा ठाकू शकतो. खरतर इथेच संगीतकाराच्या प्रातिभ शक्तीचा अदमास घेता येतो. आपल्या भारतीय संगीतात रागसांगीताचे प्राबल्य भरपूर आहे आणि त्या अनुषंगाने राग-रागिण्या भरपूर आढळतात. याचाच परिणाम असा होतो, गाण्याची स्वररचना करताना, एकाच रंगाच्या अनंत भावविभोर छटा बघायला मिळतात आणि आपले रागसंगीत किती श्रीमंत  आहे, याची चुणूक जाणवते. 
सतारीच्या नाजूक सुरावटीवर या गाण्याची सुरवात होते. खरतर हे गाणे म्हणजे दोन प्रेमी जीवांचा संवाद आहे परंतु संवादाला गेयतेची जोड लाभल्याने त्या भाषेलाच लय लाभली आहे. ही किमया, कवी राजेंद्र कृष्ण यांची. या गाण्याची अस्ताई बघितली तर लगेच स्वररचनेची खुमारी ध्यानात येईल. 

दो घडी वो जो पास आ बैठे
हम जमाने से दूर जा बैठे

इथे सुरवातीचे सतारीचे सूर, चालीचे किंचित्काल "वळण" दाखवतात - म्हणजे बघा. 

दो घडी वो
सा रेss सा अशी गत, या शब्दांच्या आधी वाजते आणि त्याच हिंदोळ्यावर शब्द कानावर येतात. सतारीच्या सुरावटीवर जी लय निर्माण केली आहे, ती संपल्याक्षणी "दो घडी" शब्द ऐकायला येतात आणि पार्श्वभागी तबल्याचे छोटेसे आवर्तन घेऊन, समेची मात्रा "वो" शब्दावर घेऊन, कवितेच्या ओळीतील आशय स्वरांच्या साहाय्याने सुबद्ध केला आहे. कवितेच्या कुठल्या शब्दावर "सम" घ्यायची ज्यायोगे कवितेतील अमूर्त आशय मूर्त होईल, इथेच संगीतकाराचा कवितेचा व्यासंग जाणून घेता येतो. आता बघा, "दो घडी वो जो पास आ बैठे" या ओळीतील "दो" शब्दावर जोर देऊन, वेगळा अर्थ अभिप्रेत करता येतो तर "पास" या शब्दावर देखील समेची मात्रा घेऊन,हीच चाल आणि हीच लय कायम ठेवता येते. संगीतकाराची "नजर" इथेच ओळखता येते. बहुतेक रचनाकार, मुखड्याला का सर्वाधिक महत्व देतात, हे आपल्याला अशा प्रकारे समजून घेता येईल. किंबहुना "मुखडा" बांधला म्हणजे मग पुढील "बांधकाम" सहजशक्य असते,असे म्हणणे  काहींचे असते, यात तथ्य आढळते. 
आता गाण्याची बांधणी बघायला गेल्यास, संगीतकाराने युगुलगीत स्वरूपाची रचना केली आहे आणि तसे करताना, मुग्ध प्रणयाची खुमारी राखून संवाद तत्वाने बांधणी केली आहे. अर्थात सुरांच्यात, शब्दातील सोज्वळता, काहीसा खट्याळपणा आणि लोभस वृत्ती कायम ठेवली आहे. 
गाण्याची मांडणी ही शक्यतोवर मध्य सप्तकातच ठेवली आहे आणि याचे प्रमुख कारण,कवितेच्या शब्दकळेत दडलेले आहे. नायक, अत्यंत आर्जवी स्वरांत नायिकेला जवळ बसण्याचे विनवणी करीत आहे तेंव्हा ही विनवणी "अनवट" स्वरांत कशी बांधता येईल? तसेच "आघाती" मात्रा आणि स्वर देखील उपयोगाचे नाहीत. संगीतकार मदन मोहन इथेच आपले वेगळेपण दाखवून देतात. मुळात, या संगीतकाराच्या बहुतेक स्वररचना या अतिशय मार्दवी, आर्जवी तसेच सर्वस्व अर्पण करणाऱ्या असते. अर्थात रसिकांकडून देखील तशीच मागणी असते. मदन मोहन यांच्या रचना आत्मसात करायच्या झाल्यास, त्या रचनेला संपूर्णपणे शरण जाऊन, एकात्म भावनेने मन समर्पण केले तरच रचनेचा "गाभा" आकळू शकतो. शब्दांमधील आशयाला कुठेही "धक्का"  न लावता, आपला संगीताशय रसिकांपर्यंत पोहोचविणे,हेच जणू ध्येय असल्या प्रमाणे मांडणी केलेली असते. 
अस्ताई संपल्यावर नेहमीच्या पद्धतीने अंतऱ्याच्या आधीचे संगीत सुरु होते. मदन मोहन यांचे संगीत हे नेहमी "गीतधर्मी" तत्वावर असते म्हणजेच गाणे बांधताना, त्यात "गायन"देखील अंतर्भूत असते जेणेकरून गायकाला गायला वाव मिळू शकतो पण गीताला कुठेही बाधा न आणता!! हीच संगीतकाराची खरी "नजर"!! इथे बासरीचे सूर अवतरतात पण जरा बारकाईने ऐकले तर सुरवातीच्या सतारीच्या सुरांशी साद्ध्यर्म राखून बासरीचे स्वर येतात. इथे दोन प्रकारचे रचनाकार संभवतात. काही रचनाकार, अंतऱ्याची "उठावण" संपूर्ण वेगळ्या स्तरावर करून रसिकांना आपल्या बुद्धिकौशल्याची जाणीव करून देतात - खुद्द मदन मोहन यांच्या काही गझला याच पद्धतीने बांधल्या आहेत पण इथे रमणीय भावगीत असल्याने, अस्ताईने साधलेला परिणाम अधिक गहिरा करण्याचा कल दिसतो. यात आणखी एक विचार संभवतो - जर का मुळातली स्वररचना अतिशय गोड असेल तर मुद्दामून प्रयोग करायचे कशाला? आहे  तीच स्वररचना रसिकांच्या मनावर "गारुड" घालू शकतो, हा आत्मविश्वास इथे दिसतो. बासरी वाजत असताना, पार्श्वभागी गिटारचे अतिशय मंद सूर वाजत आहेत, जे लयीला पूरक अशी तालाची साथ देत आहेत. बासरीच्या सुरांचे संपूर्ण आवर्तन संपवून, चाल पहिल्या अंतऱ्याकडे वळते. 

