Saturday, 5 March 2016

चिंगारी कोई भडके

मध्यरात्रीची वेळ!! आसमंतात सगळीकडे निरव शांतता आणि अशा वेळेस "तो" आणि "ती" एकत्रपणे, एका होडीवर बसून हावरा नदीच्या पात्रातून विमनस्क मनस्थितीत हिंडत आहेत. साक्षीला केवळ पाण्यातील वल्ह्यांचा आवाज. कुणालाच काहीही बोलावेसे वाटत नसते. खरतर आजूबाजूची शांतता(च) इतकी बोलका संवाद साधत असते की तिथे शब्द परके वाटावेत. चेहऱ्यावरून आपल्याला सहज कळून घेता येते, मनात कसलेतरी दु:ख कोंडलेले आहे पण तरीही त्याला "वाचा" फोडायची इच्छा होत नसते. काही वेदना अशाच असतात, त्याला जरा जरी शब्दांचा धक्का लागला तर ती वेदना लगेच प्रदूषित होईल!! 

"अमर प्रेम" चित्रपटातील "चिंगारी कोई भडके" या गाण्याची ही पार्श्वभूमी. वास्तविक चित्रपटाची नायिका ही कोठीवरील गायिका. तिला कसले वैय्यक्तिक सुख किंवा दु:ख!! असे असून देखील एकेकाळी तिच्या गाण्यातील मार्दवावर फिदा झालेला एक आशिक, आता तिचा सहचर झालेला असतो आणि तिच्या सगळ्याच भावभावनांचा साक्षीदार झालेला असतो. एक संध्याकाळी, नायिकेला, आपल्या आईच्या मृत्यूची बातमी कळते आणि साहजिकच ती उन्मळून पडते. ती वेदना नेमकेपणी जाणून घेऊन, नायक तिला त्या जागेतून बाहेर काढतो आणि शहरापासून दूर अशा नदीच्या सहवासात ती संध्याकाळ व्यतीत करायचे ठरवतो. 
"दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही. 
मी तसा प्रत्यक्ष नाहीं, ना विदेशी मी जसा,
मी नव्हें की बिंब माझे, मी न माझा आरसा". 
कवी आरतीप्रभूंच्या या ओळींचे साक्षात प्रतिबिंब दिसावे तसा हा चित्रपटातील प्रसंग आहे. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर, दोघांच्याही कारकिर्दीतील ज्या काही रमणीय भूमिका आहेत, त्यातील ही वेचक भूमिका. वास्तविक, वर म्हटल्याप्रमाणे नायिका ही कोठीवरील गायिका म्हणजे वारांगना. तिच्या वेदनेला समाजाच्या दृष्टीने कसलाच अर्थ नसतो. नायक तर तिच्या आवाजावर मोहित होऊन, त्या कोठीवर यायला लागलेला. नायक देखील असाच, आतल्या आत तडफडणारा. संसार सुख नसल्याने बाहेरख्याली झालेला आणि आसावलेला!! तरीही दुसऱ्याच्या मनाची बूज ठेवण्याइतका मनाचा मोठेपणा दाखवणारा. चित्रपटाची सगळी कथा ही याच दोन व्यक्तिरेखांवर आधारलेली आहे आणि या दोघांनी आपल्या अभिनय शैलीने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. 
गाण्याच्या पार्श्वभूमीचा विचार करता, नायिकेच्या आईचा मृत्यू झाल्याची बातमी, अर्थात तिला हतबल करणारी आणि ती हतबलता जाणून घेऊन, तिला कोठीवरून बाहेर काढण्याची सुबुद्धी सुचलेला नायक!! दिग्दर्शक शक्ती सामंता यांनी याच दृष्टीने, हे गाणे नदीच्या प्रवाहाच्या सहाय्याने, गडद अंधाऱ्या वातावरणात सादर केलेले आहे. पडद्यावर आपल्याला फक्त पाण्यात चालत असलेली ती नाव आणि त्यावर विसावलेले हे जगावेगळे जोडपे, इतकेच दिसते. 
संगीतकार राहुल देव बर्मन यांनी या गाण्याची चाल बांधताना, या सगळ्या बाबींचा विचार केलेला आढळतो. गाण्याला थोडी "बंगाली" छटा बहाल केली आहे. अर्थात, बंगालची प्रसिद्ध नदी पार्श्वभूमीवर असेल म्हणून कदाचित पण त्यात छटेने गाण्याला गहिरा रंग दिला आहे, हे निश्चित. 
