Tuesday, 16 September 2014

एक विदारक अनुभव:

आपल्याकडे एक समज आहे आणि त्याच बरोबर आकर्षण देखील आहे - गोऱ्या लोकांच्या समाजाबद्दल. समज असा आहे, "हे लोक किती श्रीमंत असतात आणि किती सुंदर आयुष्य व्यतीत करतात"!! यामधील, दुसरा भाग बरोबर आहे पण पहिला निश्चितच नाही. आयुष्य कसे उपभोगावे, याचा एक सुंदर वस्तुपाठ मला, माझ्या साउथ आफ्रिकेच्या १७ वर्षांच्या वास्तव्यात भरपूर मिळाला. अर्थात, मला भेटलेले सगळेच गोरे काही श्रीमंत म्हणावेत असे नव्हते परंतु वागण्या-बोलण्यात त्यांच्या अशी काही "ऐट" असायची की आपण त्यांच्याकडून काही शिकावे आणि मी भरपूर शिकलो देखील. अर्थात, मानवी स्वभाव हा कितीही वेगवेगळा भासला तरी अखेर भावनांचे पदर हे बरेचवेळा एकपदरी(च) असतात.
२००६ मध्ये, मला रस्टनबर्ग इथे नोकरी मिळाली आणि मी पीटरमेरीत्झबर्ग सोडले. रस्टनबर्ग हे तसे छोटेसे गाव किंवा तालुका म्हणावा इतकाच भौगोलिक विस्तार. इथूनच पुढे ४० किलोमीटरवर जगप्रसिद्ध "सन सिटी" आहे. इथे मी, Accounts विभागाचा प्रमुख म्हणून नेमणूक झाली आणि माझ्या डिपार्टमेंट एकूण, ५ माणसे होती आणि त्यातील दोन गोऱ्या मुली होत्या. आत्तापर्यंत, माझा गोऱ्या मुलींशी थेट काम करायचा कधी फारसा दीर्घकालीन संबंध आला नव्हता पण आता मात्र रोजच्या रोज येणार, ही मनाशी खूणगाठ बांधली. एकीचे नाव, "लेनी" आणि दुसरीचे नाव "लिंडा". बाकीची मंडळी या कंपनीत काही वर्षे काम करत असल्याने, "वर्क कल्चर" बाबत मी थोडा अनभिज्ञ!! तरीही, पहिल्याच दिवशी लेनी माझ्या केबिनमध्ये आली आणि पुढील एका तासात, कंपनीची सगळी इत्थंभूत माहिती दिली. मला देखील फार बरे वाटले.
लेनीने मला पहिल्याच दिवशी स्पष्ट केले, तिला स्मोकिंग फार आवडते - अगदी दिवसाला कमीतकमी ६ सिगारेट्स ओढते आणि तशी मला अधून मधून "विश्रांती" घ्यावी लागेल. आता अशी सुरवात झाल्यावर, मला देखील खवचटपणा करायचा "मूड" आला मी लगेच बोललो, "As long as, there's no drugs smoking, I don't mind"!! ती देखील थोडी चमकली पण माझ्या चेहऱ्यावरील स्मिताने तिला अधिक मोकळेपणा वाटला. वय, वर्ष २० - उंच, सडपातळ बांधा, वाचायला चष्मा, केस पिंगट सोनेरी आणि मनाने थोडी फटकळ पण मोकळी!! कामाला वाघ म्हणजे, ऑफिसमध्ये क्वचित कधी तिच्या मित्राचा फोन तिने घेतल्याचे, मला आठवत आहे. अन्यथा ऑफिसवेळेत, शक्यतो फक्त काम!! अर्थात, कधी कधी ऑफिसवेळेनंतर काम करणे जरुरीचे असायचे आणि त्यावेळेस मात्र, आमचे बोलणे अधिक मोकळेपणी व्हायचे.
