Wednesday, 26 January 2022

मोसे छल किये जाय

*लावण्याला असल्या असण्याचा हक्कच ना;* *प्रज्ञेतच फक्त तये उजळावे, आणि पुन्हा* *जळताना, घडवावी प्रतिमा निस्तुल काळ्या* *काळ्या पाषाणातून शब्दातून थिजलेल्या ---------* सुप्रसिद्ध कवी पु.शि. रेग्यांची भोगवादी कविता. चराचराच्या, निसर्गाच्या रस-रंग-नाद-स्पर्शमयी रूपांतून रसरसणारे स्त्रीचे नित नवे दर्शन कवीमनाला भुलवित असतेच. परंतु, रेग्यांना या सृजनशक्तीच्या मार्दवाचा आणि सौष्ठवाचा, गूढतेचा आणि ऐश्वर्याचा खरा साक्षात्कार घडतो, तो स्त्रीच्या मृदू, मादक शरीरलावण्यात तसेच मुग्धा,मधुर भावविलासात!! आणि हा भावविलास जवळपास अशाच स्वरूपात आपल्याला या गाण्यातून आढळतो. मुळातील हे गीत म्हणजे *नृत्यगीत* आहे. त्यामुळे शब्दांची रचना करताना त्यात खटकेबाज शब्द येणे क्रमप्राप्तच होते. लटका प्रणय हीच या शब्दांची मूळ अभिव्यक्ती. पहिल्या अंतऱ्यात *धमकाया? और करूं भी क्या* लिहिताना, एक शब्द प्रश्नार्थक आणि लगेच पुढे काहीशी हताशता!! असे सुंदर जुळवून आणले आहे. त्याच भावनेची परिपूर्ती पुढील ओळीतील *देखो मोरा जियरा...... तडपाये* हे सगळेच शब्द लटक्या प्रेमाची ग्वाही देणारे. अशी काहीशी संवादात्मक शब्दरचना कवी शैलेंद्र यांनी केली आहे. अर्थात काव्य लिहिताना, *बैरी कारा* किंवा *दी नी गारी* सारखे लोकसंगीतातील शब्द घेऊन त्यांनी कवितेत वेगळीच खुमारी आणली आहे. खरंतर गाण्याच्या पहिल्या ओळीपासून आपल्याला हीच भावना वाचायला मिळते. अर्थात नृत्यगीत असल्याने, काही शब्दांची पुनरावृत्ती वाचायला मिळते जसे, दुसऱ्या अंतऱ्यात *तडपाये तडपाये तरसाये* या ओळीत *तडपाये* शब्दाची द्विरुक्ती आहे परंतु पुढे *तरसाये* या शब्दामुळे ती फारशी खटकत नाही. एकूणच सगळ्या ओळी या आकाराने फार छोट्या आहेत आणि मुळात गाण्याची स्वररचना द्रुत आणि अति द्रुत होत असल्याने दीर्घ ओळी लिहिण्याची गरजच निर्माण होत नाही. शंका अशी आहे, बहुदा गीताची स्वररचना आधी झाली असावी आणि पुढे त्याच्यावर आधारित अशी गीतरचना झाली असावी. या गीताची स्वररचना सचिन देव बर्मन यांनी *झिंझोटी* रागावर आधारित अशी बांधली आहे. तर हा राग *अनवट* जातीत समाविष्ट होतो. ललित संगीतात देखील या रागावर आधारित फार विपुल अशी गाणी ऐकायला मिळत नाहीत. *खमाज* थाटात अंतर्भाव केलेल्या रागाचे स्वरूप *शाडव/संपूर्ण* असे करता येते. वेगळ्या भाषेत *आरोही* सप्तकात *निषाद* स्वराला स्थान नाही आणि *अवरोही स्वरांत* हाच *निषाद कोमल* स्वरूपात अवतरतो आणि बाकीचे सगळे *शुद्ध* स्वरूपात ऐकायला मिळतात. हा राग शक्यतो *मंद्र* आणि *मध्य* सप्तकात अधिक करून सादर केला जातो. आता प्रस्तुत गाणे हे नृत्यगीत असल्याने, गीताचे चलन हे द्रुत लयीत सुरु होते आणि हळूहळू अति द्रुत लयीत सादर होते. त्यामुळे गीतात सरळ, सरळ *केहरवा* आणि *त्रिताल* ऐकायला मिळतात. गंमत अशी आहे, जरी दोन्ही ताल वेगवेगळ्या मात्रांनी निबद्ध असले तरी या गीतात अवतरताना सुंदर वळणावर एकत्र मिसळतात.गीताच्या आरंभी व्हायोलिनच्या सुरांनी सुरवात होते आणि लगोलग सतारीच्या सुरांची *झमझम* ऐकायला मिळते. वाद्यमेळ एकदम थांबतो आणि क्षणात *मोसे छल किये जाये* हे शब्द ऐकायला मिळतात. *झिंझोटी* राग तर समोर येतोच परंतु *केहरवा* तालाच्या दमदार मात्रांनी आपले स्वागत होते आणि गाणे विलक्षण वेगाने ऐकायला मिळते. गाणे जेंव्हा अति द्रुत लयीत शिरते तिथेच त्रितालाच्या मात्रा ऐकायला मिळतात. गाणे ऐकताना आपल्याला क्षणभर देखील उसंत मिळत नाही. एकामागोमाग एक असे स्वरबंध ऐकायला मिळतात आणि त्याच अंगाने हरकती ऐकायला मिळतात. *समझाके मैं तो हारी* या ओळीने पहिला अंतरा सुरु होतो आणि लगोलग छोटीशी सरगम ऐकायला मिळते.पुन्हा इथे तंतोतंत *झिंझोटी* राग!! असे समजायला हरकत नाही. अर्थात अशीच सरगम पुढे दुसऱ्या अंतऱ्यात *दिल जिसे दे डाला* इथे घेतलेली आहे. सरगम देखील इतकी वेगात घेतली आहे की बऱ्याचवेळा त्यातील *स्वर* समजून घेणे अवघड जाते. दोन्ही अंतरे सारख्या चालींनी बांधले आहेत. गाण्याची खुमारी ही वेगवान लय आणि त्यातून येणाऱ्या हरकती, इथेच आहे. रागाधारित स्वररचना गायला मिळाल्यावर लताबाईंचा आवाज अधिक खुलतो. लताबाईंच्या गायकीचे आणखी एक वेगळे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, आणि अशा प्रकारच्या स्वररचनेतून ते वैशिष्ट्य अधिक खुलून येते - गाताना ज्या हरकती घ्यायच्या, सरगम घ्यायची किंवा स्वतंत्र ताना घ्यायच्या, त्या नेहमी ललित सांगितलं अनुरोधून(च) घ्यायच्या. आपण सांगीतिक अलंकार घेता आहोत, याची यत्किंचितही जाणीव करून न देता, लयीचे वर्तुळ पूर्ण करायचे. सम गाठताना देखील याच पद्धतीचा अवलंब करायचा. थोडक्यात हरकत किंवा तान घेताना, मुद्दामून घेतली आहे (तसे वस्तुतः नेहमीच असते) असे जाणवून न देता, लयीच्या अंगाने, सहज गळ्यातून काढायची (काढायची - ही कृती महत्वाची). आपण नेहमीच *सहज* या शब्दाचा वेगळा अर्थ ध्यानात घेतो परंतु *सहजता* ही कधीच *सहजपणे* प्राप्त होत नसते. मोसे छल किये जाये, हाय रे हाय, देखो सैय्या बेइमान समझाके मैं तो हारी धमकाया? दी नी गारी, और करूं भी क्या देखो मोरा जियरा हां जियरा तडपाये, जियरा तडपाये मोहे हाय हाय देखो सैय्या बेइमान मन का हैं बैरी कारा, दिल जिसे दे डाला प्रीत मोरी पल पल रोये तडपाये तडपाये तरसाये, मोहे हाय हाय देखो सैय्या बेइमान Guide Mose Chhal Kiye Jaye Hai Lata Mangeshkar - YouTube