गाण्याची सुरवात "बेस गिटार" आणि "बांसुरी" यांच्या अप्रतिम स्वरांनी होते. मुळात बासरीचे स्वर हे हळुवार आणि मार्दव भावना दर्शवणारे. गिटार वाद्यातून झणत्कार करणारे काहीसे "आवाजी" पण "आर्जवी" सूर आणि त्याला मिळालेली बासरीची साथ!! गाणे कशाप्रकारे विस्तारत जाणार आहे, याची "झलक" दाखवते. या बासरीच्या सुरांनीच आपण नदीकिनारी पोहोचतो. मुळात बंगाली संगीतात या वाद्याने कमाल केली आहे. शहरापासून दूर गेलेले वास्तव या सुरांनी अधोरेखित केले आहे. इथे आणखी एक गंमत आहे. स्वरमेळ चालू असताना, त्याच गिटारचा तालवाद्य म्हणून उपयोग करून घेतला आहे आणि तो नाद, तशाच प्रकारे गाण्यात घेतल्याने, गाण्याचा "मुखडा" देखील विलक्षण गंभीर होतो,
जो या गाण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. या गाण्यात त्या दृष्टीने तालाचा विस्तार अवलोकणे, हा बुद्धीगम्य भाग निश्चित आहे. 
हा वाद्यमेळ संपत असताना, किशोर कुमारचा हुंकारात्मक आलाप ऐकायला मिळतो. हा आलाप इतका गंभीर आहे की सगळी रचना त्यातून सुचित होते. 
"चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये;
सावन जो अगन लगाये, तो उसे कौन बुझाये;
पतझड जो बाग उजाडे, वो बाग बहार खिलाये;
 जो बाग बहार में उजडे, उसे कौन खिलाये. 
इथे संगीतकार म्हणून राहुल देव बर्मनने सुरेख करामत दाखवली आहे. "चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये" ही ओळ गाताना, तबल्याचे बोल सुरु होतात - "कोई" या शब्दावर केरवा ताल सुरु होतो. वास्तविक हा ताल चित्रपट गीतांत अनंतवेळा वापरला आहे. माझे या बाबतीत एक ठाम मत आहे. राहुल गाण्यात ताल वापरताना, नेहमीच पारंपारिक पद्धत धुडकावतो. वास्तविक, केरवा हा ८ मात्रांचा ताल आहे पण या गाण्यात वापरताना, त्याने "कोई" शब्दावर सुरवात करून,"भडके" मधील "भ" अक्षरावर समेच्या मात्रेचा आघात घेतला आहे. परिणाम असा होतो, गाण्यातील वेदनेची "आस" आहे, ती इथे नेमकेपणाने दर्शवली जाते आणि ती दर्शवताना, समेच्या मात्रेत गिटारचे सूर मिसळले आहेत. संगीतकाराची गुणवत्ता दिसते ती अशा ठिकाणी. तालाच्या सादरीकरणात वेगळेपण येते. 
कुठल्याही संगीतकाराला गाणे तयार करताना, गाण्यातील कुठल्या शब्दावर किती "वजन" द्यायचे, हे ठरवावे लागते आणि त्यानुरूप पुढील सगळी रचना आधारायला लागते, मग तुम्ही "आधी शब्द, मग चाल" किंवा "आधी चाल, मग शब्द" यापैकी कुठलीही पद्धत अनुसरा. किशोर कुमार जेंव्हा गाणे गातो तेंव्हा ते गायन बव्हंशी "शब्दभोगी" गायन असते!! हे मी पुरेशा गंभीरपणे विधान करीत आहे. गाणारे सगळेच शब्दांचे महत्व जाणून गात असतात परंतु गाताना, आपण जे शब्दोच्चार करतो, ते करताना शब्दातील आशयाशी किती तद्रूपता राखतात, इथे फरक पडतो. किशोर कुमार हा काही प्रशिक्षित गायक नव्हता पण त्याची शब्दाची जाण विलक्षण खोल होती. दुर्दैवाने, किशोर कुमार म्हटले की लगेच लोकांच्या समोर त्याचे "यॉडलींग" येते. अर्थात तसे गायन करणारा, किशोर कुमार, हा भारतातील एकमेव गायक!!   प्रशिक्षित गायक जरी नसला तरी गळ्यातली गुणवत्ता अफाट होती. इथे एक तांत्रिक उदाहरण देतो. "चिंगारी" शब्द गाताना, त्याच्या गळ्यातून अनाहूतपणे असेल, "मध्यम" स्वराचा स्पर्श झाला आहे जो पुढे "गंधार" स्वराशी जोडला गेला आहे, तो केवळ अविस्मरणीय आहे. किती प्रशिक्षित गायक इतका अप्रतिम परिणाम दाखवू शकतील, शंका आहे. 
