Sunday, 29 May 2022
फ्युजनसंगीत - किती आधुनिक, किती प्राचीन?
या विषयाला हात घालण्यापूर्वी थोडी फार पार्श्वभूमी बघणे आवश्यक ठरते आणि इथे फक्त भारतीय संगीत, इतकेच अभिप्रेत आहे. मुळात, भारतीय संगीताची (शास्त्रविरहित म्हणूया) सुरवात ही सामवेदातील *ऋचा गायन* इथून झाल्याचे बहुतेक शास्त्रकारात मेनी झालेले मत आहे. अर्थात त्याला शास्त्राचे अधिष्ठान प्राप्त झाले नव्हते, जे नारद मुनींनी *नाट्यशास्त्र* या ग्रंथातून प्राप्त करून दिल्याचे आढळते. आज आपण जे *सप्तक* आणि *श्रुती* म्हणून जे वापरतो, त्याचे शास्त्रशुद्ध लिखाण प्रस्तुत ग्रंथात सर्वप्रथम लिहिल्याचे आढळते. अर्थात त्या पूर्वी काही घडले असेल तर त्याचा *पुरावा* काही सापडलेला नाही त्यामुळे *अग्रपूजेचा* मान हा नि:संशयरीत्या नारद मुनींकडे जातो. वास्तविक या ग्रंथात केवळ एकच असा लेख आहे जो या विषयाची मांडणी करतो. पुढे, *अहोबल* किंवा *लोचन* या मुनींनी यथाशक्ती भर टाकली आहे परंतु ढाचा हाच कायम ठेवलेला आढळतो. या ढाच्याचा खरा विस्तार १२व्या शतकातील शारंगदेव मुनींनी *संगीत रत्नाकर* मध्ये केलेला आढळतो आणि आजही हा ग्रंथ *प्रमाणभूत* ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. इथेच *धृपद धमार* या गायनाचा विस्तार केलेला आढळतो. तसेच *शास्त्र* म्हणून प्रमाणबद्ध चिकित्सा केलेली वाचायला मिळते.
आता थोडे पुढे येऊ या. १५ व्या शतकात *अमीर खुसरो* अवतरले आणि त्यांनी *सतार* वाद्य आणि *ख्याल* गायनाची मांडणी केली असे सांगण्यात आले. इथे २ प्रवाद प्रसिद्ध आहेत. काही शास्त्रकारांचा प्रतिवाद असा आहे, जर का १५ व्या शतकात निर्मिती झाली तर मग पुढे १८ वे शतक उजाडेपर्यंत ही निर्मिती कुठे लुप्त झाली? पुढील ३ शतके, याचा कुठेच संदर्भ मिळत नाही!! हे कसे घडले? मुस्लिम राज्य तर देशभर पसरलेले होते तेंव्हा हे संगीत *लपवले* असे म्हणायला काहीच अर्थ नाही परंतु, एक बाब मान्य करायलाच हवी, सतार या वाद्याने भारतीय संगीतात आमूलाग्र बदल बदल घडून आला.
आता थोडा वेगळा विचार केला तर धृपद गायकीवरून ख्याल गायकीकडे वळणे, हे एक प्रकारचे *फ्युजन* म्हणायला हवे!! आता आपण विचारातील कोतेपणा बाजूला सारायला हवे कारण आज जे *फ्युजन* म्हणून ढोल वाजवला जातो, ते म्हणजे प्रमाणित संगीतापेक्षा वेगळे संगीत, असेच आपल्याला दिसून येईल.आजच्या फ्युजन संगीताचा *आराखडा* बारकाईने ऐकायला घेतल्यावर, माझे हे विधान पटू शकेल. मुळात *फ्युजन* म्हणजे संगीताचा नवीन आकृतिबंध निर्माण करणे होय. *नवनिर्मिती* ही कधीही संपूर्णपणे *नवीन* कधीही नसते तर त्यात कुठेतरी पारंपरिक निर्मितीचा संदर्भ हा प्रत्येक पायरीवर असतो.
लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे, आपण नेहमी *नवनिर्मिती* या शब्दाचा ढोल वाजवतो परंतु त्यातील *नव* आणि *निर्मिती* या दोन्ही शब्दांना बऱ्याच मर्यादा असतात. जसे आपण वर बघितले, धृपद धमार मधून त्याचा लालित्यपूर्ण आविष्कार म्हणजे ख्याल किंवा रागसंगीत होय. याच रागसंगीतातून पुढे अनेक स्वराविष्कार निर्माण झाले जसे मराठी रंगभूमीवरील संगीत!! आता जरा बारकाईने ऐकले तर मराठी नाट्यसंगीतात *ऑपेरा संगीत*(संगीत रंगभूमीची प्रेरणा मुळात ऑपेरा संगीतातून अण्णासाहेब किर्लोस्करांनी घेतली आहे) पुढे, *बैठकीची लावणी*, *ठुमरी* किंवा *दादरा* सारखे उपशास्त्रीय संगीत प्रकारातून सगळे प्रवाह आणले गेले आणि खुमासदार गायकी तयार झाली. अर्थात इथे सगळे गायन प्रकार घेतलेले नाहीत, फक्त काही उदाहरणे वानगीदाखल घेतली आहेत. आता विचार केला तर हे सगळे *फ्युजन संगीत* आहे. फक्त त्याला शास्त्रीय आणि लोकसंगीताचा भरभक्कम आधार दिला आहे. मुळात भारतीय लोकसंगीत हेच मूळ संगीत मानता येईल कारण त्याची खरी निर्मिती कुणी केली? या प्रश्नाचे उत्तर आजही अंधारात आहे.
आज जे *फ्युजन संगीत* म्हणून ढोल वाजवला जातो त्यात नक्की *सर्जनशीलता* किती आणि *Craftmanship* किती? याचा स्वतंत्रपणे विचार व्हायला हवा. खरंतर *भावगीत*, *चित्रपटगीत* किंवा *बारावरची लावणी* असे अनेक ललित संगीत आविष्कार हे *फ्युजन संगीत* आहेत. crafting तर सगळ्याच आविष्कारात आहे. केवळ सर्जनशीलता कलेसाठी उपयोगी नाही. निर्मिती करताना, त्याचे *गणित* हे मांडावेच लागते अन्यथा होणाऱ्या कलाकृतीला बांधेसूदपणा कधीही प्राप्त होणार नाही तेंव्हा हल्ली नेहमी *सर्जनशीलता* या शब्दाचा धोशा लाव ला जातो, तो देखील चुकीचाच आहे.
