चित्रपट गीतांमध्ये प्रयोग करायला तसा वाव कमी(च) असतो. मुळात ३ घटक असलेला अटकर बांध्याचा हा आविष्कार आणि त्यातून केवळ ३ ते ४ मिनिटांचे सादरीकरण. त्यामुळे, प्रयोग करायचे झाले तरी, शब्द, स्वरांची रचना, वाद्यमेळ आणि गायन, याच घटकातून होणार. आणि तिथे तिन्ही स्वतंत्र व्यक्ती!! म्हणजे प्रत्येकाच्या प्रतिभेचा आविष्कार वेगळा आणि तरीही मर्यादित स्तरावरील. चित्रपटातील कविता अति गूढ असून चालत नाही अन्यथा शब्दकळेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक. जरी, गायक/गायिका स्वतंत्र व्यक्ती असली तरी गायनाचा पल्ला हा संगीतकाराने आधीच आखून दिलेल्या मार्गावरून गाठायचा. तसे, इथे " मी गाण्यात वेगळे प्रयोग केले" असा "दावा" करणारे भरपूर भेटतात परंतु यामुळेच बहुदा "प्रयोग" हा शब्द थोडा हास्यास्पद झाला आहे. अशा परिस्थितीत, ज्या संगीतकारांना खऱ्याअर्थी "प्रयोगशील" संगीतकार म्हणावे, अशा फार थोड्या संगीतकारांमध्ये सलिल चौधरी यांचा समावेश सहज होतो. आपल्याला इथे, त्यांनी नेमके काय प्रयोग केले, आणि त्याचे किती दूरगामी परिणाम झाले, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे.
बालपण, आसाम आणि बंगाल इथे गेल्याने, या दोन्ही प्रदेशातील आदिम आणि लोकसंगीताचा गडद परिणाम झाला, असे त्यांच्या पुढे निर्माण केलेल्या रचनांवरून सहज अनुमान काढता येते. त्यातून, लहानपणी "कम्युनिस्ट" विचारसरणीशी संबंध आल्याने, ज्या कलांचा लोकांशी थेट संबंध असतो, ज्या कलांना लोकांच्या कला म्हणता येते, त्याच कला महत्वाच्या असतात. अर्थातच, आदिम, लोन आणि धर्म या भारतीय संगीताच्या कोटी आपोआपच खास महत्वाच्या ठरतात. सलिलदांच्या एकंदर सांगीत निवडीत, ही भूमिका बरीच ठामपणे दिसून येते.
या संदर्भात, पुढे विचार करण्यासाठी, आपल्याला निदान ४ टप्पे ध्यानात घेतले पाहिजेत. युथ क्वायर (युवासमूह गायन) क्षेत्रांतील त्यांचे काम, हा पहिला विशेष आणि त्यांच्यातील ज्वलंत कम्युनिस्ट विचारसरणी लक्षात घेता, हा टप्पा त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत महत्वाचा टप्पा ठरतो. त्या दृष्टीने, त्यांनी, मुंबई आणि कोलकत्ता इथे असे गायकसमूह स्थापले.
दुसरे कार्यक्षेत्र - त्यांनी दिलेले हिंदी चित्रपट संगीत आणि ते मात्र संपूर्णपणे मुंबईत फळाला आले.
तिसरा टप्पा, "बंगाली गीत" आणि या क्षेत्रात त्यांनी खूपच वेधक कामगिरी केली आहे. आणि शेवटचा टप्पा म्हणजे "बालगीते".
या सगळ्या टप्प्यांचे विवेचन अशा साठी करायचे, त्यांनी जी चित्रपट गाणी तयार केली, त्या सगळ्या निर्मितीवर, कुठे ना कुठेतरी या टप्प्यांचा प्रभाव ठामपणे जाणवतो. डाव्या विचारसरणीशी असलेल्या बांधिलकीमुळे, विविध भारतीय प्रदेशांतील लोकसंगीत, समूहगायनाची सहेतुक योजना आणि वाद्यवृंदाचा वापर त्यांच्या संगीतात सर्वत्र आढळतो. शिवाय, भारतीय संगीतात ज्याची कमतरता अनेकांना जाणवते , त्या स्वनरंगाची विविधता या ३ विशेषांमुळे त्यांना सुलभ झाले. भारतीय संगीतात, कुठलेही चावीफलक वाद्य (हार्मोनियम, पियानो, ऑर्गन इत्यादी वाद्ये) म्हटले की नवा स्वन्रंग, एक प्रकारचे प्रमाणीकरण आणि सर्वांना उपलब्ध सांगीत उपयुक्तता, या गोष्टी अपरिहार्यतेने जाणवतात. संगीतातून, अखिल भारतीय आवाहकता कशी साधायची, या मुलभुत प्रश्नाला इथे स्पर्श झाला. सलिलदांनी समूहगायनाचा आपल्या पार्श्वसंगीतासाठी वाद्यांसारखा वापर केला आहे.