त्यातून समजलेली माहिती - सध्या तिचे तिसऱ्या बॉयफ्रेंड बरोबर "सूत" जुळलेले आहे आणि त्यानिमित्ताने, पहिल्या, दोन मित्रांशी संबंध का तुटले, याची माहिती देखील समजली. गावात आई, वडील असून देखील, जिद्दीने एकट्याने राहण्याचा निर्णय घेतलेला आणि त्यामुळे,जगताना होणारी धावपळ, हे सगळे आता मला रोजच्या रोज दिसत होते. मी जिथे रहात होतो, तिथून तिचे घर, फक्त २ मिनिटांवर (चालत) होते, त्यामुळे कधीकधी शनिवार संध्याकाळ किंवा रविवार संध्याकाळ, आम्ही एकत्र गप्पा मारीत घालवीत होतो. मी एकटाच रहात असल्याने, तिनेच मला, माझे (तात्पुरते) घर वसवायला बरीच मदत केली. मी जरी स्मोकिंग करीत नसलो तरी ड्रिंक्स मात्र बरेचवेळा एकत्रितपणे घेत होतो. तिचा "जेम्स" या बॉयफ्रेंडबरोबर देखील मी बरेचवेळा एकत्र गप्पा मारीत असायचो. मला तर त्यावेळी, जेम्स तिच्या लायकीचा वाटला होता आणि पुढे जशी ओळख अधिक पक्की झाली तशी, (माझ्या टिपिकल मध्यमवर्गीय) स्वभावानुसार लेनीकडे, तिच्या लग्नाविषयी एकदा विषय काढला होता. पहिल्यांदा ती हसली आणि मला म्हणाली, "Anil, I don't want to get engaged with marriage so early. I want to enjoy life in full". कितीही झाले तरी मी परदेशी, केवळ एकाच कंपनीत काम करण्याच्या निमित्ताने संबंध जुळलेले. तेंव्हा मेच माझ्या मनावर बांध ठेवला.
अर्थात, तिची मैत्रीण. लिंडाकडून, लेनीच्या काहीशा स्वच्छंदी विचाराबद्दल बरीच माहिती समजली. एकदा, एके शनिवारी, तिच्याकडे मी याबद्दल बोलायला सुरवात केली. वास्तविक, गोऱ्या मुली आणि मुले देखील वागायला अगदी मोकळे पण, शक्यतो वैय्यक्तिक स्तरावर परकेपण दाखवणारे!! जसा मी थोड्या मोकळेपणी बोलायला लागलो तशी लेनीच्या स्वभावाचे "अस्तर" उलगडायला लागले. सध्या अस्तित्वात असलेली ही तिची तिसरी आई, मूळ आईने नुकतेच तिसरे लग्न करून वयाच्या साठाव्या वर्षी नव्याने संसार थाटलेला. अर्थात, इथे सगळे संपत नाही. लेनीला वयाच्या १४व्या वर्षी ड्रग्जचे व्यसन लागलेले, त्यावरून घरात रोजची भांडणे आणि त्यातूनच स्वत:ने वेगळे व्हायचा निर्णय आणि त्याच एकटेपणाचे सुख आणि वैषम्य,दोन्ही भावनांचा सततचा आढळ, यामुळे आयुष्यात कमालीची अस्थिरता. साउथ आफ्रिकेत राहायचे म्हणजे, तसे सोपे अजिबात नाही, अत्यंत अवघड कसरत असते आणि याचे कारण, तिथल्या समाजाची ठेवण आणि त्या ठेवणीला बळी पडलेली अशी नवीन पिढी!!
याचा परिणाम असा झाला, आत्तापर्यंत तिने २ वेळा (अर्थात, पहिल्या दोन बॉयफ्रेंडपासून) गर्भपात पण याचा परिणाम असा झाला, सेक्स विषयात बद्दल फारशी "आसक्ती"च उरली नाही आणि त्याचा उफराटा परिणाम नक्कीच होणार आणि त्यामुळे मनाची होणारी तगमग!!
आज, मी रस्टनबर्ग सोडून जवळपास ७ वर्षे झाली पण आजही माझी तिच्याशी ओळख आहे, फेसबुकवरून संपर्क चालू आहे. तिनेच दोन वर्षांपूर्वी सांगितले, तिने तिसरा बॉयफ्रेंडशी असलले संबंध तोडून टाकले!! त्याची कारणे अनेक लिहिली आणि ती, तिच्या मते योग्य(च) होती आणि आजही ती त्याच गावात एकटीच रहात आहे - घर तरी केव्हढे मोठे? एक बेडरूम, एक लाउंज आणि न्हाणीघर इतकेच!! आता, तिने नवीन नोकरी शोधली आणि अर्थात आर्थिक पूर्वीपेक्षा चांगली आहे. या सगळ्याचा परिणाम असा झाला, तिने लग्न न करण्याचा निर्णय. एकदा तिनेच मला सांगितले होते, "Anil, I spoiled my life and my body too"!! हे वाचताना, मीच थक्क!! पण, इथे अशा अनेक मुली साउथ आफ्रिकेत आजही आहेत आणि त्यांच्या आयुष्याशी वंचना अशीच चालू आहे आणि त्याबरोबर आयुष्याची फरफट!!

