Saturday, 22 January 2022
बाळासाहेब ठाकरे - व्यामिश्र व्यक्तिमत्व!!
वास्तविक बाळासाहेबांना जाऊन २,३ दिवसच झाले आहेत, त्यामुळे अत्यंत "तठस्थ" वृत्तीने लेखाजोगा करणे तसे अवघड आहे. तरीही, ते गेल्यानंतर ज्या रीतीने पेपर्स, टीव्ही आणि फेसबुकवर बातम्या, मते वाचायला मिळत आहेत, त्यावरून मला दोनच निष्कर्ष काढता येतात. त्यांचे जे "कौतुक" चालू आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर जी "टीका" चालू आहे, यात कुठेतरी सुवर्णमध्य आवश्यक आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करतो, कुठलीही व्यक्ती हि कधीच एकरेषीय नसते, त्यातून बाळासाहेबांसारखी लोकमान्य व्यक्ती तर कधीच असू शकत नाही आणि हाच दृष्टीकोन मनाशी ठेऊन, मी पुढे विधाने करणार आहे.
बाळासाहेबांसंबंधी लिहायचे म्हणजे सरळ,सरळ दोन भाग पडतात.१] राजकीय व्यक्तिमत्व , आणि २] व्यंगचित्रकार. आता, राजकीय व्यक्तिमत्व बघायचे झाल्यास, त्यात अनेक विरोधी गोष्टी दिसतात काही उदाहरणे बघूया. मुंबईत जेंव्हा मराठी लोकांना कुणी वाली नव्हता( आज तरी किती आहे, हे वादाचा भाग झाहे!! तरीदेखील) तेंव्हा, त्यांनी या परिस्थितीचा नेमका फायदा उठवला. त्यावेळी, मुंबईत कम्युनिस्ट लोकांचे उपद्व्याप सरकारला डोईजड झाले असताना, मराठी माणसांच्या या चळवळीने, मुंबईतून कम्युनिस्ट जवळपास हद्दपार झाले. यातूनच, कृष्णा देसाई खून प्रकरण घडले आणि तिथून शिवसेनेचा दरारा वाढायला लागला, असे म्हणता येईल. एक गोष्ट मान्यच करायला लागेल त्याकाळी, सरकारी नोकरीत मराठी-अमराठी हा भेदभाव प्रचंड होत होता. शिवसेनेने हे वर्चस्व मोडीत काढले. विशेषत: बँक, मंत्रालय, सरकारी खाती इथे मराठी लोकांची वर्णी लागायला लागली. अर्थात, त्याचवेळेस, एयर इंडिया मधील, नंदांच्या थोबाडीत मारून, जबरदस्तीने मराठी भरती सुरु केली!! आता हा प्रकार कुठल्या सुसंस्कृतीत बसतो? त्यावेळी, मराठी लोकांवर अन्याय होत होता हे नक्की आणि या चळवळीनिमित्ताने, मराठी लोकांना या नोकरीची दारे उघडी झाली. परंतु, केवळ "क्लार्क" किंवा फारतर "ऑफिसर" इतपतच नोकर भरती होत राहिली. पुढे याला अधिक व्यापक स्वरूप ,मिळाले नाही, हे निखालस सत्य आहे. त्यामुळे. मराठी मानसिकता, हि नेहमीच संकुचित राहिली.