बंगाली गीताचा आधुनिक अवतार सिद्ध करण्यातली त्यांची आस्था, तसेच रवींद्र संगीत आणी त्याचे वातावरण, याविषयी विरोधविकासवादी भूमिका, यामुळे, त्यांना आपल्या खास ठशाचे बंगाली गीत रचणे भाग पडले, हे सहज ध्यानात येण्यासारखे आहे. यातूनच, त्यांनी पुढे आपली अनेक बंगाली गीते, हिंदीत आणली.
याचाच परिणाम असेल, पण सलीलदा पाश्चात्य कलासंगीताचे अभ्य्सक झाले. बीथोवन, मोझार्ट इत्यादी "क्लासिकल" रचनाकार त्यांच्या खास पसंतीचे होते, हे सहज समजून घेता येते. याच संगीताच्या प्रभावामुळे, त्यांना वाद्यवृंद रचनेत प्रयोग करण्याची स्फूर्ती मिळाली असणार, हे उघड आहे. भारतीय वैदिक संगीत, आदिवासी संगीत, इतकेच नव्हे तर तंबोरा या वाद्यातही, स्वरसंवाद (हार्मनी) हे तत्व आहे, असे त्यांचे ठाम मत होते.
"दो बिघा जमीन" या चित्रपटातून, त्यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले. "धरती कहे पुकार के" ही गाणे, लोकसंगीताशी फार जवळचे नाते सांगणारे आहे. या गाण्याच्या सुरवातीला, "भाई रे" अशी पुकार आहे आणि ती पुकार, या गाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
पुढे, त्यांच्या "परख" चित्रपटातील गाणे विशेष गाजली. "मिला है किसीका झुमका" हे गाणे ऐकण्यासारखे आहे. एकाच बासरीचा वाक्यांश ऐकायला येतो. ढाल्या तारतेचा ताल आणि साधी चाल तरीही लोकसंगीताचा बाज आणि त्याच्याच चलनाचा थेट वापर, यामुळे हे गाणे वेधक होते. सुरवातीला म्हटल्या प्रमाणे , बंगाली लोकसंगीताचा त्यांच्या गडद परिणाम जाणवतो - "क्या हवा चली" किंवा "ऋत बदली" या गाण्यांवर बंगाली "बाउल" संगीताची छाप आहे. याचा वळणाने, वेगळे गाणे बघायचे झाल्यास, "बन्सी क्यो बजाये" हे गाणे ऐकावे. एक वेगळे नृत्यगीत आहे
मघाशी मी म्हटल्याप्रमाणे, त्यांनी अनेक बंगाली रचना, (स्वत:च्या) हिंदीत आणल्या - "जारे, जारे उड जारे पंछी","ओ सजना,बरखा बहार आई" किंवा " ना जिया लागे ना" ही गाणी, त्यांच्याच मुळातल्या बंगाली गाण्यांची हिंदी नक्कल आहे. असे असले तरी ती मुळातली गाणी ऐकताना, त्यांच्या प्रतिभेची साक्ष मिळते, हे नक्की.