Thursday, 4 September 2014

श्रीनिवास खळे-चिरंजीव संगीतकार!!

तसे पहिले गेल्यास, संगीतकार बरेच झाले आणि पुढे होताच राहतील. पण, आयुष्यभर आपल्या तत्वांशी जराही तडजोड न करता, आपल्याशीच प्रामाणिक राहणारे आणि आपल्या मतांशी घट्ट चिकटून राहणारे संगीतकार फारच थोडे आढळतात. प्रत्येक संगीतकाराची स्वत:ची अशी एक शैली असते. आयुष्याची  सुरवात करताना, ती शैली दृग्गोचर होते पण पुढील वाटचालीत त्याच्या शैलीत, रचनेत बदल होत जातो - कधी चांगला तर कधी रूढ लोकप्रिय रस्त्याच्या वाटेने जाणारा. त्यामुळे, बरेच वेळा, जेंव्हा त्या संगीतकाराची रचना बघायला गेलो तर, बरेच वेळा निराशाच पदरी पडते. वास्तविक पाहता, तीन मिनिटांच्या गाण्यात, प्रयोगशीलता तशी फार अवघड बाब असते. चालीचा आकृतीबंध आणि त्या अनुरोधाने केलेली वाद्यमेळाची रचना ,इथेच संगीतकाराची खरी चमक दिसून येते. तीन मिनिटांच्या गाण्यात, प्रत्येक सेकंद हा फार मौल्यवान असतो आणि तो त्या रचनेशी सतत गुंतलेला असतो.
अशा सगळ्या वैशिष्ठ्यांचा समन्वय श्रीनिवास खळे यांच्या रचनेत वारंवार आढळून येतो. अगदी, १९४० सालापासून सुरवात केली, जी.एन. जोश्यांपासून, मराठीत भावगीत हा सुगम संगीताचा प्रवास सुरु झाला आणि तेंव्हाच्या रचना बघितल्यातर आपल्या लगेच लक्षात येईल की, तेंव्हा पासूनच्या रचनांवर, मास्तर कृष्णराव यांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो तसेच मराठी नाट्यसंगीताचा प्रभाव देखील. आणि हा प्रभाव, जवळपास वीस वर्षे तरी सतत दृश्यपणे किंवा अदृश्यपणे आढळत होता.
या प्रभावापासून दूर पण स्वत:ची स्वतंत्र शैली तयार करण्यात ज्या संगीतकारांना यश मिळाले, त्यात श्रीनिवास खळे यांचा फार वरचा नंबर लागेल. या माणसाने, आयुष्यात स्वत:च्या शैलीशी तर कधीच तडजोड केली नाही पण, नेहमीच स्वत:च्या मर्जीनुसार चाली बांधल्या. खळ्यांच्या चाली या अतिशय गोड असतात, असे म्हणणे फार अर्धवट ठरेल. "शुक्रतारा तारा" हे गाणे नि:संशय गोड आहे पण जर का आपण हे गाणे जरा बारकाईने ऐकले तर असे सहजपणे लक्षात येईल की, या गाण्यात गायला गेलेला प्रत्येक शब्द हा त्या आशयाशी अतिशय तलमपणे सुसंवाद राखत आहे. याच गाण्यातील, "लाजऱ्या माझ्या फुला रे" हीं ओळ ऐकावी. किती संथपणे आणि लयीशी एकरूप झालेली दिसेल. प्रणयाचे अत्यंत मुग्ध चित्र या कवितेत आहे आणि तोच भाव अतिशय संयतपणे संगीतकाराने साकारलेला आहे. अर्थात, "शुक्रतारा" हीं केवळ एक रचना झाली, अशा कितीतरी रचना वानगीदाखल दाखवता येतील की ज्या माझ्या वरील विधानाला पुरावा म्हणून दाखवता येतील.