राजकीय पक्ष सांभाळायचा म्हणजे अनेक तडजोडी, व्यापक हित ह्या सगळ्या गोष्टी येतात, त्यासाठी लोकसंग्रह हि अत्यावश्यक गरज असते. या दृष्टीने विचार करायला गेल्यास, बाळासाहेबांचे वक्तृत्व हे नेहमीच वादग्रस्त राहिले. लोकांना आवाहन करणे निराळे, लोकांवर गारुड टाकणे निराळे आणि अश्लाघ्य भाषा वापरणे निराळे. त्याबाबतीत तारतम्य राखणे गरजेचे नाही का? मृणाल गोऱ्यांना "घृणाल गोरे" म्हणणे किंवा पुष्पा भाव्यांना "भावीण" म्हणणे कुठल्या संस्कृतीत बसते? तसेच नेहमीच अत्याग्रही भूमिका कितपत संय्युक्तिक ठरते? याच बाबीचा थोडा विस्तार केला तर, या संदर्भात कै. पु.ल. देशपांडे यांच्याबाबतीत वापरलेली भाषा, हि कुठली संस्कृती म्हणायची जेंव्हा तुम्ही, राजकारणात पडता, तेंव्हा, विरोधी मतांचा आदर, हि नेहमीची गरज असते. प्रत्येक प्रसंगाच्या विविध बाजू असतात आणि त्या चर्चेने घडवू शकतात. भारतात, प्रथमपासून लोकशाही अस्तित्वात आहे( १९४७ नंतर!!) आणि चर्चा, ही नेहमीच लोकशाहीची पायाभूत गरज असते. ज्या चर्चिलचा त्यांना अभिमान होता, त्या चर्चिलने, त्यांच्याकडे सर्वाधिकार असताना देखील, कधीच त्याचा दुरुपयोग केला नाही, किंवा स्वत:वरची टीका अडवली नाही!! त्याबाबतीत बाळासाहेबांचे पारडे हलके होते. आपली मते म्हणजे वज्रलेप आणि तिथे संवाद उद्भवत नाही, हि भूमिका लोकशाहीत कितपत योग्य ठरते? एकाबाजूने काँग्रेस मधील "घराणेशाहीवर" टीका करायची परंतु स्वत"च्या पक्षात तीच धोरणे राबवायची, हा दुटप्पीपणा नाही का? भ्रष्टाचाराच्या विळख्यातून कुठलाच पक्ष सुटलेला नाही, तेंव्हा त्याबाबतीत बाळासाहेबांवर तशी टीका करण्यात काहीच मतलब नाही. शिवसेनेने "खंडणी" संस्कृती राबवली, अशी टीका केली जाते पण, मग इतर कुठला पक्ष यातून नामानिराळा राहू शकेल? बाकीचे पक्ष "मवाळ" म्हणणे, हि शुद्ध फसवणूक आहे.
इथे इतर राज्यांबद्दल काहीही दाखले द्यायची जरुरी नाही, कारण हि "खंडणी" संस्कृती बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांमधून पूर्वीपासून राजरोस चालूच होती. त्यावेळी, कुणी टीका केल्याचे फारसे आठवत नाही!! कदाचित, महाराष्ट्र पहिल्यापासून "बुद्धीवादी" राज्य आहे, म्हणून असे असावे!!
आता, जरा दुसऱ्या बाजूने बघूया. एक काळ मुंबईत असा होता, भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, हे भाग म्हणजे "मिनी" पाकिस्तान म्हणून गणले जायचे. हे अतिरेकी लिहिणे नव्हे, मी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. उदाहरण देतो. १९८७ च्या शारजा इथल्या जगप्रसिध्द क्रिकेट सामन्यात, जेंव्हा जावेद मियांदादने, शेवटच्या चेंडूवर षटकार मारून, विजयश्री खेचून घेतली, तेंव्हाची या भागातील आतषबाजी, आजही माझ्या मनात ताजी आहे. माझ्या बाजूलाच, त्यावेळी बरीच मुस्लीम वस्ती होती, तिथले वातावरण प्रत्यक्ष अनुभवले आहे. तेंव्हा या "पाक" धर्जीण्या मनोवृत्तीला खरा पायबंद घातला असेल तो शिवसेनेने!! दुसरे "पाक" धर्जिणे उदाहरण!! काही महिन्यांपूर्वी, युरपमध्ये, एक "कार्टून" प्रसिद्ध झाले, त्यात मुस्लीम प्रेषित, मोहम्मद, याची "थोडी टिंगल" उडवली होती, लगेच त्याचे पडसाद भारतात उमटले!! काय संबंध? पण, त्यावेळी असा प्रश्न कितीजणांनी विचारला होता? किमानपक्षी विरोध नोंदवला होता? गुंडागर्दी केंव्हाही अक्षम्य, हे कबुल पण, जग कधीच एका वृत्तीने चालत नसते. जोपर्यंत आपण बलोपासना करीत नाही, तोपर्यंत समोरचा त्या भेकड वृत्तीचा फायदा हा उठवणारच, हे मानवी इतिहास आहे. १९६२ चे चीन युध्द याला साक्ष आहे. अर्थात, हे थोडे विषयांतर झाले.