Tuesday, 25 January 2022

थंडी

गेले काही दिवस मुंबईवर थंडीचा गारठा पसरला आहे एकदम मुंबईकरांची भाषा बदलली!! मुळात मुंबईत काकडणारी थंडी हा नेहमीच औत्सुक्याचा विषय असतो.वास्तविक मुंबईत थंडी म्हणजे अंगावर चादर घ्यायला लागणे इतपतच!! अशा परिस्थितीत सध्या दुपारचे ११/१२ वाजले तरी पंखा लावावा, असे वाटू नये, हे नवलच म्हणायला हवे. परंतु ही थंडी तशी अनपेक्षित आली हे नक्की. तशा हवामान खात्याने पूर्वसूचना दिल्या होत्या परंतु भर दुपारी पंख लावायची गरज भासू नये, इतपत थंडी पसरेल असे फारसे कुणाला वाटले नव्हते. नेहमीप्रमाणे टीव्हीवर उत्तर भारतातील थंडीचा कहर, ठिकठिकाणी बर्फवृष्टी अशा बातम्या झळकायला लागल्या. पण त्यात फारसे नवल नव्हते कारण अशी चित्रे दर वर्षी बघायला मिळतात. मुंबईकरांना ती चित्रे बघूनच थंडी भरते!! परंतु या वर्षी जरा परिस्थिती बदलली. आदित्य पुण्याला असतो, त्याच्याकडून रोजच पुण्याच्या तपमानाच्या बातम्या वाचायला मिळत होत्या. अर्थात *पुणे तिथे काय उणे* या उक्तीप्रमाणे पुण्याची थंडी जगावेगळी (हे फक्त पुणेकरांचेच मत!!) मुंबईची थंडी म्हणजे तपमान २२/२३ च्या आसपास. पारा जरा आणखी खाली उताराला म्हणजे ठेवणीतले स्वेटर्स, शाली बाहेर पडतात आणि *काय ही हाडे गारठवणारी थंडी* अशी ठेवणीतली वाक्ये ऐकायला मिळतात. मला मात्र अशी थंडी उपभोगायला फार आवडते. एकतर अशी थंडी या शहरात फारशी पडत नाही आणि दुसरे म्हणजे जरा गारवा आला तर चांगलेच आहे. लगेच *अंग कुडकुडायला लागले* सारखी वाक्ये बोलायची म्हणजे अशा थंडीचा अपमान होय!! थंडीचा देखील *उपभोग* घेणे हा अप्रतिम आनंदाचा सोहळा असतो. मला आठवत आहे, जेंव्हा मी साऊथ आफ्रिकेत रहात होतो तेंव्हाचे दिवस. एकतर हा देश म्हणजे दक्षिण गोलार्धातील शेवटचे टोक. केप टाऊनला गेल्यावर याची प्रचिती येते. या देशाचे वातावरण शहरागणिक बदलते असते. १९९४ साली मी जून महिन्यात या देशात प्रथम आलो. इथे भारताच्या नेमके उलटे ऋतुमान असते. इथला हिंवाळा हा एप्रिल ते ऑगस्ट असा असतो आणि पावसाळा बाराही महिन्यात कधीही!! तरी देखील डिसेंबर/जानेवारी हे महिने खास करून पावसाचे. परिणामी इथली हवा फार कोरडी. मी प्रथम *पीटरमेरित्झबर्ग* या शहरात आलो. हे शहर म्हणजे काही टेकड्यांवर वसलेली गावे!! अर्थात डोंगराळ भाग म्हणजे जून मध्ये भरपूर थंडी. माझ्यासारखा भारतातून आलेल्या माणसाला तर *कडाका* चांगलाच जाणवणार आणि तसेच सुरवातीचे काही दिवस झाले परंतु मी बोक्यासारखा!!! कसेही पडलो तरी पायावर उभे राहणार!! या शहरात जून/जुलै मध्ये ५६ इतके तपमान उतरते. मुळात इथे तशी वस्ती विरळ आणि रस्त्यावर तर वर्दळ नावाची नामोनिशाणी नसते. अशा परिस्थितीत इथली थंडी मला बाधली नाही, हे नवल. पण इथे मी थंडी उपभोगायला शिकलो. अगदी दुपारी ३ वाजता मिट्ट काळोख पसरत असताना, तिथल्या जवळपास निर्मनुष्य रस्त्यावरून एकट्यानेच हिंडणे, हा अनिर्वचनीय अनुभव होता. डर्बन हे हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले त्यामुळे तिथे थंडी इतकी जाणवत नाही. साधारणपणे १३/१४ पर्यंत तपमान उतरणे आणि ते देखील काही दिवस, इतकीच थंडी!! अर्थात समुद्रकिनारी वसलेले, हे कारण तितकेसे बरोबर नाही कारण केप टाऊन देखील अटलांटिक महासागराच्याच किनाऱ्यावर वसलेले महानगर परंतु तिथे जून/जुलै मध्ये ०/-२ इतके तपमान खाली उतरते!! दुसरे कारण संभवते, केप टाऊन शहराच्या पलीकडे जगाची भूमी संपते!! त्यामुळे थंड वाऱ्यांना फारसा अटकाव होत नाही. मला जर खऱ्या अर्थाने थंडी जाणवली ती, जेंव्हा मी Standerton या गावात नोकरीनिमित्ताने रहायला आलो. सावूठ आफ्रिकेतील अति थंड हवामानाचे गाव (शहर नव्हे) आणि एकूणच लोकवस्ती जास्तीतजास्त १५/१६ हजार इतपतच आणि बहुतेक सगळे गोऱ्या वर्णाचे. पुढे इथली भौगोलिक परिस्थिती समजली आणि हाडे गोठवणाऱ्या थंडीचे इंगित कळले/ मला आठवत आहे, इथे नोकरी करताना, मे महिन्यात मी सुटीवर यायचे ठरवले. तेंव्हा या गावाचे तपमान हे -२/-३ इतके उतरले आणि मी त्या थंडीत मुंबईत उतरलो आणि पश्चात्तापाने पोळून निघालो!!मुबई +३० तपमानात जळत होती!! _३ वरून काही तासात +३० या तपमानाला शरीर सरावणे निव्वळ अशक्य!! मला या दिवसात इथे यायची दुर्बुद्धी झाली होती. अर्थात पुन्हा जून महिन्यात तिथे परतल्यावर पुन्हा काही तासांनी मी -४/-५ तपमानात शिरलो!! हा बदल शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अतोनात थकवणारा ठरला आणि पुन्हा चुकूनही मे महिन्यात रजा घ्यायची नाही हे ठरवूनच टाकले. या गावात राहताना, *थंडीचा काकडा* म्हणजे काय याचा पूर्णांशाने अनुभव घेतला. प्रथमच असे वाटायचे, सकाळी *आंघोळ* करायलाच हवी का? अर्थात आपला भारतीय स्वभाव, मग आधी गरम पाण्याचा शॉवर सुरु करायचा आणि जरा वाफ पसरली की अंघोळ करायला आत शिरायचे, अशी मी माझ्यापुरती पद्धत ठरवली.खरी धमाल पुढे होती. बाहेर आलो तर नाकाचा शेंडा तुटतो कि काय असेच वाटायला लागले आणि बघाईतले गाडीच्या काचेवर Frost साचलेले!! अर्थात थंड पाणी घेऊनच ती काच साफ करणे अत्यावश्यक. थंड पाणी का? गरम पाणी वापरले तर काच तडकायची. या सगळ्या सूचना मला आधीच इतरांकडून मिळाल्या होत्या. गाडीत हीटर सुरु करायचा, थोडा वेळ गाडीचा अंतर्भाग गरम करायचा आणि मग गाडीत बसायचे!! प्रथम मला यातले काही माहित नव्हते तेंव्हा निव्वळ फजिती, हाच शब्द योग्य होता. पुढे गाडीच्या स्टियरिंगवर हात ठेवला आणि बोटांना भाजल्याचा चटका बसला!! बाहेरील हवेच्या थंडीने स्टियरिंग, फ्रिझर पेक्षा अधिक थंडगार झाले होते. त्यादिवशी मी ऑफिसमध्ये न जाता, प्रथम हातमोजे घेतले!! तेंव्हा सुदैवाने मला असे वेगवेगळे थंडीचे अतर्क्य अनुभव मिळत गेले आणि आयुष्य अधिक रंगतदार होत गेले आणि या पार्श्वभूमीवर आताची ही मुंबईची थंडी, मला अजूनही *काकडा* असे वाटतच नाही. अर्थात मी साऊथ आफ्रिका सोडून आता जवळपास ११ वर्षे होतील आणि आता माझे शरीर मुंबईच्या हवामानाला सरावले आहे. अर्थात या १६ वर्षांच्या आठवणी कायमच्या मनात स्थिरावल्या आहेत आणि अवचित कधीतरी बाहेर पडतात. मला आजही असेच वाटते, साऊथ आफ्रिकेत मला इतकी वर्षे काढता अली, नुसतीच काढली नाही तर नोकरींनिमित्ताने अनेक शहरात वास्तव्य करायची संधी मिळाली, हे माझ्या धडपड्या स्वभावाचे यश पण थोडा नशिबाचा भाग देखील आहे. सगळ्यांना अशा संधी प्राप्त होत नाहीत. इथे स्मिताने सध्या चादरीत गुरगटून घेतले आहे आणि ते स्वाभाविक आहे पण मी मात्र निव्वळ अंगावर चादर ओढून घेतो आणि शांतपणे या थंडीचा गोडवा उपभोगत असतो.

Saturday, 22 January 2022

संस्कार!!

