Sunday, 12 January 2020

केंव्हातरी पहाटे

मराठीत धीट आणि मोकळा शृंगार असा फारच कमी वेळा वाचायला मिळतो, अगदी कवितेसारखे मुक्त, अल्पाक्षरी माध्यम घेतले तरीही. याला प्रथम छेद दिला पु.शि. रेग्यांनी आणि नंतर सुरेश भटांनी. त्यातून सुरेश भटांनी उर्दूतील गझल आकृतिबंध स्वीकारला आणि उर्दूतील शृंगाराची मस्ती मराठीत आणली. आजही त्यांच्या काही कविता वाचताना, आत्ममग्न आणि शृंगार याची नेमकी सीमारेषा ओळखून भोगवादी कविता वाचल्याचे समाधान देतात. श्रुंगार आणि पण उठवळपणा नाही. आवाहन आहे पण लालसा नाही तसेच आमंत्रण आहे पण निलाजरेपणा नाही. शृंगारिक कविता वाचताना भोगवादाचा मनोज्ञ आविष्कार वाचत आहोत, हे भान बहुतेकवेळा कायम असते. अर्थात लिखाणात सातत्य आले की काहीवेळा घसरण होणे क्रमप्राप्तच असते परंतु एकूणच आढावा घेतला तर सुरेश भटांनी मराठी मनाला शृंगारातील मनोज्ञपणा शिकवलं असे म्हटले तर फार चुकीचे ठरू नये. आजची आपली रचना अशाच रतीक्लान्त मनोवस्थेची आनंदमयी कविता आहे. 
सुरेश भटांच्या कवितेतील अनुभव हे खास वेगळेच आणि एककेंद्री अनुभविश्व असते.  त्याचे भावविश्व भिन्न असते तसेच त्याचा प्रतिमाधर्म वेगळा असतो. मानवी जीवनातील सृजनशक्ती हि त्यांच्या अनुभवविश्वाच्या केंद्रस्थानी असते. त्यामुळेच मिळालेला अनुभव तसाच्या तसा मांडण्यात सुरेश भटांना फारसा रस नाही तर त्या अनुभवाच्या उगमाशी जाऊन त्यातील भावाशय अचूकपणे हेरून नेमक्या शब्दांतून मांडण्यात त्यांना अधिक रस आहे.  
"उरले उरात काही आवाज चांदण्याचे, आकाश तारकांचे उचलून रात्र गेली" यासारखी तलम आणि दृश्यमय प्रतिमा सुरेश भट सहज लिहून जातात या आणि अशाप्रकारच्या अनेक प्रतिमा आपल्याला आजच्या गाण्यात वाचायला मिळतात. खरतर कविता जास्त कडव्यांची आहे परंतु ललित संगीताच्या स्वतःच्या अशा अंगभूत मर्यादा असल्याने, त्यातील निवडक कडवी गाण्यासाठी घ्याव्या लागतात. अर्थात हा अधिकार संगीतकाराचा.  
संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांचा कवितेचा अभ्यास हा नेहमीच आश्चर्य वाटावे इतका वैविध्यपूर्ण आहे. मराठीतील अनेक कवींच्या कविता त्यांनी स्वरबद्ध करून लोकांमध्ये त्या कवीची आणि त्यांच्या कवितांची समर्थ ओळख करून दिली. हाताशी भावोत्कट कविता असणे अवश्य असते असा जणू हेका असावा, या ध्यासानेच हृदयनाथ मंगेशकर नवनवीन कविता हुडकीत असतात आणि त्यासाठी त्यांचे नेहमी सातत्याने कविता वाचन चाललेले असते. चाल लावायला घेतलेली कविता ही आधी आशय समृद्ध कविता असावी, असा त्याचन्ह जणू आग्रह असतो आणि त्या आग्रहापोटीच त्यांनी जे कवी अगम्य वाटतात, त्यांच्या कवितेतील रसमयता ओळखून, त्यांना चाली लावल्या आणि त्या कविता लोकप्रिय केल्या. 
गाण्याची चाल ही दुर्गा रागावर आधारित आहे.  तसे बघितले तर राग दुर्गा हा कर्नाटकी संगीतातून उत्तर भारतीय संगीतात "आयात" केलेला आहे परंतु जसे इतर रागांबाबत झाले तसेच या रागाबाबत झाले. आयात करताना त्याची ठेवण उत्तर भारतीय संगीताला साजेशी केली. कविता गज़ल वृत्तात लिहिली गेली आहे. गज़ल वृत्तात लिहिताना जेंव्हा प्रत्येक कडव्यात दुसरी ओळ संपते तेंव्हा त्या ओळीचा समारोप थोडासा धक्कान्तिक स्वरूपाचा असतो आणि वाचक थोडा स्तिमित होऊन जातो.परिणामी काव्य अधिक महत्वाचे असते. संगीतकाराने हाच विशेष नजरेसमोर ठेऊन चाल आणि वाद्यमेळ याची रचना केली आहे. प्रत्येक अंतरा वेगेवेगळा बांधला आहे परंतु अंतऱ्याचा शेवट करताना मुखड्याशी जुळवून घेतले आहे. सर्जनशीलता दर्शवण्यासाठी अशा प्रकारची स्वररचना असणे आवश्यकच असते. 
आशा भोसल्यांनी या गीताचे गायन केले आहे. गायक जर का प्रतिभाशाली असेल तर हातातील चाळीचे सोने कसे करू शकतो याचा हा आदीनमुना आहे. मुळात अशा भोसल्यांचा आवाज सगळ्या सप्तकात सहजपणे विहरणारा त्यामुळे स्वर कमी पडला हे संभवतच नाही. "उसवून श्वास माझा, फसवून रात्र गेली" ही ओळ मुद्दामून ऐकावी. वास्तविक शरीरशास्त्रदृष्ट्या श्वास अडकलेला आहे परंतु त्यातील लालित्य शब्दात ज्या प्रकारे मांडले आहे आणि त्या लालित्याचा स्वरिक विस्तार कसा केला आहे हे पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखे आहे. तसेच गाण्याचा शेवटचा अंतरा गाताना, "स्मरल्या मला न तेंच माझ्याच गीतपंक्ती" ही ओळ गाताना स्वर काहीसा दुखरा ठेवला आहे त्यामुळे ऐकताना रसिक आपसूकच काहीसा हळवा होतो. कवीला जे म्हणायचे आहे, याची संगीतकाराला नेमकी जाण झाल्यावर गायकांकडून अचूकपणे कसे काढून घ्यायचे, याचे हे सुंदर उदाहरण म्हणायला हवे. वाद्यमेळ प्रामुख्याने सतार या वाद्यावरच आधारलेला आहे पण इतके ओघवते काव्य आणि गायकी ढंगाची चाल आहे म्हटल्यावर अनेक वाद्ये वापरून अकारण सांगीतिक कौशल्य दाखवण्याचा हव्यास अजिबात जरुरीचा नसतो. सतारीवर फक्त चालीची धून वाजवली आहे आणि ते देखील चालीला पूरक अशीच आहे परिणामी कवितेचा गाढा परिणाम ऐकणाऱ्यावर होता. ललित संगीताकडून आणखी वेगळ्या अपेक्षा ठेवणे चूकच. 

केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली 
मिटले चुकून डोळे, हरवून रात्र गेली 

 सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे 
उसवून श्वास माझा, फसवून रात्र गेली 

कळले मला न केंव्हा सुटली मिठी जराशी 
कळले मला न केंव्हा निसटून रात्र गेली 

उरले उरात काही आवाज चांदण्याचे 
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली 