अर्थात, व्यंगचित्रकार म्हणून त्यांना स्थान होते, हे त्यांचे विरोधक देखील मान्य करतील. आपल्यासारख्या सामान्य माणसांना असे सांगितले जाते की "बाळासाहेबांना इतर कलांची बरीच जाणकारी होती" वगैरे, वगैरे... पण, हे त्यांचे खासगी रूप झाले.प्रत्येकाला याचा पडताळा कसा येणार? सामान्य माणसाच्या समोर प्रतिमा उभी राहते, ती सभेतल्या भाषणातून आणि तिथे तर हे व्यक्तिमत्व वादग्रस्त ठरते. जहाल भाषा वापरणे, महाराष्ट्राला नवीन नाही. अत्रे देखील कमरेखालची भाषा नेहमी वापरत. पण म्हणून, ती भाषा सुसंस्कृत ठरत नाही. त्यामुळे, बाळासाहेबांचे नेतृत्व सामान्य माणसाला जवळचे वाटले, हे सत्य आहे आणि त्याच ओढीतून, त्यांच्या अंत्ययात्रेला जो प्रचंड जमाव जमला, त्याचे इंगित ध्यानात येते. राजकारणात, सामान्य माणसाशी नाळ जोडावीच लागते. यशवंतराव चव्हाणांची होती, शरद पवारांची आहे पण त्यासाठी त्यांना खालच्या पायरीचा आश्रय घ्यावा लागला नाही. यशवंतराव चव्हाण तर बहुश्रुत होते, हे त्यांच्या विरोधकांनी देखील खुल्या मनाने मान्य केले आहे. इथे मला, या व्यक्तिमत्वाचा तर्कशुद्ध आढावा घ्यायचा नाही पण, मला जे भावले, त्याचा हा लेखाजोगा आहे.
Monday, 17 January 2022
कृतार्थता (?)
मला वाटतं, आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात काहींना काही तरी करत असतो, त्यासाठी धडपडत असतो. मग ते धडपडणे चरितार्थासाठी असेल किंवा काही आवडत्या छंदांसाठी देखील असू शकते. धडपड ही प्रासंगिक असू शकते किंवा अथक असू शकते. अथक धडपड ही त्या विषयावर अवलंबून असते, म्हणजेच जगण्यासाठीची धडपड ही अथक असते. त्याला कुठे अंत असावा? या प्रश्नाचे उत्तर वैय्यक्तिक असते. किंबहुना धडपडीला अंत असतो का? असा सार्वकालिक प्रश्न देखील या संदर्भात विचारात घेतला जाऊ शकतो. आपण, आपल्या गरजा, आपल्या भोवतालचे सामाजिक तसेच सांस्कृतिक वातावरण आणि त्या घुसळीतून आपल्यावर होणारे संस्कार, इत्यादी असंख्य मुद्दे या संदर्भात विचारात घ्यावे लागतील. *जगण्यासाठीचा चरितार्थ* ही संकल्पना फार फसवी आहे, पाण्याच्या वेगवान भोवऱ्यात सापडून गटांगळ्या खायला लावणारी असोशी आहे. याचे मुख्य कारण, आपले जगणे, हाच मुळात अथक शोध असतो आणि त्यामुळे चरितार्थ या कल्पनेला कुठलीही मर्यादा रहात नाही. अगदी झोपडपट्टीत अत्यंत हलाखीत जगणारा माणूस असो किंवा अब्जाधीश असलेली व्यक्ती असो, चरितार्थाची धडपड सुटलेली नाही, किंबहुना ते अटळ प्राक्तन असते. आपण आणखी एक उदाहरण बघू,कलाकार किंवा खेळाडू आपल्याला अतिशय सुखद असा अनुभव देतात तेंव्हा त्या अनुभव देण्याच्या क्षणी त्या व्यक्ती देखील कुठेतरी अंतर्मुख होत असणार कारण हा जो क्षण आपण दिला आहे, याच धडपडीसाठी सगळा अट्टाहास केला होता का? वास्तविक हा कृतार्थतेचा क्षण असतो परंतु याच क्षणी त्या व्यक्तीला पुढील नवीन क्षितिजे खुणावत असतात. याच अंधुक पायवाटेतून त्यांना ठेचकाळत मार्गक्रमणा करीत पुढील क्षण शोधायची धडपड करायची असते. कला किंवा खेळाची अंगे याच प्रकारे विस्तारित होत जातात. मी