खर तर, खळ्यांच्या चाली या गायकी ढंगाच्या असतात, जिथे गायकाच्या गळ्याची खऱ्या अर्थाने सत्वपरीक्षा असते. त्यांचे गाणे ऐकताना फार सुंदर आणि सहज वाटते पण जर का प्रत्यक्षात गायला घेतले की त्यातील खाचखळगे दिसायला लागतात. मुळात, या संगीतकाराने कधीही, वाचली कविता-लावली चाल, असा सरधोपट रस्ता कधीही अंगिकारला नाही. प्रत्येक कविता हीं काव्य म्हणून दर्जेदार असणे , हीं आवश्यक अट मानली. त्यामुळे, त्यांची गाणी ऐकताना, ती एक कविता म्हणूनदेखील वेगळ्या पद्धतीने आकलन करता येते. अर्थात, याचे श्रेय, तुकाराम, मंगेश पाडगावकर इत्यादी कवींकडे जाते पण या कवींनी लिहिलेली प्रतिभासंपन्न रचना तितक्याच आर्तपणे सादर करण्याची ताकद खळे यांची!! अर्थात, सगळीच गाणी, कविता म्हणून चांगली, असे नव्हे. काही, काही गाणी डागाळलेली देखील आहेत तसेच काही चाली देखील. "कंठातच रुतल्या ताना" सारखे गाणे खळ्यांनी द्यावे, याचे थोडे नवल वाटते. अन्यथा "सहज सख्या एकदाच येई सांजवेळी" सारखे नितांत रमणीय आणि संयत शृंगाराचे गाणे, हेच या संगीतकाराची खरी शैली, असे म्हणावेसे वाटते. 

खळ्यांच्या चाली फार संथ असतात हे खरेच आहे पण त्या लयीला अतिशय अवघड असतात. गायकाची खरी परीक्षा पाहणाऱ्या असतात. काही काही ठिकाणी तर, लय इतकी अवघड असते की ती साध्यासुध्या गळ्याला अजिबात पेलणारी नसते. "भेटीलागी जीवा" हा अभंग तर, पहिल्या स्वरापासून अवघड लयीत सुरु होतो त्यामुळे ऐकतानाच आपल्याला कळून चुकते की, हे गाणे आपल्या गळ्याच्या कुवतीच्या बाहेरचे आहे. पण, "नीज माझ्या नंदलाला" हे गाणे, सुरवातीला अति ठाय लयीत सुरु होते आणि मध्येच पहिल्या अंत-यानंतर लय फार वरच्या पट्टीत जाते आणि परत दुसऱ्या ओळीला, मूळ लय मिळते!! त्यामुळे ही रचना गायला फार अवघड होऊन जाते.
तसेच "या चिमण्यांनो" या प्रसिद्ध गाण्याचे उदाहरण घेता येईल. "पुरिया धनाश्री" रागात पहिली ओळ आहे तर दुसरी ओळ, "मारवा" रागात बांधलेली आहे. ज्यांना, रागदारी संगीताचे "अंग" आहे, त्यांना लगेच यातील नेमका फरक कळून चुकेल. खळ्यांची चाल अवघड असते म्हणजे काय, या साठी या गाण्याचे थोडे विश्लेषण करूया. 
"या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या; 
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या " 
आता जरा बारकाईने ऐकले तर, पहिली ओळ पुरिया धनाश्री रागात आहे तर दुसरी ओळ मारवा रागात. परंतु जर का दोन्ही रागांचे चलन पाहिले तर असे दिसेल, या चालीत, दोन्ही रागांच्या "सावल्या" तरळत आहेत. आता लयीचा भाग बघूया. पहिल्या ओळीतील "फिरा" शब्दातील "रा" शब्दावरून "रे" शब्दावर येताना, मध्ये किंचितसा "विराम" आहे आणि मग तिथे अति हळवा असा "कोमल निषाद" आहे!! "फिरा" या शब्दावरून, "रे" शब्दावर येताना जी लय आहे, ती फार गुंतागुंतीची आहे आणि तिथे गाण्याचे "अवघडलेपण" सिद्ध होते. तो जो विराम आहे, तो इतका जीवघेणा आहे की शब्दात मांडणे अजिबात जमत नाही आणि आपण मनोमन श्रीनिवास खळ्यांना दाद देण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही.  
खळे हे कधीही भरमसाट वाद्यांचा वापर करीत नाहीत, बहुतेकवेळा व्हायोलीन सारख्या वाद्यावरच रचना पेलली जाते. कधी बासरीचा अवघड तुकडा आणि अति संथ अशी तबल्याची साथ, यातूनच गाणे सुरु होते. त्यांनी कधी वाद्यातून नवीन प्रयोग करण्याचा हव्यास धरला नाही तर, वेगवेगळे लयीचे बंध शोधून, त्यानुरूप रचना तयार केल्या. कवितेला नेहमीच अग्रक्रम देण्याचा त्यांचा आग्रह असतो व त्याचे महत्वाचे कारण म्हणजे, काव्यावर असलेली अव्याभिचारी निष्ठा!! त्यामुळेच त्यांची गाणी, कविता म्हणूनदेखील फार अर्थपूर्ण असतात.