स्मरल्या मला न तेंव्हा माझ्याच गीतपंक्ती 
मग ओळ शेवटची सुचवून रात्र गेली 



नाचे मन मोरा मगन

"जन्मभर अश्रूंस माझ्या शिकवले नानां बहाणे; 
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!!
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही,
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!"
कविवर्य सुरेश भटांची ही अजरामर गझल, मानसिक तुटलेपणाची तडफड व्यक्त करणारी. सुरेश भटांच्या कवितेला गझल शैली भावणारी होती आणि त्याच शैलीत त्यांनी आपल्या बहुतांशी रचना केल्या. प्रस्तुत गाण्याच्या संदर्भात वरील ओळी फार प्रत्ययकारी वाटतात. आता त्या कशा प्रत्ययकारी आहेत, याचाच ताळा आपण बघणार आहोत. 
संध्याकाळची वेळ, रंगमंचावर नृत्य गीताचा अपूर्व कार्यक्रमाची आखणी झालेली असते. रंगमंचाच्या आतल्या बाजूला, काहीशा अंधाऱ्या प्रकाशात गायक आणि साजिंदे  तयारीत असतात आणि अचानक रंगमंचावर प्रकाश उजळतो आणि तरुणी आपल्या नृत्याच्या वेषात, कार्यक्रम सुरु होण्याची वाट बघत असते. वेशभुषेवरून आणि एकूणच नृत्यांगनेच्या आविर्भावावरून कथ्थक नृत्याला सुरवात होणार, याची आपली खातरजमा होते. 
सगळा प्रेक्षकगण काहीशा अधिरतेने कार्यक्रम कधी सुरु होणार याची वाट पहात असतात आणि रंगमंचाच्या आतल्या बाजूने, मर्दानी आवाजात भैरवी रागावर आधारित अशी दीर्घ आलापी येते आणि पाठोपाठ, तबल्याचे खणखणीत बोल ऐकायला येतात. तबल्याचे एक सुंदर वर्तुळ पूर्ण होते आणि पाठोपाठ संतूरचे मधुर सूर आणि तबल्याचे बोल, याची अप्रतिम रचना ऐकायला मिळते. रंगमंचावर पार्श्वभागी काहीशा अंधाऱ्या जागेत, नृत्यांगनेच्या अस्तित्वाची सावली, तबल्याच्या बोलांवर आधारित नृत्याचे तुकडे सादर करायचे निर्देश देत असते. 
जसा रंगमंच प्रकाशाने  उजळून निघतो तशी रंगमंचावर खऱ्याअर्थाने नृत्याला सुरवात होते. गाण्याची लय हळूहळू द्रुत लयीत येते, नृत्यांगनेची पावले तबल्याच्या बोलांवर थिरकत असतात आणि गायकाचा आवाज देखील त्याच्या तोडीस तोड ताना, हरकती घेत असतो. सगळेच वातावरण, मद्याच्या ग्लासात केशरी किरण पडून काच उजळून निघावी त्याप्रमाणे रंगमंच उजळलेला असतो. या सगळ्यात एक गंमत असते. ज्या रंगमंचावर गायकाच्या आवाजाची मोहिनी पडलेली असते, तो गायक मात्र आपले अस्तित्व अंधारात लपवून ठेवत असतो. अर्थात, यात रंगमंचावरील नृत्यांगनेला मात्र गायकाच्या अस्तित्वाची जाणीव असते. 
गाण्याच्या शेवटाला, ती नृत्यांगना अचानक आतल्या बाजूचे दिवे लावते आणि सगळ्यांना त्या गायकाचे दर्शन घडते. तो गायक मात्र पूर्ण भांबावून जातो आणि कसेबसे गाणे पूर्ण करतो. आपल्याला दिसतो, तो गायकाच्या विद्रूप, किळसवाणा चेहरा आणि  चकित होतो. हीच सगळी कहाणी आहे, "नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी" या सुप्रसिद्ध गाण्याची. अभिनेत्री आशा पारेख यांच्या आयुष्यातील सगळ्यात अप्रतिम भूमिका आणि मुख्य म्हणजे या गाण्यात, तिच्यातील नृत्यकौशल्याचा जितका सुरेख वापर करून घेतला आहे, तितका तिच्या पुढील  विरळा किंवा जवळपास अजिबात करून घेतल्याचे आढळत नाही. तोच प्रकार, अशोक कुमार या अत्यंत देखण्या, रुबाबदार अभिनेत्याबाबत म्हणता येईल.
दिग्दर्शक "आर.के. राखन" यांच्या "मेरी सुरत तेरी आंखे" या चित्रपटातील एका अजरामर गाण्याला सुरवात होते. जन्मापासून विद्रूप म्हणून त्याच्या आई-वडिलांनी एका मुसलमानाला देऊन टाकलेला!! त्यामुळे आयुष्यभर मनात, "आपण जगाला नको आहोत" अशा नकारात्मक भावनेने पछाडलेला नायक, दत्तक बापाने दिलेल्या संगीताच्या शिकवणुकीच्या आधाराने, आयुष्यात उभारी घेण्याचा सतत प्रयत्न पण तरीही जगापासून आपले अस्तित्व लपविल्याने, मनात साचलेली खंत!! अशोक कुमार यांनी आयुष्यात बऱ्याच अजरामर भूमिका केल्या पण अशा प्रकारची भूमिका एकमेव!!
या गाण्याची चाल, "साडे नाल" या पंजाबी टप्प्यावर आधारित चाल बांधलेली आहे. संगीतकार एस.डी.बर्मन यांनी, या गाण्याच्या द्वारे, या मूळ चालीचे अक्षरश: सोने केले आहे. खरतर, "टप्पा" हा शास्त्रीय संगीतातील एक अनोखा आविष्कार आहे. सर्वसाधारणपणे "टप्पा" गायन हे मध्य लयीत सुरु होते आणि हळूहळू रचनेची बढत, द्रुत लयीत होते. हे गाणे देखील याच धर्तीवर बांधलेले आहे. अर्थात, गाण्याला नृत्याचे अंग असल्याने, गाण्यात तबला वादनाला अपरिमित महत्व आलेले आहे. पंडित किशन महाराज यांनी, या गाण्यात आपल्या वादनाची असामान्य चुणूक दाखवली आहे.  हे सगळे झाले तरी, या गाण्याचा खरा नायक आहे - गायक मोहमद रफी. आवाजाचा पल्ला, भरीवपणा, समान ताकदीची फेक, मर्दानी जोमदारपणा, अत्यंत सुरेल आणि लहान स्वरांशाचे सफाईदार द्रुतगती गायन या गुणांचा त्यांच्या आवाजात नेहमी आढळ दिसतो. 
गाण्याच्या सुरवातीला जो आलाप आहे, त्यातून गायकाच्या मर्दानी आवाजाची आपल्याला कल्पना येते आणि खरे म्हणजे त्यातूनच गाण्याच्या पुढील रचनेचे सूचन होते. कविता म्हणून या रचनेत काही फार विशेष हाताला लागत नाही परंतु बंदिशप्रचुर  तेंव्हा उपमा, प्रतिमा या अलंकारांना इथे स्थान नाही जाण ठेऊन शैलेंद्र यांनी गीतरचना केली आहे, मुळात, शैलेंद्र यांच्या बहुतेक रचना या गीतसदृश असतत. तिथे गुढार्थ किंवा विचारांना फारसे स्थान नसते आणि जो विचार असतो, तो शक्यतो साध्या सोप्या शब्दातून मांडलेला दिसतो.नायकाची मानसिक तडफड आणि त्याचे गायनातून होणारे सादरीकरण, इतपत मर्यादित हेतूने गाण्याची शब्दकळा बांधली आहे पण तरीही, गाण्यात गेयता असणे तसेच चालीचे बंधन पाळून शब्दरचना करणे, यातूनच आराखडा तयार केलेला आहे. 
"नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी
बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी. 
या ओळींतच तबल्याचे बोल मिसळून, गाण्याचा विस्तार काय धर्तीवर असेल याचे सूचन मिळते. गाणे पहिल्यापासून द्रुत लयीतच चालते आणि त्याला नृत्याची अप्रतिम जोड आहे. काह्रेतर, गायन, तबला आणि नृत्य या त्रयीवर सगळे गाणे आधारलेले आहे. गाण्याच्या सुरवातीला केरवा ताल आहे. आठ मात्रांच्या या तालातील शेवटचे बोल, विशेषत: "धिन, ना" हे बोल डग्ग्यावर घेऊन गाण्यात खुमारी आणली आहे आणि  त्या बोलांची जोड नृत्याच्या पदन्यासाशी जुळवून घेतल्याने, गाणे अधिक रंगतदार होते. आशा पारेख प्रशिक्षित नर्तिका आहे, हे तिच्या हाताच्या किंवा बोटांच्या हालचालीतून नेमकेपणी जाणवते. 
गाणे पहिल्यापासून द्रुत गतीत आणि नृत्याच्या हालचालीने बांधलेले असल्याने, पडद्यावरील सादरीकरण देखील तितकेच विलोभनीय झालेले आहे. आशा पारेख यांची प्रत्येक हालचाल, ही तालाशी निगडीत आहे आणि त्यामुळे अर्थात तबल्याच्या बोलांना विलक्षण उठाव मिळतो. त्यामुळे, ध्रुवपदानंतरचा वाद्यमेळ हा पारंपारिक भारतीय वाद्यांवर आधारित आहे जसे पहिला अंतर सुरु व्हायच्या आधीचा जो स्वरिक वाक्यांश आहे, त्या वाद्यमेळात, प्रथम बासुरी आणि त्याला जोडून सतारीचे सूर घेतले आहेत पण या वाद्यांची "गत" बांधताना, विशेषत: सतारीच्या प्रत्येक सुराशी तबल्याच्या बोलाचे नाते जोडले आहे आणि त्याच्याच आविष्कार नृत्याच्या पदन्यासातून आपल्याला सुरेख अनुभवता येतो. हे जे सगळे "बोल" आहेत, तेच या गाण्याचे वेगळे सौंदर्य म्हणून सांगता येईल. 
कुहु के कोयलिया, कुहु के कोयलिया कही दूर पपीहा बुलाये 
टुटे ना ये सपना, टुटे ना ये सपना, कोई अब मुझे ना जगाये 
घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी. 
वास्तविक, कडव्याच्या चालीत तसे फार फेरफार नाहीत,शक्यतो स्वररचना तशीच ठेवलेली आहे पण गाताना, रफीने ज्या प्रकारे स्वरांची "उठावण" घेतलेली आहे, त्यावरून गायकाच्या अभ्यासाचा अंदाज घेता येतो. इथे घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी" ही ओळ घेताना लय "दुगणीत" जाते आणि गाणे विलक्षण वेगात सुरु होते. खरेतर हे सगळे रागदारी संगीतात अनुभवता येते परंतु संगीतकाराचे चातुर्य असे की, हे सगळे अलंकार त्याने मोठ्या खुबीने या गाण्यात घेतले आहेत. हे गाणे ऐकताना, तुम्ही क्षणभर देखील उसंत घेऊ शकत नाही!!
यही रुक जाये, यही रुक जाये, ये शाम आज ढलने ना पाए 
टुटे ना ये सपना, टुटे ना ये सपना, कोई अब मुझे ना जगाए 
घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी. 
हे कडवे सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ आणि आधीच्या कडव्यातील वाद्यमेळ ऐकण्यासारखा आहे. अशा प्रकारच्या  रचनेत,शक्यतो वाद्यमेळ संगीतात फारसे बदल अपेक्षित नसतात कारण तीन मिनिटांच्या गाण्यात तितका अवकाश प्राप्त नसतो. असे असून देखील या गाण्यातील दुसरा अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळाची स्वररचना संपूर्ण भिन्न आहे आणि तरीही परत लयीच्या त्याच अंगाने, गाणे समेवर येते. 
छुप छुप ऐसे मे, छुप छुप ऐसे में, कोई मधुए गीत गाए 
गीतो के बहाने, गीतो के बहाने,छुपी बात होटो पे आए 
घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी. 
इथे परत एकदा संगीतकार एस.डी.बर्मन यांनी अशीच एक मजेशीर रचना बांधली आहे.कडव्याच्या चालीत तोच आकृतिबंध कायम ठेऊन, वाद्यमेळाची रचना काहीशी संथ ठेवली आहे पण लय मात्र तशीच वेगवान आहे. थोड्या वेगळ्या उदाहरणाने हे अधिक स्पष्ट व्हावे. उस्ताद विलायत खांसाहेब, नेहमीच गत द्रुत लयीत चालू असताना, तबल्याच्या एखाद्या मात्रेवर स्वररचना मंद्र सप्तकात ठेवतात आणि रागाचे अपूर्व स्वरूप आपल्याला घडवतात. हा प्रकार निरतिशय कठीण आहे आणि या गाण्यात, त्याच प्रकारची स्वररचना, वाद्यमेळातून ऐकायला मिळते. संगीतकार "दिसतो" तो अशा ठिकाणी. 
गाण्याचा शेवट मात्र नक्कीच अविस्मरणीय होणे क्रमप्राप्तच ठरते. गाण्याची कडवी संपतात आणि गाण्याचा ताल बदलतो. रचना त्रितालात सुरु होते आणि गाण्याची लय विलक्षण द्रुत होत जाते. रफीची आलापी देखील दीर्घ आणि वरच्या स्वरात होते. तबला विलक्षण अवघड लयीत सुरु होतो आणि त्याचबरोबर नृत्याची गती देखील. ही तर अप्रतिम जुगलबंदी आहे आणि पण तरीदेखील त्यात विलक्षण लालित्य आहे, लडिवाळ स्वरावली आहे. केवळ मात्रांचा आणि नृत्याचा गणिती हिशेब नसून त्याला सुरेख भावनिक जोड दिलेली आहे. गाणे चित्रपटातील आहे, याची वाजवी जाणीव संगीतकाराकडे असल्याचे हे लक्षण आणि म्हणूनच, गाणे कुठेही क्षणभर देखील रेंगाळत तर नाहीच पण आपली उत्सुकता ताणली जाते. चित्रपट गीताचे आणखी वेगळे कुठले वैशिष्ट्य सांगायचे? 


