आपल्याकडे सर्वसाधारणपणे मराठी कविता म्हटली की लगेच समाजप्रबोधन, सामाजिक बांधिलकी किंवा प्रणय कविता हाच दृष्टिकोन ठेवला जातो परंतु या पलीकडे देखील मराठी कविता भावनांचे अनेक तरंग दाखवते. विशेषतः: रगेल आणि रंगेल भाववृत्तीचे दर्शन मराठीत तसे अभावानेच आढळते. मराठी मनाची ती एक मर्यादा मानवी लागेल. अर्थात काही कवींनी जाणीवपूर्वक या प्रांतात समृद्ध रचना केल्या आहेत पण एकूणच कवितांचा अवकाश बघता, प्रमाण तुरळकच आहे. आजचे गाणे हे अशा प्रकारचे आहे. ग.दि.माडगूळकरांच्या कविता रचनेत जरी मराठी संस्कृतीचा आणि मातीचा विपुल आढळ असला तरी देखील त्यांनी काही अपवादात्मक कविता लिहिल्या, त्यातील ही कविता. ढंगदार आणि तरीही संयत रचना करणे हा माडगूळकरांच्या प्रकृतिधर्म. लावणीचा बाज स्वीकारताना देखील, त्यातील रांगडा श्रुंगार शब्दबद्ध करताना, कुठेही औचित्याचा भंग होणार नाही याचीच काळजी घेतली आहे. वास्तविक प्रस्तुत कवितेबाबत काही मांडायचे झाल्यास, मद्य घेतानाची तरल अवस्था आणि धुंदावस्थेत असूनही घरात असलेल्या बाळाची आणि त्याच्या आईची काळजी, असे दुहेरी पातळीवरील वर्णन आहे. मद्य सेवन करणारा "मी" धुंद होत असताना सुद्धा शुद्धीवर आहे. एकाच वेळी मद्याचा आस्वाद चालू आहे पण त्याचबरोबर कुटुंबाची काळजी आहे. खरतर हे कुणाही संयत, सक्षम माणसाबद्दल म्हणता येईल. प्रासादिक आणि सुबोध शब्दरचना माडगूळकरांच्या कवितेचे प्रधान वैशिष्ट्य म्हणता येईल. इथे देखील, कविता म्हणून स्वतंत्रपणे वाचताना, ध्रुवपदांच्या ओळीतच आशयाची संकल्पना रेखीवपणे मांडलेली आहे. रात्रीची मदिरधुंद वेळ आहे आणि त्याचवेळी काहीशा द्विधा मनस्थितीत बायकोची आणि तद्वत आपल्या बाळाची आठवण येऊन, काहीशा विकल मनस्थितीचे यथार्थ वर्णन आहे.
धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले
त्याचवेळी तू असशील तेथे बाळा पाजविले
एकदा का पहिल्याच ओळीत आशय स्पष्ट झाल्यावर पुढे वेगवेगळ्या प्रतिमांनी तोच आशय अधोरेखित करणे आणि त्याद्वारे कवितेची बांधणी घट्ट करणे, हे आणखी एक वैशिष्ट्य माडगूळकरांच्या कवितेबाबत अवश्यमेव लिहावे लागेल. दोन वेगळी चित्रे आणि त्यातील विरोधाभास, संपूर्ण कवितेत हाच दृष्टिकोन ठेवलेला आहे. " माझ्यावरती खिळली येथे विषयाची दृष्टी " किंवा " माझ्या कानी घुमती गाणी, मादक मायावी " या वाक्यातून ज्या परिसरात "मी" बसलेला आहे, याचे नेमके वर्णन केलेले आहे. कविता अल्पाक्षरी असते ती अशी.