मागे एकदा, संगीतकार यशवंत देव यांनी, गाण्याचे त्यांचे स्वत:चे असे एक मर्म सांगितले होते. ते म्हणतात, "गाण्याची चाल हीं कवितेतच दडलेली असते. आम्ही, फक्त ती शोधून काढतो!!" पण, यावरूनच काव्य हा गाण्याचा किती महत्वाचा घटक असतो, हेच अधोरेखित होते. खळे यांच्या चालीत हाच अर्थ अमूर्तपणे आढळत असतो.
खळ्यांनी फक्त भावगीते दिली हीं अर्धवट माहिती झाली. "जय जय महाराष्ट्र माझा" सारखे वीरश्रीयुक्त गाणे खळ्यांनी दिले आहे, हे मुद्दामून सांगावे लागते तर, "कळीदार कर्पुरी पान" सारखी खानदानी बैठकीची लावणी सादर केली आहे. बैठकीची लावणीवरून एक किस्सा लिहितो. साधारपणे, बावीस वर्षांपूर्वी, एन.सी.पी.ए. मध्ये, आपले पु.ल.देशपांडे आणि अशोक रानडे यांनी "बैठकीची लावणी" म्हणून एक दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रम सादर केला होता. एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, याचा अत्यंत आदर्श वस्तुपाठ होता. रंजकतेच्या दृष्टीकोनातून, पु,लं,चे संचालन आणि अभ्यासक दृष्टीकोनातून अशोक रानड्यांचे संचालन, हा सगळा, दोन तंबोरे जुळून यावेत, त्याप्रमाणे जुळून आले होते. तेंव्हा, अशोक रानड्यांनी एक सूत्रबद्ध विवेचन केले होते. ते म्हणाले," बैठकीची लावणी, हीं उत्तर भारताच्या ठुमरीला महाराष्ट्राने दिलेले उत्तर आहे". सुरवातीला, मला याचा फारसा अदमास आला नाही पण नंतर जेंव्हा या वाक्याचा मी स्वतंत्रपणे विचार करू लागलो तेंव्हा त्या वाक्यातील अर्थ ध्यानात यायला लागला. "कळीदार कर्पुरी पान" हीं लावणी ऐकताना याचे नेमके प्रत्यंतर येते. ठुमरीतील लाडिक आणि आव्हानात्मक शृंगार आणि त्याचबरोबर जाणवणारी संयत भाववृत्ती याचे नेमके फार विलोभनीय दर्शन, या लावणीतून दिसून येते.
खळे नेहमी म्हणतात, "माझी गाणी, कमीत कमी पन्नास वर्षे तरी टिकली पाहिजेत" आणि याच जिद्दीने ते गाणी तयार करतात. आज, १९६५ साली, त्यांचे "शुक्रतारा मंदवारा" हे गाणे सादर झाले आणि आता या गाण्याला पन्नास वर्षे होत आली आणि आजही हे गाणे रसिकांच्या स्मरणात आहे. खळ्यांनी या संदर्भात, कधीही आपल्या मतांशी तडजोड केली नाही. त्यामुळेच त्यांना लायकीपेक्षा फार कमी चित्रपट मिळाले. त्यांच्या बाबतीत एक मत नेहमी ऐकायला मिळते व ते म्हणजे,"खळ्यांच्या चाली या कवितेसारख्या असतात"!! आता हे दूषण आहे का कौतुक आहे, याची मला कल्पना नाही, मुळात हे वाक्यच अति खुळचट आहे. चाली कवितेसारख्या असतात म्हणजे काय? वास्तविक प्रत्येक गाणे हे शब्दांवरच आधारलेले असते आणि हीं वस्तुस्थिती असताना, कविता हीं काही अशी गोष्ट आहे का की जी गाण्यापेक्षा फार वेगळी असते!! कविता हीं कविताच असते. काही कविता गाण्यायोग्य असतात, त्याच्यात अंगभूत लय दडलेली असते. उदाहरणार्थ, भा रा, तांबे, बा.भ. बोरकर, मंगेश पाडगावकर किंवा सुरेश भट, यांच्या कविता या बहुश: अत्यंत लयबद्ध असतात की ज्या संगीतकाराला चाल बांधण्यास उद्युक्त करतात तर काही कविता या सुरांपासून फार वेगळ्या असतात. अर्थात, त्या कवितेतदेखील एक आंतरिक लय हीं असतेच, उदाहरणार्थ, पु.शि.रेगे, इंदिरा संत, विं.दा.करंदीकर किंवा मर्ढेकर इत्यादी. यांच्या कवितेत वाचताना, एक लय जाणवत असते की जी त्या कवितेच्या आशयाशी सुसंवाद साधणारी असते. फक्त त्यांना सुरांचा भार सहन होण्यासारखा नसतो, इतकेच. तेंव्हा, चाल कवितेसारखी असते, या वाक्याला तसा काही अर्थ नाही.
