Saturday, 25 March 2017

इस मोड से जाते है

मी फार पूर्वी, प्रसिद्ध कवी सुधीर मोघ्यांचा "पक्षांचे ठसे "हा कविता संग्रह वाचत होतो, बहुदा हा संग्रह देखील, या कवीचा पहिलाच संग्रह असावा. कवीचा पहिलाच संग्रह असल्याने, काही ठराविक भावभावनांचे चित्रण वाचायला मिळत होते, काही नवीन प्रतिमा, काही वेगळे घाट तर कुठे रचनांबाबत नावीन्य वाचायला मिळत होते. असेच वाचत असताना,

"स्वच्छंद साथ देणारी वाट कधी भेटते
कधी दिलासा मागते तर कधी दिलासा देते
आकांक्षांना चैतन्याचा तिथे फुलोरा मिळतो
रक्तावाचूनच्या नात्याचा तिथेच अर्थ कळतो
    पण अतूट वाटणारे तेही बंध नकळत सैल होतात
    विस्मृतीच्या धुक्यामध्ये हरवतात, अंधुक होतात"

या ओळी वाचल्या आणि अचानक थबकल्यासारखे झाले. कुठेतरी या ओळींचे नाते कुठेतरी पूर्वी वाचल्याचे जाणवायला लागले. कवितांच्या अशाओळी वाचताना,  आपल्या बाबतीत असेच फार वेळा होते आणि आपले विचार अनंताच्या प्रवासाला निघतात आणि धुकाळ वातावरणातील वाट हुडकाव्यात त्याप्रमाणे संगती लावायचा प्रयत्न करतात. कधी प्रयत्न चुकतो, हताश होतो तर कधी आशयांशी नाते जोडणाऱ्या ओळीची आठवण मनात येते.
हिंदी चित्रपट "आंधी" मधील "इस मोड से जाते है" हे गाणे, कविता म्हणून वाचताना, माझ्या मनात सुधीर मोघ्यांच्या वरील ओळींशी "नाळ" जुळली. तसे बघितले तर दोन्ही कविता स्वतंत्र आहेत परंतु कवितेतील "रस्ते" या शब्दांवर केलेल्या प्रगट चिंतनाशी कुठेतरी वैचारिक नाते मात्र जुळले, हे नक्की. आता प्रत्यक्ष कविताच इथे मांडतो.


" इस मोड से जाते हो.
कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें
पत्थरकी की हवेली को शीशे के घरोंदे में
तिनको के नशेमन तक इस मोड से जाते है,

आंधी की तरह उडकर, इक राहू गुजरती हैं
शरमाती हुई कोई, कदमो से उतरती हैं
इन रेशमी राहों में, एक राहू तो वो होगी
तुम तक जो पहुंचती हैं, इस मोड से जाती हैं
इस मोड से जाते है

एक दूर से आती हैं, पास आके पलटती हैं
एक राह अकेली सी, रुकती हैं ना चलती हैं
ये सोचके मैं बैठी हूं, एक राह तो वो होगी
तुम तक जो पहुंचती हैं, इस मोड से जाते है"