हिंदी चित्रपटसंगीतात या संगीताचा वारेमाप उपयोग केला जातो परंतु याच चित्रपट संगीतात, १९४० मध्ये जेंव्हा *पियानो*, *सेलो* सारखी पाश्चात्य वाद्ये आणून स्थिरावली तिथेच *फ्युजन संगीत* सिद्ध झाले. *व्हायोलिन* पाश्चात्य वाद्य आहे पण हे मुद्दामून सांगावे लागावे, इतके ते भारतीय संगीतात मिसळून गेले आहे. काही उदाहरणे देतो. *होटो पे ऐसी बात* सारखी *ज्वेल थीफ* चित्रपटातील गाणे किंवा *तुम जो मिल गये हो* सारखे *हसते जख्म* चित्रपटातील गाणे, ही फ्युजन संगीताची म्हणून अप्रतिम उदाहरणे देता येतील. याचा काळात, *ओ.पी. नैयर*,*सलील चौधरी* सारख्या अनेक संगीतकारांनी अशाच फ्युजन संगीताच्या रचनांनी हिंदी चित्रपटसंगीत ढंगदार केले पण तेंव्हा *फ्युजन* हा शब्दच अवतरलेला नव्हता.
इतके कशाला १९६७ साली *शिवकुमार शर्मा*, *हरिप्रसाद चौरासिया* आणि *ब्रिजभूषण काब्रा* यांची *Call of the Valley* ही संयुक्त निर्मिती याच संगीताचे द्योतक म्हणता येईल. अर्थात त्याच्याही पंडित रविशंकर यांनी सत्यजित रे यांच्या गाजलेल्या *पथेर पांचाली* या गीतविरहित चित्रपटासाठी ज्या स्वररचना केल्या आहेत, ते फ्युजन संगीत आहे. खरंतर सध्या बरेचवेळा *फ्युजन संगीत* जे समोर येते, ते म्हणजे एका सुंदर कल्पनेचा विचका असतो. जुन्या गाण्यांची नव्याने बांधणी करायला हरकत नाही पण तसे करताना, त्या गाण्यातील काव्य काय आहे? त्याची अनुभूती घेऊन, नवी बांधणी करणे गरजेचे असते. केवळ आफ्रिकन संगीताचे तुकडे टाकून आपणच आपली पाठ थोपटून घेणे, याला काही अर्थ नसतो. अर्थात त्यासाठी कवितेची अर्थपूर्ण जाण असणे, आवश्यक असते आई तिथेच निराशा पदरी पडते. नवीन Remix सगळेच वाईट असत नाही परंतु बव्हंशी कडबाच हाती येतो!!
Wednesday, 27 April 2022
साहित्यिक वास्तवता - एक मूल्य - भाग ५
साहित्यात सामाजिक प्रतिबिंब दिसते ही बाब एका निराळ्या प्रकाराने सुद्धा करण्याचा प्रयत्न होतो. कलाकृतीत कलावंताच्या अनुभवाचा आविष्कार होतो ही गोष्ट सहजपणे मान्य केली जाते. अर्थात त्याच जोडीने हे देखील मान्य केले जाते - कलाकृतीच्या मुळाशी माणसाचे व्यक्तिमत्व असते. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, या व्यक्तिमत्वाची २ टोके असतात. १) सहजप्रेरणेचे आणि २) सामाजिक जाणिवेचे. सामाजिक जाणिवेचे टोक, यात त्या व्यक्तीची जी सामाजिक मूल्ये असतात किंवा वृत्ती असतात, जी वास्तवता विषयक - Concept of Reality, असते, ती अंतर्भूत असते. व्यक्तीला जी एक जीवनविषयक वस्तुनिष्ठता प्राप्त झालेली असेल, ती या टोकाला असते. दुसरे टोक सहजप्रेरणेचे!! हे टोकाच्या पहिल्या क्रियाप्रतिक्रियांना अनुसरून भावना उत्पन्न करते. परंतु दोन्ही टोकाच्या परस्परांवर क्रियाप्रतिक्रिया चाललेल्या असतात आणि यामध्ये भावनेला विशिष्ट स्वरूप देणारे पहिले सामाजिक जाणिवेचे टोक असते. म्हणूनच व्यक्तिमत्वाचा कुठलाही अनुभव हा एका टोकाला जो Concept of Reality असेल तिचाच आविष्कार ठरतो. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, तो वैय्यक्तिक असूनही जेवढ्यापुरती, जितकी व्यापक, ज्या पातळीवर असते तेवढ्या जगाच्या वास्तवतेचा तो आविष्कार ठरतो.
अर्थात यात काही प्रश्न अंतर्भूत होतात. व्यक्तिमत्वाची दोनच टोके आहेत असे मानायचे का? आणि ती देखील टोकेच आहेत का? हे सगळे Dialectics चा उपयोग करता यावा म्हणूनच ना!! सहजप्रेरणांचे सामाजिकीकरण झाले आहे, असे म्हटल्यावर सहजप्रेरणा आणि सामाजिक जाणीव, यांच्यात विरोध का कल्पायचा? सामाजिक जाणीव म्हणजे काय? इत्यादी प्रश्न उद्भवू शकतात.
त्यादृष्टीने बोलायचे झाल्यास, मार्क्सवाद्यांचे विचार करायचे तंत्र आणि त्याच विचारातून काढायचे निष्कर्ष आधीच ठरून गेलेले असतात. आणि त्यासाठी ते कशी गळचेपी करतात, हे वरील विवेचनावरून समजून घेता येईल.