वर जो शब्द वापरला, जगण्यासाठीचा चरितार्थ, हा शब्द सगळ्यांनाच लागू होतो. इथे चरितार्थ म्हणजे फक्त आर्थिक व्यवहार, इतकाच मर्यादित अर्थ नाही. कलाकारांनी केलेला अथक रियाझ किंवा खेळाडूने रक्त आटवून घेतलेली मेहनत, असे सगळे काही चरितार्थ या शब्दात सामावलेले आहे कारण त्याशिवाय दुसरी गती संभवत नाही. आपण जेंव्हा जगायला सुरवात केली तेंव्हा काही एक लक्ष डोळ्यासमोर ठेवलेले असते. त्या लक्षपूर्तीसाठीची धडपड, हेच चरितार्थ या शब्दाचे दुसरे स्वरूप होय. बऱ्याच परिश्रमानंतर ते लक्ष आवाक्यात आल्याचे आपल्याच ध्यानात येते परंतु त्याच क्षणी आपल्या नवीन शिखरे खुणावायला लागतात आणि आपण त्या क्षणी थोडे भ्रांतचित्त होतो. समोर मार्ग दिसत आहे, मार्गातील खाचखळगे एव्हाना ध्यानात आलेले असतात तरीही मनाला भुरळ पडलेली असते!! याचाच वेगळा अर्थ, आपल्याला जे *साफल्य* मिळाले असे वाटत होते, ते केवळ *मृगजळ* होते का?? मृगजळ म्हणणे कठीण आहे कारण ते साफल्य अस्तित्वात आलेले असते परंतु आपली मानसिक अवस्था थोडीशी दोलायमान अवस्थेला आलेली असते. नवीन खुणावणारी शिखरे आपल्याला अस्वस्थ करीत असतात, पुढे मार्गक्रमणा करायला प्रवृत्त करीत असतात. हे जे खुणावणारे असते, त्यालाच मी मघाशी मृगजळ म्हणून संबोधले. अशावेळेस प्रश्न पडतो, आयुष्यात *कृतार्थता* कधीतरी लाभणारी असते का? आपल्या संस्कृतीत *वानप्रस्थाश्रम* ही जीवनाची अंतिम वाटचाल मानली गेली आहे. परंतु, असे धरून चालू आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारला (खरे तर आधुनिक जगात याला किती स्थान आहे?) पण त्या अवस्थेत देखील जगण्याची धडपड चालूच असते. आपण इतकी वर्ष जपून ठेवलेले छंद आणखी वाढवायचा ध्यास लागलेला असतो. आपण ठरवतो, आता वयाची साठी उलटली (आपली पिढी आता याच वयात शिरली आहे म्हणा) तेंव्हा आता स्वान्तसुखाय वाचन करायचे, विचारमंथन मनात घडवायचे आणि संध्याकाळी मंद आवाजात संगीत ऐकायचे. या सुखाच्या आपल्या परमोच्च अवस्था म्हणून स्वीकारतो पण प्रत्यक्षात या छंदाला कुठेही अंत सातो, हे देखिल आपल्याला जाणवायला लागते आणि मग या धबडग्यात स्वान्तसुखाय अवस्था आणि परमोच्च समाधान, या शब्दांना कुठेच *जागा* मिळत नाही.मग आयुष्याला कृतार्थता लाभली म्हणजे नक्की काय लाभले? अशी कृतार्थता अनुभवता येते का?
एक गमतीशीर विचार
जरी विचार गंमत म्हणून लिहीत असलो तरी काही प्रमाणात गंभीरपणे विचार नक्कीच केला आहे. एकूणच सगळीकडे एक प्रघात असतो - आजची पिढी आमच्यापेक्षा वेगळी आहे आणि वस्तुस्थिती तशीच आहे. परंतु १९९२ नंतर आपल्याकडे जे मन्वंतर झाले आणि समाजात झपाट्याने बदल होत गेले, त्याचा वेग केवळ स्तिमित करणारा होता. अशा प्रकारे बदल, आपल्या पूर्वीच्या पिढीने अनुभवाला नव्हता, अगदी दुसरे महायुद्ध जमेस धरून. दुसऱ्या महायुद्धाने सगळ्याच मूल्यव्यवस्थांना हादरा दिला तरी ती पिढी बरीचशी भावनाप्रधान, स्वप्नावस्थेतील होती, ज्याचे संस्कार आपल्या पिढीवर झाले. परंतु आधुनिकीकरणाच्या रेट्यात, तोच मध्यम वर्ग आमूलाग्र बदलला!!