खळ्यांच्या चाली गायला अवघड असतात, हे मान्य व्हायला काहीच हरकत नाही. प्रत्येक संगीतकाराचा स्वत:चा असा एक पिंड असतो व त्यानुरुपच त्याची कला सादर होत असते. वसंत प्रभू, वसंत देसाई, सुधीर फडके किंवा वसंत पवार याच्या चाली, अपवाद वगळता, सहज गुणगुणता येतात तर, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर यांच्या चाली लयीला अवघड असतात. गाण्यात अशी प्रतवारी करणे खरे तर फार चुकीचेच ठरेल.गाणे हे मुळात गाणेच असते आणि संगीतकाराने लावलेली चाल, शब्दाच्या आशयाशी किती संवादी आहे, ती चाल उठून दिसावी म्हणून, वापरलेला वाद्यमेळ किती सुसंवादित्व राखणारा आहे, इत्यादी बाबी लक्षात ठेऊन, प्रतवारी ठरविणे महत्वाचे आहे. 
संध्याकाळ होत असते, घरात दिवा लागलेला असतो आणि बाहेर अंधाराचे साम्राज्य पसरत असते. घरातली वयस्कर मंडळी विक्लान्तपणे परतलेली असता. फक्त, घरातील चिमण्या मुलांचा पत्ता नसतो आणि, मग लताच्या दिव्य आवाजात, "या चिमण्यांनो परत फिरा" या गाण्याचे सूर कानावर येतात आणि तीच संध्याकाळ फार विषण्ण वाटायला लागते.

Wednesday, 3 September 2014

रोशन - कलात्मक संगीतकार

हिंदी चित्रपट गाण्यांचे काही ठराविक साचे आहेत आणि त्याच्यापलीकडे बहुतेक सगळे संगीतकार ओलांडून जात नाहीत.सुरवातीला गाण्याच्या चालीचे सूचन, वाद्यांच्या किंवा वाद्यमेळाच्या सहाय्याने दर्शवायचे, पुढे पहिला अंतरा, नंतर दुसरा अंतरा आणि शेवटी गाण्याचे शेवटचे चरण, असा बांधेसूद आविष्कार असतो.त्यामुळे गाण्यांच्या सादरीकरणात कधीकधी एकसुरीपणा येऊ शकतो. असे असून देखील काही संगीतकार असे असतात, याच पद्धतीने गाणे सादर करताना, चालीतील वैविध्य, वाद्यांचे निरनिराळे प्रकार, आणि गायन शैली यात प्रयोग केले जातात, दुर्दैवाने, असले प्रयोग बहुतांशी दुर्लक्षित होत असतात. वास्तविक चाल म्हणजे काय? हाताशी असलेल्या शब्दकळेला सुरांच्या सहाय्याने सजवून, गायक/गायिके पर्यंत पोहोचवायची!! चाल अशी असावी की ती गुणगुणताना, कविता वाचनापेक्षा अधिक सुरेल आणि खोल तरीही आशयाशी सुसंवादित्व राखणारी असावी. अशा थोड्या संगीतकारांच्या पंक्तीत रोशन यांचे नाव फार वरच्या स्तरावर घ्यावे लागेल. सुरवातीपासून, उर्दू भाषेची आवड आणि संगीताचा ध्यास, यामुळे सुरवातीचे शिक्षण पंडित रातरंजनकर, पुढे, उस्ताद अल्लाउद्दिन खान साहेब यांचे लाभलेले मार्गदर्शन, यामुळे रागदारी संगीताचा पाया तयार झालेला. दिलरुबा वाद्यावर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्यामुळे त्यांच्या गाण्यांत तंतुवाद्यांचा आढळ भरपूर आढळतो. याचा परिणाम असा झाला, लयबंधांचे उठावदार प्रक्षेपण करणाऱ्या वाद्यांपेक्षा सुरावट धुंडाळणाऱ्या वाद्यांचे आकर्षण अधिक होते. 