असो, आपल्या दृष्टीने वरील विवेचनातून एकच मुद्दा महत्वाचा म्हणून समोर येतो. तो असा, मानवी व्यक्तिमत्वाच्या मुळाशी एक Concept of Reality असते. प्रत्येक माणसाच्या मनात मूर्त किंवा अमूर्त स्वरूपात वरील विधान नेहमीच अस्तित्वात असते. परंतु Concept of Reality याला व्यक्तिमत्वाचा पाया मानणे मानसशास्त्राला कितपत मान्य होईल? तसेच मघाशी जे विवरण केले,त्याचा वेगळा अर्थ लावायचा झाल्यास, काव्यात जे काही असते ते Concept च्या चौकटीत बसवता येते आणि त्यात एक Conceptual संगती असते. परंतु काव्यात व्यक्त होतात, त्या Concepts नसतात. काव्याचा मूलभूत घटक हा प्रतिमा (Image) असतो. आणि या प्रतिमेची संगती असते ती तार्किक नसून कलात्मक असते. तेंव्हा माणसाच्या मुळाशी एक Concept of Reality असते, हे मान्य केले तरी त्या Concept चा आणि काव्याच्या द्वारे व्यक्त होणाऱ्या अनुभवाचा काही एक संबंध असतो हे नव्याने सिद्ध करावे लागेल.
परंतु अशा प्रकारचा काही निश्चित आणि अपरिहार्य संबंध असतो असे आढळून येत नाही. असे बरेच श्रेष्ठ कलावंत आहेत, की त्यांच्या कलाकृतीतून एक निश्चित अशी जीवित विषयी भूमिका शोधून काढता येत नाही. पुष्कळदा एकाच कलावंताच्या निरनिराळ्या कलाकृतीत निरनिराळ्या परस्पर वेगळ्या भूमिका दिसतात . आणि परिणामी, लेखकाची जीवित विषयक भूमिका आणि त्याच्या कलाकृतीचे वा उंची याचा मेळ बसवणे कठीण जाते.
कलाकृतीतून वास्तवतेचे चित्रण होते असे जेंव्हा म्हटले जाते तेंव्हा असेही सूचित होते, वास्तवतेचे स्वरूप कळावे म्हणूनच आपण कलाकृती वाचत असतो. परंतु असे जर असेल तर भूतकाळातील कलाकृतीत आपले मन रमू नये, निदान आजच्या कलाकृतीत रमते,तितके रमू नये. त्या आजच्या कलाकृती इतक्या ताज्या अगर अर्थपूर्ण वाटू नयेत. पण तसे होत नाही. शेक्सपियरची नाटके आजही ताजी आणि अर्थपूर्ण वाटतात. ती तशी का वाटतात याचे स्पष्टीकरण वास्तवतेच्या पुरस्कर्त्यांनी करणे अत्यावश्यक ठरते..
*समाप्त*
Friday, 22 April 2022
साहित्यिक वास्तवता - एक मूल्य - भाग ४
आता आपण थोडे वेगळे मांडून बघू. अगदी भिन्न प्रकारचे अनुभव आणि भिन्न प्रकारची लेखकांची व्यक्तिमत्वे कलाकृतीतून व्यक्त होत असतात. आणि आपण त्या सगळ्या कलाकृतीचा सारख्याच अनुभूतीने रसास्वाद घेऊ शकतो. त्यामागे नेमकी काय कारणे असू शकतात? याचे उत्तर शोधणे महत्वाचे ठरू शकेल.
असे म्हणतात कलावंत जरी एखाद्या विशिष्ट घटनेचे चित्रण करत असेल तरी ती घटना प्रातिनिधिक स्वरूपाची असते; जीवनात नेहमी घडणारी असते. त्यामुळे चित्रण करताना तो वास्तव जीवनाविषयी सर्वसामान्य असे काहीतरी सांगतच असतो. अर्थात काही कलावंत अपवादात्मक असे विषय निवडीत असतात.
या भूमिकेबाबत २ प्रकारच्या अडचणी उद्भवू शकतात. एक अशी की, सर्वानुमते श्रेष्ठ ठरलेल्या कलाकृतीचे विषय अपवादात्मक असू शकतात. उदाहरणार्थ *किंग लियर* हे नाटक किंवा *क्राईम अँड पनिशमेन्ट* ही कादंबरी तत्कालीन जीवनाचे प्रातिनिधिक चित्रण करणारी आहे, असे विधान करणे अवघड आहे आणि तरीही या दोन्ही कलाकृती श्रेष्ठ दर्जाच्या आहेत, असे मानले जाते. अशा रीतीने सर्वसंमत असे जे काही कलाकृतीच्या संदर्भात निर्णय आहेत त्या निर्णयाशी ही भूमिका सुसंगत नाही.
शिवाय तर्कदृष्ट्या प्रतिनिधित्वाची कल्पना सदोष आहे. कुठलीही गोष्ट घेतली तरी ती इतर कुठल्याही गोष्टींचे पूर्णांशाने प्रतिनिधित्व करू शकत नाही. त्याचप्रमाणे अमुक एका वर्गाच्या चौकटीतल्या काही गोष्टी तिच्या एका सीमेजवळ असतात तर काही त्या चौकटीच्या मध्यभागी असतात. त्यामुळे अमका एक कामगार इतर सर्व कामगारांचा प्रतिनिधी आहे, असे फार मर्यादित अर्थाने म्हणता येईल. त्यामुळे साहित्यात जीवनाचे प्रातिनिधिक चित्रण असावे असे म्हटले तर अनेक अडचणी उपस्थित होतील.
या शिवाय आणखी एक मुद्दा समोर येतो आणि तो म्हणजे, एखाद्या कथेतील व्यक्ती ज्या प्रमाणात सचेतन असते, त्या प्रमाणात ती कथा, कलाकृती ठरते. परंतु प्रातिनिधिक ही एक कल्पना (Concept) असते आणि म्हणूनच ती अचेतन असते. त्यामुळे ज्या प्रमाणात हे प्रतिनिधित्व एखाद्या कथेतील व्यक्तीच्या अंगी असेलत्या प्रमाणात ती ठोकळेबाज ठरणार. साहित्याचे व्यापक स्वरूपात प्रसरण सुरु झाले म्हणजे असा धोका उद्भवतो.
