Friday, 20 January 2023
जिया ना लागे मोरा
हिंदी चित्रपट संगीत आपल्या आयुष्यात अनेक संदर्भात अवतरले आहे. एका मर्यादेत विधान करायचे झाल्यास, हिंदी चित्रपट संगीत भारतातील आधुनिक आविष्कारांचा नवा अवतार म्हणण्यास प्रत्यवाय होऊ नये. याचा कारणास्तव, हिंदी चित्रपट संगीत हे वाढत्या प्रमाणात अभ्यास विषय होणे गरजेचे ठरते. हिंदी चित्रपट संगीताचे आकलन होण्यासाठी,सर्वात प्रथम, ज्या "जनसंगीत" कोटींत या संगीताचा अंतर्भाव होतो तिचे आकलन होणे गरजेचे आहे. मुळात जी "जनसंस्कृती" म्हणून जे अस्तित्वात आहे, त्याचाच उपप्रकार म्हणजे जनकोटी संगीत असे ढोबळ मानाने म्हणता येईल.
या बाबत असे विधान करता येईल, जनकोटी संगीतात, ध्वनी या माध्यमातील अत्यंत महत्वाच्या परिमाणाची म्हणजे "स्वन" किंवा "ध्वनिवैशिष्ट्याची" विपुल आणि जाणीवपूर्वक वापरलेली विविधता!! हेच जनकोटी संगीताचे प्रमुख वैशिष्ट्य मानता येते. आणि यालाच अनुसरून पुढे हेच वैशिष्ट्य चित्रपट संगीतात सढळपणे वावरते. याच विधानाच्या संदर्भात आपण आजचे गाणे "जिया ना लागे मोरा" आस्वादायला घेऊया.
वास्तविक पाहता मजरुह सुलतानपुरी हे नाव केवळ उर्दू भाषेत नसून, अखंड हिंदी चित्रपटसृष्टीत अतिशय आदराने घेतले जाते आणि ते सर्वार्थाने सत्य आहे. गेयताप्रधान गीते लिहिताना, भाषेचा अनुपम डौल, त्यांच्या रचनेतून वाचायला मिळतो. कविता समजायला फारशी अवघड नसते तरीही कवितेत घीसेपीटेपण फारसे नसते. लिखाणात प्रचंड सातत्य असून देखील भाषिक दर्जा टिकवण्यात कमालीचे यश प्राप्त केले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील मोजक्या दर्जेदार कवींमध्ये त्यांची गणना होते.
आजचे गाणे हे बरेचसे "बंदीश" प्रधान गाणे आहे. अर्थात ज्याप्रमाणे रागदारी संगीतातील बंदिश रचनेला, काव्यदृष्ट्या फार महत्व नसते. अगदी तास प्रकार इथे घडविलेला नाही पण, एक घाटदार बंदिश असावी, त्याप्रमाणे एकूण रचनेचा घाट आहे. नायिकेचा नायकाला उद्देशून केलेला आत्मगत संवाद आहे. त्यामुळे एकूणच भाषा देखील काहीशी सांकेतिक आहे. "काहे पट खोला,तूने मेरे द्वार का; आया बरसों में कोई,झोंका प्यार का" सारख्या ओळीतून हे स्पष्ट वाचायला मिळते. "दो पल तो ठहर जा,मोहे इतना भी ना सता" या ओळीतून नायिकेला वाटणारा विश्वास प्रतीत होतो. असे जरी असले तरी एकूणच कविता म्हणून वाचताना, फार काही हाताला लागत नाही, हे खरे. अर्थात अशी अपेक्षा ठेवायचे कारण स्वतः मजरुह यांचे स्थान आहे. इतर कोणी कवींच्या बाबतीत अशी अपेक्षा ठेवणे, अपवाद स्वरूपात का होईना, जड जाते. इथे कवितेची खुमारी जाणवते ती, चालीच्या गुंतागुंतीतून, थोडक्यात चालीमध्ये जे "खटके" किंवा "हरकती" आहेत,, त्याला "सुयोग्य" अशी शब्दरचना आहे आणि तशी लिहिली गेली, हेच या कवितेचे मुख्य यश म्हणावे लागेल.