आपण सगळेजण रोज काही ना काहीतरी वाचत असतो, मग ते रोज शिळे होणारे वर्तमानपत्र देखील असो. आपल्याला, निदान मध्यमवर्गीय मराठी समाजाला वाचनाची आवड ही अगदी शाळकरी वयापासून लागलेली असते. त्यावेळी अर्थातच आपल्या वाचनावर घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा प्रभाव असतो. पुढे आपण जसे वयाने वाढत जातो आणि अनुभवाने परिपक्व (आयुष्यात ज्याला *परिपक्व* म्हणता येईल अशी स्थिती प्राप्त होते का हा एक गहन प्रश्नच आहे.पण ते असो.) होत जातो आणि आपली आवड, आपल्या नकळत बदलत जाते. बदल घडत जाणे, हे प्रगतीचे विविक्षित लक्षण आहे. पूर्वी रोजचे वर्तमानपत्र, वाचनाचे साधन असायचे, पुढे कथा,कादंबऱ्या आणि अगदीच सूक्ष्म आवड झाली तर कविता वाचन सुरु होते. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असणे सुसंगत असते आणि तिथे टीका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्हाला घरात काय प्रकारचे वातावरण अनुभवायला मिळते, त्यावरून बव्हंशी आपली आवड ठरत जाते. असे सहज विधान करता येईल, आपल्या सगळ्याची आवड ही *प्रेमकथा* किंवा *साहसकथा* अशा विषयांवर निर्माण होते आणि त्यात फारसे वावगे नाही. आता आपण सगळेच मराठी आणि सगळ्यांच्या घरातील मराठमोळे वातावरण म्हटल्यावर मराठी भाषेतील साहित्य वाचणे क्रमप्राप्तच होते. रोजच्या वर्तमानपत्र वाचनावरून आपण सहजपणे ज्याला *साहित्य* म्हणता येईल, अशा लेखनाकडे वळतो. बरेचवेळा आपली आवड इथेच थबकतो कारण ही वाचनाची दिशा जेंव्हा नक्की होते तेंव्हा आपल्या रोजच्या आयुष्याचा मार्गक्रम बदललेला असतो आणि आपल्या गरजा वेगळ्या झालेल्या असतात. *वाचन ही गरज होणे, गरजेचे असते!* पण असे सहसा, आपल्या तरुण वयात तरी होत नाही. कथा, कादंबऱ्या देखील फुरसत मिळाली तर वाचायच्या, असा प्राधान्यक्रम होतो. अर्थात हे देखील चुकीचे म्हणता येणार नाही. मजेचा भाग असा असतो, आपण जे वाचतो, त्यातील काही भाग आपल्या नकळत आपण मनात झिरपत असतो. आपल्याला तेंव्हा काहीच कल्पना नसते परंतु भविष्यात अकल्पितपणे ते आपल्याला आठवते आणि आपण सगळेच चकित होतो. असे अचानक आठवणे, हे कसे घडले याची तर्कसंगती लागत नाही आणि इथे *दैव* किंवा *नशीब* हे अवतरते! मुळात आपण खोलात शिरून विचार करायचे टाळतो कारण कशाला विचार करायचा? कशाला डोक्याला शीण द्यायला लावायचा? रोजच्या आयुष्याच्या कटकटी काय कमी आहेत म्हणून या विचारांची भुणभुण मागे लावून घ्यायची? असे अनेक विचार मनात आणून,आपण दुसऱ्या विचारांकडे (तरीही ते विचारच असतात!!) वळतो. यात मजेचा भाग असा असतो, आपल्यावर जे *संस्कार* झालेले असतात, त्याबाबत सजगपणे आपण विचारच करत नाही, त्याची आपल्याला गरजच वाटत नाही.लहानपणी पाठ केलेली स्तोत्रे, पुढे कधीही म्हणत नाही परंतु वेळ आली की तीच स्तोत्रे आपल्या तोंडून येतात आणि आपण त्याला *चमत्कार* असे अत्यंत भोंगळ नाव देऊन, सुटका करून घेतो. खरे तर ही आपली, आपल्यापासून दूर जाण्याची एक पळवाट असते परंतु चंगळवादाच्या आत्यंतिक आहारी गेल्यामुळे असल्या विचारांना तिथे स्थान नसते. किंबहुना एक बावळटपणा, म्हणून आपण संभावना करतो. तसे करणे आपल्याला रोजच्या आयुष्यासाठी सोयीस्कर असते. इथेच मघाशी मी *झिरपणे* हा शब्द वापरला, त्याचा अनुभव येतो, जो *संस्कार* म्हणून मानला जातो. कविता ही अशीच आपल्या मनात झिरपत असते, त्यासाठी खास प्रयास करण्याची अजिबात गरज नसते. गरज असते ती, ती आवड मनापासून करण्याची. मला काही तरी वाचले पाहिजे, मी काहीतरी संगीत ऐकले पाहिजे, याची मनाला आच लागायला हवी. ऑफिसमधील एखादी अडचण समोर आली की आपण सहजपणे धुडकावून टाकतो का? नाही टाकत कारण तिथे आयुष्य कारणी लागलेले असते, आर्थिक प्रश्न असतात. त्याक्षणाची ती गरज असते परंतु त्याचबरोबर आपण हे देखील ध्यानात घेत नाही, ऑफिसमधील कटकटी आपण शक्यतो घरी आणत नाही कारण *गरज सरो, वैद्य मारो* ही उक्ती आचरणात आणतो. संस्काराचे असे होत नाही. संस्कार आपल्या मनाच्या तळाशी जाऊन बसतात. म्हणूनच घरातील कुणी निर्वतले की बाकीच्यांनी सांगायच्या आधी आपल्या डोळ्यात *दहिवर* साठते. ती प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया असते जी आपल्या मनाच्या तळाशी कुठेतरी लपलेली असते आणि अशा प्रसंगी उन्मळून बाहेर येते. आठवणींचे असेच असते. मनाच्या कप्प्यात कुठेतरी त्याचे अस्तित्व असते पण आपल्याला त्याची साधी जाणीव देखील नसते. *संस्काराने व्यक्ती जखडलेली असते, ती अशी*

बाळासाहेब ठाकरे - व्यामिश्र व्यक्तिमत्व!!