Monday, 6 January 2020

कैसे दिन बीते

फार पूर्वी, प्रसिद्ध गझल गायिका बेगम अख्तर यांना एक प्रश्न विचारला होता. "आयुष्यात खरे गाणे कधी गायलात?" या प्रश्नावर त्यांनी बरेच विस्तारपूर्वक उत्तर दिले होते पण त्याचा गोषवारा घ्यायचा झाल्यास, "मी खूप वर्षांनी प्रथमच लखनौ रेडियो स्टेशनवर गायला गेले असता, त्यावेळी खऱ्याअर्थी पोटभर गायले". त्यामागील पार्श्वभूमी अशी होती, लग्नानंतर बेगम साहिबांनी गायन बंद केले होते परंतु आतल्या आत सुरांची तडफड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
याच पार्श्वभूमीवर, "अनुराधा" चित्रपटातील "कैसे दिन बीते, कैसी बीती रतियां" या गाण्याचा विचार करता येईल. चित्रपटातील नायिका, मुळातली प्रतिभाशाली गायिका परंतु लग्नानंतर तिच्या पतीने, तिच्या या छंदाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने, स्वत:चे गाणे बंद करून टाकले आणि आतल्या आत झुरत राहिली. नवरा डॉक्टर असल्याने आणि संपूर्ण वेळ हाच व्यवसाय करीत राहिल्याने, पत्नीकडे दुर्लक्ष झाले आणि पत्नीने देखील हे वास्तव निमुटपणे स्वीकारले असल्याने, मनातल्या मनात गायन करणे, इतपतच सगळी संगीत साधना राहिली. 
एके दिवशी, एक पेशंट यांच्या घरी येतो आणि नायिकेला बघून चमकतो. नायिकेच्या गायनाच्या जुन्या आठवणी निघतात आणि त्यातून, गायनाचा आग्रह होतो. मनात कोडून ठेवलेले आणि भळभळत असलेले सूर गळ्यातून येताना वेदनेचा अप्रतिम आकार घेऊन येतात आणि हे गाणे सादर होते. 
अभिनेत्री लीला नायडू यांनी हिंदी चित्रपटात काही फार भूमिका केल्याचे आठवत नाही पण ही भूमिका मात्र केवळ अप्रतिमरीत्या वठवली आहे.वास्तविक, त्यांची भूमिका अतिशय वाखाणलेली गेली होती पण तरीही त्यांचा, हिंदी चित्रपट सृष्टीत जम बसला नाही, हे निखळ सत्य. बलराज सहानींचा तर प्रश्नच नाही. या माणसाने, आजमितीस "वाईट" अभिनय केला आहे, असे निदान माझ्या तरी पाहण्यात नाही. यालाच जोडून, आणखी म्हणता येईल, या चित्रपटाचे संगीतकार प्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर आहेत आणि त्यांनी देखील, ४,५ हिंदी चित्रपट वगळता, आणखी काही चित्रपटांना संगीत दिल्याचे आठवत नाही. 
हे गाणे मी जेंव्हा ऐकतो तेंव्हा प्रत्येकवेळी माझ्या मनात कवी ग्रेस यांच्या "पाउस" कवितेची आठवण येते. 
"पाउस कधीचा पडतो, वाऱ्याने हलती पाने:
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुरांने". 
हे गाणे असेच आहे. मनाला झालेली जखम एखाद्या संतत चिघळत असलेल्या वेदनेप्रमाणे झुळझुळत असते. या वेदनेला "आक्रोश" नसतो तर केवळ चिरदाह सहन करावा लागतो. चित्रपटातील नायिकेची मनोवस्था नेमकी अशीच आहे आणि तो भाव नेमकेपणाने जाणून घेऊन, या गाण्याची रचना केली आहे. 
गाण्याचे चित्रीकरण देखील तसेच आहे. घरातली घरगुती बाई जसे सहज, उस्फुर्त पण तरीही गायकी ढंगाचे गाणे गाईल, तसेच केले आहे. सगळे चित्रीकरण एका खोलीत केले आहे पण तसे करताना, प्रत्येक व्यक्तीरेखेचा "स्वभाव" नेमकेपणाने टिपलेला आहे.पंडित रविशंकर यांनी "माज खमाज" या काहीशा अनवट रागावर आधारित तर्ज बांधली आहे. गाण्याच्या सुरवातीलाच लताबाईंनी "हाये" शब्द जसा उच्चारला आहे, त्या स्वराला दुसरी तोड नाही. मी, वरती ग्रेस यांच्या कवितेच्या काही ओळी उधृत केल्या आहेत, त्यातील "दु:खाच्या मंद सुरांने" या शब्दांतील जाणीव नेमकी "हाये" शब्दाच्या सुरांत एकवटली आहे. मनातली सगळी वेदना त्या शब्दात, लताबाईंनी आणली आहे.चित्रपट गायकीची ही असामान्य करामत आहे. 
पुढे लगेच गाण्याला सुरवात होते. "कैसे दिन बीते, कैसी बीती रतियां, पिया जाने ना" या ओळीतील "पिया" शब्द देखील किती सुरेख घेतला आहे. "दिन बीत गये, रांते भी उड गयी लेकिन "पिया" को कोई पता नाही" ही विखारी आणि व्याकूळ करणारी जाणीव "पिया" या शब्दात सामावली गेली आहे. कवितेतील कुठल्या शब्दाला किती महत्व द्यायचे, हे संगीतकाराचे काम आणि त्याचबरोबर त्या शब्दातून, कवितेचा आशय कसा वृद्धिंगत करायचा, हे गायकाचे काम. गाताना शब्दावर किती "आघात" द्यायचा जेणेकरून भावनांचे प्रकटीकरण रसिकांसमोर सादर होईल. पहिल्यांदा घेतलेला "हाये" आणि इथला "पिया" हे शब्दातून या गाण्याची संस्कृती आपल्या ध्यानात येते आणि गाणे कुठली वळणे घेऊन, विस्तार करणार आहे, याचा अदमास घेता येतो. गाण्याची अचूक बांधणी ही अशाच स्वररचनांमधून सिद्ध होत असते.   
गाण्यावर बंगाली ठसा जाड आहे पण बंगाली भाषेतील "गोलाई" येत नसून स्वरांना टोक येते. गाणे चालू असताना, नायिकेच्या चेहऱ्यावरील निराशा आणि नायकाची दुर्लक्षित वृत्ती देखील बघण्यासारखी आहे. 
"नेहा लगा के मैं पछताई 
सारी सारी रैना निंदिया ना आयी 
जान के देखो, मेरे जी की बतियां 
पिया जाने ना"
इथे रचना किंचित द्रुत लयीत जाते पण इतकीही नव्हे की रचनेचा तोल बिघडेल. "जान के देखो, मेरे जी की बतियां" या ओळीचे, रचनेच्या दृष्टीने दोन खंड पाडले आहेत."जान के देखो" ही ओळ पहिल्या ओळींच्या लयीतच घेतली आहे पण लगेच "मेरे जी की बतियां" इथे "उतरी" स्वर घेऊन, मूळ स्वररचनेला जोड दिली आहे. असामान्य स्वरिक कलाकुसर आहे. लय सगळी बदलते पण आशयाला कुठेही धक्का पोहोचत नाही. या ओळी पडद्यावर सादर होत असताना, नायकाचे वाचनात गर्क होणे आणि घरी आलेल्या पाहुण्याला त्याचे वैषम्य वाटणे, सगळे कसे गाण्यातील भावना भरीव करणारे आहे. 
पुढील ओळी सादर होताना, एक सुंदर दिग्दर्शकीय नमुना दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जींनी पेश केला आहे. गाण्यातील वाद्यमेळाचे सूर चालू असताना, घरातील पाहुण्याचे लक्ष घरातील एका तसबिरीकडे जाते. तिथे नायिकेचा जुना फोटो आहे आणि त्याच बाजूला आताची नायिका गात आहे, असे त्याला भासायला लागते. क्षणभराची अनुभूती आहे पण यथार्थ आहे. 
कडव्यांची बांधणी तशी समान आहे म्हणजे पहिल्या कडव्याची चाल आणि दुसरे कडवे, यात सत्कृत्दर्शनी काहीही फरक नाही आणि त्याच, पूर्वीच्या तालात आणि लयीत गाणे पुढे सरकते.      
"रुत मतवाली आके चली जाए 
मन में ही मेरे मन की रही जाए 
खिलने को तरसे, नन्ही नन्ही कलियां 
पिया जाने ना" 
इथे देखील शब्दांची वाजवी जाणीव ठेवलेली आहे. "आके चली जाए" मधील "जाए" शब्दातून, कवी शैलेंद्र यांनी जी निराशा व्यक्त केली आहे त्याचे निराशेशी गाण्याची चाल तद्रूप होते. "जाए" मधील "जा" अक्षरानंतर किंचित स्वरांत हेलकावा दिला आहे आणि कसे सगळे विरून गेले, याचीच जाणीव करून दिली आहे. सगळे गाणे हे अत्यंत हताश आणि काहीतरी जवळचे पण महत्वाचे संपून गेल्याची आठवण करून देणारे आहे." खिलने को तरसे, नन्ही नन्ही कलियां" या ओळीतून आपल्याला हेच वाचायला मिळते. आयुष्यातील अतिशय छोटे आनंद देखील कसे करपून जातात आणि तरीही आयुष्य तसेच पुढे चालत असते!! 
हे कडवे संपत असताना, नायक गाण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून, खोलीचा दरवाजा उघडून आतल्या खोलीत जायला निघतो. पडद्यावर नायकाची पात दिसते आणि ती पाठ बघून, नायिकेची विषण्णता अधिक गहिरी होते, हा अभिनय बघणे, खरोखरच मनोज्ञ आहे. आपल्या नवऱ्याने, इतकी वर्षे जे केले तेच आता देखील, गाणे चालू असताना केले, हे बघून, मनातली काजळी चेहऱ्यावर उमटली आहे. गाण्यातील वाद्यमेळ देखील त्याच वृत्तीचा आपल्यावर गडद परिणाम होईल, असाच योजलेला आहे.  
"कजरा ना सोहे, गजरा ना सोहे 
बरखा ना भाए, बदरा ना सोहे 
क्या कहू जो पुछे, मोसे मेरी सखियां 
पिया जाने ना"
कवी शैलेंद्र यांनी देखील ही भावना मांडताना, "सोहे" सारखे लोकसंगीतातील शब्द घेतले आहेत तसेच त्याचबरोबर वेदना अधिक मुखरित करण्यासाठी, "कजरा","बरखा" सारख्या शब्दांचा उपमेप्रमाणे उपयोग करून, आशय अधिक अंतर्मुख केला आहे. नवऱ्याने पाठ फिरवली असल्याने, असलेली जाणीव अधिक खोल झाल्याची भावना, या कडव्याची सुरवात करताना किंचित वरच्या सुरांनी व्यक्त केली आहे आणि हे देखील एकूण गाण्याच्या भावनेशी अत्यंत सुसंगत आहे. "बरखा" येउन देखील आपल्या मनावर त्याचा काहीही परिणाम होऊ शकला नाही आणि आयुष्य उजाड झाले. 
कवी म्हणून या रचनेकडे बघितल्यास, एक बाब स्पष्ट होते, काव्यात वर्तमानाच्या उंबरठ्यावर तोललेला भूत आणि भविष्याचा कालभाग आणि या दोन टोंकात ताणलेली भाववृत्ती, हाच स्थायीभाव आहे. वर्तमानाच्या क्षणाच्या या दोन टोकांपासून बदलत असणाऱ्या अंतराने, व त्यामुळे बदलणाऱ्या ताणाने, या भाववृत्तीच्या छटा काव्यात आल्या आहेत. आणि अशा कितीतरी तरल छटा, स्थायीभावाची किती विविध रूपे, या कवितेंतून शब्दांकित केली आहेत. शब्दांत पकडणे केवळ अशक्य वाटावे, अशा कितीतरी भावच्छटांना शब्दाचे शरीर दिले आहे!! वर्तमानातील भकास क्षण भोगताना स्मृतींच्या मोहक क्षणांना गोंजारण्याची हळवी वृत्ती; या जाणिवेने तगमग आणि याच जाणिवेने आलेली बधिरता; कधी या दोहोंत तोल सावरून, काहीतरी होईल आणि आपण यातून मुक्त होऊ, या कल्पनेची लागलेली आस पण त्याचवेळी उरलेल्या जीवनाला अर्थ आहे तो केवळ याच स्मृतींमुळे आणि ती दु:खाची तार सुटली तर काहीतरी भयंकर होईल, याची विषण्ण जाणीव!! अशा अनेक आणि विविध भावच्छटा येथे काव्यरूप झाल्या आहेत.  आणि म्हणूनच अशा वर्णनांतून काव्याच्या भावनाशयाची जरी कल्पना देता आली तरी खोलीची कल्पना देता येणे केवळ अशक्य!! आणि तसे करताना शब्द, शब्दसमूह, त्यांची गुंफण, प्रतिमा या त्यांच्या काव्यशरीराच्या घटकांकडे बघत, बघत हा प्रवास केला तरच त्यांचे स्वरूप स्पष्ट जाणवेल.  
गाण्याचा शेवट पूर्णपणे वाद्यमेळ थांबवून, केवळ लताबाईंच्याच सुरात करणे, हे एका दृष्टीने अपरिहार्य होते, एकटेपणाची जळजळीत जाणीव परत आपल्या मनातच दाबून ठेवायची ही खूण!!  एका दृष्टीने एका असामान्य कुवतीच्या कलाकाराची मानसिक परवड कशी होते, याचे अप्रतिम चित्रण केवळ चित्रिकरणातून नसून, सुरांच्या सहाय्याने गाण्यातून कसे व्यक्त करायचे, याचा हे गाणे गाणे म्हणजे समृद्ध अनुभव आहे.  