सारंगी, Accordion, Spanish Guitar, बासरी या वाद्यांवर त्यांचा अधिक भर आहे. काही उदाहरणे बघूया. १] सलामे हसरत कबूल कर लो, २] मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है, ३] पांव छू लेने दो, ४] रहते थे कभी उनके दिल मे, या आणि अशा बऱ्याच गाण्यातील सारंगी मुद्दामून ऐकावी म्हणजे माझे म्हणणे पटावे.  प्रेत्येक भाषिक वाक्यानंतर सारंगी आपल्या छोट्या, खेचक व दर्दभरल्या सुरावटींच्या पाउलखुणा सोडीत गीताचा दरवळ वाढवते. चालीचे स्वरूप, सारंगीस दिलेला वाव आणि तिचा स्वनरंग, यांमुळे सारंगीसंगीताचे नक्षीकामात रुपांतर होण्याचा धोका भरपूर होता परंतु संगीतकार म्हणून तो धोका त्यांनी टाळला!! वाद्याची निवड, हात राखून पण विचक्षण वापर अनाजे विशिष्ट वाद्ये, आणि तरीही आवाहक योजना, ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील. 
रोशन यांच्या वाद्यांच्या वापराविषयी दोन सर्वसाधारण विधाने करता येतील. १] रचनाकारांचा एकंदर कल बाजूला सारून, टिकाऊ आणि मधुर भावरंग पैदा व्हावा याकरिता खालचे - मंद्र सप्तकातील तसेच मध्य सप्तकातील स्वर आणि संबंधित स्वर-मर्यादा यांतच चालीचा वावर ठेवण्यात कसलीही कसूर केली नाही. "तेरी दुनिया मे दिल लगता नही", "कहा हो तुम" ही गाणी ऐकावीत. कुठेही विरहीवेदनेची दवंडी पिटलेली नाही. सारा परिणाम, ढाल्या स्वरांतून तरंगत राहणाऱ्या सुरावटी व आवाज यांतून सिद्ध केला आहे. असाच उदासी परिणाम, तलतच्या "मै दिल हुं एक अरमान भरा" या गाण्यात अप्रतिम येतो. तलतच्या आवाजातील सुप्रसिद्ध कंप आणि त्याला साजेसा सुरावटीचा ढाला पाया, मनार गाढा परिणाम करते. 
मात्र, साठीच्या दशकात रोशन यांची शैली बदलली. जिथे मंद्र सप्तक आणि ढाला स्वर होता, तिथे उच्चस्वरी वाद्यवृंद घेतो, असे आढळते. अर्थात, त्याबद्दल आपण थोडा नंतर विचार करूया. सुरावटी आणि सुरावटींचे खास स्त्रोत यांच्याकडे या संगीतकाराचा जाणवण्याइतका ओढा असला तरी लयबंधांचा सर्जक उपयोग, हा दुसरा विशेष म्हणता येईल. एकाच गीतात, एकाधिक ताल वा लयबंध वापरणे, हा त्यांचा खास प्रयोग म्हणता येईल. "बार बार तोहे क्या समझाये" किंवा "झीलामील तारे करे इशारा" ही गाणी बघूया. संगीतशास्त्रानुसार ताल आणि ठेका, या दोन वेगळ्या पण संबंधित संकल्पना असून, त्यांची सादरीकरणे खास स्वरूपाची असतात. तसे बघितले तर, हे दोन्ही कालिक आकृतिबंध असतात, पण ताल हा मानसिक वा कल्पित कालिक नकाशा असून, त्याचे मूर्त स्वरूप वाद्यावर निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनीच्या द्वारे ठेक्यातून सिद्ध होत असते. म्हणून एकाच तालाचे अनेक ठेके अस्तित्वात असतात आणि ते कानाला वेगवेगळे प्रतीत होतात. "सलामे आली  हसरत कबूल कर लो" आणि "मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है" ही गाणी बघुया. या दोन्ही गाण्यांत निराळे ठेके योजले आहेत. "बहारो ने मेरा चमन लूटकर" या गीतात देखील १० मात्रांचा झपताल वापरला आहे पण तालाचा चेहरा-मोहरा ओळखीचा वाटत नाही. 