हाच मुद्दा पुढे आणायचा झाल्यास, हल्ली असे सर्रास बोलले जाते, आजच्या पिढीला *मराठी* भाषेबद्दल फारशी आस्था नाही, त्यांचे मराठी वाचन जवळपास थांबले आहे, इत्यादी. आता आपण, आपल्याबद्दल विचार करू. आपण जेंव्हा तरुण होतो तेंव्हाचे वातावरण आणि मराठी लेखन आणि संस्कृती, या सगळ्याशी आपले मानसिक नाते जोडलेले होते. घरोघरी आपले आई/वडील खास मराठी सण साजरे करीत होते आणि आपल्या पिढीने, जमेल तसे टिकवून ठेवले. घरात मराठी वाचन, हा *वाचन धर्म* होता. आता उदाहरण घेतो. पु.लं. चे *बटाट्याची चाळ* आपल्या अवतीभवती होती. त्यामुळे त्यातील व्यक्तिरेखा आणि वातावरण, आपल्याला कधीही परके वाटले नाही. अगदी वैय्यक्तिक बोलायचे झाल्यास, याच लेखकाची पुस्तके वाचून, मी माझ्यावर थोडेफार संस्कार करवून घेतले. अर्थात पुढे आपले वय वाढले आणि अपाय अभिरुचीत बदल होत गेला. बदल हळूहळू होत होता पण घडत होता हे नक्की.
पुढे माझे वाचन खूपच बदलत गेले तरीही पु.लं. बद्दल मनात कृतज्ञता कायम राहिली, हे देखील खरे. आज जेंव्हा मी या लेखकाची पुस्तके पुन्हा वाचायला घेतो तेंव्हा मला तितके आपलेसे वाटत नाही कारण आता आजूबाजूला *हरितात्या* किंवा *बबडू* सारख्या व्यक्तिरेखा आढळतच नाहीत. पूर्वस्मृती रम्य होत्याच परंतु आजचे माझे मन, त्या विनोदांना तितकी दाद द्यायला तयार नव्हते! आता या पार्श्वभूमीवर, आजच्या पिढीकडे वळायचे झाल्यास, माझ्या मुलाला या व्यक्तिरेखेत काय गम्य सापडणार? एकतर मराठी वाचन कमी झाले (याला आपली पिढीच जबाबदार आहे) त्यातून आजूबाजूला टिपिकल मराठमोळी संस्कृती प्रसादापुरती शिल्लक राहिलेली नाही. मग आजच्या पिढीतील मुले, या वाचनातून कसा काय आनंद घेणार? बरे, अशा गोष्टी समजावून सांगण्यात काहीही अर्थ नसतो कारण त्यांना उदाहरण म्हणून आपण काय दाखवणार? इथे मी पु.ल. देशपांडे हे एक उदाहरण म्हणून घेतले पण इतर मराठी लेखकांबद्दल देखील हेच म्हणावेसे वाटते.
आजही जागतिकीकरणाचा रेटा प्रचंड असूनही आपले मराठी साहित्य मात्र *जातीव्यवस्था* किंवा *सामाजिक भान* (म्हणजे काय? हा मोठा प्रश्नच आहे!!) यांच्या पलीकडे जात नाही आणि बहुतेक लिखाण हे समाजाला सुधारायचे, असल्या बालिश उद्देशाने लिहिलेले आढळते. त्या पलीकडे फार मोठे जग विस्तारलेले आहे आणि ते विस्तारलेले जग, आजच्या पिढीला इंग्रजी साहित्यातून समजून घ्यायला मदत करते!! ही बाब आपली पिढी फारशी लक्षात घेत नाही. फार मागे वि.का.राजवाड्यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे "जेंव्हा पाश्चात्य संस्कृतीत देकार्त आणि बेकन सारखे विचारवंत होते तेंव्हा भारतात फक्त संतांचाच प्रभाव होता!!"