जरा सी आहट होती है

पावसाळी हवेतील धुंद संध्याकाळ. प्रियकर सैन्यात सामील झाल्याने दूर गेलेला. मनात उठलेली हुरहूर आणि कालवाकालव. अशाच विक्लांत क्षणी सुरुच्या घनदाट बनात शिरल्यावर, अंगावर कोसळलेला अंधार. तिथल्या प्रत्येक खोडावर उमटलेले स्पर्श, पानांनी ऐकलेले हितगुज या सगळ्याचा झालेला "कोलाज". मनाची सगळी सैरभैर अवस्था आणि त्या अवस्थेतून बाहेर पडण्याची धडपड. नजरेसमोर जाणवत असलेला प्रियकर आणि त्याच्या बरोबर घालवलेले धुंद क्षण, गोकर्णाच्या दुमडलेल्या पाकळीप्रमाणे उमटलेले अस्फुट स्मित. 
रॉय किणीकरांच्या शब्दात ,मांडायचे झाल्यास, 
"लागली समाधी आभाळाला आज,
गौतमीस आली कृतार्थतेची नीज;
बघ तपोवनावर पडले इंद्रधनुष्य,
भगव्या मातीवर नाचे हिरवे हास्य". 
"हकीकत" चित्रपटातील "जरा सी आहट होती है" हे गाणे ऐकताना आणि चित्रीकरण बघताना, मनासमोर असलेच अर्धुकलेले चित्र उभे राहते. यमन रागाचा आधार असलेले हे गीत, प्रणयाच्या अनोख्या रंगाचे अनोखे प्रणयरम्य चित्र. 
हिंदी चित्रपटात एकूणच युद्धपट फारसे निघत नाहीत आणि त्यात देखील युद्धाचा खरा थरार आणि निर्माण झालेल्या झळा फारशा जाणवत नाहीत. १९६२ च्या चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर काढलेला चित्रपट. दिग्दर्शक चेतन आनंदने चित्रपटासाठी लडाखचा डोंगराळ प्रदेश निवडला असल्याने,चित्रपटाला वास्तवाची सुरेख डूब मिळालेली आहे. 
आता या गाण्याच्या संदर्भात मांडायचे झाल्यास, चित्रपटाची नायिका प्रिया राजवंश आहे. दुर्दैवाने अभिनेत्री म्हणून तिच्या अभिनयाला बऱ्याच मर्यादा आहेत. पडद्यावर इतके नितांतरमणीय गाणे चालू आहे पण चेहऱ्यावर त्या भावनेचे अतिशय अस्पष्ट प्रतिबिंब पडावे, हे या गाण्याचे दुर्दैव म्हणायला लागेल. गाण्यातील शब्दकळा मात्र केवळ अप्रतिम, अर्थगर्भ आणि आशयसंपृक्त आहे.     
कैफी आझमी हे नाव उर्दू साहित्यात, विशेषत: शायरीमध्ये फार गौरवाने घेतले जाते. चित्रपट गाण्यांना अजूनही फारसा साहित्यिक दर्जा दिला जात नाही ( दर्जा का दिला जात नाही, हे एक कोडेच आहे!! पण ते असुदे!!) परंतु ज्या कवींनी त्याबाबत अथक प्रयत्न केले त्यात, कैफी आझमी यांचे नाव निश्चित घ्यावे लागेल, जसे शकील, साहिर किंवा गुलजार या यादीत येतील. ( या यादीत आणखी नावे येतील!!) प्रस्तुत गाणे म्हणजे मुक्त छंदाच्या वळणाने गेलेली प्रणय कविता आहे, मुक्त छंदाने अशासाठी, कवितेत, यमकादि गोष्टी आढळत नाहीत, अर्थात मुक्त छंदाचे हेच व्यवच्छेदक लक्षण नव्हे. चित्रपटातील गाण्यात, शब्दांमध्ये आंतरिक लय असावीच लागते तसेच सांगीतिक क्रिया होण्यासाठी शब्द देखील तितकेच अर्थवाही आणि गेयतापूर्ण असावेच लागतात. 
इथेच बघा, "जरा सी आहट होती है तो दिल सोचता है" म्हणजे नायिका, प्रियकराची किती आतुरतेने वाट पहात आहे, हेच दृग्गोचर होते. "आहट" हा शब्दच असा आहे तिथे दुसरा कुठलाच शब्द योग्य नाही!! गाणे हे असे शब्दांकित असावे, तिथे आपण दुसऱ्या कुठल्याच शब्दाची कल्पना करणे अवघड. वास्तविक, चित्रपटात "प्रणय" भावना नेहमीच प्रमुख असते, त्यामुळे, ती भावना शब्दांकित करताना, रचनेत तोचतोचपणा बरेचवेळा जाणवतो परंतु "खानदानी" कवी, तीच भावना अशा असामान्य शब्दातून मांडतो. पुढे, "कहीं कहीं ये वो तो नहीं" हे वाक्य दोनदा लिहिण्यात औचित्य आहे, केवळ सांगीतिक रचनेसाठी केलेली तडजोड नव्हे. 
पुढील कडवे देखील याच दृष्टीने बघणे संय्युक्तिक ठरेल. "छुप के सीने मे कोई जैसे सदा देता है, शाम से पहले दिया दिल को जला देता है; है उसीकी ये सदा, है उसीकी ये अदा" इथे "सदा" शब्द दोन वेळा लिहिला गेला आहे परंतु आशय मात्र वेगळा!! शब्दांशी असे मनोहारी खेळ खेळणे आणि त्याचबरोबर आशयाची अभिव्यक्ती अधिक अंतर्मुख करणे, इथेच कवी दिसतो. 
आता गाण्याकडे वळूया. वास्तविक "हकीकत" हा युद्धपट तरीही अशा चित्रपटात असे प्रणयी गीत!! असो, हा मुद्दा वेगळा आहे. व्हायोलीनच्या सुरांनी रचनेला सुरवात आहे. त्यात देखील एक गंमत आहे, सुरवातीचा व्हायोलीनचा "पीस" १९,२० सेकंदाचा आहे पण त्या सुरांत मध्येच २ तुटक ध्वनी आहेत, ते जर बारकाईने ऐकले तर ध्यानात येतील आणि ते ध्वनी व्हायोलीनचेच आहेत म्हणजे लय साधली ती व्हायोलीनच्या स्वरांनी तरीही मध्येच असे ते २ ध्वनी वेगळे, ज्यांनी तो २० सेकंदाचा "पीस" एकदम वेगळाच होतो, हे मदन मोहनचे कौशल्य. नंतर लगेच लताबाईंचा सूर सुरु होतो. नायिका प्रणयोत्सुक आहे आणि ती भावना, स्वरांकित करताना, "कहीं ये वो तो नहीं" ही ओळ तीनदा गायली आहे पण प्रत्येक वेळेस, "वो" शब्द कसा स्वरांतून, ज्याला "वेळावून" म्हणता येईल असा गायला आहे. लताबाईंचे गाणे कसे शब्दांच्या पलीकडे जाते, ते असे!! 
ह्या कडव्यानंतर व्हायोलीनचे सूर दुपदरी ऐकायला मिळतात!! म्हणजे असे, कडवे संपते आणि पहिल्या अंतऱ्याच्या आधीची सुरावट सुरु होते, ती संतूरच्या ३ स्वरांनी, ते स्वर म्हणजे पुढील व्हायोलीनच्या सुरांना वाट काढून देतात!! थोडक्यात, संतूरच्या सुरांनंतर जी व्हायोलीनची गत सुरु होते, त्या सुरांत दुसरी व्हायोलिन्स वेगळीच गत सुरु करतात आणि काही सेकंदातच परत समेवर येतात. 
"छुप के सीने मे" हे उच्चारल्यावर, त्या क्षणी, एक "आकार" युक्त हरकत घेतली आहे, किती जीवघेणी आहे!! ओळ चालू आहे पण, मध्येच क्षणभर थांबून, त्या लयीतच तो आकार घ्यायचा!! खरच फार कठीण सांगीतिक वाक्यांश!! पुढे, "शाम से पहले दिया दिल को जला देता है" हे गाताना, "शाम" हा शब्द कसा उल्लेखनीय उच्चारला आहे आणि नुसते तेव्हडेच नसून, त्या स्वरांतून, पुढील शब्दांचा आशय देखील मूर्त केला आहे. "है उसी की ये सदा, है उसी की ये अदा"!! मघाशी मी जे कवितेचे विशेष सांगितले तोच विशेष नेमका स्वरांतून मांडणे, "सदा" आणि "अदा" ह्यामागील स्वरांची हलकी वेलांटी, किती तोच भाव अमूर्त करते!! छोटासा "आकार" आहे पण, तोच "आकार" त्या शब्दांचे "विभोर" किती प्रत्ययकारी ऐकायला मिळतात. 
लताबाईंचे गाणे हे असेच छोट्या स्वरांनी अलंकारित असते, जे पहिल्या प्रथम ध्यानात येत नाहीत पण गायला घेतले की त्या "जागा" गळ्यातून घेणे किती अवघड आहे, हे लक्षात येते. एकाच लयीत गाताना, मध्येच त्या लयीत वेगळा सूर लावून, तरीही ती लय कुठेही बेलय होऊ न देता, संगीत वाक्यांश पूर्ण करते, सगळेच अद्भुत!! 
"शक्ल फिरती है" हे गायल्याक्षणी तिथे परत आकार आहे पण पहिल्या अंतऱ्याप्रमाणे नसून थोडासा "सपाट" आहे, म्हणजे गाण्याची लय, चाल तशीच आहे पण तरीही असे आलाप वेगवेगळ्या प्रकारे आलेत!! भारतीय संगीताचे हे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. शब्द देखील किती अप्रतिम आहेत!! "शक्ल फिरती है निगाहो मे वोही प्यारी सी, मेरी नसनस मे मचलने लगी चिंगारी सी;छु गयी जिस्म मेरा, किसके दामन की हवा"!! व्वा, गाण्याला दाद द्यावी, तशी शब्दांना द्यावीशी वाटली.  
संगीतकार म्हणून मदन मोहन यांचे मूल्यमापन झाल्यास, त्यांची प्रतिभा गीतधर्मी होती. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, अर्थाव्यतिरिक्त पण त्याच्याच आधारे आशयाचे तरंग निर्माण करण्याची ज्या काव्यात अंगभूत अशी ताकद असते अशा काव्याला प्रतिसाद म्हणून रचनाकार जेंव्हा एखादी भावपूर्ण सुरावट उभी करतो तेंव्हा गीत संभवते आणि या विधानाला नेमका पुरावा म्हणून प्रस्तुत गीत सादर करता येईल.  एकदा का आपण मदन मोहन यांना गीतधर्मी असे मान्य केले म्हणजे मग अशा प्रकारचे रचनाकार लयबंधापेक्षा सुरावटींकडे आणि प्रवाही चलनांकडे वळतात. लयबंधांच्या वा तालांच्या, ठळक किंवा ढोबळ वापरातून जी गतिमानता प्रत्ययास येते, तिच्यापेक्षा स्वनरंगातले सूक्ष्म भेद दाखवून अनुभवास येणारी गतिमानता ते पसंत करतात. याचाच वेगळा परिणाम, स्वररचनेत काहीतरी गमावल्याची धूसर हळहळ याच भावस्थितीच्याच निरनिराळ्या छटा आढळतात. याचा वेगळा द्रिश्य परिणाम असा  झाला,वाद्यमेळाचा मर्यादित स्तरावरील वापर आणि शक्यतो कंठसंगीतावर अधिक भर राखणे क्रमप्राप्तच ठरले. याच विधानाचा दुसरा भाग असा म्हणता येईल, मदन मोहन याना पाश्चात्य धर्तीवरील नृत्यसंगीत किंवा उडत्या चालीची गाणी बनविणे, त्यांच्या स्वभावधर्माच्या विरुद्ध होत गेले. चित्रपट संगीतात वावरायचे तर अशा प्रकारच्या रचना करणे अत्यावश्यक ठरते आणि अशा रचना ऐकताना, मदन मोहन यांचे मन रमले नाही, हे स्पष्ट जाणवते.   
वास्तविक गाणे केवळ दोनच कडव्यांचे आहे पण गाण्यातील प्रत्येक सूर आणि त्याबरोबरची लय, इतकी अप्रतिम आहे की वेगळे काही बोलायची सोयच उरलेली नाही. आणखी एक मुद्दा!! सतार आणि मदन मोहन यांचे नाते "अद्वैत" असे नेहमी म्हटले जाते पण या गाण्यात सतारीचा एकही सूर नाही!! गाण्यातील काव्य आणि संगीत रचना, ह्या नेहमी हातात हात घालून सादर व्हावे, अशी अपेक्षा बहुतांशी असते पण फारच थोड्या गाण्याच्या बाबतीत असा भाग्ययोग जुळून येतो. मदन मोहन आणि लताबाई, यांनी कितीतरी अजरामर गाणी दिली आहेत, त्यामुळे हेच गाणे मी का निवडले, याला कसलेच संय्युक्तिक उत्तर नाही, कदाचित या गाण्यात सतारीचा अजिबात वापर नाही, हे कारण देखील असू शकते!! अर्थात हे संगीतबाह्य कारण आहे. गाण्याची चाल अद्भुत आहे, हेच खरे महत्वाचे. 