त्यांनी, पाश्चात्य रचनाकारांचा अभ्यास केला होता आणि त्यांनी ज्याप्रकारे गाण्याचे वाद्यमेळ रचले, त्यातून आपण सहज समजू शकतो. याचाच परिणाम असा झाला, त्यांच्या गाण्यात, दोन्ही सांगीतिक संस्कृतीचा अप्रतिम मिलाफ आढळतो. तसेच पारंपारिक वाड्यातून देक्गील नवनवीन सुरावटी काढून, गाण्यालाच वेगळे परिमाण देण्याचा त्यांचा प्रयत्न लक्षणीय ठरतो. तसेबघितले तर, "इतना ना मुझसे तू प्यार बढा" हे गाणे सरळ, सरळ मोझार्टच्या सिम्फनीवर बेतलेले आहे (सलिलदांनी ते कधीही लपविले नाही) तरीही गाण्यातील वाद्यमेळ बारकाईने ऐकला तर, त्यात सलिलदांच्या अभ्यासाची चुणूक दिसून येते. असाच प्रकार, त्यांनी इतर रचनांच्या बाबतीत केलेला दिसतो. म्हणजे चालीचा मुलस्त्रोत जरी उचलेल असला तरी त्यात स्वत:चे वैशिष्ट्य म्हणून काहीतरी सांगीतिक करामत करून दाखवायची आणि ही जाणीव, त्यांनी शेवटपर्यंत ठेवली होती, अगदी "रजनीगंधा", "छोटी छोटी सी बात" या चित्रपटातील गाणी ऐकावीत. चाली तशा सरळ, साध्य आहेत परंतु प्रत्येक अंतरा आणि तिथला वाद्यमेळ, यात काही ना काहीतरी वेगळेपण दिसून येते. त्या दृष्टीने, त्यांच्या आधी सी. रामचंद्रांनी जी पाश्चात्य संगीताची जाणीव ठेवली होती, त्याचे सुसंस्कारित रूप, सलिलदांनी आपल्या रचनांमधून आपल्या समोर आणले.
आज, ए.आर, रेहमान जे प्रयोग करीत आहे, म्हणजे भारतीय आणि पाश्चात्य संगीताचे एकत्रीकरण, याचा पाया, सलिलदा आणि नंतर राहुल देव बर्मन, यांनी घातला आहे, हे आपल्याला सहज समजून घेता येईल.
संपूर्ण गीतत्वास पोचलेली अशी एक रचना - "ओ सजना बरखा बहार" बघूया. वास्तविक चाल, ही त्यांच्या मूळ बंगाली गाण्याची आहे तरीही स्वरपट्ट्यामध्ये मुक्त फिरणारी, संगीत कल्पनांनी भरलेली, उत्साही, द्रुत अशी मधुर चाल आहे. कोमल निषाद स्वरावर येउन थांबणारा मुखडा, हा या रचनेचा मनोज्ञ विशेष. नायिकेच्या मनोवस्थेचे नेमके चित्रण स्वरांच्या सहायाने अतिशय प्रत्ययकारी पद्धतीने घडते.
पाश्चात्य संगीताचा अभ्यास असल्याने, "जिंदगी ख्वाब है" या गाण्यात, Violin, Accordion, Trumpet इत्यादी वाद्यांचा वापर खास ऐकण्यासारखा आहे.
सलिलदांच्या सांगीतिक कारकिर्दीचे शिखर म्हणजे "मधुमती". या चित्रपटात, सलिलदांच्या सांगीत सर्जनक्षमतेचा विस्तीर्ण पट जवळपास उलगडलेला दिसतो. "आजा रे" सारखे पछाडून टाकणारे गीत, "दैय्या रे दैय्या" सारखे लोकसंगीतावर आधारित गाणे, "जंगल मे मोर नाचा" सारखे हलके फुलके गीत तर "टुटे हुवे ख्वाबो ने" सारखे अप्रतिम विरह गीत, चित्रपट संगीताच्या गाण्यांच्या जीतल्या काही महत्वपूर्ण "कोटी" आहेत, त्या सगळ्यांचा या चित्रपटात समावेश होतो आणि त्यामुळे, त्यातील प्रत्येक गाण्याला सलिलदांनी स्वत"चे खास वैशिष्ट्य प्रदान केले आहे.
सलिलदांची गीतसर्जनशक्ती वारंवार आपले सौंदर्यपूर्ण सांगीत वर्चस्व गाजवण्यासाठी आवश्यक त्या चैतन्याने भारलेली होती. काम जर अधिक केंद्रीभूत झाले असते तर संगमसंगीताच्या गतिमान कोटींत चपखल बसणारे संगीत ते आपल्याला देऊ शकले असते. त्यांची गाणी ऐकताना, अनेकवेळा हिंदी चित्रपट संगीतात जे संगीत होते त्यापेक्षा अधिक टिकाऊ आणि सार्थ संगीतसंगम साधण्याची त्यांना इच्छा होती, असे फार जाणवते आणि तशी त्यांची क्षमता देखील होती. हे काम कुणालाही सहज पेलणारे काम नव्हते!!