संध्याकाळची शांत, मंद, मदिर वेळ. नेहमीचे हॉटेल तसे ओकेबोके वाटत होते, अजूनही हॉटेलमध्ये येणाऱ्या गिऱ्हाइकांची वर्दळ नसल्याने एकूणच आसमंत काहीसा निर्जीव" भासत होता. हळूहळू एकेक करून माणसे येउन, टेबलावर बसायला लागली आणि ते हॉटेल "जिवंत" व्हायला लागले. संध्याकाळी, इथे दर दिवशी गाणी आणि नृत्याचा कार्यक्रम, हे खरे आकर्षण असल्याने बरेचसे "आंबटशौकीन" तसेच खलबते करणारी माणसे आजूबाजूला वावरायला लागली.
गाण्याचा कार्यक्रम असल्याने, स्टेजवर वादक आपली वाद्ये जुळवून, गायिकेच्या प्रतीक्षेत. अचानक, हॉटेलमध्ये गिटार,चेलो आणि clarinet वाद्ये झंकारायला लागली आणि ते वातावरण धुंद व्हायला लागले. नेहमीची माणसे यायला लागली आणि स्टेजवर गायिकेचे आगमन होते!! आगमन होतानाच, तिच्या गळ्यातून धुंद करणारा आलाप येतो आणि वातावरणात खऱ्याअर्थी "नजाकत" निर्माण होते.
चित्रपट "हावरा ब्रिज" मधील, "आईये मेहरबां" हे अत्यंत लोकप्रिय गाणे आणि त्या गाण्याची ही पार्श्वभूमी. दिग्दर्शक शक्ती सामंता यांनी, हे गाणे चित्रित करताना, खूपच कल्पकता दाखवली आहे. अर्थात, संगीतकार ओ.पी. नैय्यर यांच्या रचनाकौशल्याचा सिंहाचा वाटा. गाण्यात , मधुबाला, अशोक कुमार आणि के.एन.सिंग असे तगडे अभिनेते आहेत. असे असून देखील पडद्यावर छाप पडते, ती मधुबालाचीच.
"तोंच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ
आलीस मिरवित चालीमधुनी नागिणीचा डौल,
करांतून तव खिदळत आले स्तनाकार पेले
जळता गंधक पाच उकळती यांही रंगलेले."
कविवर्य बा.भ.बोरकरांच्या अविस्मरणीय ओळींची ग्वाही देत, मधुबाला स्टेजवर येते ती अशाच एखाद्या नागिणीचा डौल घेऊन आणि त्याच्या साथीला आशा भोसल्यांचा अवर्णनीय मादक स्वर. पडद्यासारखी निर्जीव चीज देखील हे सौंदर्य बघून बावचळून जायची तिथे आपल्यासारख्या स्खलनशील मानवाचे काय वर्णावे!! स्टेजवर तिचा जो प्रवेश आहे, तो खास बघण्यासारखा आहे. आपण एका हॉटेलमधील प्रसिद्ध गायिका आहोत आणि आपले काम, हॉटेलमध्ये येणाऱ्या माणसांचे मन रिझवणे, हे आहे आणि या कामाची पूर्तता, तिच्या स्टेजवरील आगमनातून पुरेपूर दिसून येते. खरेतर पुढील सगळे गाणे म्हणजे गाण्यावर अभिनय कसा करावा याचा सुंदर वस्तुपाठ आहे.
आता आपण गाण्याकडे वळूया. गाण्यातील शब्दकळा काही असामान्य अशी अजिबात नाही, अर्थात हॉटेलमधील नृत्यगीत आहे म्हणजे त्यात अलंकारिक भाषा,प्रतिमा, उपमा यांना फारशी जागा नसते. परंतु तरीही शब्द लिहिताना, चालीचा "मीटर" ध्यानात घेऊन, चित्रपटातील प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन रचना करावी(च) लागते. चित्रपट गीतकारांना उठसूट नावे ठेवण्याची आपल्याकडे पद्धत आहे पण त्यांनी या बाजूकडे देखील लक्ष दिले तर असला "फिजूल" आरोप करण्याकडे ते वळणार नाहीत.