Wednesday, 20 April 2022
साहित्यिक वास्तवता - एक मूल्य - भाग ३
आता थोडे पुढे जायचे झाल्यास, कलावंत हा वास्तव जीवनाविषयी शास्त्रीय किंवा तांत्रिक स्वरूपाचे सत्य सांगत असतो हे जर मान्य केले तर काही अडचणी उभ्या राहू शकतात. शास्त्रीय सत्य शोधून काढायची पद्धत म्हणजे शास्त्रीय चिकित्सा होय. परंतु शास्त्रीय चिकित्सा कलाकृतीत असू शकत नाही. तेंव्हा कलावंताने सांगितलेले शे ते सत्य आहे की नाही, हे वाचकाला कलाकृती वाचून कळेलच असे नाही. तसेच कलावंतालाही जे सांगितले ते निव्वळ किंवा निखळ सत्यदर्शन केले आहे की नाही हे कलाकृतीद्वारे सांगणे अवघड आहे. म्हणजेच कलाकृतीतून रसग्रहण तसेच मूल्यमापन करताना बाह्य गोष्टींना महत्वाचे स्थान द्यावे लागेल. एखाद्या कलावंताने नवीन निर्मिती केली की नाही हे ठरवण्यासाठी त्याने काही शास्त्रीय किंवा तात्विक सत्य सांगितले आहे की नाही, हे बघावे लागेल. तेंव्हा ही भूमिका मे केली की शेक्सपियरने अथवा बहुतेक इतर श्रेष्ठ कलावंतांनी काहीच नवीन निर्मिती केली नाही असा निष्कर्ष काढावा लागेल. परंतु असला निष्कर्ष काढायला कुणी धजावेल असे वाटत नाही.
या शिवाय कुठल्याही रसिक वाचकाचा अनुभव असा असतो की कलाकृतीपासून आपल्याला जे काही मिळते ते तार्किक स्वरूपाच्या विधानात अंतर्भूत होऊ शकत नाही. परंतु काही कलाकृती विशेषतः कविता अशा असतात की त्यांतील आशय तार्किक स्वरूपाच्या विधानांच्या मार्गाने मांडणे अशक्यच असते. उदाहरणार्थ बालकवींच्या काही कविता अशा आहेत, मग अशा वेळी कवीने काव्यातून कुठला आशय सांगितलं आहे असे समजायचे? की त्यात आशयच नसतो असे समजायचे?
कलाकृतीत केवळ जीवनविषयीचे सत्य नसते, तर ते कलात्मकरीत्या व्यक्त झालेले असते. कलावंत त्याची आपल्याला प्रतीती आणून देत असतो, असे विधान बरेचवेळा वास्तववादी पुरस्कर्ते म्हणत असतात. या भूमिकेच्या मुळाशी अशी कल्पना आहे की कलावंताची जी अभिव्यक्तीची पद्धती आहे तिच्या द्वारे तार्किक स्वरूपाचे सत्य व्यक्त होऊ शकते. हे विधान तपासून बघणे महत्वाचे ठरेल.
साहित्यात वास्तवतेचे चित्रण व्हायचे आणि तिचा अर्थ लावायचा म्हणजे २ गोष्टी आवश्यक असतात. १) लेखकाची भूमिका वस्तुनिष्ठ हवी आणि २) त्याने कलाकृतीतून एका विशिष्ट घटनेचे चित्रण न करता सर्वसामान्य स्वरूपाची विधाने करायला हवीत. पण कलावंत यापैकी एकही गोष्ट करीत नसतो. तो एखाद्या परिस्थितीचे चित्रण करीत नसतो तर त्या परिस्थितीच्या आपल्याला आलेल्या अनुवास्तवतेचे वस्तुनिष्ठ चित्रण होणे अशक्य असते. तेंव्हा कलावंत कलात्मक पद्धतीने लिहीत असतो असं म्हटले म्हणजे तो वास्तवतेचे चित्रण करीत असतो. परिस्थिती हे त्या अनुभवाचे निमित्त असते. त्या अनुभवाचे स्वरूप बऱ्याचवेळा लेखकाच्या व्यक्तिमत्वावरून ठरते. त्याचप्रमाणे साहित्यिक सर्वसामान्य स्वरूपाची विधाने करीत नसतो. बहुदा तो एका व्यक्तीविषयी किंवा विशिष्ट घटनेविषयी लिहीत असतो. अधिक परखडपणे बोलायचे झाल्यास, तो एक विशिष्ट अनुभव व्यक्त करीत असतो. ह्यामुळे कलावंताची जी अभिव्यक्तीची पद्धती आहे तिच्या द्वारे वास्तवतेचे वस्तुनिष्ठ चित्रण होणे अशक्य असते.
कलावंत हा शास्त्रज्ञाप्रमाणे Statement करीत नसतो तर Psudo Statement करीत असतो. त्यामुळे एका कलावंताने निराशेचे चित्रण केले आणि दुसऱ्याने आशेचे चित्रण केले तर या दोन्हीपैकी एक कुणीतरी बरोबर आहे, असा निष्कर्ष वाचकाला काढावा लागत नाही. दोघांचे म्हणणे एकाचवेळी खरे असू शकते.
अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आणि भिन्न प्रकारचिलेखकाची व्यक्तिमत्वे कलाकृतीतून व्यक्त होत असतात आणि आपण त्यासगळ्या कलाकृतींचा सारख्याच आनंदाने रसास्वाद घेऊ शकतो. आणि हे आपल्याला नित्य अनुभवायला मिळते.