भूल की उनका हमनशीं हो के
ऱोयेंगे दिल को उम्रभर खो के
हाए क्या चीज थी लुटा बैठे

मघाशी मी जे विधान केले त्याप्रमाणे, ध्रुवपदाची चाल तशी कायम ठेऊन, गाण्याचा विस्तार इथे बघायला मिळतो. कवितेचे बोल लयीच्या अंगाने वळवत असताना, बरेचवेळा शब्द फोड केली जाते - इथेच मी म्हणतो तसे ललित संगीताचे काहीसे अपुरेपण दिसते - अर्थात रागसंगीताच्या अनुरोधाने मी हे विधान केले आहे. चालत असलेली लय तर कायम ठेवावीच लागते तेंव्हा मग ती जागा तशीच कायम ठेवताना, शब्दांची ओढाताण क्रमप्राप्तच ठरते - फक्त प्रश्न असतो, संगीतकार किती खुबीने अशा "जागा" स्वररचनेत मिसळून घेतो. "हमनशीं" गाताना किंचित हलकासा खटका घेतला आहे पण अशा प्रकारे घेतला की लयीत तर सुरेखपणे बसवला आहे त्याचबरोबर आशय देखील कुठेही "विजोड" होत नाही आणि ही "जोड" स्वरांच्या माध्यमातून साधणे - इथे संगीतकार दिसतो!! अर्थात गायक म्हणून मोहम्मद रफींचे कौशल्य मानायलाच हवे.   

दिल को एक दिन जरूर जाना था
वही पहुंचा जहां ठिकाना था
दिल वोही दिल जो दिलमे जा बैठे

आता इथे कवितेबाबत थोडा विचार करायचा झाल्यास, प्रस्तुत कविता पहिल्या प्रथम गझल वृत्तात लिहिल्याचे जाणवते आणि याचे प्रमुख कारण, कवितेत पाळलेले, "रदीफ","काफिया"या आणि "जमीन" यांचे नियम पण तरीही ही पारंपारिक गझल नसून "नज्म" आहे!! याचे प्रमुख कारण, गझलेत प्रत्येक शेर, ही स्वतंत्र, सार्वभौम कविता असते. चित्रपट गीतांत, विशेषतः प्रणय गीतांत, असे "स्वातंत्र्य" घेणे परवडणारे नसते. पडद्यावरील प्रसंगाचा उद्भव गाण्याच्या माध्यमातून मुखरीत करणे, हेच मुख्य असते. अर्थात कवी राजेंद्र कृष्ण यांच्या बहुतांशी कविता या "गेयताबद्ध" असतात. याचा परिणाम, संगीतकाराला कविता स्वरबद्ध करणे आव्हानात्मक ठरते. वरील अंतरा मात्र वेगळ्या सुरावटीत सुरु होतो. गमतीचा भाग असा आहे, वाद्यमेळ त्याच सुरांत बांधलेला आहे पण अंतऱ्याची "उठावण" वेगळ्या सुरांवर आहे, व्यामिश्र बुद्धिमत्तेचा सुंदर नमुना!! अर्थात अंतरा संपवताना मात्र परत मूळ चालीशी नाते निर्माण केले आहे. 