Thursday, 26 December 2019

भारवाही लमाण

एखादे पुस्तक पहिल्याप्रथम वाचले की मनावर एखादी भावना उमटणे साहजिकच असते आणि त्यानुसार आपण त्या पुस्तकावर आवड/निवड ठरवत असतो. पुढे समजा तो लेखक/ती लेखिका निजधामास गेल्यावर काहीशा गहिऱ्या वातावरणात पुन्हा तेच पुस्तक वाचायला घेतल्यास, कदाचित वेगळा परिणाम घडू शकतो. कितीही तटस्थतेचा आव आणला तरी या प्रतिक्रियेची तर्कसंगत फोड करणे दुरापास्त होऊन बसते. डॉ. श्रीराम लागू लिखित "लमाण" पुस्तकाबाबत माझी बरीचशी विमनस्क प्रतिक्रिया झाली. 
वास्तविक ५ वर्षांपूर्वी मी हे पुस्तक वाचले होते आणि माझी प्रतिक्रिया तेंव्हाही निराशजनक अशीच होती आणि आता नुकतेच लागूनच निधन झाले म्हणून पुन्हा पुस्तक वाचून काढले तेंव्हा यावेळच्या प्रतिक्रियेत फारसा बदल घडला नाही. एखाद्या लोकप्रिय अभिनेत्याचे पुस्तक वाचायला घेताना आपल्यासमोर काही प्रमाणात पुस्तकाबाबत काही मते असतात (यात त्या अभिनेत्याच्या प्रतिमेचा भाग अधिक) आणि असे माझ्याबाबतीत आणखी एका पुस्तकाबाबत झाले आहे. विजया मेहता लिखित "झिम्मा" पुस्तकाने माझी अशीच निराशा केली आणि आजही त्या प्रतिक्रियेत सुतराम फरक पडलेला नाही. तसे बघितल्यास श्रीराम लागू आणि विजया मेहता यांचे कर्तृत्व निश्चितच उत्तुंग असे म्हणायला लागेल. मराठी रंगभूमीवर ज्या कलाकारांनी मन्वंतर घडवले त्यातील हे दोघे प्रमुख अभिनेते. आजही त्यांच्या शैलीविषयी गहिवरलेल्या आवाजात बोलले जाते (मला हे चुकीचे वाटते कारण कलाकाराबद्दल आत्मीयता असणे यात चूक नाही पण विश्लेषण करताना गहिवरलेपण कशासाठी?) आणि या दोन्ही कलाकारांच्या एकूण सम्यक योगदानाबद्दल त्यांना नेहमीच उजवे माप दिले जाते ( हे योग्य ) परंतु जेंव्हा कारकिर्दीचा अभ्यासक आढावा घ्यायची वेळ येते तेंव्हा वैय्यक्तिक भावना वगैरे बाजूला सारणे आवश्यकच असते. 
आता थेट पुस्तकाकडे वळतो. पुस्तकातील २ बाबी विशेष खटकल्या 
. पहिल्या बायकोचा आणि तसेच मुलाचा उल्लेख इतका त्रोटक आहे (जवळपास नगण्य स्वरूपात) आहे की थोडे आश्चर्य वाटते. आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात आणि त्यातील कुणा व्यक्तीचा किती उल्लेख करावा याबाबत खरतर लेखकाचा विचार अंतिम असे म्हणावे लागेल परंतु या पुस्तकात, पहिल्या बायकोचा फोटो आहे (फोटोंत दोघेही आहेत) आणि "माझे पहिले प्रेम" असे वर्णन केले आहे. याचाच अर्थ, आयुष्यावर काहीतरी परिणाम घडला असणार (मी असे ऐकले आहे, पहिल्या बायकोचा मृत्यू संशयास्पद रीतीने झाला. कदाचित त्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळू नये हा लेखकाचा विचार असावा) असे असताना, बायकोबद्दल इतका त्रोटक उल्लेख खटकतो. तसेच आपला मुलाचा उल्लेख. तसे बघितल्यास, मुलाचा मृत्यू ही घटना अतिशय व्याकुळ करणारी घटना होती आणि त्याबद्दल उल्लेख न करणे हा लेखकाच्या बुद्धीवादी स्वभावाचा खास विशेष म्हणायला लागेल. पण मग पुढे मुलाच्या नावाने पारितोषिक ठेवणे, ही घटना याच बुद्धीवादी विचाराशी कशी ताडून बघता येईल? पारितोषिक ठेवले म्हणजे मुलाबद्दल मनात कोवळीक तर असणारच तसेच मुलाची आठवण चिरंतन राहावी, हा विचार देखील असणारच आणि त्यात वस्तूत: काहीही चूक नाही. प्रश्न असा उद्भवतो जर का मुलाची स्मृती कायम राहावी असे वाटत असेल तर मग पुस्तकात मुलाचा ना फोटो ना कसला उल्लेख!! असे का केले असावे? हा प्रश्न मनात येतो. दुसऱ्या बायकोबद्दल बरेच उल्लेख आहेत ( याबाबत अशी मखलाशी करता येईल - दुसरी बायको नाट्यव्यवसायात असल्यामुळे उल्लेख झाले) 
सगळे आयुष्य नाट्यव्यवसायात काढले आणि ते काढताना, एक विशिष्ट विचारसरणी डोळ्यासमोर ठेऊन काढले. ही बाब सहज, सोपी नाही. आपला दृष्टिकोन कायमस्वरूपी बाळगताना मनात अनेक द्वंद्व उभी राहिली असणारच. प्रसंगी तडजोडी केल्या असणारच आणि त्यावेळी मनाची समजूत घालणे पराकोटीचे अवघड झाले असणार परंतु त्याबाबत फारसे काही वाचायला मिळत नाही. नाटकाचा व्यवसाय म्हणून स्वीकारल्यावर सदासर्वकाळ उत्तम भूमिका मिळणे कधीही शक्य नसते. तसे कुणालाही अशक्यच असते परंतु जेंव्हा मनाविरुद्ध एखादी भूमिका स्वीकारली जाते (ऐतिहासिक नाटकांतील भूमिकांबाबत त्यांनी भिन्न दृष्टिकोन ठेवला होता) तेंव्हा एकतर निव्वळ आर्थिक स्थैर्य हा मुद्दा प्रमुख असू शकतो किंवा सातत्याने रंगभूमीवर वावरणे, ही मानसिक गरज असू शकते. त्याबाबत फार खोलवर विचार केलेला आढळत नाही. किंबहुना "अभिनय कला" बाबत काही ठिकाणी काही परिच्छेद सुरेख लिहिले आहेत जे लेखकाच्या वैचारिक भूमिकेशी नाते सांगतात. 
परंतु विशेषतः "नटसम्राट" नाटक वाचायला घेतले त्यावेळची भारावलेली अवस्था त्यांनी छान मांडली आहे आणि एक माणूस म्हणून हे घडू शकते परंतु काही काळाने याच अभिनेत्याने "नटसम्राट" हे नाटक डागाळलेले नाटक आहे असे विधान केले होते. एखादी कलाकृती कालांतराने आवडेनाशी होणे, संययुक्तिक आहे पण मग त्यावेळच्या आपल्या प्रतिक्रियेबाबत आपली मते आणि विचारसरणी याबाबत काहीतरी विवेचन होणे अगत्याचे वाटते. नटसम्राट नाटकातील भूमिका आपल्याला कशी मिळाली या विषयावर भरपूर लिहिले आहे (नाटकाचे लेखक शिरवाडकरांशी वैय्यक्तिक स्नेह कसा झाला याचे देखील वर्णन आहे) पण एक बुद्धीवादी अभिनेता म्हणून त्या भूमिकेत नेमके काय भावले, आपण त्याची तयारी कशी केली याबाबत फारसे विश्लेषणात्मक काही वाचायला मिळत नाही. किंबहुना आपल्याला कालानुरूप कशा भूमिका मिळाल्या याची जंत्री वाचायला मिळते (विकिपीडियाच्या काळात ही माहिती कुणालाही कशीही मिळू शकते) "हिमालयाची सावली" ही लेखकाला मिळालेली आणखी एक गाजलेली भूमिका. महर्षी कर्व्यांच्या आयुष्यावर बेतलेली भूमिका. वास्तविक इतका प्रचंड आवाक्याचा माणूस साकारायला मिळणे, हे भाग्यच म्हणायला हवे परंतु या भूमिकेबाबत एक अभिनेता म्हणून विश्लेषक भूमिका घेतलेली नाही - हे सगळे मी लिहीत आहे कारण लागूंचा उल्लेख करताना त्यांच्या बुद्धीवादी दृष्टिकोनाचा नेहमी उल्लेख केला जातो आणि वस्तुनिष्ठ विचारसरणी आयुष्यभर कशी बाळगली, हे ऐकायला/वाचायला मिळते. जर हे उल्लेख अनिवार्य असतील तर मग आपल्याला मिळालेल्या भूमिकेबद्दल तितकाच खोलवर विचार वाचायला मिळणे, ही अपेक्षा चुकीची नाही आणि तिथे हे लेखन कमी पडते. 
