Wednesday, 11 January 2023
मीच बुडविलें
ऐकून घेणारा...... तूं,
समजून घेणारा.....तूं,
तुझ्याचपाशी म्हणून वागलें,
म्हणून बोललें....उगाच काहीं
खुळेभाबडें,
भानमोकळे....
अर्थशून्यही.
मुरडून थोडे नाक बुद्धीचे,
हासून थोडे उपहासाचे,
म्हणालास तू....
"सांगशील का मोजून मजला
या उथळपणाची खोली?"
गळ्यांत आला एक अवंढा
__डोहच काळा उथळपणाचा__
भिडले काळें पाणी येऊन
काजळावरी....
आणि तुला मी,
मीच बुडविलें त्या डोहामधीं
उंच तुझ्या त्या
हिमशिखरांसह.
"मृगजळ" या कवितासंग्रहातील ही छोटेखानी परंतु आशयगर्भ कविता, परंतु कवियत्री इंदिरा संत यांच्या शैलीची चुणूक दाखवणारी कविता. या कवितेत इंदिरा संतांच्या कवितेची सगळी वैशिष्ट्ये वाचायला मिळतात. ही कविता "भावकविता" म्हणून निश्चितच गणली जाते. आता त्या दृष्टीने विचार करता, कुठलीही कविता ही नेहमीच्या शब्दांतून आपल्याला वेगा आशय प्रतीत करून देणारी असावी. आपल्या नेहमीच्या जाणिवांना पाहिलं खोलवर दिशा दर्शवणारी असावी. बाकी गोष्टी या नंतर अवतरतात आणि त्या सगळ्या शब्दनिष्ठ असतात. आपण जगताना असंख्य अनुभव पदरात घेत असतो पण त्या अनुभवांना नेमक्या शब्दांची जोड मिळतेच असे नसते पण काही अनुभव हे कायम स्मृतीत टिकून राहतात आणि मग अवचितपणे त्या अनुभवांना शब्दरूप मिळते. अर्थात, भूतकाळातील अनुभवांना जेंव्हा वर्तमानात शब्दरूप देण्याची वेळ येते तेंव्हा त्यावेळच्या जाणिवा आणि आजच्या जाणिवा यात अंतर पडू शकते आणि आशयाची व्याप्ती बदलू शकते. अर्थात वर्तमानात जाणीव अधिक टोकदार आणि लखलखीत होऊ शकते आणि तो अनुभव पुन्हा नव्याने झळाळून उठतो. भूतकाळाच्या संवेदना त्याच जाणिवेने पुन्हा मांडणे, इथे इंदिरा संत यांची कविता यशस्वी होते. पूर्वीची झालेली जाणीव त्याच जाणिवेने प्रतीत करण्यात बाईंची कविता खरंच श्रेष्ठ ठरते.
आता या कवितेच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, कविता स्पष्टपणे आत्मगत स्वरूपाची आहे आणि हे तर बाईंच्या कवितेचे नेहमीचे गमक म्हणता येईल. इंदिरा संतांच्या बहुतेक कविता याच पातळीवर वावरत असतात. परंतु त्यात एकासाचीपणा न येत, जाणिवांच्या निरनिराळ्या दिशा आपल्याला बघायला मिळतात. वास्तविक कविता हा शाब्दिक खेळच असतो परंतु त्या खेळाची व्याप्ती, तुम्ही मगदुराप्रमाणे वाढवू शकता. निरनिराळ्या प्रतिमांना वेगवेगळ्या प्रकारे खेळवत, आशय अधिकाधिक विस्तारित न्यायचा, ही त्यांनी मांडलेल्या खेळाची दुसरी बाजू, सुरवातीलाच " ऐकून घेणारा...... तूं" या ओळीतून एक अवघडलेपण दिसते आणि ते कायम संपूर्ण कवितेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून आपल्याला वाचायला मिळते. हेच अवघडलेपण पुढे
"तुझ्याचपाशी म्हणून वागलें,
म्हणून बोललें....उगाच काहीं
खुळेभाबडें,"
या ओळींतून स्पष्ट दिसते. "बोललें...." नंतर जे चार ठिपके आहेत, ते काही चूष म्हणून मांडलेले नसून, पुढील "उगाच" या शब्दाचा अर्थ वाढवणारे आहेत. बोलायचे तर आहे पण कसे बोलायचे, हे अवघडलेपण मनात असल्याने, काहीशा तुटक, चाचरत भावनेतून उमटलेल्या संवेदना आहेत. म्हणूनच "खुळेभाबडे" सारखा शब्द वाचायला मिळतो. याच शब्दाने त्या ओळीचा शेवट होणे, हे अपरिहार्य असते. तिथे दुसरी अभिव्यक्ती असूच शकत नाही. नात्यातील ताणेबाणे हे असे दर्शवले आहेत. अत्यंत मोजक्या शब्दात भावना दुसऱ्याला पोहोचवायची ही इंदिराबाईंची खासियत फार वेगळी ठरते.एकमेकांच्या जवळ आहोत पण तरीही मनातले बोलायची धिटाई होत नाही.
"भानमोकळे....
अर्थशून्यही."
असे शब्द मोडून, दीर्घ लांबवून तीच भावना अधिक खोलपणे व्यक्त होते मन मोकळे करताना, काहीसा inferiority complex येऊन, मग " अर्थशून्य" असे वाटून, काहीशी अपराधी भावना मनात आली का? असा प्रश्न उभा राहतो. कारण समोरच्या व्यक्तीला आपली भावना नेमकेपणाने कळेल का? या प्रश्नातून आलेली ही भावना आहे. ठिपके मांडून ही भावना अधिक खोलपणे व्यक्त होते. इथेच मनातील चाचरणे दिसून येते.
एव्हाना जे सांगायचे ते सांगून झाल्यावर, प्रतिक्रिया म्हणून समोरच्या व्यक्तीचे काहीसे उपहासात्मक बोलणे ऐकायला मिळते. पुरूषच तो, तेंव्हा आपला ताठा दाखवणारच!! आपली बुद्धी तसेच पुरुष असल्याचा वृथा अभिमान डोकावत असताना,
"मुरडून थोडे नाक बुद्धीचे,
हासून थोडे उपहासाचे,
म्हणालास तू....
"सांगशील का मोजून मजला
या उथळपणाची खोली?"
या ओळींतून तेच तिच्या ध्यानात येते. आपल्याला हा पुरुष समजून घेईल का? आणि कानावर लगोलग "सांगशील का मोजून मजला,या उथळपणाची खोली?" असली पृच्छा येते. मनात जी अनामिक भीती दडलेली आहे, त्याचेच प्रत्यक्ष स्वरूप उभे राहते आणि एकदम मन बावचळते. कविता वाचता,वाचता एकदम वेगळे प्रतीत व्हावे असा हा अनुभव आहे. येणार अनुभव एकदम समोर उभा ठाकला की जी मनाची ओढगस्त अवस्था होते, तेच इथे वाचायला मिळते आणि संवेदन विश्व वेगळेच निर्माण होते. वास्तविक बाईंच्या कवितेत नेहमी निसर्ग असतो पण इथपर्यंत तरी त्याचा मागमूस दिसत नाही.
"गळ्यांत आला एक अवंढा
__डोहच काळा उथळपणाचा__
भिडले काळें पाणी येऊन
काजळावरी...."
इथे मात्र एक सुंदर प्रतिमा येते. "__डोहच काळा उथळपणाचा__" . नको असलेले समोर आल्यावर,आहे ते तसेच्या तसे स्वीकारण्याची तयारी नसते आणि स्वभावगत भावना डोळ्यांतून उमटते. इथे पहिल्याप्रमाणे ठिपके नसून डोहाच्या खोलीची व्याप्ती दर्शवली आहे. निसर्गप्रतिमा इथे ठसठशीतपणे पुढे येते.आता "डोह" म्हटल्यावर त्यातील "काळे पाणी" ही सहज प्रतिक्रिया होणे, स्वाभाविक होते. खरंतर सगळीच कविता ही एका स्वाभाविक मनोवस्थेची अलौकिक जाण आहे. काळे पाणी काजळावर येणे, ही या भाववृत्तीची अखेर म्हणता येईल. आता पर्यंत जे अनुभवविश्व साकारले आहे, त्याची ही अटळ अशी अखेर म्हणायची का? हा विदग्ध अनुभव खरंतर बहुतेकांच्या आयुष्यात अनेकवेळा, अनेक प्रकारे येत असतो परंतु त्याला असे शब्दरूप देणे कितीजणांना शक्य असते? काजळावर काळे पाणी साचणे, ही अभिव्यक्तीच फार मोठी आहे. संपूर्ण अनुभव वेगळ्याच स्तरावर जातो.
आणि तुला मी,
मीच बुडविलें त्या डोहामधीं
उंच तुझ्या त्या
हिमशिखरांसह.
आता कवितेच्या शेवटाकडे. आलेला अनुभव तसाच्या तास पचविणे अशक्य मग हाती काय राहते? एकदा "डोह" ही प्रतिमा स्थिर केल्यावर त्या शब्दाच्या अनुरोधाने पुढील अनुभव मांडणे, अपरिहार्य ठरते, पण तो अनुभव कशाप्रकारे "रिचवला" जातो, ते बघण्यासारखे आहे. त्या व्यक्तीला, त्याच्या विचारांना स्मृतीतून नाहीसे करणे, आवश्यक वाटते तेंव्हा जो डोह आपण निर्माण केला आहे, त्या डोहातच त्या स्मृतींना गाडून टाकणे, अधिक श्रेयस्कर. अर्थात तसे करताना, पुरुषी बाणा दर्शवून गाडले आहे - "हिमशिखरांसह"! तुझा ताठा, कर्मठपणा यातून जो "थंडगार" अनुभव जाणवतो, तोच या शब्दात मांडून त्याला त्या डोहात गाडणे, हेच अखेरचे प्राक्तन असू शकते.
अतिशय साधा, नेहमीच अनुभव परंतु त्याला वेगवेगळ्या प्रतिमांतून खेळवत आपल्यासमोर इंदिरा संतांनी मांडला आणि हेच त्यांच्या काव्याची खरी शैली म्हणता येईल.
No comments:
Post a Comment