गिटारच्या पहिल्या सुरांपासून गाण्याचे "घराणे" ध्यानात येते. आता हॉटेलमधील नृत्यगीत आणि ते हॉटेल देखील संपूर्णपणे पाश्चात्य धाटणीचे म्हटल्यावर गाण्याची चाल देखील त्याच धर्तीवर असणार, हे ओघानेच आले. गाण्याच्या सुरवातीच्या वाद्यमेळात गिटार, चेलो सारखी वाद्ये वाजत असतात आणि त्या वाद्यांनी गाण्याची अप्रतिम पार्श्वभूमी तयार झाली आहे. इथे आणखी एक बाब नजरेसमोर आणावीशी वाटते. आपल्याकडे संगीतकार किंवा रचनाकार म्हटले की त्याला रागदारी संगीताचे प्राथमिक ज्ञान आणि परिपूर्ण अभ्यास असणे गरजेचे आहे, असा प्रवाद प्रसिद्ध आहे. मला स्वत:ला तसे वाटत नाही. या गाण्याचे संगीतकार ओ.पी.नैय्यर यांनी असा कुठलाही अभ्यास केला नव्हता पण तरीही त्यांच्या कितीतरी रचना या रागदारी संगीतावर आधारित आहेत आणि त्या रचना करताना, कुठेही चाचपडलेपण आढळत नाही. चित्रपट गाणे हा एक स्वतंत्र आविष्कार असतो आणि त्यासाठी काव्याची जाणकारी तसेच वाद्यांची परिभाषा माहितीची असली तरी देखील खूप प्रमाणात पुरेसे ठरू शकते.
"आईये मेहरबान, बैठीये जानेजां
शौक से लिजिये, इष्क की इम्तेहान."
इथे आशाबाईंनी "आईये" शब्द कसा घेतला आहे, हे ऐकण्यासारखे आहे. स्वरांत जितका म्हणून "मादक"पणा आणता येईल (यात कुठेही उठवळ वृत्ती दिसत नाही आणि हे फार महत्वाचे) तितका आणला आहे गाताना किंचित "आ"कार लांबवला आहे आणि त्यातूनच गाण्याचा पुढील विस्तार कसा असेल, याचे मदभरे सूचन केले आहे. "आईये" शब्दाचा किंचित उच्चार करून त्यालाच जोडून "हुंकारात्मक" स्वरिक आवाहन आणि त्याच्या जोडीला मधुबालाची दिलखेचक हालचाल!! सगळा "माहौल" तयार!! हॉटेलमध्ये पाहुणे आले आहेत आणि त्यांच्यासाठी आजची संध्याकाळ अविस्मरणीय करायची, याच उद्देशाने ही रचना बांधली आहे आणि मग त्यासाठी "ला ला ला" असे निरर्थक शब्दोच्चार देखील अर्थपूर्ण ठरतात. ही किमया आशाबाईंच्या अलौकिक गायनाची. स्वरावली कागदावर असते परंतु गायकाच्या गळ्यातून खऱ्याअर्थाने, त्या स्वरावलीला पुनर्जन्म मिळतो आणि मग ती रचना चिरंजीव होते.
गाण्याची धाटणी ही सरळ,सरळ पाश्चात्य "waltz" धर्तीवर आहे आणि त्याच थाटात, गाण्याचा नृत्याविष्कार आहे. तालासाठी जरी काही ठिकाणी "चायानील ब्लॉक" हे वाद्य वापरले असले तरी गाणे जेंव्हा सुरु होते तिथे संगीतकाराने, ज्या वाद्याच्या आधारे सगळी कारकीर्द सजवली त्या ढोलक वाद्याचा आणि जोडीने पारंपारिक तालाचा वापर केला आहे. हॉटेल मधील पाश्चात्य धर्तीवर गाणे आणि तरीही तालाला ढोलक!! अर्थात याचे श्रेय पूर्णपणे संगीतकाराकडे जाते. तालाला ढोलक असूनही गाणे कुठेही "विशोभित" होत नाही!!
गाणे जरी सर्वस्वी मधुबालाचे असले तरी अशोक कुमारचे अस्तित्व देखील खास आहे. तोंडात रुबाबात सिगारेट पेटवून, धूर काढत असताना, ओंठावर जे हास्य विलसत ठेवले आहे, ते बघत गाणे ऐकणे हा सुंदर अनुभव दार्शनिक अनुभव ठरतो. खरेतर या अभिनेत्याच्या प्रत्येक हालचालीत "ग्रेस" आहे, कुठेही "बेंगरूळ" होत नाही. मधुबाला आपल्यावर "फिदा" आहे, याचा अभिमान तसेच ती गाताना शेजारी(च) बसलेल्या के.एन. सिंगला सतत डिवचत असते (हे डिवचणे देखील अतिशय लाघवी आहे!!) त्यामुळे सुखावलेला अहंकार देखील बघण्यासारखा आहे. गाण्यात शेवटाला. मधुबाला त्याला, आपल्याबरोबर नृत्य करायचे आमंत्रण देते, त्यावेळचा आविर्भाव देखण्यालायक आहे.
