Wednesday 18 June 2014

“उर्मिला” – ग्रेस




ग्रेस यांची कविता, हेच खरेतर “शिवधनुष्य” आहे. जिथे, आशय आकळत आहे, असे वाटत असताना,अचानक, एखादी प्रतिमा वाचायला मिळते आणि सगळी कविता धुसर व्हायला लागते. भाषेचा अतिमोहक फुलोरा, प्रतिमाप्रतीकांचा प्रत्ययकारी उपयोग या कवितेत जितका अनुभवायला मिळतो, तितका इतर कुठल्या कवितेत फारसा आढळत नाही, परंतु याचा प्रतीकांमुळे कवितेत जटिलता पसरते आणि आशयाच्या दृष्टीने कविता अवघड होत जाते. कवितेत आढळणारा जीवनानुभव, कविवृत्ती दर्शवतेच पण, त्याची नेमकी वजने, ताण,पोत ह्यांसह तो अभिव्यक्त होताना त्या प्रतिमांची पकड कायम राहते. निसर्गरूपे, त्यातील भावजीवने ह्यांचा अनुभव व बंदिश, दोन्ही काव्यात्मकताच नियंत्रित करतात. इतके लिहूनही अखेर असेच वाटते, या कवितेचे नेमके विश्लेषण करून सांगणे कठीणच आहे.
“उर्मिला” ही कविता या दृष्टीने अनुभवण्यासारखी आहे. वास्तविक भारतीय पुराणातून अशा अलक्षित व्यक्ती आणि त्यांचे नेहमीच्या संदर्भातील नाते वेगळ्या स्वरूपात मांडले जाते. अशाच प्रकारचे नाते, इंदिरा संतांनी “कुब्जा” आणि पु.शि.रेग्यांच्या “राधा” कवितेतून असेच त्या व्यक्तीचे वेगळेच दर्शन आपल्याला घडवले आहे!!
जीवनातील अनेक घटनांमधील तसेच व्यक्तीव्यक्तींच्या भावनाशयातील विरोधलयाची जी जाण सहजगत्या असावी लागते, ती या कवितेतून दिसून येते. पुष्कळदा अतिशय तरल असा भावाशय अतिशय ढोबळ अशा प्रसंगांच्या द्वारे करावा लागतो, म्हणजे उपमा घेऊन तर सांगायचे तसेच सतत उलगणाऱ्या व उलगडण्याची क्रिया, हाच प्राण असलेल्या फिल्म्ससारखी न होता, अंतराअंतराने येणाऱ्या स्लाइड्ससारखी होते.
“त्या दाट लांब केसांचा
वाऱ्यावर उडतो साज
दु:खात अंबरे झुलती
की अंग शकते लाज………
तरी हळू हळू येते ही
संध्येची चाहूल देवा
लांबती उदासीन क्षितिजे
पाण्यांत थांबल्या नावा………
देहास आठवे स्पर्श
तू दिला कोणत्या प्रहरी
कीं धुके दाटले होते
या दग्ध पुरातन शहरी……
सुख असे कळीतून फुलते
व्यापतो वृक्ष आभाळ
छायाच कशा दिसती मग
आपुल्यापरी खडकाळ
आटले सरोवर जेथें
का मोर लागतो नाचू
तू सोड उर्मिले आता
डोळ्यांत बांधिला राघू……
हे कविता वाचताना, मला काही ठिकाणी, या कवीची “पाऊस” हे तितकीच असामान्य कविता आठवली, विशेषत: ” की धुके दाटले होते, या दग्ध पुरातन शहरी…” ही ओळ वाचताना, “संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा” ही ओळ आठवली. वास्तविक दोन्ही ओळी आशयाच्या दृष्टीने वेगळ्या आहेत तरीही बहुदा, “संदिग्ध” आणि “दग्ध” या शब्दांमुळे आठवल्या असाव्यात!! तसे पहिले तर प्रत्येक कवीच्या, स्वत:च्या अशा खास प्रतिमा किंवा प्रतीके असतात, जसे ग्रेसच्या कवितेत, “राघव”,”घोडा” किंवा कार आलेला “दग्ध” शब्द, असे उदाहरणादाखल म्हणता येईल.
