Sunday, 25 June 2017

वेदनेचा सुरेल अविष्कार

आपल्याकडे‘यशस्वी’ म्हणून गणना करताना व्यावहारिक यश हाच एकमेव निकष वापरला जाऊन त्यानुसार गुणवत्ता ठरवली जाते. अर्थात, व्यावहारिक यशाकडे संपूर्ण कानाडोळा करणे तसे चूकही आहे; पण तोच एकमेव निकष मानणे तितकेसे योग्य नाही. परंतु हाच निकष आजवर सर्रास लावल्याने हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक गुणवान संगीत दिग्दर्शकांवर अन्याय झालेला आहे. मदनमोहन हे त्यातील एक ठळक नाव.

मदनमोहन यांच्या सर्वंकष संगीताचा विचार करायचा झाल्यास, काही बाबी ठळकपणे नोंदवाव्या लागतील. मदनमोहन यांची प्रतिभा ‘गीतधर्मी’ होती. याचाच वेगळा अर्थ असा लावता येईल की शब्दांच्या अर्थाव्यतिरिक्त पण त्याच्या आधारे आशयाचे विविध तरंग निर्माण करण्याची ताकद, त्यांच्या संगीत रचनेतून प्रतीत होत होती. यामध्ये, कवितेतील आशयाबरोबर सांगीतिक रचनादेखील समांतर अस्तित्व दाखवत असते. तरीही दोन्ही घटकांचा अत्यंत सुनियोजित मेळ घातलेला असतो. यावरूनच, मदनमोहन यांच्या संगीतात गझलेला का महत्त्व आले, हे अधोरेखित व्हावे. गीतधर्मी संगीतकार हे नेहमीच लयबंधापेक्षा सुरावटीकडे आणि त्याच्या प्रवाही चलनाकडे अधिक झुकतात. लयबंधाच्या किंवा तालांच्या ठळक वापरातून जी गतिमानता प्रत्ययास येते, तिच्यापेक्षा स्वररंगातील सूक्ष्म भेद दाखवून आकारास येणारी गतिमानता, असे संगीतकार नेहमी पसंत करतात.

उदाहरणादाखल ‘नैना बरसे’ हे गाणे घेऊया. एक प्रणयगीत म्हणून ऐकताना, नेहमीच्या गझल रचनेचा वापर न करता संगीतकाराने गीताची पारंपरिक धाटणी अंगीकारली आहे; पण तरीही ‘मुखडा’ समोर ठेवत असल्याचा भास निर्माण करून एकदम सुरावटीत बुडी मारणारे चलन, तसेच एकामागोमाग येणार्‍या कडव्यांची पट्टी बदलून केलेले गायन पण तरीही नकळत मूळ पट्टीकडे येणे! पट्टीच्या कानसेनांचे लक्ष वेधून घेणारे आहे.’

दुसरा विशेष असा सांगता येईल, अशा संगीतकारांच्या गाण्याचे मुखडे गुणगुणत राहावे, असे असतात. तसेच द्रुतगती किंवा गुंतागुंतीच्या पण उत्स्फूर्त वाटणार्‍या संगीतात वाक्यांशासाठी चालीत मुबलक जागा सोडलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या गाण्यात ‘गायकी’ अंग फार ठळकपणे दिसून येते. मुळात मदनमोहन यांच्यावर उत्तर भारतीय पण लखनवी परंपरेचा प्रभाव असल्याने उपशास्त्रीय संगीताकडे ओढ असणे स्वाभाविक ठरते. गझलेचे वर्णन करताना, ‘भोगवादाचा मनोज्ञ आविष्कार’ या शब्दात केले जाते, आणि याचाच अप्रतिम आविष्कार मदनमोहन यांच्या संगीतात दिसून येतो. कुठलीही समृद्ध गझल काव्य म्हणून ध्यानात घेतली तर त्यात उत्कटता, अभावित सौंदर्यवादी धक्का देण्याची प्रवृत्ती आणि कुठल्याही भावनेचा ‘अर्क’ शोषून घेण्याची शोधक वृत्ती आढळते. त्यामुळे जेव्हा आपण मदनमोहन यांच्या रचना ऐकतो, तेव्हा यावरील गुणवैशिष्ट्यांचा आपल्याला नेहमीच प्रत्यय येतो.