"कैसे हो तुम नौजवान, कितने हसीन मेहमान
कैसे करू मैं बयां, दिल कि नहीं हैं जुबां."
गाण्यातील आशय ध्यानात ठेऊन, चित्रीकरण केले असल्याने गाणे ऐकण्याबरोबर बघायला देखील मनोरंजक आहे. वरील ओळीतील "नौजवान" शब्दावर Camera अशोक कुमारच्या चेहऱ्यावर क्षणमात्र स्थिर ठेवला असून, या ओळीच्या वेळेस, दोघांनाही असेच वाटत असते मधुबाला "आपलीच" आहे!! गाण्याची चाल तशी प्रत्येक टप्प्यात सारखीच आहे म्हणजे पहिला अंतरा वेगळा, दुसरा वेगळा असले प्रयोग नाहीत पण गाणे इतके वेगात पुढे सरकत असते की त्याची जाणीव देखील आपल्याला होत नाही. दोन्ही अंतऱ्याच्या मध्ये Waltz च्या तालावर twist नृत्याची जोड दिली आहे आणि त्याने गाण्यात वेगळीच खुमारी येते. वास्तविक पाश्चात्य नृत्य म्हणजे म्हणजे दोन शरीरांची भेट, इतपत तोकडा अर्थ नसतो तर शारीरिक हालचालीतून किंवा अंगप्रत्ययांतून तालाचे देखणे सौंदर्य दाखविले जाते फक्त ते ओळखण्याची "नजर" हवी!!
"देखा मचल के जिधर, बिजली गिरा दी उधर
किस का जला आशियां, बिजली को ये क्या खबर."
चाल तशीच आहे पण सादरीकरण बहारीचे आहे. या ओळींच्या वेळेस, मधुबाला, के.एन.सिंग यांच्या जवळ जाते पण त्यांना हुलकावणी देत, अशोक कुमारकडे वळते. दोन्ही वेलची देहबोली तर खास आहे. छचोरपणा नक्कीच आहे पण उठवळपणा नाही त्यामुळे ते "झुलवणे" देखील आल्हाददायक होते.
गाण्याच्या सांगीतिक रचनेबद्दल थोडे दोन शब्द. मोहिनी घालणारे, भुलविणारे संगीत:अशारीर प्रेम किंवा रूढीमान्य, शिष्टसंमत प्रेमाविरुद्ध बंड पुकारणारे भाव, परकीय वाटणाऱ्या आणि चमकदार वाद्यध्वनींचा कौशल्यपूर्ण वापर आणि सर्वसाधारणत: मान्य भाषिक आणि उच्चार संकेतांना तिलांजली अशी यादी करावी लागेल. स्पष्ट बोलायचे झाल्यास, या प्रकारच्या गीतांना सूक्ष्म सुरेलपणापासून दूर सरकायचे असते. संबंधित गायक वा वादक यांना सुरावट दाखवता, दाखवता नियंत्रित पद्धतीने बेसूर होता यावे यासाठी चालीत हेतुपूर्वक काही जागा निर्माण केलेल्या असतात. नैतिक कक्षेच्या बाहेर जाण्याच्या आशयास चालीतही जणू काही समांतर बांधणी असते. या सगळ्या आणि इतर अनेक वैशिष्ट्यांसाठी संगीतकार ओ.पी.नैय्यर निश्चित प्रशंसेस पात्र आहेत.
हिंदी चित्रपट संगीतात, सी. रामचंद्र यांनी जो पाश्चात्य संगीताचा पायंडा पाडला त्या मार्गाला आणखी वेगळे वळण देण्याचे काम या गाण्याने केले आणि या मार्गावर आणखी अनेक विस्तार सुचविण्याच्या शक्यता भरपूर निर्माण केल्या. त्या दृष्टीने, हे गाणे निश्चितच एक "मैलाचा" दगड म्हणून गणले गेले.