जरी कविता उर्मिलेवर असली तरी, वाचताना असे सहजच जाणवते, हा सगळा उर्मिलेशी, तिच्या प्रियकराचा संवाद चाललेला आहे. ग्रेसच्या कवितेत दु:खाचे दर्शन विविध स्वरूपात आढळते.
“तरी हळू हळू येते ही, संध्येची चाहूल देवा; लांबती उदासीन क्षितिजे, पाण्यांत थांबल्या नावा….” वास्तविक पहिल्या दोन ओळीतच दु:खाची जाणीव करून दिलेली आहे. “दु:खात अंबरे झुलती, की अंग शकते लाज…” इथेच दु:खाची स्पष्ट कल्पना दिली आहे. किती रम्य ओळ अहे, “अंबर” आहे म्हणजे दु:ख लपलेले तर नाही पण तरीही लाजेने अंग झाकले आहे!! त्याच्याच विस्तार संध्याकाळच्या पार्श्वभूमीवरील लांबणाऱ्या सावल्या आणि पाण्यातील स्थिर नावा!! दु:ख असे गोठविणारे आहे, चिरंतन स्वरूपाचे आहे.
“देहास आठवे स्पर्श, तू दिला कोणत्या प्रहरी; की धुके दाटले होतें, या दग्ध पुरातन शहरी” प्रणयोत्सुक स्पर्श पण आता त्याची आठवणी डंख देणारी, इतकी की भोवती सगळेच धुके पसरलेल्या आसमंतात जशा वस्तू गूढ दिसतात तसे ते दिलेले स्पर्श आता जाणवत आहेत.
“दग्ध” या शब्दातच त्या भावनेची नेमकी “दाहकता” कळून येते. आरतीप्रभूंच्या दोन ओळी या संदर्भात आठवल्या!! ” तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे!!” इथे अशा प्रतिकांतून आपल्याला जाणीव होते ती, दु:खाचीच पण कधीही जखम न भरून येणाऱ्या, भळभळणाऱ्या रक्ताची!!
काही कवी हे नेहमीच अंत:स्फूर्तीने, नेणीवेनेच लिहितात आणि एकदा नेणीवांनी विचार करायचा झाल्यास, जाणीवेचा प्रवास हा नेहमीच अर्धुकलेला, धुकाळलेला राहणार!! जीवनातील, चिरंतन आणि मुलभूत पातळीवरील अशाच अति तीव्र व अस्तित्व ढवळून टाकणाऱ्या अनुभवांना एक स्वत:च्या प्रगल्भ, सुसंस्कृत जाणीवेतून सामोरा जातो तसेच अनुभवांना नेणिवेच्या पातळीवरून कवेत घेऊ पाहतो. इथे तर, केवळ अंत:स्फूर्तीतून व जणू नेणीवेतून निर्मिली जाताना, ती निसर्गरूपाचे गुणधर्म घेऊन येते.
“आटले सरोवर जेथे, का मोर लागतो नाचू; तू सोड उर्मिले आता, डोळ्यांत बांधला राघू…” एकमेकांवरील प्रेम तर आता आटले, तरी अजूनही मनात थोडी धुगधुगी आहे!! अशा विपर्यस्त क्षणाला जी मनाची तडफड असते, याचे सुंदर शब्दचित्र इथे उभे राहिले आहे. अर्थात, नेहमीप्रमाणे, ग्रेस कधीही कवितेचा शेवट सरळ, सहज भाषेत करीत नाही आणि याची प्रचीती, इथे नेमकी येते ती, “राघू” या शब्दातून!! वास्तविक, “राघू” म्हणजे सोप्या अर्थाने “पोपट”!! या पक्ष्याची प्रतिमा डोळ्यांत उभी राहिली, हे समजले पण नेमका हाच पक्षी का?

1 comment:

  1. नेमका 'राघू' च का?

    ReplyDelete