आपल्याकडे "पतंजली, चार्वाक,चाणक्य,चरक किंवा सुश्रुत ही दैदिप्यमान परंपरा होती पण कुणीही ती परंपरा पुढे खंडित का झाली?" हा प्रश्न विचारत नाही. इथे इंग्रज फार नंतर, काही शतकांच्या अवधीने अवतरले, हे लक्षात ठेवायला हवे. दुसरे असे आपल्याला युरोप मधील औद्योगिक क्रांतीचे आकलनच पुरतेपणी झाले नाही. आपण सारखे, "आमच्या संतांनी आयुष्याचा अर्थ सांगितला आहे" या भ्रमात वावरत होतो आणि आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. फार मागे जयंत नारळीकरांनी म्हटले होते -" त्याकाळी राजगायक तसेच राजज्योतिषी पदरी बाळगण्यात स्पर्धा असायची पण कुणीही राजगणिती किंवा राजवैज्ञानिक पदरी ठेवत नव्हते"!!
याचा सगळा परिणाम आपल्या साहित्य निर्मितीवर होणारच होता. तेंव्हा अशा *कूपमंडूक* डबक्यातून आजच्या पिढीला बाहेर येण्यासाठी पाश्चात्य साहित्य जवळ करावेसे वाटले तर त्यात काय चूक आहे?
मी वरती म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पिढीचा आपल्या पुढील पिढीबरोबर संघर्ष हा चालूच असतो परंतु वास्तवाचा प्रदीर्घ विचार केल्यास, आपली पुढची पिढी मराठी वाचत नाही आणि याला कारण फक्त आपण आहोत. हे मान्य करण्यावाचून तरणोपाय दिसत नाही.
Sunday, 16 January 2022
बुडत्याचा पाय खोलात!!
लेखाचे शीर्षक थोडे विचीत्र वाटेल पण सध्या तरी तेच योग्य वाटते. आपला मराठी समाज किंवा एकूणच भारतीय समाज बऱ्याचप्रमाणात अत्यंत भोंदू आणि भोंगळ आहे. अडकित्त्यात मान अडकलेली असावी तशी अवघडलेली अवस्था झाली आहे. आपण आपल्या मराठी लोकांबद्दल विचार करू. सध्याचा मराठी समाज हा बराचसा भ्रांतचित्त झाला आहे. एकीकडे पूर्वसूरींचा अतोनात सोस आणि टोकाचा अभिमान बाळगायचा पण रोजच्या व्यावहारिक जीवनात त्याचा फारसा उपयोग होत नाही, असे बघितल्यावर आधुनिक विचारसरणीचा आधार घ्यायचा!! आधुनिक विचारसरणी स्वीकारायची कारण आपण *प्रतिगामी* ठरू, याची भीती मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असते. तेंव्हा मग *पुरोगामी* हाच मार्ग दिसतो. आता पुरोगामी लेबल चिकटवून घ्यायचे म्हटल्यावर लगेच आपली दृष्टी पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळते. यात एक मखलाशी आपण अशी करतो, पाश्चिमात्य संस्कृतीमधील *आपल्याला झेपेल* इतकेच स्वीकारतो. हा भोंदूपणा झाला. मुळात निव्वळ अंधपणे ही संस्कृती स्वीकारणे, हाच पायावर धोंडा पाडून घेणे होय पण तसे आपण कधीही मान्य करणार नाही. याचे महत्वाचे कारण, आपल्याला असलेला भयानक *अहंकार!!