पुढे मराठी सिनेमात प्रवेश केला. "पिंजरा","सामना", "सिंहासन" सारख्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. वास्तविक सिनेमा आणि नाटक, दोन्ही संपूर्ण वेगळी माध्यमे आणि दोन्हीकडे तुम्हाला वेगळी अभिनय शैली अंगीकारावी लागते. हा मुद्दा तर सर्वश्रुत आहे परंतु आजही आपल्याकडे या विषयावर फारसे "बौद्धिक" लिहिलेले वाचायला मिळत नाही. विशेषतः "पिंजरा" चित्रपटातील भूमिका फार वेगळी होती. वाचायला मिळतो तो शांताराम बापूंचा ताठरपणा आणि त्यांनी अभिनेत्यावर दाखवलेला विश्वास!! परंतु एक विचारी अभिनेता म्हणून या भूमिकेत नेमके काय भावले? त्यासाठी काही वेगळे प्रयत्न केले का? या प्रश्नांची कुठेच उत्तरे मिळत नाहीत. हिंदी किंवा मराठी चित्रपटात असंख्य सामान्य/अतिसामान्य अभिनेते बघायला मिळतात आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षाच नसते परंतु ज्या बुद्धिवादाची कास लागूंनी आयुष्यभर धरली त्यांच्याकडूनअशी  अपेक्षा बाळगणे निश्चितच चुकीचे नाही.  
आता आपण लागूंच्या अभिनयाबद्दल बोलूया. एकूणच सगळ्या भूमिकांचा साकल्याने विचार केल्यास काही गोष्टी ठामपणे जाणवतात. मराठी चित्रपटाचे नाव आठवत नाही पण एका प्रसंगात (प्रसंग चित्रपट गीताचा आहे) लागू ढोलकी वाजवताना दिसतात. किमान अपेक्षा अशी असते, तबला किंवा ढोलकी वादनाचे चित्रण चालू असेल तर निदान वादनाचा अचूक आभास पडद्यावर  दिसायला हवा परंतु पडद्यावर ढोलकी वादनाच्या वाजलेल्या मात्रा आणि लागूंच्या हात/बोटांच्या हालचाली याचा अजिबात  मेळ बसलेला नाही!! ढोलकी वादकाची भूमिका आणि मूलभूत तत्वे विसरली!! एक वेगळे उदाहरण - अर्थात तुलना नाही पण "कोहिनूर" या हिंदी चित्रपटातील "मधुबन में राधिका" या प्रसिद्ध गाण्यातील दिलीप कुमारने भासवलेले सतार वादन बघावे. तसेच अभिनयाबाबत एक बाब नेहमी सांगितली जाते, अभिनेत्याने भूमिकेत स्वत्व विसरून ती भूमिकाच वठवणे योग्य. पडद्यावर किंवा रंगभूमीवर अभिनेता न दिसता, ती भूमिकाच दिसली पाहिजे. आता या पार्श्वभूमीवर लागूंचा अभिनय कुठल्या पातळीवर येतो? पुस्तकात ठायीठायी हॉलिवूड तसेच ब्रिटिश दिग्गज अभिनेत्यांचा उल्लेख होतो आणि त्या अभिनेत्यांचा आपल्यावर पडलेला प्रभाव (त्यांच्या अभिनयशैलीबाबत काहीही वाचायला मिळत नाही तर  फक्त नामावळी  वाचायला मिळते)  याबाबत बरेच लिहिलेले वाचायला मिळते. मग प्रश्न असा  उभा राहतो. संस्कारक्षम वयात प्रभाव पडलेल्या अभिनेत्यांचे काय विशेष तुम्हाला जाणवले? आणि जे विशेष जाणवले त्याचा तुम्ही तुमच्या अभिनयासाठी काय उपयोग करून घेतला? लागूंचे वर्णन नेहमी बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्ती म्हणून केले जाते मग ज्या कलेची व्यवसाय म्हणून जाणीवपूर्वक निवड केली, त्याबाबत सखोल विचार केलेला फारसा वाचायला मिळत नाही. किंबहुना काही भूमिका बघताना, आपण प्रथितयश अभिनेते डॉ. श्रीराम लागू (च) बघत आहोत असे वाटते. भूमिका वेगळी असली तरी संवादफेक, शारीर अभिनय आणि हालचाली यात काहीवेळा साचेबद्धता आढळते. एक विचारी अभिनेता म्हणून इकडे लक्ष गेले नाही की जाणूनबुजून दुर्लक्ष केले? 
सामाजिक कृतज्ञता निधी ही मराठी रंगभूमीवरील फार महत्वाची घटना आणि त्याबद्दल विस्ताराने सुरेख लिहिले आहे. "लमाण" पुस्तक ही आठवणींची जंत्री आहे, असे खुद्द लेखकानेच म्हटले आहे आणि विधानाला पुष्ट्यर्थ हे लेखन आहे. या अनुरोधाने आणखी एक मुद्दा मनात येतो."लग्नाची बेडी" नाटक करायचे ठरल्यावर जे अभिनेते/ अभिनेत्री नक्की केले जातात. त्याबाबत नक्की काय निकष ठेवले होते? याबाबत काहीही वाचायला मिळत नाही. 
पुस्तकांत, आपल्यावर खास प्रभाव पाडणाऱ्या कलाकारांची नावे लिहिली आहेत. १) बर्ट्रांड रसेल, २) मर्ढेकर आणि ३) कुमार गंधर्व. आता यांचे नेमके काय भावले?  प्रश्न अनुत्तरीतच राहतो. मर्ढेकरांच्या कवितांची अवतरणे वाचायला मिळतात, त्यावरून समृद्ध वाचनाची खात्री पटते परंतु आपल्याला का आवडले? हाच प्रकार रसेलच्या लिखाणाबत घडतो. संगीतात आपल्याला फारसे कळत नाही असे सुरवातीलाच सांगितले. अर्थात संगीत न कळता (शास्त्र न जाणता) आस्वादता येते. परंतु हे लेखनाबाबत असे म्हणता येणार नाही. अभिनेत्याचे आत्मचरित्र आहे तेंव्हा लेखनाची सखोल चर्चा अपेक्षित नाही परंतु आपली आवड, याबाबत थोडक्यात तर्कसुसंगत भूमिका मांडणे, ही अपेक्षा चुकीची ठरत नाही. त्यातून आयुष्याच्या उत्तर काळात लागूंनी कविता वाचनाचे जाहीर कार्यक्रम केले होते म्हणजे मराठी कवितेबाबतची साक्षेपी नजर स्पष्ट केली होती. 
वास्तविक आत्मचरित्रात्मक लेखन म्हणजे आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहण्याची एक दुर्लभ संधी असते. त्यानिमित्ताने आपल्या पूर्वायुष्याकडे त्रयस्थ नजरेतून बघून त्याचा ताळा मांडणे शक्य असते. भावनांना संपूर्णपणे बाजूला सारून, त्यावेळच्या प्रतिक्रिया कितपत योग्य होत्या, किती चुकीच्या होत्या, इत्यादी गोष्टी संगतवार तपासता येतात, निदान त्या दृष्टीने प्रयत्न असावा आणि तिथेच "लमाण" पुस्तक अपुरे ठरते. कधीतरी असे मनात येते, बुद्धीप्रामाण्यवाद हा लेखकाने आपल्यावर लादून घेतला की काय? तसे असेल तर हे सगळेच लेखन ही आत्मवंचना ठरेल. 