*क्रमश:*
Tuesday, 19 April 2022
५०० लेख लिहून झाल्याचे निमित्त
वास्तविक हा आकडा गाठून २,३ आठवडे उलटले परंतु त्यावेळी डोक्यात अनेक विचार घोळत होते आणि त्याचा योग्य तो निचरा करण्यापायी, हे टिपण लिहायला उशीर झाला. मनात नेहमीच बऱ्याच गोष्टी येतात, अनेक विषय घोळत असतात. काही विषय वाचनातून सुचतात तर काही विषय अनुभवातून मनात गठित होतात. वयाच्या १०व्या वर्षांपासून हळूहळू वाचनाची सवय लागली परंतु त्याला वेग आला, तो परदेशात राहायला सुरु झाली तेंव्हापासून. परदेशात *समाज न्याहाळणे* आणि *समजून* घेणे नित्य चालतच होते परंतु एकटाच रहात असल्याने, हाताशी बराच वेळ मिळत असे आणि मग आहे तो वेळ *सत्कारणी* का लावू नये? या प्रश्नातून आधी वाचन आणि मग नंतर लिहायला सुरवात झाली. लिहीण्याचे स्वप्न तसे फार नंतर पडायला लागले. मुळात लिहायचे काय? हाच मुद्दा महत्वाचा होता. परंतु मराठी कविता वाचायला सुरवात झाली आणि मनात बरेच विचार घोळायला लागले!! त्यातूनच २००९ च्या सुमारास आधी फेसबुक आणि नंतर ब्लॉग सुरु झाला. तेंव्हा देखील मी इथे इतका रमून जाईन याची सुतराम शक्यता नव्हती. तसे बघितल्यास, घरी आणि काही ठराविक मित्रांना पत्रे लिहिणे हा मुख्य आनंदाचा भाग होता, अगदी नंतर इ मेल सुरु झाले आणि त्या द्वाराने दणदणीत लांबीची पत्रे जात होती. सगळेच फार सहनशील होते. तरीही *वाचन* हा छंद खरा आणि सुदैवाने आजही त्यात खंड पडलेला नाही. अर्थात विषय आणि आवड, वयानुरूप बदलत गेली. परिणामी मन *वठले* नाही. आज जेंव्हा मी किंचित मागे वळून बघतो तेंव्हा सुरवातीची शैली आणि आजची शैली यात महदंतर पडल्याचे स्पष्ट जाणवते आणि ते योग्यच झाले अन्यथा माझा रस निघून गेला असता. आज जेंव्हा पूर्वीचे वाचतो तेंव्हा तर परखडपणे त्यातील *अधिरी* वृत्ती, विषयाचे *अपुरे आकलन* इत्यादी कमतरता स्पष्टपणे दिसून येते. अगदी संगीत विषयक लिहिलेल्या लेखांत देखील आणि असे असून देखील काही मित्रांनी दिलेले उत्तेजन मला आजही महत्वाचे वाटते. एक उदाहरण देतो, ८,९ वर्षांपूर्वी काश्मीर इथे झुबीन मेहतांचा सिम्फनी कार्यक्रम झाला होता. अतिशय सुंदर आणि त्यांच्या लौकिकाला साजेसा असा झाला होता. अर्थातच मी लगोलग (हे लगोलग लिहिणे, हा अधिरेपणा) आधी फेसबुकवर आणि नंतर काही जाणकार मित्रांना पाठवला. आज जेंव्हा मी पुन्हा वाचतो तेंव्हा त्यातील असंख्य त्रुटी दिसतात. असे असून देखील *आनंद मोडक* सारख्या जाणकार व्यक्तीने माझे कौतुक करून, माझा हुरूप वाढवला होता. त्यावेळी असे उत्तेजन बऱ्याच जणांनी वेळोवेळी दिले होते, आजही देतात. आज मी जेंव्हा माझ्याच रागरंग* या पुस्तकातील लेख वाचतो तेंव्हा असेच मनात येते, काही लेखांच्या बाबतीत थोडी घाई केली. थोडा विचार केला असता तर हेच लेख आणखी छान आणि वैचारिक झाले असते. आपले लेखन *वैचारिक* व्हावे ही माझी मनापासूनची इच्छा आणि त्यातूनच मग इतरांना *अगम्य* असे लिहिले जाते पण मला तसे अजिबात वाटत नाही. या उलट असेच वाटते, प्रत्येकवेळेस, लेखकाने (इथे मी स्वतःला *लेखक* म्हणवून घेत आहे पण सगळेच मित्र असल्याने समजून घेतील....) वाचकाला काय आवडेल? याचा विचार करून का लिहावे? तसे केल्याने, जे लिहिले जाईल, ती त्याची खरी *अभिव्यक्ती* असेल का? आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, कधीतरी वाचकांनी वरची पायरी चढावी की!! प्रत्येकवेळी लेखकानेच खालची पायरी का उतरावी? हे अहंकारी आहे, हे मान्यच आहे. माझे लिखाण *अवघड* भाषेत असते, हा आता सर्वमान्य आक्षेप आहे आणि मी तर माझी शैली बदलणे अवघड आहे - वास्तविक विषयानुरुप शैली बदलते, उदाहरणार्थ माझे साऊथ आफ्रिकेतील अनुभव. याचा वेगळा अर्थ, जसा विषय असेल तसे लेखन होणार. मी काहीवेळा समीक्षापर लेखन करतो. आता असा विषय जेंव्हा घेतो तेंव्हा तिथे तशीच भाषा येणे अनिवार्य नव्हे का? कवितेसारखा अति लवचिक साहित्य प्रकार हाताळताना, त्याचे *सौंदर्य* मांडताना, भाषा सांकेतिक होणारच. काही तांत्रिक शब्द येणारच. तसेच संगीताविषयी लिहिताना घडते. आता *संगीत* या विषयावर सरळ, साधे आणि सोपे, निदान मराठीत बरेच सापडते आणि जर मी तीच वाट धरली तर माझी *ओळख* ती कुठली? मळलेल्या वाटेने जाण्यात काय हशील आहे आणि मग या विचाराने, लेखाची शैली ठरली जाते. बरे, लेखन करून भरपूर पैसा मिळवावा, अशी माझी कधीच महत्वाकांक्षा नाही मग जर का पैसा नाही तर मग निदान मानसिक समाधान तरी मिळवावे!! यात काय चूक. आता जवळपास १२ वर्षे मी अथकपणे लिहीत आहे पण इतक्या वर्षांत मी कधीही *वाचक* डोळ्यासमोर ठेऊन, एक अक्षर देखील लिहिले नाही, मला ते जमणारच नाही. माझा तसा *पिंड* नाही. माझी इथे *अतोनात चेष्टा* केली जाते आणि याची मला याची पूर्ण कल्पना आहे. सगळे मित्रच आहेत तेंव्हा मित्राची चेष्टा होणे, क्रमप्राप्तच आहे. असे असून देखील, आजमितीस एकही लेख असा लिहून झाला नाही जिथे मला १००% समाधान मिळाले!! लेखन हा छंदच असा आहे, इथे *संपूर्ण समाधान* हे फक्त कागदावर(च) असते, प्रत्येक्षात कधीही मिळणारे नसते, जे दिसते ते कायमस्वरूपी *मृगजळ* असते आणि हेच मृगजळ तुम्हाला प्रत्येकवेळी लिहायला प्रवृत्त करते.