हिंदी चित्रपट गीतांत "काव्य" नसते, चटपटीतपणा फार असतो अशी टीका अनेकवेळा केली जाते. जरी त्यात थोडा फार तथ्यांश असला तरी, ज्या कवींनी त्याबाबत नि:संशायरीत्या आपले योगदान दिले आहे, त्यात गुलजार यांचे नाव घ्यावेच लागेल. किंबहुना, गुलजार यांनी ज्या रचना गाणी म्हणून लिहिली त्यातील बहुतांश रचना या "कविता" म्हणून स्वतंत्रपणे वाचणे अवश्य ठरेल.  थोडे पुढं जाऊन असं देखील म्हटले, त्यांच्या कविता या अधिकतर भावकविता असतात, तर ते अजिबात धाडसाचे ठरू नये.
गुलजार यांची कविता वाचताना, पहिला परिणाम होतो तो, अत्यंत अनुरूप अशा शब्दांचा, शब्दांच्या योजनेचा, अभिव्यक्तीत घडणीचा, आणि बांधणीचा.  गुलजार यांची कविता शब्दांचाच आधाराने अस्तित्व घेते, वाढते आणि शेवटचा ठसा उमटवते, तो देखील शब्दांचाच!! चांगल्या अभिव्यक्तीचा एक सांगितलं  जातो,तिचं स्वतंत्र अस्तित्व भासूच नये. तिने आशयांत पूर्णपणे विलीन व्हावे. गुलजार यांची कविता वाचताना, जसा तिथे शब्दरूपाचा शोध असतो त्याचबरोबर भाषेशी चाललेला खेळ देखील तितकाच महत्वाचा असतो. कवितेतील, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा भावनाशाय आणि त्याची यांत्रिक, तर्कात्म, मानसशास्त्रीय या तत्त्वांपासून सौंदर्यात्मक तत्वांवरील बंदिश, असा प्रवाह अवलोकन करणे, केवळ मनोज्ञ आणि अंतर्मुख करणारेअसते.त्यातून आणखी एक वैशिष्ट्य कायम जाणवत आलेले आहे, भाषेच्या सामान्य व्यवहारातील उपयोगामुळे शब्दांभोवती पडलेले अर्थांचे पापुद्रे/कडे मोडून तेच शब्द काव्यात्म पातळीवर निराळ्या अर्थाने अर्थवाही करण्याचे प्रयत्न फारच लक्षवेधी ठरतात. 
मुळात, "आंधी" चित्रपट म्हणजे पडद्यावरील अप्रतिम भावकाव्य आहे. त्यामुळे, या चित्रपटातील गाणी, ही "कविता" म्हणून नेहमीच असामान्य ठरली आहेत आणि अशी सक्षम कविता राहूल देव बर्मनच्या हाती आल्यावर, त्याने मिळालेल्या संधीचा सुरेख उपयोग करून घेतला.
गाण्याची सुरवात एका दीर्घ आलापीने होते. पर्वत शिखरांच्या पार्श्वभूमीवरील हा दीर्घ आलाप, आपल्याला पहिल्या सुरांतच, स्वररचना यमन रागावर आधारलेली आहे, याचे सूचना करून देते आणि आणि हा आलापच रसिकांचे लक्ष वेधून घेतो. हा आलाप तास सरळसोट नाही. सुरांच्या भाषेत लिहायचे झाल्यास, "सा........ नीधपग... ग रे म(तीव्र)  ध प ", असा आहे. इथे मी मुद्दामून अशी भाषा वापरली, जेणेकरून या आलापाची तीव्रता ध्यानात यावी. "नीधपग" हीच सुरावट यमन रागाची आठवण करून देते.  यमन रागावर आधारित आतापर्यंत असंख्य गाणी झाली आहेत आणि यापुढे देखील खंड पडेल असे वाटत नाही. या आलापला धरूनच आपल्या कानावर शब्द येतात, "इस मोड से जाते है". ही ओळ गाताना, "मोड" या शब्दाला किंचित स्वरिक हेलकावा दिला आहे आणि या ओळीतील, या शब्दाचे महत्व दर्शवून दिले आहे.
गाण्यातील शब्द आणि त्यामागील आशय जाणून घेतला की मग हाताशी असलेली स्वररचना आणि त्यातील लपलेले सौंदर्य, याचा मनोरम खेळ सुरु होतो.  एव्हड्याच साठी मी सुरवातीला सगळी कविता मांडली जेणेकरून, स्वरांच्या प्रवासाचा मागोवा घेताना, शब्दागणिक स्वरांच्या साहाय्याने जे अर्थांचे पदर उलगडले गेले आहेत, त्याचा नेमका अर्थ ध्वनित होईल. "कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें", ओळीच्या पहिल्या भागातील "सुस्त" शब्द गाताना, स्वर किंचित खालच्या पातळीवर ठेवला आहे तर "तेज" शब्द गाताना, स्वर थोडा वरच्या पट्टीत गेला आहे. अर्थात याचे श्रेय जितके लताबाईंची तितकेच संगीतकाराचे देखील. ललित संगीताच्या आस्वादात या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि पण बरेच वेळा अशा सौंदर्यस्थळांकडे अक्षम्य असे दुर्लक्ष करतो. परत हीच ओळ ओळ गाताना " मोड" शब्द गाताना घेतलेली अशीच लक्षणीय आहे. पायाखालची वाट आहे पण वाटेवर वळणे आहेत, हे जसे शब्दांतून मांडले आहे तसेच स्वरांतून देखील त्याच ताकदीने दर्शविले आहे. 