"मैने शायद तुम्हे" या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. भारतीय गीतरचनेत पहिल्या तालमात्रेवर, जिला आपण "सम" म्हणतो, तिच्यावर जोर दिलेला असतो. या पार्श्वभूमीवर या गाण्याची सम "निराघात" आहे. "शायद" या शब्दातील, "य" अक्षरावर सम येउन गेली, हे पहिल्यांदा ऐकताना ध्यानात देखील येत नाही!! मुळात, गाण्यात, ताल देखील अति हलक्या आवाजात आघाती ठेवलेला आहे, त्यामुळे गाणे फार बारकाईने ऐकायला लागते. 
एकंदरीने, रोशन यांची रचनाप्रकृती दु:ख, अंतर्मुखता आणि खंत करण्याकडे झुकली आहे. अर्थात, याविरुद्ध देखील त्यानी रचना केल्या आहेत."कही तो मिलेगी", "सखी रे मोरा मन", "वो चले आये रे" ही सगळी गाणी चैतन्यपूर्ण, चमकदार चालींची झाली आहेत. द्रुत गती, चाल फार खाली नाही वा फार उंच स्वरांवर नेउन न ठेवणे, शब्दांच्या शेवटी खटके-मुरक्या इत्यादी नाजूक स्वरालंकार योजणे वगैरे सांगीतिक युक्त्या कुशलतेने योजलेल्या आहेत.
रोशन यांच्या गाण्यांकडे आणखी वेगळ्या नजरेने बघितल्यास, त्यांना युगुलगीतांचे आकर्षण अधिक होते, हे सहज समजून घेता येते. "हम इंतजार करेंगे","छा गये बादल","पाव छु लेने दो" ,"छुपा लो युं दिल मे प्यार" इत्यादी गाणी ऐकावीत. आपल्याकडील बहुतांशी युगुलगीते, नाट्यात्म होतात, ती संवादात्मक तत्वाच्या पाठपुराव्यामुळे, हे सर्वसाधारण सत्य लक्षात घेत, या गाण्यातील आगळेपण सहज सिद्ध होते. ही गाणी कुठेही अति नाट्यात्मक होत नाहीत तर संवाद्तत्वावर पुढे विस्तारत जातात. 
आम म्हटल्या जाणाऱ्या हिंदुस्थानी रागांत रचना करणे, रोशन यांचे मनपसंद काम होते. "मन रे तू काहे ना धीर धरे (यमनकल्याण), या गाण्यातील शांत स्वरवैभव केवळ अपूर्व आहे. निगाहे मिलाने को जी चाहता है (यमन), "बता दो कौन गली (तिलंग), "मदभरी अंखीयां" (जौनपुरी) किंवा "गरजत बरसत" (मल्हार) ही देखील उल्लेखनीय गाणी म्हणता येतील.  प्रत्यक्षात तो राग जरी योजला नसला तरी त्या रागाच्या छायेत या गाण्यांच्या चाली अवतरत असतात. आता, यमन राग घेतला तरी, "सलामे हसरत","गमे हस्तीसे बस बेगाना","वळला क्या बात","युं अगर मुझको ना चाहो तो" ही सगळी यमन रागाच्या सावलीत वावरतात परंतु रागाची प्रकृती वेगळी गाण्याची रचना वेगळी, असा फरक या गाण्यांमधून अप्रतिमरीत्या दिसून येतो. 
"कव्वाली" हा गीतप्रकार रोशन यांनी प्रतिष्ठित केला. "अगर ये दिल" (घर घर मे दिवाली),"ना तो कारवां की तलाश" (बरसात की रात), "निगाहें मिलाने को" (दिल ही तो है) या कव्वाल्या ऐकाव्यात. "निगाहें मिलाने को" या कव्वालीत, यमन  नीटसपणे येतो, पण आशा भोसलेच्या कौशल्यपूर्ण आवाजाच्या लागावास (उदाहरणार्थ खालच्या "रे" वरून एकदम अचूक वरचा "रे" घेणे!!) शब्दांच्या अंती येणारी द्रुतगती फिरत यांना भरपूर जागा आहे. 
आणखी काही खास वैशिष्ट्ये बघायची झाल्यास, त्यांची बहुतेक गाणी स्वरविस्तार योग्य आहेत, म्हणजे गाताना, तुम्हाला स्वरविस्तार करण्यास भरपूर वाव असतो, अर्थात गायकी अंगाच्या रचनेचे हेच महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागते. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना "बांध" घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे. साठोत्तरी गाण्यात मात्र काही गाणी या तत्वांना फटकून बांधली गेली आहेत. त्यांची बहुतांश गाणी ऐकताना, मला आरतीप्रभूंच्या दोन ओळी नेहमी आठवतात, 
"तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे"