Wednesday, 4 January 2023
जाओ रे जोगी तुम जाओ रे
सांगीत आविष्कारांतील उच्चतम आविष्कारांपर्यंत म्हणजे गीतापर्यंत पोहोचणे दीर्घ प्रक्रिया असून त्यात अनेक प्रक्रिया अंतर्भूत असतात. या प्रत्येक क्रियेस आपापली अविष्कार क्षमता असते. या परिप्रेक्षात एकसूरीपणापासून दूर जाणे, हे संगीतनिर्मितीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होय. कंठसंगीत आणि वाद्यसंगीताच्या विशिष्ट अविष्कारांत पूर्णतः गुंतून राहणे म्हणजे एकसुरीपणा होय. दुसरा टप्पा म्हणजे गुणगुणणे. या क्रियेत सांगीत कल्पना आकारास आलेली असते पण तिचे प्रक्षेपण होत नाही. तिसरा टप्पा म्हणजे सस्वरपाठाचा. यशस्वीपणे प्रक्षेपित तारातांची सहेतुक रचना हा याचा खास विशेष आहे. यात निवडलेल्या संदर्भरेषेच्या वर-खाली या पातळ्यांच्या पलीकडे न बघण्याची एक भूमिका असते. चौथी पायरी म्हणजे पठण. इथे संगीतपरता महत्वाची ठरते. याच पातळीचा परमोच्च आविष्कार म्हणजे गीत होय. गीताने संगीतपरतेच संभवपट पूर्ण होतो. गीताचे खास लक्षण असे, आपल्या गुणवत्तापूर्ण प्रक्षेपणामुळे प्रस्तुत गीत ऐकणाऱ्याची अशी गुंतवणूक करते की तो जवळपास निर्मितीचा सहभागी घटक बनतो.
वरील विवेचनाचा अनुसरून, आजच्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे. * जाओ रे जोगी तुम जाओ रे* नेहमीप्रमाणे आधी गाण्यातील कविता बघूया. प्रसिद्ध कवी शैलेंद्र यांची शब्दरचना आहे. शैलेंद्र हे शक्यतो भारतीय संस्कृतीच्या नाळेशी जोडलेले होते आणि त्यांच्या इतर काव्यामधून हेच दृग्गोचर होते. अर्थात प्रसंगानुसार गीत रचणे, ही प्राथमिकता लक्षात घेता, आजच्या गीताची रचना ही अर्थातच हिंदी सरंजामशाहीच्या काळाला अनुसरून केली आहे. संपूर्णपणे हिंदी भाषिक शब्दांनी योजलेली रचना आहे. आता नृत्यगीत तर आहेच परंतु त्याचबरोबर चित्रपटातील नायकाला आवाहन करणारे आहे. नायकाला विरक्ती आल्याने, त्या विरक्तीच्या विरुद्ध लिहिलेले गाणे आहे. एक गंमत, चित्रपट *चित्रलेखा* मध्ये अशा धर्तीवर लिहिलेले गाणे आठवले - *संसार से भागे फिरते हो*!! अर्थात अआशयातील साम्य वगळता, बाकी सगळेच भिन्न आहे. तशी शब्दरचना साधी आणि सोपी आहे. परंतु चित्रपटासाठी योग्य अशी आहे. *ज्ञान की कैसी सीमा ज्ञानी,गागर में सागर का पानी* या ओळीतून कवीच्या कवित्वाचा स्पर्श दिसतो. अन्यथा, गेयता हे वैशिष्ट्य वगळता, फार काही सांगावेसे वाटत नाही.
संगीतकार शंकर/जयकिशन यांची स्वररचना आहे. या जोडीने चित्रपट सृष्टीवर एक काळ संपूर्णपणे राज्य केले होते.अनेक प्रवृत्तीच्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना, त्यांच्या शैलीला आत्मसात करून, त्याप्रमाणे चाली निर्माण करण्याचे त्यांचे कौशल्य निश्चितच असामान्य होते. प्रस्तुत *आम्रपाली* चित्रपट भारतीय संगीतावर आधारित आहे आणि ते ध्यानात घेऊनच त्यांनी चाली निर्माण केल्या. *कामोद* रागावरआधारित स्वररचना आहे. २ आठवड्यांपूर्वी आपण याचा रागावर आधारित *तुमको देखा तो खायला आया* या गाण्याचे रसग्रहण करताना, या रागाचा अल्पसा असा परिचय करून घेतला होता आणि आज याच रागाचे वेगळे, स्वतंत्र असे स्वरूप बघत आहोत. दोन्ही मध्यम अंगिकारलेल्या या रागाचे स्वरूप *संपूर्ण/संपूर्ण* असे आहे, म्हणजेच कुठलाच स्वर *वर्ज्य* नाही. आता या पार्श्वभूमीवर या गाण्यातील सूर बघायचे झाल्यास, मुखडा *जाओ रे जोगी तुम जाओ रे* ही ओळ, *ग प धनिसा ध धप पम म ग गरे गरे प........* अशा स्वरांत ऐकायला मिळते. इथे *प* स्वरानंतर मींडयुक्त तान ऐकायला मिळते. हा झाला तांत्रिक भाग जो आपण झलक स्वरूपात घेतला आहे.