जवळपास 30 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देऊनही ज्या थोड्या संगीतकारांना अजिबात व्यावसायिक यश प्राप्त झाले नाही, अशा अत्यंत दुर्दैवी संगीतकारांत मदनमोहन यांचा समावेश करावा लागतो. जरा बारकाईने बघितले तर कारकीर्दीच्या सुरुवातीला ‘हमारे बाद अब महफ़िल में’, किंवा ‘दुखियारे नैना’सारखी विलक्षण ताकदीची गाणी देणारा संगीतकार, अगदी आयुष्याच्या अखेरीस ‘बैया ना धरो’ किंवा ‘आज सोचा तो आंसू भर आये’ अशी त्याच तोलामोलाची गाणी देऊ शकला. हा माणूस किती प्रतिभावंत होता, याची ही चार गाणी साक्ष द्यायला पुरेशी आहेत. वास्तविक बघता, सांगीतिक रचनेच्या दृष्टिकोनातून वर निर्देशिलेल्या पहिल्या दोन गाण्यांच्या रचना आणि नंतरच्या दोन गाण्यांच्या रचना, यात तसा फारसा फरक नाही!! वेगळ्या शब्दांत मांडायचे झाल्यास, रचनेचा मूलभूत ‘ढाचा’ बराचसा मिळताजुळता आहे; पण फरक आहे तो वाद्यसंगीताचा आणि गायकीचा!

गझल गायकीत जो भोगवादाचा अर्क असतो, त्याचे नितांत रमणीय दर्शन मदनमोहन यांच्या रचनेतून दिसून येते. हाताशी आलेल्या काव्यातील दडलेला आशय तितक्याच समर्पक सुरांतून व्यक्त करण्याची अद्भुत ताकद, या संगीतकाराच्या रचनेतून वारंवार दिसून येते. याआधी उल्लेख केल्याप्रमाणे गाण्याची रचना करताना ‘धून’ अशी तयार करावी, की त्यातून प्रत्येक वेळी नवीन सांगीतिक वाक्यांश प्रत्ययाला यावेत आणि त्यामुळे, मूळ चालीचे सौंदर्य अधिक विस्तीर्ण व्हावे. मदनमोहन यांची गाणी नेहमी इथे इतरांपेक्षा वेगळी होतात. चित्रपटात जेव्हा केव्हा उठवळ प्रसंगाला साजेसे गाणे करायची वेळ आली, तेव्हा मदनमोहन यांनी केलेल्या रचना केवळ कर्तव्यभावनेने केलेल्या आणि बर्‍याच रुक्ष वाटतात!! आपली प्रवृत्ती अशा गाण्यांना साजेशी नाही, याची पुरती जाणीव मदनमोहन यांना होती आणि त्यामुळे अशी गाणी बांधताना, त्यातील जो उत्स्फूर्तपणा असतो, त्याचा मदनमोहन यांच्या ठायी लवलेश नसतो. कदाचित म्हणूनही या संगीतकाराच्या वाट्याला व्यावसायिक या संज्ञेत बसणारे फारसे चित्रपट आले नसावेत!!

अर्थात, प्रत्येक संगीतकाराची जशी बलस्थाने असतात, तसे तोकडेपणदेखील असते. तद्वत हॉटेलमधील नृत्यगीतांत वा त्या सदृश गाण्यांत, मदनमोहन अजिबात रमलेले दिसत नाहीत. त्याचबरोबर बलस्थाने विचारात घेता, गझलसदृश गाण्यांत मात्र मदनमोहन एकमेवाद्वितीय! अशा गाण्यांत त्यांच्या प्रतिभेच्या उत्तुंग आविष्काराचे दर्शन घडते. वास्तविक संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतादेखील, ‘यमन’सारख्या चित्रपट संगीतात वारंवार वापरल्या जाणार्‍या रागात, ‘जारे बदरा बैरी जा’, ‘जिया ले गयो जी मोरा सांवरिया’सारख्या अवीट गोडीची ‘तर्ज’ तयार करणे, हे येर्‍यागबाळ्याचे काम नोहे! मदनमोहन यांच्या गाण्यात दुसरे खास वैशिष्ट्य दिसून येते, ते गाण्याच्या चालीसोबत रुणझुणणारा वाद्यमेळ. गायक/गायिकेने जिथे स्वर सोपवला आहे, तिथून वाद्यसंगीताच्या मदतीने तीच लय अधिक विस्तारित करत जायचे, हा या संगीतकाराचा अत्यंत मनोहारी खेळ!! बर्‍याच गाण्यांत हा खेळ आपल्याला अनुभवायला मिळतो. जसे, रस्मे उल्फत को निभाये, तुम जो मिल गये हो... इत्यादी अनेक गाण्यांतून माझ्या म्हणण्याचे वाचकांस प्रत्यंतर येऊ शकेल.

सुरुवातीला मी जे म्हटले, आपल्याकडे एखाद्या कलाकाराची बूज तो जिवंत असताना फारशी राखली जात नाही, आणि ती व्यक्ती गेल्यानंतर तिचे गोडवे गाण्याची मात्र अहमहमिका लागते!! मदनमोहन यांच्या बाबतीत नेमके असेच घडत आहे. म्हणूनच कदाचित, आजही या संगीतकाराचे नाव रसिक गौरवाने घेत असावेत!!