एक दिल ही था गमगूसार अपना
मेहरबां, खास राजदार अपना
गैर को क्यूँ उसे बना बैठे ?

गायक म्हणून विचार करताना, मोहम्मद रफींच्या गायकीचा उल्लेख आवर्जूनपणे करायलाच लागेल. रफी काही संगीतकारांकडे गाताना, ज्याला आपण "नाटकी" म्हणतो, तशा पद्धतीचा आवाज लावलेला आढळतो इथे मात्र त्यांचा मुळचा संयमित, सौम्य आवाज लावलेला आहे. मला तर नेहमी वाटते, तार स्वरांत गायन करणे, ही गायनाची अत्यावश्यक कसोटी अजिबात नसावी. तार स्वरांत गळा लावणे कौशल्याचेच काम आहे पण बरेचवेळा रसिकांना भुलवण्यासाठी, रसिकांवर प्रभाव गाजवण्यासाठी आवाज वरच्या सुरांत लावला जातो किंवा जसे रफींनी काही गाण्यात "अति भावविवश" असा आवाज लावून, गाण्याची  रसहानी केली आहे. तसा प्रकार या गाण्यात जरादेखील आढळत नाही. याचे श्रेय जितके रफींचे आहे तितकेच संगीतकार म्हणून मदन मोहन यांना द्यायला लागेल.  या साठी आपण, वरील दुसरा अंतरा जरा बारकाईने ऐकायला हवा. "गैर को क्यूँ उसे बना बैठे" ही ओळ कवितेत प्रश्नार्थक आहे पण गाताना, रफींनी त्यातील ऋजुता सांभाळली आहे आणि ते ऐकणे हा सुंदर ऐकीव अनुभव आहे. 

गैर भी तो कोई हसीं होगा
दिल युं ही दे दिया नहीं होगा
देखकर कुछ तो चोट खा बैठे

हा शेवटचा अंतरा. आता लताबाईंच्या गायकीबद्दल खरे तर वेगळे काय लिहायचे हाच खरा प्रश्न आहे. एक मात्र नक्की, युगुलगायनात आपल्या बरोबरीचा गायक आणि त्याच्या गळ्याची मर्यादा जाणून घेऊन त्याप्रमाणे आपली गायकी सुसंगत ठेवायची, यात लताबाई केवळ अप्रतिम म्हणाव्या लागतील. या गाण्यात जेंव्हा प्रत्येक अंतरा संपत असताना, शेवटची ओळ रफी आणि लताबाई एकत्रितपणे गातात, तेंव्हा आपल्याला या वाक्याची प्रचिती घेता येईल. आपण गात असलेल्या रचनेची स्वरिक जाण आणि त्याबर सूर लावणे, यात लताबाई हातखंडा, असेच म्हणावे लागेल. 
संगीतकार म्हणून मदन मोहन यांचा या गाण्याबाबत विचार मांडायचा झाल्यास, हे गाणे त्यांनी नेहमीच्या पद्धतीने बांधलेले नसून, शब्दांची जातकुळी ओळखून, स्वररचना निर्माण केली आहे. चाल भावानुकूल तर नक्कीच आहे पण ते काही खास वैशिष्ट्य मानता येणार नाही कारण भावनाकुल स्वररचना करणे, हे तर बहुतांशी सगळेच प्रातिभ संगीतकार करताच असतात परंतु इथे संगीतकाराने, आपली नेहमीची शैली बाजूला सारून, मी वर म्हटल्याप्रमाणे सहज गुणगुणता येणारी तरीही गळ्याची परीक्षा पाहणारी अशी आगळीच स्वररचना तयार केली आहे. शैलीला बाजूला सारणे , हे सहज जमण्यासारखे नाही. चालीत गोडवा निर्माण करणे आणि तो गोडवा रचनेतून आपल्यापर्यंत पोहोचवणे, हेच या गाण्याचे खरे वैशिष्ट्य म्हणायला लागेल.