वास्तविक बाळासाहेबांना जाऊन २,३ दिवसच झाले आहेत, त्यामुळे अत्यंत "तठस्थ" वृत्तीने लेखाजोगा करणे तसे अवघड आहे. तरीही, ते गेल्यानंतर ज्या रीतीने पेपर्स, टीव्ही आणि फेसबुकवर बातम्या, मते वाचायला मिळत आहेत, त्यावरून मला दोनच निष्कर्ष काढता येतात. त्यांचे जे "कौतुक" चालू आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर जी "टीका" चालू आहे, यात कुठेतरी सुवर्णमध्य आवश्यक आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करतो, कुठलीही व्यक्ती हि कधीच एकरेषीय नसते, त्यातून बाळासाहेबांसारखी लोकमान्य व्यक्ती तर कधीच असू शकत नाही आणि हाच दृष्टीकोन मनाशी ठेऊन, मी पुढे विधाने करणार आहे. बाळासाहेबांसंबंधी लिहायचे म्हणजे सरळ,सरळ दोन भाग पडतात.१] राजकीय व्यक्तिमत्व , आणि २] व्यंगचित्रकार. आता, राजकीय व्यक्तिमत्व बघायचे झाल्यास, त्यात अनेक विरोधी गोष्टी दिसतात काही उदाहरणे बघूया. मुंबईत जेंव्हा मराठी लोकांना कुणी वाली नव्हता( आज तरी किती आहे, हे वादाचा भाग झाहे!! तरीदेखील) तेंव्हा, त्यांनी या परिस्थितीचा नेमका फायदा उठवला. त्यावेळी, मुंबईत कम्युनिस्ट लोकांचे उपद्व्याप सरकारला डोईजड झाले असताना, मराठी माणसांच्या या चळवळीने, मुंबईतून कम्युनिस्ट जवळपास हद्दपार झाले. यातूनच, कृष्णा देसाई खून प्रकरण घडले आणि तिथून शिवसेनेचा दरारा वाढायला लागला, असे म्हणता येईल. एक गोष्ट मान्यच करायला लागेल त्याकाळी, सरकारी नोकरीत मराठी-अमराठी हा भेदभाव प्रचंड होत होता. शिवसेनेने हे वर्चस्व मोडीत काढले. विशेषत: बँक, मंत्रालय, सरकारी खाती इथे मराठी लोकांची वर्णी लागायला लागली. अर्थात, त्याचवेळेस, एयर इंडिया मधील, नंदांच्या थोबाडीत मारून, जबरदस्तीने मराठी भरती सुरु केली!! आता हा प्रकार कुठल्या सुसंस्कृतीत बसतो? त्यावेळी, मराठी लोकांवर अन्याय होत होता हे नक्की आणि या चळवळीनिमित्ताने, मराठी लोकांना या नोकरीची दारे उघडी झाली. परंतु, केवळ "क्लार्क" किंवा फारतर "ऑफिसर" इतपतच नोकर भरती होत राहिली. पुढे याला अधिक व्यापक स्वरूप ,मिळाले नाही, हे निखालस सत्य आहे. त्यामुळे. मराठी मानसिकता, हि नेहमीच संकुचित राहिली. राजकीय पक्ष सांभाळायचा म्हणजे अनेक तडजोडी, व्यापक हित ह्या सगळ्या गोष्टी येतात, त्यासाठी लोकसंग्रह हि अत्यावश्यक गरज असते. या दृष्टीने विचार करायला गेल्यास, बाळासाहेबांचे वक्तृत्व हे नेहमीच वादग्रस्त राहिले. लोकांना आवाहन करणे निराळे, लोकांवर गारुड टाकणे निराळे आणि अश्लाघ्य भाषा वापरणे निराळे. त्याबाबतीत तारतम्य राखणे गरजेचे नाही का? मृणाल गोऱ्यांना "घृणाल गोरे" म्हणणे किंवा पुष्पा भाव्यांना "भावीण" म्हणणे कुठल्या संस्कृतीत बसते? तसेच नेहमीच अत्याग्रही भूमिका कितपत संय्युक्तिक ठरते? याच बाबीचा थोडा विस्तार केला तर, या संदर्भात कै. पु.ल. देशपांडे यांच्याबाबतीत वापरलेली भाषा, हि कुठली संस्कृती म्हणायची जेंव्हा तुम्ही, राजकारणात पडता, तेंव्हा, विरोधी मतांचा आदर, हि नेहमीची गरज असते. प्रत्येक प्रसंगाच्या विविध बाजू असतात आणि त्या चर्चेने घडवू शकतात. भारतात, प्रथमपासून लोकशाही अस्तित्वात आहे( १९४७ नंतर!!) आणि चर्चा, ही नेहमीच लोकशाहीची पायाभूत गरज असते. ज्या चर्चिलचा त्यांना अभिमान होता, त्या चर्चिलने, त्यांच्याकडे सर्वाधिकार असताना देखील, कधीच त्याचा दुरुपयोग केला नाही, किंवा स्वत:वरची टीका अडवली नाही!! त्याबाबतीत बाळासाहेबांचे पारडे हलके होते. आपली मते म्हणजे