संगीतकार राहुल देव बर्मन यांनी बांधलेली "तर्ज" हेच या गाण्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल. स्वररचना सरळ,सरळ "खमाज" रागावर आधारित आहे. खमाज राग एकूणच ललित आणि उपशास्त्रीय रचनांसाठी खूप लोकप्रिय राग आहे. "रिषभ" वर्जित हा राग "शाड्व / संपूर्ण" या जातीचा आहे. तसा अगदी सरळसोट राग आहे. "ग म प ध नि(को) ध" ही सुरावट "ना जा रे, ना जा रे, ना जा" इथे ऐकायला मिळते आणि खमाज राग सिद्ध होतो. आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, या संगीतकाराची जी ओळख निर्माण झाली आहे, त्याला छेद देणारी रचना आहे. बैठकीच्या गाण्याचा आराखडा आहे त्यामुळे फारसा वाद्यमेळ वापरलेला नाही. अत्यंत घरगुती वातावरणातील गाणे आहे. वाद्यमेळात सतार,बासरी ऐकायला मिळते परंतु सगळे गाणे तालाच्या मात्रांवर उचलून घेतले आहे. गाण्यात तालाचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग करण्याच्या कौशल्याला मात्र दाद द्यायला हवी. गाणे मध्यलयीत आहे पण अंतरा संपताना किंचित्काल द्रुत लयीत शिरते परंतु ते शिरणे, हा स्वररचनेचा आंगिक भाग आहे. आपल्या भारतीय संगीतात, समेच्या मात्राला अतिशय महत्व आहे आणि त्या मात्रेला रचना येताना, लय विसर्जित होते आई हे विसर्जित होणे, अतिशय डौलाने होणे, अपेक्षित असते. या विधानाचा थोडा बारकाईने विचार केल्यास, इथली द्रुत लय का निम्नस्तरावर आहे, याचा उलगडा होतो.
या गाण्यातील "विराम" अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत, "जिया ना" नंतर छोटासा विराम आहे, पण निव्वळ अप्रतिम आहे. तसेच पुढे "दो पल तो ठहर जा" इथे असाच जीवघेणा विराम आहे. शब्दांचे औचित्य राखून निर्माण केलेली "जागा" आहे. प्रेयसीची आळवणी "ठहर जा" या शब्दातून व्यक्त होते तेंव्हा तिथेच क्षणभर सगळेच थांबणे औचित्यपूर्ण ठरते. गाणे ऐकताना, या संगीतकाराच्या शैलीची सगळी वैशिष्ट्ये आपल्याला बघायला मिळतात, जसे की "खटके" घेण्याची पद्धत किंवा "हरकत" घेताना, काहीसा तुटकपणा घ्यायचा! अर्थात हे लताबाईंच्या गायकीचे कौशल्य देखील म्हणता येईल.
लताबाईंची गायकी अशा गाण्यातून खुलून येते. इथे प्रत्येक शब्दाचा उच्चार ऐकण्यासारखा आहे, जसे की अस्ताई मधील "जिया ना लागे मोरा" गाताना, स्वरांचे ताण तर सांभाळले आहेतच परंतु शब्दांमधील भाव देखील त्याच असोशीने दाखवला आहे. प्रियकराची ओढ इतक्या सौंदर्यपूर्णतेने ऐकवली आहे की तिथेच हे गाणे आपल्या मनाची पकड घेते. "ना जा रे, ना जा रे, ना जा" इथे अक्षरांचे पुनरावर्तन जरी असले तरी प्रत्येक अक्षराचे ठळक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य, लताबाईंनी आपल्या गळ्यातून दाखवले आहे. गाण्यातील प्रत्येक खटका, त्या शब्दांतील दडलेला आशय स्पष्ट करणारा आहे. "गायकी" दाखवण्याचा चुकूनही प्रयास नाही.मुळात चाल इतकी गोड आहे की मुद्दामून शब्दांवर सुरांचे वजन टाकण्याची गरज नाही. लताबाईंनी हेच गाऊन सिद्ध केले आहे. मुळात गाण्यातील "मेलडी" इतकी सुंदर आहे की त्याला बाह्य आवरणाची गरजच भासत नाही.
अतिशय शांत, निर्मळ आणि गोड गाणे आहे. रसिकांनी खरोखरच दाद द्यावी, असे हे गाणे आहे.
जिया ना लागे मोरा,
ना जा रे, ना जा रे, ना जा
काहे पट खोला,तूने मेरे द्वार का
आया बरसों में कोई,झोंका प्यार का
दो पल तो ठहर जा,मोहे इतना भी ना सता
सुन के मेरी बातें, पलक तेरी क्यूँ झुकी
अच्छा रे बेदर्दी, जा नहीं मैं रोकती
ये है तेरा रस्ता, कहीं जा सकता है तो जा
(2) Jiya Na Lage Mora - Navin Nischal - Archana - Buddha Mil Gaya - Om Prakash - Deven Verma - YouTube
No comments:
Post a Comment