Saturday, 16 April 2022
श्रवण साधना योग ........
आपण गाणं ऐकतो. ती एक सहजस्फूर्त घटना असते आणि त्यासाठी आपल्याला फार काही सायास करायला लागत नाहीत आणि याचे मूळ कारण आपल्यावरील झालेले संस्कार तसेच एक भारतीय म्हणून आपल्यातील जो रक्तगुण असतो, त्याची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे आपली *श्रावण साधना* असे थोडक्यात मांडता येईल. फार पूर्वीपासून अनेकविध माध्यमांनी गाणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याची सोय करून ठेवली असल्याने, गाणे ऐकणे, या क्रियेसाठी आपल्याला फार प्रयास पडले नाहीत. अर्थात अर्वाचीन काळाची गोष्ट वेगळी कारण तेंव्हा तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने, गाणे ऐकण्याची वानवा असायची परंतु जसेजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसतशी श्रवण क्रिया सुलभ व्हायला लागली. याचा माणसाला अमाप फायदा झाला, हे मान्यच करायला हवे.
जरा खोलात गेलो तर असा विचार करू शकतो, आपण *गाणे* का ऐकतो? ते सहज आपल्या कानावर पडते म्हणून त्याची प्रतिक्षिप्त क्रिया आपल्याकडून घडते का? इथे गाणे म्हणजे सगळ्या प्रकारचे संगीत - म्हणजे रागदारी संगीत, उपशास्त्रीय संगीत तसेच ललित संगीत अभिप्रेत आहे. ही अत्यंत ढोबळ वर्गवारी आहे आणि त्यात अनेक सांगीतिक आविष्कार अंतर्भूत आहेत परंतु आपल्या इथे त्याबद्दल काहीच बोलायचे नसल्याने, मी ढोबळ वर्गवारी स्वीकारली आहे. अगदी मागील शतकाचा विचार केला तर मागील शतकाच्या सुरवातीला रागदारी आणि आणि उपशास्त्रीय संगीत, या २ प्रकारांचा प्रभाव आल्या तेंव्हा समाजावर गाढा हता आणि त्याविषयी दुमत होऊ नये.पुढे मग हेच संगीत अधिकाधिक जटील व्हायला लागले कारण बदलती जीवनप्रणाली!! पुढे वेगवान होत जाणाऱ्या जीवनशैलीपुढे तासंतास चालणारे रागसंगीत मागे पडायची शक्यता निर्माण झाली आणि मराठी रंगभूमीवर रागसंगीताचाच उपयोग करून, चटपटीत स्वररचनांचा प्रादुर्भाव वाढला आणि रंगभूमीवर *नाट्यगीत* हा आविष्कार समाजमान्य झाला.
पुढे याचा विपर्यास झाला ती बाब वेगळी आणि मग त्यातूनच *सुगम संगीत* अवतरले आणि एकूणच संगीताचा ढाचाच बदलला. सुगम संगीत नुसते अवतरले नसून त्याने कालानुरूप *कात* टाकायला सुरवात केली आणि एकूणच समाजमनावर प्रचंड पगडा बसवला, हे मान्यच करावे लागेल. हे मन्वंतर झाले कारण ललित संगीत हे सुगम आहे, थोडक्यात संगीताशय आंनदाण्याची कुवत आहे तसेच सामान्य माणसाला देखील भुरळ घालणारे आहे. परिणामी ललित संगीत आपले स्वतंत्र आणि वेगळे वर्चस्व गाजवू लागले.
आता मुद्दा असा पुढे येतो , या सगळ्या संगीतात, *श्रवण क्रिया* या घटनेला अतोनात महत्व आले मग तिथे कुठलाही संगीताविष्कार असू दे. मुळात ऐकणारे नसतील तर कुठलेही संगीत हे निष्प्रभ होणारे, हे ओघाने आलेच. यातूनच पुढे *प्रेक्षकशरणता* अतोनात वाढली. जिथे अतिरेक होतो तिथे मग त्याच्या मर्यादा स्पष्ट होतात. ऐकायला रसिक हवेत, ही जाणीव झाली आणि मग रसिकांना आपल्याकडे ओढण्याची जणू स्पर्धा निर्माण झाली, परिणामी सांगीतिक दर्जा खालावणे, क्रमप्राप्त झाले. यातूनच मग रसिकांची फुटकळ *वर्गवारी* झाली - ज्याची आजही काहीही जरुरी नाही परंतु रागदारी संगीत ऐकणारे अधिक *आढ्यताखोर* होणे आणि इतर संगीतप्रकारांकडे काहीशा तुच्छतेने बघणे, इत्यादी प्रकार बोकाळायला लागले. त्यामाने उपशास्त्रीय संगीताचे रसिक बरेच उदारमतवादी निघाले.
काही उदाहरणे देतो. *तुच्छतावाद* तर आपल्याकडे पाचवीला पुजलेला आहे. मध्यंतरी लताबाईंचे निधन झाले आणि लगोलग नको तितका भावनिक पूर पसरला. लताबाईंचे वैश्विक स्थान बघता, अशा प्रतिक्रिया अपेक्षित होत्या परंतु काही ठिकाणी *तुच्छतावाद* प्रखरपणे दिसून आला. अगदी माझे त्याबाबत स्वानुभव आहेत. लताबाई झाल्या तरी त्या काही *अजेय* नव्हेत. त्यांची गायनाची एक अजोड शैली होती. अर्थात त्यांची जशी एक शैली होती ताशा इतर गायिकांच्या वेगळ्या प्रकारच्या शैली अस्तित्वात होत्या, हे कुणीही मान्य करेल. आता, जशी लताबाई गेल्याची बातमी आली तशी त्यांच्या गायनशैलीवर टीका व्हायला लागली. टीका झाली म्हणून फारसे बिघडत नाही कारण लताबाई म्हणजे कुणी *देवता* नव्हेत. त्या देखील मानवी योनीतुन जन्माला आलेल्या होत्या आणि तदनुषंगाने त्यांच्यात *माणूस* आणि *कलाकार* म्हणून काहीतरी *कमतरता ही असणारच परंतु टीका करताना इतकी खालची पातळी गाठली गेली की एकदा असेच मनात आले, लताबाईंपेक्षा बहुदा रेल्वे डब्यातील गाणारी भिकारीण देखील उत्तम गायिका म्हणावी लागेल का? टीका करावी पण टीका करायची म्हणून खालच्या पातळीवर उतरायची गरज नसते. परंतू दुर्दैवाने, तितके सजग भान दाखवले गेले नाही.
