Saturday, 7 January 2023

वो ना आएंगे पलटकर

आपाल्या भारतीय संगीत संस्कृतीत जरा उशिराने अवतरलेल्या *ठुमरी* संगीत प्रकाराने असंख्य नवीन वाटा निर्माण केल्या. थोडी शृंगारिक, थोडी विरही छटा दाखवणारी, असे विभ्रम आपल्याला ऐकायला/बघायला मिळतात. असे म्हणतात हिंदी शब्द *ठुमकना* वरून *ठुमरी* शब्द जन्माला आला. तसे असेल तर ठुमरीत शृंगारिक भाव आढळणे, साहजिकच ठरते. उत्तर प्रदेशाने भारतीय संगीताला दिलेली ही फार मोठी देणगी, असे म्हणता येईल. संयत शृंगारासह भावनिक प्रणयी थाटाची कविता, आणि नृत्याचे अंग अशी ठुमरीची एकूण बाह्यात्कारी लक्षणे मानता येतील.आता उत्तर प्रदेशातून आल्याने, ठुमरी ही *अवधी* आणि ब्रज* भाषेत वाढली. खयाल संगीताचे लावण्यपूर्ण रंग ठुमरीमध्ये बघायला मिळाले आणि ठुमरी गायन प्रचंड लोकप्रिय झाले. अर्थातच केवळ शृंगारिक अंग हेच ठुमरीचे वैशिष्ट्य कधीच नव्हते आणि आजही नाही. अनेक प्रकारचे विभ्रम ठुमरी गायनातून ऐकायला मिळतात आणि त्या विभ्रमांचे लालित्य. त्यामुळेच बहुदा ठुमरीत *लखनवी बाज* कमालीचा लोकप्रिय झाला. जेंव्हा ठुमरी प्राथमिक अवस्थेत होती तेंव्हा ठुमरी गायनाला फारशी प्रतिष्ठा नव्हती, परिणामी ठुमरी ऐकायची म्हणजे लखनौच्या कोठ्यांवर जावे लागायचे. अर्थात तिथे आधी नृत्य आणि मग नृत्याच्या जोडीला ठुमरी गायन, असे मनोरंजनाचे खेळ चालत असत. *वाजिद अली खान* याच्या काळात जशी *कथ्थक* नृत्याला प्रतिष्ठा मिळाली तशी त्याच्याच जोडीने ठुमरी प्रतिष्ठित झाली. आजचे आपले गाणे हे अशाच धर्तीवरच, कोठीवरील विरही भावनेचा परिपोष करणारे, ठुमरी अंगाने जाणारे चित्रपट गीत - वो ना आएंगे पलटकर, या गीताचा आस्वाद घेणार आहोत. शब्दांवरुनच आपल्याला कल्पना करता येते, विरही छटेची रचना आहे. एकूणच गाण्याचे चलन वलन ठुमरीच्याच अंगाने जाणारे आहे. अर्थात कोठीवरील गाणे असल्याने, गाण्यात *खटके*, *हरकती* भरपूर आहेत. सुप्रसिद्ध शायर साहिर लुधियान्वी यांनी या गीताची शब्दरचना केली आहे. चित्रपटातील प्रसंगानुरूप नेमकी गीते लिहिण्याचे सामर्थ्य या कवीकडे कायम होते आणि तशा प्रकारे लिहिताना, आपल्या कवितेचा दर्जा राखण्याकडे कायम, त्यांचा कल असायचा. इथे तर कोठीवरील नृत्यांगनेचे गाणे आहे आणि मुख्य म्हणजे नायकामध्ये गुंतून गेलेल्या मनःस्थितीचे चित्रण आहे. त्याकाळी काव्यात उर्दू शब्द सर्रास वापरले जायचे. *हसरतों*,*बेरुख़ी* किंवा *जफ़ाये* सारखे शब्द जरी प्रथमक्षणी आकलनास कठीण वाटले तरी संपूर्ण ओळ वाचल्यावर त्यातील आशय समजून घेण्यास काहीही अडचण होत नाही. प्रसंग असा आहे, नायक निराशेने कोठी सोडून निघाला आहे आणि हे त्या नृत्यांगनेला जरा देखील रुचलेले नसते. त्यातून आलेल्या विफल भावनेचे शब्दरूप आहे. साहिर यांची शब्दरचना नेहमीच खास असते. * तेरी बेरुख़ी के सदक़े,मेरी जिंदगी के खुशियाँ* या वाक्यातून जरी मनात हताशता आली असली तरी स्वत्वाची जाणीव दिसते. * वो ना आएंगे पलटकर,उन्हें लाख हम बुलाये* या वाक्याची पूर्तताच नंतरच्या ओळीतून होते. दुसरी बाब म्हणजे शब्द लिहिताना, संगीतकाराला जिथे *खटका* हवा असतो, तिथे तसेच शब्द लिहायचे, जेणेकरून गाण्यातील गुणवत्ता अधिक वाढीस लागेल. संगीतकार एस.डी.