जेंव्हा कुठलाही संगीतकार गाण्याची चाल बांधत असतो तेंव्हा त्या चालीबरोबर, पार्श्वभागी वाजणारा वाद्यमेळ देखील तितकाच सर्जनशील असतो, याची नेमकी जाणीव ठेवत असतो. इथे पहिला अंतरा सुरु व्हायच्या आधी, प्रथम बासुरीचे स्वर, त्याला जोडून सतार आणि सरोद वाद्यांचे स्वर कसे ध्रुवपदाच्या स्वरावलींशी अचूक नाते राखून आले आहेत.  खरतर इथं परत एकदा स्वररचना मांडायचा मोह होत आहे पण तो मोह टाळून पुढे वळतो. या तिन्ही वाद्यांच्या एकत्रीकरणाने नेहमीच्या प्रणयी भावनेला एकदम उत्फुल्ल बनविले आहे आणि सगळेच गाणे फार वरच्या पातळीवर जाऊन बसते.  त्यातहे एक गंमत - वाद्यमेळाची सुरवात बासरीच्या ज्या सुरांनने होते आणि पुढे सतार आणि सरोद मधून तीच स्वररचना विस्तारित जाते पण जेंव्हा पहिल्या अंतऱ्याची वेळ येते तेंव्हा परत रचना सुरवातीच्या बासरीच्याच स्वरांशी येऊन विसर्जित होते. हा स्वरिक खेळ परत, परत ऐकण्यासारखा आहे. संगीतकाराच्या, लयीवरील प्रभुत्वाची नेमकी साक्ष देणारी आहे.
पहिला अंतरा रागाची कास सोडून स्वतंत्र होतो. प्रतिभावंत संगीतकाराचे हे एक वैशिष्ट्य नेहमीच मानता येईल, चालीला रागाधार असावा पण चाल पुढे स्वतंत्र असावी. सर्जनशीलतेची एक प्रभावी लक्षण मानता येईल.  पहिला अंतरा सुरु होतो तोच मुळी, "प प प म(तीव्र) ध प म(तीव्र)" अशा स्वरांवर!! यमन रागाच्या आरोही सप्तकात पंचमाला स्थान नसून इथे राहुल देव बर्मनने हा स्वर कोंदणात बसवला आहे .  या संगीतकारावर असंख्य आरोप झाले आणि त्यातील काही खरे असले तरी या माणसाच्या भारतीय संगीताच्या व्यासंगाबद्दल शंका घेण्याचे काहीच कारण नाही. हा संगीतकार प्रचलित भारतीय संगीतापासून जरी कितीही दूर गेला असला तरी परत, परत याची नजर भारतीय संगीताकडे वळत होती आणि हे निखालस सत्य आहे.
"एक दूर से आती हैं, पास आके पलटती हैं". किशोरकुमारांचा अत्यंत निकोप, अनक्रोशी आणि स्वच्छ आवाज.  ललित संगीतात - भारतीय ललित संगीतात असे दोनच आवाज झाले आहेत ज्यांच्या गायकीलाआपण "शब्दभोगी" गायकी असे सार्थपणे म्हणू शकतो. १) आशा भोसले, २) किशोर कुमार. अतिशय  शांत, रसाळ चाल हाताशी आल्यावर, किशोर कुमार आपल्या गायनातून कसे निखळ व्यक्त होतात, याचा ही ओळ ऐकून समृद्ध अनुभव घेता येतो. वास्तविक गाण्यातील प्रत्येक अंतरा वेगळ्या अशा चालीने बांधलेला नाही (तसे अंतरे  बांधणे,हे देखील सर्जनशीलतेचा एक निकष म्हणून मानता येऊ  शकते) परंतु या गाण्याचा  मुखडाच इतका वेधक बांधलेला आहे की पुढे कसल्याच कलाकुसरीची गरज पडत नाही.
संगीतकार म्हणून राहुल देव बर्मन, गाण्याच्या तालात नेहमीच काहीतरी नावीन्य आणीत असतो. इथे देखील केरवा ताल वापरला आहे पण प्रचलित तालाचे चलन आणि गाण्यातील मात्रांचे वजन, यात सत्कृतदर्शनी काहीही साम्य आढळत नाही पण मात्रांचा मागोवा घेत, हिशेब ठेवला म्हणजे आपल्याला केरवा तालाची ओळख पटते. 
एकंदरीत विचार करता, यांचे संगीत, रचनाकाराच्या संभवनीय सर्जनशीलतेविषयी दर्जा आणि खात्री पटविणारे असे संगीत आहे. त्यांनी जे संगीत आकारले ते केवळ चित्रपटीय सादरीकरणासाठी. परस्परविरोध, विरोधाभास, आणि विसर्जित न केलेले सांगीत तणाव यांचे आकर्षण म्हणजे आधुनिक सांगीत संवेदनशीलता.  या दृष्टीने संगीतकार राहुल देव बर्मन यांनी हिंदी चित्रपट संगीताला नवीन आयाम दिले हे आपल्याला नक्कीच करावे लागेल.