संगीत हा विषयच इतका *व्यापक* आहे की इथे कुणीही *Champion* नाही. सगळे कलाकार देखील आयुष्यभर *विद्यार्थी* असतात तेंव्हा अशा परिस्थितीत तथाकथित रसिक देखील अपवाद कसे असतील? आपल्याकडे *गाणे* कसे ऐकावे, हेच बऱ्याच जणांना ठाऊक नसते. हा प्रकार शास्त्रीय संगीताच्या मैफिलींबाबत वारंवार अनुभवायला मिळतो. कुणीही कलाकार राग सादर करायला लागला की लगोलग *कुजबुज* सुरु होते, कुठला राग सादर होत आहे? आणि ही कुजबुज इतरत्र ऐकायला येईल, इतपत मोठ्या आवाजात ऐकायला मिळत असते. खरंतर सादरीकरणातील *राग* ओळखता येणे, ही रसिकत्वाची अत्युच्च पातळी नव्हे. परंतु आपणं कुणीतरी *वेगळे* आणि *व्यासंगी* आहोत हे इतरांना दर्शवायची अतोनात वाईट खोड वारंवार बघायला मिळते. त्यातून दुसरी खोडसाळ सवय. मैफिल संपल्यावर दुसऱ्या दिवशी मित्रांच्या समवेत काळाच्या मैफिलीचे नको तितके रसभरीत वर्णन करायचे. समोरचा ऐकणारा समजा रागदारी संगीताविषयी *अनभिज्ञ* असेल तर सांगणाऱ्याच्या *अंगात* येतेआणि लगोलग *यमन*, *दरबारी* अशा रागांच्या नावाच्या *पुड्या* सोडायला सुरवात होते. ऐकणारा एकदम गार पडतो कारण त्याला तर हे सगळेच *अगम्य!* असे रसिक भयंकर तापदायक असतात.
तसेच आणखी डोक्यात तिडीक जाणारा अनुभव असतो. कार्यक्रमाची वेळ माहीत असते तरीही मैफिलसुरु होऊन अर्धा, पाऊण तासांनी सभागृहात यायचे आणि इतर रसिकांची तंद्री भंग करायची!! हा तर प्रचंड *उद्दामपणा* म्हणायला हवा. तुम्हाला साधे Time Management सांभाळता येत नाही!! तसाच प्रकार चाललेली मैफिल ऐन रंगात आल्यावर मैफिल सोडून जाण्याची घाई करायची!! तुम्ही रागदारी संगीताची मैफिल ऐकायला आला आहात आणि ती किती वेळ चालणार आहे, याचे तुमच्या मनाशी आडाखे पक्के असतात. तेंव्हा असे असून देखील, पहिल्या किंवा दुसऱ्या रांगेतील रसिक (ती बरेचवेळा जोडगोळी असते!!) संपूर्ण सभागृह ओलांडून बाहेर जाते. आता टॉयलेटला गेले तर समजण्यासारखे आहे पण काही नैमित्तिक कामे आठवतात आणि मग मैफिल सोडून जातात!! यात आपण कलाकाराचा *अपमान* करिताहोत याची किंचितही जाणीव नसते. याचाच पुढील भाग म्हणजे, दुसऱ्या दिवशी इतरांशी (जे मैफिलीला गेले नसतात त्यांच्या समोर) बोलताना, *काल भीमसेन ऐकला* किंवा *काल कुमार काय अफलातून गायला आहे!* अशा भाषेत *पुड्या* सोडायच्या!! जणू काही हे कलाकार यांचे कायमचे *शेजारी* आहेत किंवा, *माझ्या त्यांच्याशी किती जवळीक आहे* हे दर्शविण्याचा उद्दामपणा दिसून येतो. यात फक्त एक छोटीशी पण अत्यंत महत्वाची बाब विसरली जाते - कालच्या मैफिलीतून तुम्ही नेमके काय शिकलात? कारण तुम्हाला काही *शिकायचे* नसते. तुम्ही *सर्वज्ञ* असता!! चित्रपट संगीताबाबत बघायला मिळते. आता तशी वेळ येत नाही कारण आता YouTube वर बव्हंशी बरीचशी गाणी उपलब्ध असतात पण एकेकाळी, विशेषतः लताबाईंची *दुर्मिळ गाणी* आपल्या संग्रही असणे, हा पराकोटीच्या अभिमानाचा विषय असायचा. एकेकाळीमी देखील याला *बळी* पडलो होतो. माझ्याकडे, इतरांकडे नसतील अशा दुर्मिळ गाण्यांचा संग्रह आहे, अशी वाक्ये अत्यंत ताठ्यात इतरांसमोर बोलायची फॅशन होती. त्यावेळी मला देखील त्यांचा *हेवा* वाटायचा. पुढे जसा माझा अभ्यास वाढायला लागला तेंव्हा ध्यानात यायला लागले जी गाणी *दुर्मिळ* आहेत, त्यातील काही गाणी खरोखरच *विस्मृतीत* जावी, अशा लायकीची होती!! सगळीच दुर्मिळ गाणी *अनमोल* नाहीत!!
मुळात गाणे कसे ऐकावे, याचा पायाभूत शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम तयार करण्याची फार गरज आहे. आपण जे ऐकतो, त्यातील आपल्याला काय आणि किती समजले आहे? हा प्रश्नच आपल्याला विचारत नाही. आपण आपल्याला कधीही प्रश्न विचारत नाही त्यामुळे गाण्यातील *सत्व* काय आणि *फोलफट* काय, हे समजून घेण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही. प्रत्येकवेळी *शास्त्राचा* आधार घ्यायला पाहिजे असे नाही पण ऐकताना, *सजग* वृत्ती दाखवणे जरुरीचे आहे, हेच कुणाला पटत नाही.