बर्मन यांचे स्थान केवळ अतुलनीय असेच म्हणायला हवे. जशी दिग्दर्शनाची शैली, त्याला अनुरूप गाणी तयार करणे, या बाबतीत फारच थोडे संगीतकार त्यांच्या जवळपास येऊ शकतील. *खमाज* रागाची साथ घेण्यात फार मोठे औचित्य साधलेले आहे. एकूणच कोठीवरील ठुमरीसदृश गाणी ऐकली तर सर्वसाधारणपणे *खमाज* किंवा *पिलू* रागातील सुरावटींची पखरण ऐकायला मिळते,जणूकाही अशा प्रकारच्या गीत प्रकारांना हे राग *आंदण* दिले आहेत!! आरोही सप्तकात *रिषभ* वर्ज्य असून *दोन्ही निषाद* सातत्याने वापरले जातात. अर्थात नेहमीप्रमाणे इथे खमाज राग निव्वळ काही सुरावटींपुरता आधाराला घेतला आहे. एकूण बांधणी ही, गाण्याच्या आशयाला समृद्ध करण्यासाठी इतर बाबी अंतर्भूत केल्या आहेत. जसे की हरकती घेताना, चक्क राग बाजूला सारलेला दिसून येतो. या संगीतकाराने काही वेळा, शास्त्रोक्त चीजेवर आधारित गाणी बांधली आहेत - *नज़र लागी राजा तोरे बंगले पर* हे एक उदाहरण म्हणून देता येईल परंतु बहुतांशवेळी रागातील एखादे *चलन* हाताशी घ्यायचे आणि त्याच्या भोवती चाल रचायची, असेच धोरण एकूण दिसते. आजच्या आपल्या गाण्याच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, गाण्यातील जी ठुमरी अंगाची संस्कृती जपलेली आढळते आणि त्याचबरोबर आपण एक चित्रपट गीत तयार करीत आहोत, याचे नेमके भान दिसते. गाण्यातील हरकती किंवा तान किती घ्यायची जेणेकरून त्याचा चित्रपटीय आविष्कार कुठेही गढूळ किंवा बटबटीत होणार नाही, याची *नजर* ऐकायला मिळते. गाण्यात उत्तर भारतीय लोकसंगीताचा रंग आहे तसेच ठुमरीचा बाज आहे आणि हे सगळे फक्त ३ मिनिटांच्या आविष्कारात दाखवले आहे. ही कामगिरी अनन्यसाधारण अशीच म्हणायला हवी. या संगीतकाराने, हिंदी चित्रपट गीतांचा नवीन *साचा* तयार केला आणि तसे करताना लोकांच्या पचनी पाडले. रवींद्र संगीतापासून स्फूर्ती घेतली पण आंधळी स्वीकृती नाकारून, त्यात स्वतःच्या बुद्धीने त्यातील आंतर सौंदर्याची दृष्टी दिली आणि हे करताना त्यांनी सुसंस्कृत संयम दाखवला. गाण्यातील वाद्यमेळ हा बव्हंशी सारंगी वाड्याने सजवलेला आहे आणि एकूणच विरही गीताच्या दृष्टीने योग्यच आहे. गायिका मुबारक बेगम यांनी हे गीत गायले आहे. एक गायिका म्हणून विचार करता, गळ्यावर संगीताचे *संस्कार* झाल्याचे जाणवत नाही. तसेच छोट्या ताना किंवा हरकती घेणे त्या गळ्याला झेपणारे होते. ललित संगीतात एक गायिका म्हणून सिद्ध करण्यासाठी, तुम्हाला व्यासंगी रचनाकार लाभणे, गरजेचे असते. मुबारक बेगम यांना तसा लाभ मिळाल्याचे दिसत नाही परिणामी गाण्यांची संख्या फारच तुरळक अशी राहिली. त्यातून त्यांच्या गळ्याला ठराविक प्रकारची गाणी - सर्वसाधारणपणे लोकसंगीतावर आधारित गाणी, गायला मिळाली. त्यांच्या आवाजाला एक सुंदर टोक होते, या गीताच्या संदर्भात हे विधान बघण्यासारखे आहे. वरच्या सुरांत हे गीत सुरु होते आणि द्रुत लयीत सुरु होते. गायिकेच्या गळ्याला हे जमून गेले पण प्रश्न येतो, या गायिकेला शांत, संयत गाणी कितपत जमली असती? तसेच हॉटेल मधील कॅबरे गीते जमली असती का? गळ्यात फारसा लवचिकपणा नसल्याने गीते मिळण्यावर मर्यादा आल्या. गीतातील उर्दू शब्दोच्चार अचूक केले आहेत तसेच गाण्यातील वेग सुरेखरित्या राखला आहे. द्रुत लयीतील गाणे गाताना, कवितेचा आशय ध्यानात घेऊन गाणे गायचे असते आणि ते इथे जमले आहे. आता प्रश्न पडतो, अशा गायिकेला संधी इतक्या कमी का मिळाल्या? या प्रश्नाचे उत्तर बाईंच्या गळ्याची एकूणच मर्यादित तयारी असेच म्हणावे लागेल. असे असून देखील हे गाणे अतिशय सुंदर झाले आहे आणि याचे कारण संगीतकाराने निर्माण केलेली स्वररचना, असेच म्हणावे लागेल. *देवदास* चित्रपट इतर गाणी इतकी सुश्राव्य आहेत की शंका एकाच येते की त्यामुळेच हे गाणे मागे कडाळे असावे अन्यथा इतके सुंदर गाणे, काळाच्या ओघात विस्मृतीत जाण्याचे काहीही कारण नव्हते. वो ना आएंगे पलटकर,उन्हें लाख हम बुलाये, मेरी हसरतों से केह दो की ये ख्वाब भूल जायें अगर इस जहाँ का मालिक, कही मिल सके तो पूछे, मिली कौनसी खता पर, हमें इस कदर सजाये तेरी बेरुख़ी के सदक़े,मेरी जिंदगी के खुशियाँ तू अगर इसी में खुश हैं, तो खुशीसे कर जफ़ाये (3) Woh Na Aayenge Palat Kar - YouTube

No comments:

Post a Comment