* मी *स्वतंत्र बुद्धीवादी* आहे, अशी खुळचट आणि भ्रामक समजूत करून घेतली आहे. एका बाजूने पूर्वसूरींचे गोडवे गायचे पण प्रतिगामी ठरू म्हणून प्रतिगामित्वाचा बुरखा घालून घ्यायचा. अशी अडकित्त्यात अडकलेली स्थिती झाली आहे. यात एक मेख अशी आहे, असे धरून चालू आपले पूर्वज अत्यंत हुशार होते आणि त्यांची तत्वे,वागणे आजही उपयोगी आहेत. परंतु त्याचा अत्यंत *डोळस* अभ्यास करण्याची चिकाटी आणि तयारी नाही. वास्तविक बघता, कुठलाच विचार हा कधीही संपूर्णपणे योग्य असत नाही. तो केवळ एक मार्ग दाखवत असतो. एका बाजूने पूर्वजांचे गोडवे गायचे (तर्काशिवाय,हे महत्वाचे) कारण इथे कुणीही इतका व्यासंग केलेला नसतो. त्यातून दुसरा भाग असा, लोकांना काय, नवीन काहीतरी *आयते* मिळाले की खुश होतात आणि सारासार विचार बाजूला ठेऊन, नवीन *देवघराची* प्रतिष्ठापना करतात!! *नीरक्षीर विवेकेतू* ही वृत्ती फक्त कागदावर साजून दिसते, प्रत्यक्षात ते आपल्याला परवडत नाही. आता भाग येतो, तथाकथित *पुरोगामीत्व* स्वीकारण्याचा. मघाशी मी जो पाश्चात्य संस्कृतीचा उल्लेख केला आणि आपण आंधळ्या वृत्तीने आपल्याला झेपेल तितकेच स्वीकारतो आणि *आम्ही पुरोगामी* असा ढोल वाजवायला सुरु करतो!! *ढोल वाजवणे* आपल्या व्यवस्थित जमते. पाश्चात्य चंगळवादी सवयी आपण नेमक्या उचलल्या कारण त्या स्वीकारण्यासाठी फार काही करायची गरज नव्हती. पाश्चात्य संस्कृतीतील *बुद्धिप्रामाण्यवाद* आपण फक्त वेगवेगळ्या लेखांसाठी उचलला कारण प्रत्यक्षात आचरण करण्यासाठी लागणारी मेहनत करायची आपल्याला सवय नाही!! आता इथे उदाहरणे देण्यात येतील, विशेषतः अमेरिका किंवा युरोप मध्ये जे भारतीय फार वरच्या पातळीवर पोहोचले, त्यांची नावे फेकली जातील. परंतु अशा काही शेकडा व्यक्ती म्हणजे समाज नव्हे. या प्रयत्नात आपण आपली *ओळख* विसरत जात आहोत, हे फारसे ध्यानात येत नाही. व्यक्तिगत समाधान, ही तर पराकोटीची भावना बळावत चालली आणि समाज मागासलेला राहिला.
Thursday, 28 October 2021
संगीत - एक शास्त्र
वास्तविक हा विषय म्हटले तर अति किचकट आहे पण तरीही निदान मला तरी किती आकळलेला आहे, हे तपासण्यासाठी आणि थोडेफार *सुबोध* मराठी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. एक नक्की, आधी वातावरणात ध्वनी होते आणि त्यांचे स्वरूप नक्की करून आपल्या प्रतिभावंत ऋषींनी त्याचे शास्त्र बनवले. अगदी मागोवा घ्यायचाच झाल्यास, सामवेदात संगीताची काही मुलतत्वे सापडतात परंतु आजचे जे आपले *सप्तक* आहे (सा रे ग म प ध नि) त्याची शास्त्रशुद्ध प्रतिस्थापना नारद मुनींनी केली (रामायणातील नारद मुनी वेगळे. त्यांचा इथे काहीही संबंध नाही). नारद मुनींनी *नाट्यशास्त्र* नावाचा श्लोकात्मक ग्रंथ लिहिला आणि त्यात संगीतावर १ प्रकरण लिहिले आणि त्यात आजच्या सप्तकाची मांडणी केली (त्यावेळेस म हा स्वर पहिला मानून सप्तक तयार केले. पुढे यथावकाश सा स्वर पहिला अशी मांडणी झाली) आता हा ग्रंथ इ.स.पूर्व २०० ते इ.स.८००, इतका प्राचीन काल मानला गेला आहे. अगदी इ.स.पूर्व २०० जरी धरले तरी आज त्या ग्रंथाला २,२०० वर्षे झाली!! लक्षात घ्या, त्याकाळी आजच्यासारखी आधुनिक उपकरणे नव्हती. केवळ कर्णगोचर अवस्थेत त्यांनी ध्वनीचे स्वरूप आकळून घेतले, जे आजच्या आधुनिक उपकरणांनी मान्य केले आहे. आता गमतीचा भाग असा आहे, यावेळेस पाश्चात्य संगीत कुठे होते?