येथ विजेचे दिवे फेकतो उघड्यावर पाप
ज्योत पणतीच्या असेल उजळीत तव मुख निष्पाप
माझ्या कानी घुमती गाणी, मादक मायावी
ओठांवरती असेल तुझिया अमृतमय ओवी
गायक आणि संगीतकार, या दोन्ही भूमिकेत इथे आपल्याला सुधीर फडके भेटतात. खरतर, सुधीर फडक्यांची बहुतांश कारकीर्द ही मराठी चित्रपटाच्या भोवती बहरलेली दिसते परंतु त्यांनी काही थोड्याच अशा भावकवितांना चाली लावल्या आणि स्वतः:च्याच आवाजात चित्रपटबाह्य अशा संगीतरचना सादर केल्या. एक निरीक्षण - जेंव्हा एखादा संगीतकार खाजगी गीत संगीतबद्ध करायला घेतो, तेंव्हा बहुतांशी हाताशी असलेले काव्य हे, कविता म्हणून अधिक घाटदार, समृद्ध काव्याशय इत्यादी घटक आवर्जूनपणे बघतो. कवितेत गेयता असणे, गरजेचेच असते परंतु गेयता बघताना, ओळींमधून दिसणारा शाब्दिक लय देखील तितकाच महत्वाचा असतो आणि तिथे संगीतकाराची नजर अधिक तीक्ष्ण असते. गाण्याची सुरवातच, कसलाही वाद्यमेळ न वापरता केलेली आहे. कवितेत एका ओळीतून एक कल्पना तर दुसऱ्या ओळीतून विरोधी कल्पना, हा विरोधाभास ध्यानात घेऊन, फडक्यांनी संगीतरचना केली आहे आणि स्वतः:च गायन करीत असल्याने, तो विरोधाभास प्रत्ययकारी पद्धतीने मांडला आहे. गायक म्हणून सुधीर फडके किती बारकाईने विचार करतात - "निष्पाप" शब्द गाताना, "ष" अक्षराचा उच्चार मुद्दामून ऐकण्यासारखा आहे. उच्चारात स्पष्टता आहे पण स्पष्टता आणताना बहुतांशी "खडखडीत" उच्चार होतात आणि गाण्याचा रसभंग होऊ शकतो आणि सुधीर फडक्यांनी नेमके तेच टाळले आहे. असे शब्द सुरांद्वारे गायचे, हे सहज जमण्यासारखे नसते.
माझ्यावरती खिळली येथे विषयाची दृष्टी
मत्पुजेस्तव असशील शोधीत सखे, स्वप्नसृष्टी
कनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली
विरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली
गाण्यातील वाद्यमेळ बांधताना, व्हायोलिन, बासरी इतपतच वाद्ये ठेवली आहेत तर तालवाद्याचा ध्वनी देखील काहीसा "दबका" ठेवला आहे, जेणेकरून माडगूळकरांच्या शब्दांना कुठेही धक्का बसू नये. दुसरी महत्वाची बाब म्हणजे गायन करताना, प्रत्येक ओळीतील आशय ध्यानात घेऊन, आवाजाचा स्तर कमी, जास्त ठेवला आहे. तसेच पहिला अंतरा आणि दुसरा अंतरा, याची "उठावण" ऐकण्यासारखी आहे. दुसरा अंतरा घेताना स्वर किंचित उंचावला आहे. खरतर सुधीर फडक्यांचा गळा शक्यतो मंद्र आणि मध्य सप्तकात अधिक करून खुलणारा आहे पण प्रसंगी तार स्वर घेणे त्यांच्या गळ्याला सहज जमत होते. तसे बघितले तर अंतऱ्याची चाल जवळपास तशीच ठेवली आहे.
तुझे नि माझे अंतर व्हावे कसे एकरूप?
शीलवती तू, पतिव्रते मी मूर्तिमंत पाप!!
गाण्याचा शेवट करताना मात्र एके ठिकाणी जरा दोष आढळतो. शेवटची ओळ गाताना, शीलवती तू, पतिव्रते मी मूर्तिमंत पाप " - नायिकेचे वर्णन करताना, " शीलवती तू , पतिव्रते - मी मूर्तिमंत पाप " अशी गायला हवी होती. इथे गाताना, " पतिव्रते मी " असे शब्द गायले गेले आहेत. पटकन लक्षात येत नाही पण जरा बारकाईने ऐकले तर समजून घेता येते आणि याचे मुख्य कारण स्वररचनेची लयच अशी बांधलेली आहे की जर का दोन्ही शब्द "सुटे" गायले गेले असते तर लय बिघडली असती आणि मग समेची मात्रा घ्यायला प्रयास पडला असता. "शब्दप्रधान गायकी"च्या मर्यादा या अशा दिसतात.
Excellent! Thank You!
ReplyDeleteExcellent Commentry!!!
ReplyDeleteकाल माझ्या बाबतीत असं घडलं...
ReplyDelete"बायको तिकडे हळदीकुंकवाला गेलीय
आणि नवरा घरी कोंबडी marinade बनवत आहे"
या परिस्थितीवर सुचलेले...
*खाद्यपेय विडंबन*
🎭
_धुंद येथ मी_ स्वैर चोपतो हळद कोंबडीला
हळदकुंकू तू लेवून तिकडे खेळशि फुगडीला
मसाल्यात मी कुटून घालतो मिरी लवंगेला
गूळ कसा तू कुटून घालशी तीळखोबऱ्याला
रश्श्याच्या त्या उकळीने बघ जाग मला आली
वडापाव तो सांडत असता तुझिया गं गाली
सुरा-चषक बघ फेर घालिती मादक मायावी
तीर्थप्रसादा घेऊन नमुनी भक्ति तुला यावी
तुझे नि माझे अंतर व्हावे असे एकरूssप
शीलवती! तू बनून साकी, चखण्या ओsरsप
✍🏼🤠चिअर्स🍷🥃
(१९/०१/२०२५)