हल्ली रागदारी संगीतात एक प्रकार नाले तितका बोकाळला आहे, रचना *द्रुत लयीत* आली की सतार/सरोद किंवा बांसरी वादक आणि साथीला असलेला तबला वादक यांच्या *तुंबळ* युद्ध सुरु होते आणि समोर बसलेले तथाकथित रसिक *अवाक* होऊन ऐकत बसतात!! यात एक बाब विसरली जाते, सतारीवरील सूर हे कधीही तबल्यावर आणता येत नसतात, होतो तो निव्वळ *आभास* असतो मग तबला वाजवणारा झाकीर हुसेन असला तरी आणि हे मी अत्यंत गंभीरपणे विधान करीत आहे. परंतु लोकं याचीच *वाट* बघत असतात आणि नको तितकी अविश्वसनीय दाद देतात!! किती मूर्खपणा आहे. तसेच *संपूर्ण सप्तकी तान* घेणे, हे असेच रसिकांना *अवाक करून जाते. ही *संगीत* नव्हे, दुर्घट तान हा एक सांगीतिक अलंकार आहे, संपूर्ण गायन नव्हे. मग, खुद्द कलाकार अशा *गिमिक्सच्या* आहारी जातात आणि हाती फक्त संगीताचे *कलेवर* उरते!
Friday, 15 April 2022
साहित्यिक वास्तवता - एक मूल्य - भाग २
मुळात आपण *वास्तवता* हा शब्दच अकारण गहन करून ठेवला आहे आणि त्यातून मुळातच संकल्पना गोंधळाची केल्यामुळे पुढे सगळेच फार विसविशीत होऊन बसले. तसे बघायला गेल्यास, कुठल्याही प्रसंगाचे आणि व्यक्तीचे चित्रण केले किंवा सकाळपासून रात्रीपर्यंत मुंबईत काय घडले याचे वर्णन केले तर त्या वर्णनाला *कलाकृती* म्हणता येईल का? अगदी ,त्या वर्णनाची भाषा अगर पद्धती जरी कथा-कादंबऱ्यांत जशी आढळते तरी त्यामुळे ती कलाकृती ठरणार नाही. परंतु ललित साहित्य हा वास्तव जीवनाचा आरसा आहे ही भूमिका शब्दश: मान्य केली तर त्या वर्णनाला कलाकृती म्हणता येईल.
वास्तवतेचे पुरस्कर्ते देखील कुठल्याही प्रसंगाच्या किंवा प्रसंगमालिकेच्या वर्णनास कलाकृती म्हणणार नाहीत. प्रत्यक्षात जे पाहायला मिळते त्याचेच केवळ कलाकृतीद्वारे आपल्याला दर्शन घडते असेही ते म्हणतील का? याचाच वेगळा अर्थ, वास्तवतेच्या वर्णनाहून अधिक काहीतरी कलाकृतीत असावे लागते, हे त्यांना मान्य आहे. हे *अधिक काहीतरी* काय असते? कलाकृतीत नुसत्या वास्तवतेचे चित्रण नसते तर त्या वास्तवतेच्या कलावंताने काही तरी संगती निर्माण केलेली असते, तिथे त्याने वास्तवतेचा अर्थ लावलेला असतो. असेच उत्तर या प्रश्नाला वास्तवतेचे पुरस्कर्ते देतील.
त्यांची भूमिका अशी असू शकते, कलावंत हा जीवनाचा अर्थ लावीत असतो (जीवनाचा संपूर्ण अर्थ साहित्याद्वारे लावणे निव्वळ अशक्य आहे). *शेवटी सत्याचा जय होतो* किंवा दलित वर्गाचाच वर्गकलहात अखेर विजय होणार असतो* अशा प्रकारचे सत्य तो सांगत असतो.
पण या बाबतीत २ अडचणी उद्भवतात. एक अशी की, मोठमोठ्या कलाकृतीतून सांगितलेली सत्ये जर आपण तपासून बघितली तर ती सामान्य स्वरूपाची असतात. ती कुठल्याही शहाण्या माणसास माहीत असतात. आणि जर का त्याचेच ज्ञान करून घेण्यासाठी जर साहित्य वाचायचे असेल तर बहुतेक माणसे साहित्याच्या वाटेला जाणार नाहीत. त्या शिवाय, कलाकृतीतून जे सांगितलेले असते त्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचे, अवघड आणि जीवनावर प्रकाश पडणारे सत्य शास्त्रीय किंवा तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांतून सांगितलेले असते. मग साहित्य वाचण्यात वेळ व्यर्थ करण्यापेक्षा हेच ग्रंथ का वाचू नयेत? हा प्रश्न पुढे उभा राहतो.
या प्रश्नावर २ प्रकारची उत्तरे देता येतील. पहिले असे, सर्वसामान्य माणसाच्या अंगी शास्त्रीय किंवा तत्वज्ञानावरील ग्रंथ वाचायला लागणारी बुद्धिमत्ता किंवा चिकाटी नसते. म्हणून त्यांना शास्त्रीय स्वरूपाची सत्ये कलावंत सोप्या आणि आकर्षक स्वरूपात सांगत असतो. याच भूमिकेवरून बहुतेक धर्मात कथा,काव्ये, पुराणे यांना महत्व दिलेले असते. महाराष्ट्रात विद्वान म्हणून गाजलेली अनेक माणसे याच भूमिकेवरून ललित साहित्याकडे बघत असतात. आता यालाच *विद्वत्ता* म्हणावी का? हा दुसरा उपप्रश्न इथे उद्भवतो.
काही लोकांची भूमिका वेगळी असते. त्यांच्या मते, शास्त्रीय स्वरूपाचे सत्य कलावंत देखील सांगत असतो पण तो तेच सत्य कलात्मकपणे सांगत असतो!! त्याची तो वाचकाला *प्रतीती* देत असतो. ज्ञानमार्गाने सत्य आकळता येते परंतु त्याचा कलात्मक आविष्कार झाल्याशिवाय ते प्रतीत होऊ शकत नाही. अर्थात इथे कलावंताला थोडा अधिक मान मिळू शकतो. शास्त्रज्ञाहून इथे काहीतरी वेगळे असे कलावंत करीत असतो. पण कलावंत आणि शास्त्रज्ञ एकच भूमिका मांडत असतात, हे मान्य करता येऊ शकते.
*क्रमश:*
Subscribe to:
Posts (Atom)