राहुल गाण्याचा वाद्यमेळ नेहमीच अनोख्या प्रकाराने सजवत असतो. पहिला अंतरा संपतो आणि आपल्याला मेंडोलीन वाद्याचे स्वर ऐकायला मिळतात. तसेच दुसरा अंतरा संपताना, एके ठिकाणी सनईचे तीक्ष्ण स्वर ऐकायला मिळतात. एक वाद्य मंद्र सप्तकात आहे तर सनई किंचित तार स्वरांत आहे पण तिथेही राहुलने सनईचे स्वर संपूर्णपणे "काबूत" ठेवले आहेत.गाण्याच्या भावनेतील ऋजूता लक्षात घेऊन केलेली ही रचना आहे.   
गाण्यातील शब्द तसे फार काही प्रभावी नाहीत पण चित्रपटातील प्रसंग गहिरा करणारे आहेत. ठराविक साच्यातील उपमा आणि प्रतीके योजली आहेत. चित्रपटातील गाणे नेहमी, आहे तो प्रसंग अधिक खोलवर नेण्यासाठी वापरलेले असते/असावे आणि ती गरज इथे पूर्ण होते. किशोर गायक म्हणून किती श्रेष्ठ होता, याचे एक सुंदर उदाहरण इथे मांडता येईल. दुसरा अंतरा सुरु होतो, तो 
ना जाने क्या हो जाता, जाने हम क्या कर जाते;
पीते हैं तो जिंदा हैं, ना पीते तो मर जाते;
दुनिया जो प्यासा रख्खे, तो मदिरा प्यास बुझाये;
मदिरा जो प्यास लगाये, उसे कौन बुझाये. 
इथे एकतर गाण्याची "उठावण" वेगळ्या सुरांवर होते (गाण्याच्या मुखड्याची चाल ध्यानात ठेवली तर फरक लगेच समजून घेता येईल) आणि त्याच लयीत गाणे सुरु असताना, स्वरावली बदलते पण, 
दुनिया जो प्यासा रख्खे, तो मदिरा प्यास बुझाये;
मदिरा जो प्यास लगाये, उसे कौन बुझाये. 
या ओळी गाताना किशोरचा आवाज किती "गहिरा" (गहिरा आणि गहिवरलेला यातला फरक लक्षात ठेवला तर समजून घेता येईल) होतो, हे खास ऐकण्यासारखे आहे.नायिकेची मन:स्थिती ध्यानात ठेऊन, या ओळीची स्वरावली बांधली आहे. राहुल, प्रसंगी चाल बदलायला बिनदिक्कत तयार असतो, जेणेकरून पडद्यावरील प्रसंग उठावदार होईल. चित्रपट माध्यम हे असेच आहे, इथे तुकड्या तुकड्यांनी सगळे सांधायचे असते आणि ते सांधताना तुकड्यांची जाणीव विसरायला लावायची!! 
पडद्यावर गाणे अतिशय संयतरीत्या सादर केले आहे. कुठेही भावनांचा आक्रोश किंवा भावविवशता दिसत नाही. सगळे मूकपणे मान्य करून वाटेला आलेले प्राक्तन स्वीकारायचे, याच हिशेबाने सगळा अभिनय आहे. पडद्यावरील अंधाराची आणि नदीच्या पाण्याची घनता संगीताच्या माध्यमातून खोल होत असताना, आपण मात्र या गाण्याच्या आहारी जात असतो. हा सगळा मूक रुदनाचा आणि अंतस्थ तडफडाटाचा आविष्कार आहे. विशेषत: शर्मिला टागोरचा "मूक" अभिनय बघणे, हे आनंद निधान आहे. गाणे राजेश खन्नावर चित्रित झाले आहे पण गाण्यातून वेदना मांडली, शर्मिलाची. असे भाग्य फारच कमी चित्रपट गीतांच्या वाटेला येते. चित्रपट गीत आपल्या भावनांच्या दिशा अधिक विस्तारत नेते, यापेक्षा आणखी वेगळे यश ते कुठले?