Monday, 16 December 2019

भारतीय लोकशाही

भारतात लोकशाही पद्धत १९४७ पासून अस्तित्वात आली असे म्हणता येईल. कित्येक शतके राजेशाही, सरंजामशाही पुढे परकीय राज्य इत्यादी अनेक कारणांनी इथे लोकशाही नाममात्र होती किंवा अजिबात नव्हती, असे म्हणता येईल. त्याचा परिणाम असा झाला, भारतीय लोकांना "लोकशाही" या शब्दाचा खरा अर्थ कळलंच नाही आणि आजही दुर्दैवाने तशीच परिस्थिती आहे. "लोकांनी चालवलेले, लोकांसाठी चालवलेले" वगैरे घोषणा भरपूर झाल्या आणि तशाच हवेत विरल्या. अर्थात घोषणा या हवेतच करायच्या असतात, याचे धडे भारतीयांना देश स्वतंत्र झाला आणि लगोलग प्रचिती यायला लागली. इथल्या राजकारणी नेत्यांना, सामान्य जनतेला कसे फसवायचे याचे मूलभूत धडे फार पूर्वीपासूनच मिळाले. आज फक्त त्याची री ओढली जात आहे. 
"नेहरूंनंतर कोण?" हा प्रश्न जेंव्हा उपस्थित केला त्या दिवशीच राजकारणातील व्यक्तिपूजेची प्रतिष्ठापना झाली. पुढे, Indira is India या घोषणेने त्या वृत्तीला खतपाणी मिळाले. आज जेंव्हा व्यक्तिकेंद्रित शासनव्यवस्था हाच भारतीय राजकारणाचा पाय बनला आहे. त्याबद्दल नकारात्मक सूर काढला जातो तेंव्हा आपण इतिहासाकडे जाणूनबुजून काणाडोळा करत असतो. आज जेंव्हा भाजपविरुद्ध टीका केली जाते तेंव्हा जर का इतिहासात डोकावले तर काँग्रेसने जे ७० वर्षांत केले, तेच भाजप आज करीत आहे, हे स्पष्टपणे दिसते. आज फरक इतकाच पडला आहे, कालापरत्वे संपर्कसाधने आधुनिक झाली आणि टीका सर्वव्यापी होत गेली. 
आपल्याकडे लोकशाही कधीही रुजली नाही किंबहुना लोकशाही रुजावी अशी व्यवस्थाच कधी निर्माण केली नाही. तशी होऊ शकणार नाही, याची फार पूर्वीपासून काळजी घेण्यात आली. ज्या इंग्लंडच्या लोकशाहीचे आपण गुणगान करतो आणि त्याच धर्तीवर भारतीय लोकशाहीचा डोलारा उभारला आहे तिथे विरोधक आणि सत्ताधारी जरी वेगळे असले तरी व्यक्तिकेंद्रित मत असते. चर्चिलने तर आपल्या आत्मचरित्रात, "मी बरेचवेळा विरोधी पक्षात असून सुद्धा सरकारच्या बाजूने मत दिले आहे कित्येक वेळा सरकारात सामील असतात विरोधात मत दिले आहे आणि मला याबाबत कधीही खेद वाटला नाही". असे चित्र दुर्दैवाने भारतात कधीही दिसले नाही. विरोधक म्हणजे देशबुडवे अशीच संस्कृती, विशेषतः इंदिरा गांधींपासून जन्माला आली आणि पुढे त्या संस्कृतीत भर पडत राहिली. अशा परिस्थितीत भारतात लोकशाहीचा पाया मजबूत होणारच नाही आणि यापुढे ती शक्यता फार अंधुक झाली आहे. त्यातूनच मागचे ते मूर्ख आणि फक्त मीच शहाणा, हा विचार बळावत गेला. अर्थात हा विचार व्यक्तिपूजेचाच एक भाग आहे म्हणा. ७० वर्षे काँग्रेसचा एकछत्री अंमल होता त्यामुळे त्या पक्षाला हे वाक्य बोलायची सुविधा नव्हती परंतु एकूणच, विरोधक म्हटल्यावर त्याने फक्त विरोध करणे अपेक्षित असते आणि सत्ताधारी म्हटल्यावर त्याने सतत भलावण करायची आणि हीच खरी लोकशाही म्हणून आरडाओरडा करायचा. यातून फक्त गोंधळ निर्माण होतो. टीव्हीवरील चर्चा याच संस्कृतीचे फलित आहे. शांतपणा आपल्याला भावतच नाही कारण मृत्यू हीच शांततेची एकमेव कसोटी असे आपले मत आहे. मृत्यूनंतर शांतता भंग करता येत नाही, हे भारतीयांचे भाग्यच म्हणायला हवे. 
एका बाबतीत आपण जगासमोर अग्रेसर आहोत. सदैव घोषणा करून सामान्य माणसाला विचार करायची संधीच मिळवून द्यायची नाही. त्याच्या डोक्यात सतत चिखल भरून ठेवायचा आणि भ्रमिष्ट करून टाकायचे. एकप्रकारची ही स्टालिनशाही (च) म्हणायची. गुलामगिरी आपल्या रक्तातच भिनली आहे. त्यातूनच निष्ठा एकाच व्यक्तीपाशी केंद्रित करण्याची प्रवृत्ती वाढायला लागली. स्वतंत्र विचारशक्तीच गमावून बसलो आहोत. दर ५ वर्षांनी मतदानाचा भोंगळ उत्सव आणि निवडणुकीचे गुऱ्हाळ घालून, लोकशाहीचे सुंदर थडगे बांधले जाते. खरतर भारतीय समाजाला लोकशाही म्हणजे काय, याचेच धडे देण्याची गरज आहे. नुसत्या संसद इमारती बांधून काहीच साधले जात नाही. आपण फक्त लोकशाहीचा वृथा आणि अत्यंत खोटा अभिमान बाळगत आहोत. आपण सगळेच खोटारडे आहोत आणि आता असे म्हटल्यावर "मी सत्याचा पुजारी आहे" सारखी भ्रामक  उत्तरे वाचायला मिळतील सुद्धा. 
लोकांना गृहीतच धरायचे नाही, सामान्य जनतेच्या डोक्यावरून वरवंटा फिरवायचा. याच कृतीने आपण लोकशाही सिद्ध करीत आहोत. अजूनही स्वातंत्र्य लढ्याची वर्णने चवीने वाचली जातात, त्या लढ्याच्या भोगातून असंख्य आर्थिक फायदे उपटले जातात. आपली बुद्धी अजूनही ७० वर्षे मागासलेलीच आहे. आजही "मी इतके महिने/वर्षे तुरुंगात राहून देशसेवा केली" असली उबवलेली वाक्ये म्हणण्यातच धन्यता मानीत आहोत आणि गमतीचा भाग असा आहे, सर्वसामान्य जनता याच वाक्यांना फशी पडत आहे.  आणखी एक बाब, आपण घृणास्पदरीत्या बुद्धीचा टेम्भा मिरवीत असतो. 
गेली ७० वर्षे हेच चालले आहे. या गोष्टी मात्र भारतीय जनता सहन करण्यायोग्य झाली आहे, हेच निर्विवाद सत्य होय. यालाच "भारतीय लोकशाही" म्हणतात जी जगाच्या इतिहासात अद्वितीय आणि अजोड आहे. 

Saturday, 7 December 2019

जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात

मध्यरात्री घनघोर पावसांच्या धारांत भिजत असलेली आणि त्यामुळे अवघडून गेलेली तरुणी, एखादा सुरक्षित आडोसा शोधत उभी असते. आजूबाजूला विजेचा कडकडात चालू असतो आणि त्या नादात पावसाचा जोर वाढलेला असतो. त्यामुळे ती तरुणी "ओलेती" झालेली. अचानक एक तरुण तिथे येतो आणि त्या ओलेत्या सौंदर्यावर लोभावून जातो. तरुणीला, हा तरुण आपल्याला "हेरत" आहे याची जाणीव होते आणि काहीशी सलज्ज होते. 
१९६० साली आलेल्या "बरसात कि रात" या चित्रपटातील "जिंदगी भर नहीं भूलेगी" या प्रसिद्ध गाण्याची वरील प्रमाणे पार्श्वभूमी आहे. चित्रपट सरधोपट आहे आणि अभिनयाच्या क्षेत्रात "मधुबाला" वगळता, सगळाच आनंद आहे!! मला तर बरेचवेळा असेच वाटते, समोर भारत भूषण सारखा नाठाळ अभिनेता असल्याने, मधुबालाचा अभिनय अधिक खुलून येतो!! तिच्या सौंदर्याबद्दल तर कुठलेच दुमत नसावे. रोशन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी, हाच या चित्रपटाचा प्राण आहे!! 

"पाठमोरी मूर्ती तुझी पाहिली मी कौतुकें 
वाटले स्वत्कुंतली गे गुंतली सारी सुखे 

भार त्यांचा गाढ काळा मेघ आषाढांतला 
का फुलांच्या मार्दवे मानेवरी भारावला? 

सुप्रसिद्ध कवी बा.भ. बोरकरांच्या या ओळी म्हणजे मोहक, सलज्ज तरुणीच्या संयत सौंदर्याचा आविष्कार आहे. या मतितार्थाशी संलग्न अशा ओळी, प्रसिद्ध शायर साहिर यांनी प्रस्तुत गाण्यात लिहिल्या आहेत. खरतर, या गाण्यातील ओळी अप्रतिम आहेत आणि अशा वेळी, या ओळी असामान्य आहेत की पडद्यावर दिसणारे मधुबालाचे सौंदर्य अलौकिक आहे, असा संभ्रम पडतो. सुंदर गाण्यात शब्द असे असावेत, जिथे स्वरलय संपते तिथेच अक्षर संपावे, जेणेकरून शाब्दिक "यतिभंग" होऊ नये. हे सगळे एकाच वेळी जुळून येणे फार अवघड असते. चित्रपट गीतांवर जेंव्हा सरसकट टीका केली जाते तेंव्हा हा मुद्दा फारसा ध्यानात घेतला जात नाही. 
संगीतकार रोशन यांच्या बहुतांशी रचना या अतिशय संयत, अनाक्रोशी आणि विशेष करून मुग्ध स्वरूपाच्या आहेत. गाण्यातील वाद्यमेळ बांधताना, कुठलेही वाद्य अति तार सप्तकात शक्यतो जाणार नाही आणि त्यायोगे गायन देखील त्याच पातळीवर वावरेल, याची काळजी घेतलेली आढळते. बरेचवेळा रचनेत, लय वरच्या सुरांत जाण्याची शक्यता दिसत असताना, लय खंडित करून खालच्या स्वरांवर वळवून घेण्याकडे त्यांच्या बराचसा कल दिसतो. गाणे अधिककरून मंद्र सप्तकात कसे बांधले जाईल, हाच दृष्टीकोन बाळगलेला आढळतो. त्यामुळे रचनेत, फारच कमीवेळा "यतिभंग" झाला आहे किंवा शब्दांची अनावश्यक मोडतोड झाली आहे, असे ऐकायला मिळत नाही. शब्दांच्या आशयानुरूप लयीला "वळण" द्यायला त्यांनी कधीही मागेपुढे बघितले नाही, त्या दृष्टीने, त्यांची गाणी ही अधिक करून "गीतधर्मी" असतात.
सुरवातीच्या हुंकारातून, गाण्याची सुरवात होते. या हुंकारातच आपल्या यमन रागाची खूण पटते. मोहमद रफी, हा गायक म्हणून विचार करताना, सरळ सरळ दोन भाग दिसतात. १] या अशा गाण्यातून गायकीचे अतिशय संयमित रूप ऐकायला मिळते तर इतर अशी काही गाणी आहेत, तिथे आवाजात अकारण "नाटकी" भाव फार डोकावतो. गायन करताना, शब्दांची जाण ठेऊन गायन करणे, हा फार ढोबळ विचार झाला परंतु शब्दांतील आशय अधिक खोलवर दाखवण्याच्या नादात वाहवत जाण्याचा धोका फार असतो आणि दुर्दैवाने, मोहमद रफी काही गाण्यात तसे वाहवत गेले आहेत.
 
जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात  
एक अंजान हसीना से मुलाकात की रात 

या ओळीतील भाव जाणून घेतला तर लगेच ध्यानात येईल, "त्या" अनुपमेय रात्रीच्या सुगंधी आठवणींची मांडणी आहे. मघाशी मी संगीतकार रोशन यांच्या बाबतीतील वैशिष्ट्य सांगताना, शब्दातील "ऋजुता" चालीत मांडताना, मुग्धता अधिक खोलवर कशी दाखवता येईल, याचाच प्रत्यय येतो. खरतर त्या रात्री त्या तरुणीशी "मुलाकात" म्हणावी तर केवळ दृष्टीभेट इतपतच मर्यादित परंतु त्या नजरभेटीतून अवतरलेले भावनांचे "बोलके" भाव केवळ शब्दातून(च) नव्हे तर सुरांतून देखील विभ्रमासहित आपल्याला ऐकायला मिळतात. गाण्याचा "मुखडा" असावा तर असा!! गेयताबद्ध शब्दकळा आणि त्याला संलग्न अशी स्वररचना आणि त्याचे आविष्कृत स्वरूप गायनातून तितक्याच प्रत्ययकारी दिसणे. सगळेच मधुबालाच्या सौंदर्याप्रमाणे विलोभनीय!! 
इथे पहिला अंतरा येण्याआधीचा वाद्यमेळ ऐकण्यासारखा आहे, "मुलाकात की रात"
या ल शेवटचा "त" या अक्षराचा सूर ध्यानात ठेऊन, सतारीच्या स्वरांची बांधणी केली आहे आणि त्यात पुढे सारंगी आणि जलतरंग या वाद्यांना जोडून घेतले आहे. मनाची घालमेल ही, जलतरंग वाद्यातून किती सुरेख उमटली आहे आणि हे भाव दाखवताना कुठेही लय कठीण किंवा वरच्या सुरांत गेली आहे, असे दिसत नाही. रोशन यांच्या रचनेतील "संयत" भाव दिसतो, तो असा. 

हाय वो रेशमी झुल्फो से बरसता पानी
फुल से गालों पे रुकने को तरसता पानी 
दिल में तुफान उठाते हुये, जजबात की रात 

इथे देखील रोशन यांची शब्दांप्रती दिसणारी जाणीव दिसते. "हाय वो रेशमी झुल्फो से बरसता पानी" ही ओळ दोनदा घेतली आहे आणि पहिल्यांदा घेतल्यानंतर काही सेकंद, सतार आणि जलतरंग यांचा स्वरमेळ ऐकायला मिळतो. पडद्यावर मधुबालेचा सलज्ज चेहरा आणि पार्श्वभागी जलतरंग वाद्याचे सूर!! "दिल में तुफान" इथे रचना किंचित वरच्या सुरांत जाते ती केवळ "तुफान" या शब्दाचे सूचन करण्यासाठी परंतु पुढल्या क्षणी चाल परत मूळ स्वरलयीशी जुळवून घेते. रचना परत, पहिल्या ओळीशी - "जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात"  येते पण ही ओळ घेताना, मोहमद रफी "बरसात" हा शब्द कसा घेतो हे खास ऐकण्यासारखे आहे. आवाजात किंचित थरथर आहे पण कुठेही नाटकीपणा नाही. आता, पडद्यावरील भारत भूषणच्या चेहऱ्यावरील रेषा देखील हलत नाही, हा या गाण्याचा भीषण विपर्यास आहे, तो भाग वेगळा!!

डर के बिजली से अचानक वो लिपटना उसका 
और फिर शर्म से बलखा के सिमटना उसका 
कभी देखी न सुनी ऐसी तिलिस्मात की रात 

या ओळी गाताना, लय जरा खालच्या पट्टीत गेली आहे आणि या ओळी वाचल्या की लगेच याचे उत्तर आपल्याला मिळेल. या गाण्यात, प्रत्येक कडव्याची पहिली ओळ संपल्यावर. रोशन यांनी जलतरंग वाद्याच्या सुरांनी अप्रतिम जोडकाम केले आहे जेणेकरून, ओळीचा अर्थ आपल्याला अधिक सुंदररीत्या लक्षात यावा. वाद्यमेळ अक्षरश: एखाद, दोन सेकंदाचा आहे पण अर्थपूर्ण आहे. हे शब्द देखील काय अप्रतिम आहेत. "लिपटना" च्या जोडीला "सिमटना" घेऊन, प्रणयाचा रंग भलताच सुरेख रंगवला आहे. मी सुरवातीला म्हटले आहे, "संयत" हा रोशन यांच्या संगीताचा स्थायीभाव आहे आणि तो इथे नेमका आढळतो. कडव्याची शेवटची ओळ पुन्हा वरच्या सुरांत सुरु होते पण पुढल्या क्षणी चाल खालच्या सुरांत येते. "शर्म से बलखा" हे शब्द कसे गायले गेलेत हे मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. 

सुर्ख आंचल को दबा कर निचोडा उसने 
दिल पे जलता हुआ एक तीर सा छोडा उसने 
आग पानी मे लगाते हुये हालात की रात 

सगळे गाणे हे केवळ काही मिनिटांच्या दृष्टीक्षेपावर आधारित आहे, जिथे एकही शब्दाचा संवाद नाही, अशा अनोख्या भेटीवर हे गाणे बेतलेले आहे. त्यामुळे, चित्रपटाचा नायक कवी प्रकृतीचा असल्याने, मनात उमटणाऱ्या निरनिराळ्या प्रतिमांचे आवर्तन, साहीरच्या कवितेतून वाचायला मिळते. अचानक नजरेसमोर तरुण येतो आणि त्यामुळे मनाची झालेली घालमेल "सुर्ख आंचल को दबा कर निचोडा उसने" या ओळीतून व्यक्त होते आणि त्या सलज्ज असहायतेतून झालेली दृष्टीभेट, नायकाच्या मनात कल्लोळ उठवते. 

मेरे नग्मो में बसती है वो तसवीर थी वो 
नौजवानी के हसीन ख्वाब की ताबीर थी वो 
आसमानो से उतर आई थी जो रात की रात 

चित्रपटातील नायक, कवी असल्याने, गाण्याचा शेवट देखील, "मेरे नग्मो में बसती है" याच शब्दांनी होणे उचित ठरते. साहीर कवी म्हणून काय दर्जाचा होता, हे बघण्यासारखे आहे. "नौजवानी के हसीन ख्वाब की ताबीर थी वो " इथे, "हसीन ख्वाब" च्या जोडीला "ताबीर" हाच शब्द यायला हवा. तिथे दुसरा कुठलाही शब्द उपरा ठरेल आणि अशी अपरिहार्यता जेंव्हा कवितेत येते, तिथे ती कविता "काव्य" म्हणून श्रेष्ठ ठरते. एक उदाहरण, पु.शि. रेग्यांच्या "त्रिधा राधा" कवितेत, "क्षेत्र साळीचे" असे शब्द येतात, तेंव्हा "क्षेत्र" हे "साळी"चेच असायला हवे, असे होते. तिथे दुसरा पर्याय नाही. 
सगळेच गाणे एका सुंदर लयीत बांधलेले आहे, कुठेही कुठलेच वाद्य "बेसूर" तर नाहीच पण, एखादा स्वर वाढवला तर, असला विचार देखील मनाला शिवत नाही. गाण्याची घट्ट बांधणी अशीच असावी लागते. या कडव्यानंतर गाणे परत ध्रुवपदावर येते आणि आपल्या मनात केवळ मधुबाला रहात नसून स्वर आणि शब्दांच्या आकृतीने निर्माण केलेला  नितांतरमणीय आविष्कार  आपल्या मनात उतरत जातो. कुठल्याही गाण्याची सांगता यापेक्षा वेगळी होणे उचित नाही.