खरी खासियत आहे ती अशाच अप्रतिम हरकतींनी सजलेल्या गाण्याची. गाण्यात प्रत्येक ओळ, काही ठिकाणी तर शब्दागणिक हरकती आहेत आणि त्या सगळ्या *गायकी* अंगाच्या आहेत. परिणामी हे गीत ऐकायला कितीही वेधक वाटले तरी गायला मात्र *तयारी* असणे जरुरीचे ठरते. गाण्यात साधा *तीनताल* आहे जो बहुशः नृत्यगीतात अंतर्भूत असतो. गाणे द्रुत लयीत सुरु होते आणि त्याचा वळणाने संपते. अंतरे सारख्याच बांधणीचे आहेत परंतु गाण्यातील द्रुत लय आपल्याला सतत गाण्यासोबत राहायला लावते. मुखड्याच्या स्वरांना समांतर अशीच अंतर्यांची चाल आहे. गाण्याची रचना ही जवळपास *तार सप्तकात* आहे, अर्थात समेवर येताना एक,दोन ठिकाणी *मध्य सप्तकात* क्षणमात्र येते पण एकूणच सगळे गाणे वरच्या सुरांत चाललेले आहे. त्यामुळे नवागतांच्या गळ्यावर ताण पडण्याचा संभव अधिक. गाण्यातील वाद्यमेळ बव्हंशी सतार वाद्यानेच व्यापला आहे.
लताबाईंचे गायन हा या गाण्याचा खरा USP आहे!! रागदारी संगीतावर आधारित गाणे मिळाले की बाईंचा गळा किती समृद्ध गायकी दाखवतो, याचे हे एक समृद्ध उदाहरण म्हणता येईल. द्रुत लयीत देखील स्पष्ट शब्दोच्चार तसेच लखलखीत स्वर, हे मुद्दाम सांगण्यासारखे वैशिष्ट्य आहे. गाणे सुरु होण्याआधी बाईंच्या गळ्यातून *उपहासपूर्ण हास्य* ऐकायला मिळते. मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. हसण्याचे देखील किती विलोभनीय प्रकार असतात, हे कळून घेता येते आणि इथूनच बाई आपल्या गायकीला सुरवात करतात. *जाओ रे* इथे *रे* अक्षरावरील *एकार* ऐकताना, पुढील गायनाची चुणूक मिळते. पुढे *ये हैं प्रेमियों की नगरी* हे गाताना *ये* अक्षरावर किंचित वजन देऊन गायले आहे. "ये प्रेमियो की नगरी है" हे बजावणारे *वजन* आहे. ललित संगीतात खरे सौंदर्य हे अशाच बारीक,बारीक गोष्टींतुन बघायचे असते. स्पष्ट आणि दीर्घ तान हे चकित करतेच परंतु अशा अस्पष्ट गोष्टी त्या गायनाला नेहमी *भरीव* करतात. पुढे *यहाँ प्रेम ही हैं पूजा* गाताना *पु जा* गाताना दोन्ही अक्षरांतून फार बारीक, बारीक हरकती घेतल्या आहेत आणि हे खरेच अवघड आहे कारण जरी शब्द फोडला असला तरी त्या शब्दाचे वजन कुठेही भरकटत नाही आणि बाईंचे गायनी अंग कळते. *पूजा* गाताना पहिल्या अक्षरावर *उकारयुक्त* हरकत तर दुसऱ्या अक्षरावर *आकारयुक्त* हरकत आणि यातील काल,*क्षण* देखील मोठा वाटावा, इतका लवमात्र!!
पहिला अंतरा दुसऱ्यांदा घेताना, वरच्या सुरात केलेली सुरवात, क्षणात बदलू मुखड्याला समांतररीत्या जुळवून घेतली आहे. हा बाईंच्या गळ्यावरील अधिकार. आपण म्हणू त्याप्रमाणे गळा *वळवून* घेऊ शकतो. हे फार अवघड आणि असामान्य आहे. याच अंतऱ्यातील *प्रेम बिना ये जीवन दुःख हैं* या ओळीतील *दुःख* शब्द घेताना लावलेली *पम* स्वराची संगती किती परिणामकारक असू शकते, हे ऐकण्यासारखे आहे. हाच शब्द पुन्हा घेताना *गरे रेसा* या वेगळ्याच सुरांत घेतले आहे. अर्थात, हे गाणे जेंव्हा ऐकायला घ्याल, तेंव्हा या आणि अशा अनेक जागा, लताबाईंनी सुश्राव्य करून टाकलेल्या आहेत आणि म्हणूनच हे गाणे निव्वळ अप्रतिम गोडव्याचे झाले आहे.
जाओ रे जोगी तुम जाओ रे
ये हैं प्रेमियों की नगरी,यहाँ प्रेम ही हैं पूजा
प्रेम की पीड़ा सच्चा सुख हैं,
प्रेम बिना ये जीवन दुःख हैं. जाओ रे.....
जीवनसे कैसा छुटकारा
है नदिया के साथ किनारा, जाओ रे......
ज्ञान की कैसी सीमा ज्ञानी
गागर में सागर का पानी, जाओ रे......
(3) 66 38 Jao Re Jogi Tum Jao Film Amrapali - YouTube
No comments:
Post a Comment