वज्रलेप आणि तिथे संवाद उद्भवत नाही, हि भूमिका लोकशाहीत कितपत योग्य ठरते? एकाबाजूने काँग्रेस मधील "घराणेशाहीवर" टीका करायची परंतु स्वत"च्या पक्षात तीच धोरणे राबवायची, हा दुटप्पीपणा नाही का? भ्रष्टाचाराच्या विळख्यातून कुठलाच पक्ष सुटलेला नाही, तेंव्हा त्याबाबतीत बाळासाहेबांवर तशी टीका करण्यात काहीच मतलब नाही. शिवसेनेने "खंडणी" संस्कृती राबवली, अशी टीका केली जाते पण, मग इतर कुठला पक्ष यातून नामानिराळा राहू शकेल? बाकीचे पक्ष "मवाळ" म्हणणे, हि शुद्ध फसवणूक आहे. इथे इतर राज्यांबद्दल काहीही दाखले द्यायची जरुरी नाही, कारण हि "खंडणी" संस्कृती बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांमधून पूर्वीपासून राजरोस चालूच होती. त्यावेळी, कुणी टीका केल्याचे फारसे आठवत नाही!! कदाचित, महाराष्ट्र पहिल्यापासून "बुद्धीवादी" राज्य आहे, म्हणून असे असावे!! आता, जरा दुसऱ्या बाजूने बघूया. एक काळ मुंबईत असा होता, भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, हे भाग म्हणजे "मिनी" पाकिस्तान म्हणून गणले जायचे. हे अतिरेकी लिहिणे नव्हे, मी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. उदाहरण देतो. १९८७ च्या शारजा इथल्या जगप्रसिध्द क्रिकेट सामन्यात, जेंव्हा जावेद मियांदादने, शेवटच्या चेंडूवर षटकार मारून, विजयश्री खेचून घेतली, तेंव्हाची या भागातील आतषबाजी, आजही माझ्या मनात ताजी आहे. माझ्या बाजूलाच, त्यावेळी बरीच मुस्लीम वस्ती होती, तिथले वातावरण प्रत्यक्ष अनुभवले आहे. तेंव्हा या "पाक" धर्जीण्या मनोवृत्तीला खरा पायबंद घातला असेल तो शिवसेनेने!! दुसरे "पाक" धर्जिणे उदाहरण!! काही महिन्यांपूर्वी, युरपमध्ये, एक "कार्टून" प्रसिद्ध झाले, त्यात मुस्लीम प्रेषित, मोहम्मद, याची "थोडी टिंगल" उडवली होती, लगेच त्याचे पडसाद भारतात उमटले!! काय संबंध? पण, त्यावेळी असा प्रश्न कितीजणांनी विचारला होता? किमानपक्षी विरोध नोंदवला होता? गुंडागर्दी केंव्हाही अक्षम्य, हे कबुल पण, जग कधीच एका वृत्तीने चालत नसते. जोपर्यंत आपण बलोपासना करीत नाही, तोपर्यंत समोरचा त्या भेकड वृत्तीचा फायदा हा उठवणारच, हे मानवी इतिहास आहे. १९६२ चे चीन युध्द याला साक्ष आहे. अर्थात, हे थोडे विषयांतर झाले. अर्थात, व्यंगचित्रकार म्हणून त्यांना स्थान होते, हे त्यांचे विरोधक देखील मान्य करतील. आपल्यासारख्या सामान्य माणसांना असे सांगितले जाते की "बाळासाहेबांना इतर कलांची बरीच जाणकारी होती" वगैरे, वगैरे... पण, हे त्यांचे खासगी रूप झाले.प्रत्येकाला याचा पडताळा कसा येणार? सामान्य माणसाच्या समोर प्रतिमा उभी राहते, ती सभेतल्या भाषणातून आणि तिथे तर हे व्यक्तिमत्व वादग्रस्त ठरते. जहाल भाषा वापरणे, महाराष्ट्राला नवीन नाही. अत्रे देखील कमरेखालची भाषा नेहमी वापरत. पण म्हणून, ती भाषा सुसंस्कृत ठरत नाही. त्यामुळे, बाळासाहेबांचे नेतृत्व सामान्य माणसाला जवळचे वाटले, हे सत्य आहे आणि त्याच ओढीतून, त्यांच्या अंत्ययात्रेला जो प्रचंड जमाव जमला, त्याचे इंगित ध्यानात येते. राजकारणात, सामान्य माणसाशी नाळ जोडावीच लागते. यशवंतराव चव्हाणांची होती, शरद पवारांची आहे पण त्यासाठी त्यांना खालच्या पायरीचा आश्रय घ्यावा लागला नाही. यशवंतराव चव्हाण तर बहुश्रुत होते, हे त्यांच्या विरोधकांनी देखील खुल्या मनाने मान्य केले आहे. इथे मला, या व्यक्तिमत्वाचा तर्कशुद्ध आढावा घ्यायचा नाही पण, मला जे भावले, त्याचा हा लेखाजोगा आहे.

Monday, 17 January 2022

कृतार्थता (?)

मला वाटतं, आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात काहींना काही तरी करत असतो, त्यासाठी धडपडत असतो. मग ते धडपडणे चरितार्थासाठी असेल किंवा काही आवडत्या छंदांसाठी देखील असू शकते. धडपड ही प्रासंगिक असू शकते किंवा अथक असू शकते. अथक धडपड ही त्या विषयावर अवलंबून असते, म्हणजेच जगण्यासाठीची धडपड ही अथक असते. त्याला कुठे अंत असावा? या प्रश्नाचे उत्तर वैय्यक्तिक असते. किंबहुना धडपडीला अंत असतो का? असा सार्वकालिक प्रश्न देखील या संदर्भात विचारात घेतला जाऊ शकतो. आपण, आपल्या गरजा, आपल्या भोवतालचे सामाजिक तसेच सांस्कृतिक वातावरण आणि त्या घुसळीतून आपल्यावर होणारे संस्कार, इत्यादी असंख्य मुद्दे या संदर्भात विचारात घ्यावे लागतील. *जगण्यासाठीचा चरितार्थ* ही संकल्पना फार फसवी आहे, पाण्याच्या वेगवान भोवऱ्यात सापडून गटांगळ्या खायला लावणारी असोशी आहे. याचे मुख्य कारण, आपले जगणे, हाच मुळात अथक शोध असतो आणि त्यामुळे चरितार्थ या कल्पनेला कुठलीही मर्यादा रहात नाही. अगदी झोपडपट्टीत अत्यंत हलाखीत जगणारा माणूस असो किंवा अब्जाधीश असलेली व्यक्ती असो, चरितार्थाची धडपड सुटलेली नाही, किंबहुना ते अटळ प्राक्तन असते. आपण आणखी एक उदाहरण बघू,कलाकार किंवा खेळाडू आपल्याला अतिशय सुखद असा अनुभव देतात तेंव्हा त्या अनुभव देण्याच्या क्षणी त्या व्यक्ती देखील कुठेतरी अंतर्मुख होत असणार कारण हा जो क्षण आपण दिला आहे, याच धडपडीसाठी सगळा अट्टाहास केला होता का?  वास्तविक हा कृतार्थतेचा क्षण असतो परंतु याच क्षणी त्या व्यक्तीला पुढील नवीन क्षितिजे खुणावत असतात. याच अंधुक पायवाटेतून त्यांना ठेचकाळत मार्गक्रमणा करीत पुढील क्षण शोधायची धडपड करायची असते. कला किंवा खेळाची अंगे याच प्रकारे विस्तारित होत जातात. मी वर जो शब्द वापरला, जगण्यासाठीचा चरितार्थ, हा शब्द सगळ्यांनाच लागू होतो. इथे चरितार्थ  म्हणजे फक्त आर्थिक व्यवहार, इतकाच मर्यादित अर्थ नाही. कलाकारांनी केलेला अथक रियाझ किंवा खेळाडूने रक्त आटवून घेतलेली मेहनत, असे सगळे काही चरितार्थ या शब्दात सामावलेले आहे कारण त्याशिवाय दुसरी गती संभवत नाही. आपण जेंव्हा जगायला सुरवात केली तेंव्हा काही एक लक्ष डोळ्यासमोर ठेवलेले असते. त्या लक्षपूर्तीसाठीची धडपड, हेच चरितार्थ या शब्दाचे दुसरे स्वरूप होय. बऱ्याच परिश्रमानंतर ते लक्ष  आवाक्यात आल्याचे आपल्याच ध्यानात येते परंतु त्याच क्षणी आपल्या नवीन शिखरे खुणावायला लागतात आणि आपण त्या क्षणी थोडे भ्रांतचित्त होतो. समोर मार्ग दिसत आहे, मार्गातील खाचखळगे एव्हाना ध्यानात आलेले असतात तरीही मनाला भुरळ पडलेली असते!! याचाच वेगळा अर्थ, आपल्याला जे *साफल्य* मिळाले असे वाटत होते, ते केवळ *मृगजळ* होते का?? मृगजळ म्हणणे कठीण आहे कारण ते साफल्य अस्तित्वात आलेले असते परंतु आपली मानसिक अवस्था थोडीशी दोलायमान  अवस्थेला आलेली असते. नवीन खुणावणारी शिखरे आपल्याला अस्वस्थ करीत असतात, पुढे मार्गक्रमणा करायला प्रवृत्त करीत असतात. हे जे खुणावणारे असते, त्यालाच मी मघाशी मृगजळ म्हणून संबोधले. अशावेळेस प्रश्न पडतो, आयुष्यात *कृतार्थता* कधीतरी लाभणारी असते का? आपल्या संस्कृतीत *वानप्रस्थाश्रम* ही जीवनाची अंतिम वाटचाल मानली गेली आहे. परंतु, असे धरून चालू आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारला (खरे तर आधुनिक जगात याला किती स्थान आहे?) पण त्या अवस्थेत देखील जगण्याची धडपड  चालूच असते. आपण इतकी वर्ष जपून ठेवलेले छंद आणखी वाढवायचा ध्यास लागलेला असतो. आपण ठरवतो, आता वयाची साठी उलटली (आपली पिढी आता याच वयात शिरली आहे म्हणा) तेंव्हा आता स्वान्तसुखाय वाचन करायचे, विचारमंथन मनात घडवायचे आणि संध्याकाळी मंद आवाजात संगीत ऐकायचे. या सुखाच्या आपल्या परमोच्च अवस्था म्हणून स्वीकारतो पण प्रत्यक्षात या छंदाला कुठेही अंत सातो, हे देखिल आपल्याला जाणवायला लागते आणि मग या धबडग्यात स्वान्तसुखाय अवस्था आणि परमोच्च समाधान, या शब्दांना कुठेच *जागा* मिळत नाही.मग आयुष्याला कृतार्थता लाभली म्हणजे नक्की काय लाभले? अशी कृतार्थता अनुभवता येते का?  

एक गमतीशीर विचार

जरी विचार गंमत म्हणून लिहीत असलो तरी काही प्रमाणात गंभीरपणे विचार नक्कीच केला आहे. एकूणच सगळीकडे एक प्रघात असतो - आजची पिढी आमच्यापेक्षा वेगळी आहे आणि वस्तुस्थिती तशीच आहे. परंतु १९९२ नंतर आपल्याकडे जे मन्वंतर झाले आणि समाजात झपाट्याने बदल होत गेले, त्याचा वेग केवळ स्तिमित करणारा होता. अशा प्रकारे बदल, आपल्या पूर्वीच्या पिढीने अनुभवाला नव्हता, अगदी दुसरे महायुद्ध जमेस धरून. दुसऱ्या महायुद्धाने सगळ्याच मूल्यव्यवस्थांना हादरा दिला तरी ती पिढी बरीचशी भावनाप्रधान, स्वप्नावस्थेतील होती, ज्याचे संस्कार आपल्या पिढीवर झाले. परंतु आधुनिकीकरणाच्या रेट्यात, तोच मध्यम वर्ग आमूलाग्र बदलला!! हाच मुद्दा पुढे आणायचा झाल्यास, हल्ली असे सर्रास बोलले जाते, आजच्या पिढीला *मराठी* भाषेबद्दल फारशी आस्था नाही, त्यांचे मराठी वाचन जवळपास थांबले आहे, इत्यादी. आता आपण, आपल्याबद्दल विचार करू. आपण जेंव्हा तरुण होतो तेंव्हाचे वातावरण आणि मराठी लेखन आणि संस्कृती, या सगळ्याशी आपले मानसिक नाते जोडलेले होते. घरोघरी आपले आई/वडील खास मराठी सण साजरे करीत होते आणि आपल्या पिढीने, जमेल तसे टिकवून ठेवले. घरात मराठी वाचन, हा *वाचन धर्म* होता. आता उदाहरण घेतो. पु.लं. चे *बटाट्याची चाळ* आपल्या अवतीभवती होती. त्यामुळे त्यातील व्यक्तिरेखा आणि वातावरण, आपल्याला कधीही परके वाटले नाही. अगदी वैय्यक्तिक बोलायचे झाल्यास, याच लेखकाची पुस्तके वाचून, मी माझ्यावर थोडेफार संस्कार करवून घेतले. अर्थात पुढे आपले वय वाढले आणि अपाय अभिरुचीत बदल होत गेला. बदल हळूहळू होत होता पण घडत होता हे नक्की. पुढे माझे वाचन खूपच बदलत गेले तरीही पु.लं. बद्दल मनात कृतज्ञता कायम राहिली, हे देखील खरे. आज जेंव्हा मी या लेखकाची पुस्तके पुन्हा वाचायला घेतो तेंव्हा मला तितके आपलेसे वाटत नाही कारण आता आजूबाजूला *हरितात्या* किंवा *बबडू* सारख्या व्यक्तिरेखा आढळतच नाहीत. पूर्वस्मृती रम्य होत्याच परंतु आजचे माझे मन, त्या विनोदांना तितकी दाद द्यायला तयार नव्हते! आता या पार्श्वभूमीवर, आजच्या पिढीकडे वळायचे झाल्यास, माझ्या मुलाला या व्यक्तिरेखेत काय गम्य सापडणार? एकतर मराठी वाचन कमी झाले (याला आपली पिढीच जबाबदार आहे) त्यातून आजूबाजूला टिपिकल मराठमोळी संस्कृती प्रसादापुरती शिल्लक राहिलेली नाही. मग आजच्या पिढीतील मुले, या वाचनातून कसा काय आनंद घेणार? बरे, अशा गोष्टी समजावून सांगण्यात काहीही अर्थ नसतो कारण त्यांना उदाहरण म्हणून आपण काय दाखवणार? इथे मी पु.ल. देशपांडे हे एक उदाहरण म्हणून घेतले पण इतर मराठी लेखकांबद्दल देखील हेच म्हणावेसे वाटते. आजही जागतिकीकरणाचा रेटा प्रचंड असूनही आपले मराठी साहित्य मात्र *जातीव्यवस्था* किंवा *सामाजिक भान* (म्हणजे काय? हा मोठा प्रश्नच आहे!!) यांच्या पलीकडे जात नाही आणि बहुतेक लिखाण हे समाजाला सुधारायचे, असल्या बालिश उद्देशाने लिहिलेले आढळते. त्या पलीकडे फार मोठे जग विस्तारलेले आहे आणि ते विस्तारलेले जग, आजच्या पिढीला इंग्रजी साहित्यातून समजून घ्यायला मदत करते!! ही बाब आपली पिढी फारशी लक्षात घेत नाही. फार मागे वि.का.राजवाड्यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे "जेंव्हा पाश्चात्य संस्कृतीत देकार्त आणि बेकन सारखे विचारवंत होते तेंव्हा भारतात फक्त संतांचाच प्रभाव होता!!" आपल्याकडे "पतंजली, चार्वाक,चाणक्य,चरक किंवा सुश्रुत ही दैदिप्यमान परंपरा होती पण कुणीही ती परंपरा पुढे खंडित का झाली?" हा प्रश्न विचारत नाही. इथे इंग्रज फार नंतर, काही शतकांच्या अवधीने अवतरले, हे लक्षात ठेवायला हवे. दुसरे असे आपल्याला युरोप मधील औद्योगिक क्रांतीचे आकलनच पुरतेपणी झाले नाही. आपण सारखे, "आमच्या संतांनी आयुष्याचा अर्थ सांगितला आहे" या भ्रमात वावरत होतो आणि आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. फार मागे जयंत नारळीकरांनी म्हटले होते -" त्याकाळी राजगायक तसेच राजज्योतिषी पदरी बाळगण्यात स्पर्धा असायची पण कुणीही राजगणिती किंवा राजवैज्ञानिक पदरी ठेवत नव्हते"!! याचा सगळा परिणाम आपल्या साहित्य निर्मितीवर होणारच होता. तेंव्हा अशा *कूपमंडूक* डबक्यातून आजच्या पिढीला बाहेर येण्यासाठी पाश्चात्य साहित्य जवळ करावेसे वाटले तर त्यात काय चूक आहे? मी वरती म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पिढीचा आपल्या पुढील पिढीबरोबर संघर्ष हा चालूच असतो परंतु वास्तवाचा प्रदीर्घ विचार केल्यास, आपली पुढची पिढी मराठी वाचत नाही आणि याला कारण फक्त आपण आहोत. हे मान्य करण्यावाचून तरणोपाय दिसत नाही.

Sunday, 16 January 2022

बुडत्याचा पाय खोलात!!

लेखाचे शीर्षक थोडे विचीत्र वाटेल पण सध्या तरी तेच योग्य वाटते. आपला मराठी समाज किंवा एकूणच भारतीय समाज बऱ्याचप्रमाणात अत्यंत भोंदू आणि भोंगळ आहे. अडकित्त्यात मान अडकलेली असावी तशी अवघडलेली अवस्था झाली आहे. आपण आपल्या मराठी लोकांबद्दल विचार करू. सध्याचा मराठी समाज हा बराचसा भ्रांतचित्त झाला आहे. एकीकडे पूर्वसूरींचा अतोनात सोस आणि टोकाचा अभिमान बाळगायचा पण रोजच्या व्यावहारिक जीवनात त्याचा फारसा उपयोग होत नाही, असे बघितल्यावर आधुनिक विचारसरणीचा आधार घ्यायचा!! आधुनिक विचारसरणी स्वीकारायची कारण आपण *प्रतिगामी* ठरू, याची भीती मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असते. तेंव्हा मग  *पुरोगामी* हाच मार्ग दिसतो. आता पुरोगामी लेबल चिकटवून घ्यायचे म्हटल्यावर लगेच आपली दृष्टी पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळते.  यात एक मखलाशी आपण अशी करतो, पाश्चिमात्य संस्कृतीमधील *आपल्याला झेपेल* इतकेच स्वीकारतो. हा भोंदूपणा झाला. मुळात निव्वळ अंधपणे ही संस्कृती स्वीकारणे, हाच पायावर धोंडा पाडून घेणे होय पण तसे आपण कधीही मान्य करणार नाही. याचे महत्वाचे कारण, आपल्याला असलेला भयानक *अहंकार!!* मी *स्वतंत्र बुद्धीवादी* आहे, अशी खुळचट आणि भ्रामक समजूत करून घेतली आहे. एका बाजूने पूर्वसूरींचे गोडवे गायचे पण प्रतिगामी ठरू म्हणून प्रतिगामित्वाचा बुरखा घालून घ्यायचा. अशी अडकित्त्यात अडकलेली स्थिती झाली आहे. यात एक मेख अशी आहे, असे धरून चालू आपले पूर्वज अत्यंत हुशार होते आणि त्यांची तत्वे,वागणे आजही उपयोगी आहेत. परंतु त्याचा अत्यंत *डोळस* अभ्यास करण्याची चिकाटी आणि तयारी नाही. वास्तविक बघता, कुठलाच विचार हा कधीही संपूर्णपणे योग्य असत नाही. तो केवळ एक मार्ग दाखवत असतो. एका बाजूने पूर्वजांचे गोडवे गायचे (तर्काशिवाय,हे महत्वाचे) कारण इथे कुणीही इतका व्यासंग केलेला नसतो. त्यातून दुसरा भाग असा, लोकांना काय, नवीन काहीतरी *आयते* मिळाले की खुश होतात आणि सारासार विचार बाजूला ठेऊन, नवीन *देवघराची* प्रतिष्ठापना करतात!! *नीरक्षीर विवेकेतू* ही वृत्ती फक्त कागदावर साजून दिसते, प्रत्यक्षात ते आपल्याला परवडत नाही. आता भाग येतो, तथाकथित *पुरोगामीत्व* स्वीकारण्याचा. मघाशी मी जो पाश्चात्य संस्कृतीचा उल्लेख केला आणि आपण आंधळ्या वृत्तीने आपल्याला झेपेल तितकेच स्वीकारतो आणि *आम्ही पुरोगामी* असा ढोल वाजवायला सुरु करतो!! *ढोल वाजवणे* आपल्या व्यवस्थित जमते. पाश्चात्य चंगळवादी सवयी आपण नेमक्या उचलल्या कारण त्या स्वीकारण्यासाठी फार काही करायची गरज नव्हती. पाश्चात्य संस्कृतीतील *बुद्धिप्रामाण्यवाद* आपण फक्त वेगवेगळ्या लेखांसाठी उचलला कारण प्रत्यक्षात आचरण करण्यासाठी लागणारी मेहनत करायची आपल्याला सवय नाही!! आता इथे उदाहरणे देण्यात येतील, विशेषतः अमेरिका किंवा युरोप मध्ये जे भारतीय फार वरच्या पातळीवर पोहोचले, त्यांची नावे फेकली जातील. परंतु अशा काही शेकडा व्यक्ती म्हणजे समाज नव्हे. या प्रयत्नात आपण आपली *ओळख* विसरत जात आहोत, हे फारसे ध्यानात येत नाही. व्यक्तिगत समाधान, ही तर पराकोटीची भावना बळावत चालली आणि समाज मागासलेला राहिला.