थोडा खोलवर जाऊन अभ्यास केला तर असे आढळते, त्यावेळी पाश्च्यात्यांकडे *ग्रीक संगीत* अस्तित्वात होते (पुढे त्यांनी याचा संपूर्ण त्याग केला केला) आणि त्या संगीतात देखील *सप्तक* होते (C D E F G A B) परंतु त्यांचा प्रॉब्लेम असा झाला, आपल्या सप्तकात काही *अंतर्गत सूर* मांडले गेले, ज्यांना *श्रुती* म्हणतात. (खरंतर स्वर म्हणजे श्रुती म्हणता येईल पण तो भाग फार जटील आहे) आपले स्वर हे नैसर्गिक ध्वनींवर आधारीत आहेत (म्हणूनच आपली वाद्ये नैसर्गिक तत्वावर तयार झाली आहेत) आणि पाश्च्यात्यांकडील वाद्ये संपूर्णपणे वेगळ्या धर्तीवर बांधलेली असतात. त्यामुळेच पाश्च्यात्यांना *टेम्पर्ड स्केल* स्वीकारावे लागले कारण नैसर्गिक स्वरतत्व त्यांच्या वाद्यांना खपणारे नव्हते. अर्थात हा भाग देखील समजायला अति अवघड आहे.
आपल्याकडे नेहमी फार ढोबळ विधाने केली जातात जसे भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीत एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत कारण दोन्ही संगीतात *सप्तक* वापरले जाते!! असे बोलताना, एक बाब नेहमी बाजूला सारली जाते आणि ती म्हणजे स्वरांतर्गत असलेल्या श्रुती व्यवस्था. आपले स्वर नैसर्गिक असल्याने, आपल्या संगीतात *मेलडी* असणे सहजसाध्य असते तर पाश्च्यात्यांना त्यांची वेगळी व्यवस्था म्हणून *हार्मनी* व्यवस्था स्वीकारणे भाग पडले. अर्थात पाश्चात्य संगीतात, अधून मधून मेलडी ऐकायला मिळते.
जेंव्हा दोन्ही संगीतातील *साम्य* दर्शवायचे असते तेंव्हा हे मुद्दे महत्वाचे असतात पण तिकडे कुणीही फारसे लक्ष देत नाही आणि ढोबळ विधाने करून, वेळ मारून नेली जाते. ऐकणारे बरेचसे *Layman* असतात आणि त्यामुळे अधिक खोलात जाऊन फारसा विचार केला जात नाही. मुळात, *संगीतशास्त्र* म्हटल्यावर बरेचसे दचकतात आणि लांब रहातात. दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे. त्यातून शास्त्राबद्दल *गम्य* असणारे इतकी अवघड भाषा वापरतात की ज्या कुणाला रस निर्माण होण्याची शक्यता असेल, ती व्यक्ती दूर जाते आणि *शास्त्र* विषयाबाबत दुराग्रह करून बसतात. आता शास्त्र म्हटल्यावर काही संकल्पना, काही तांत्रिक शब्द हे येणारच. त्याला इलाज नाही पण त्याची थोडी सवय करून घेतली तर त्यात, आपल्याला जितके अवघड वाटते, तितके ते अवघड नाही, याचा प्रत्यय येऊ शकतो.
आपल्याकडे एक विचार प्रचंड प्रसिद्ध आहे. *गाणे कानाला गोड वाटले ना, मग ठीक आहे*!! गाणे कानाला गोड वाटायलाच हवे, ती तर प्राथमिक कसोटी आहे पण तिथेच थांबणे योग्य नव्हे. सादर होणारी प्रत्येक कलाकृती *शास्त्राधारित तपासणे* शक्य नसते. तिथेच मग त्या कलाकृतीचे *निकष* उपयोगी पडतात. प्रत्येक सांगीतिक कलाकृतीचे काही ठराविक निकष अस्तित्वात आहेत पण ते आहेत, याचीच जाणीव ठेवली जात नाही आणि आस्वाद घेतला जातो. त्यामुळे, *मला गाणे आवडले* हे वाक्य नको तितके प्रसिद्ध होते. एकदा शास्त्र म्हटल्यावर *व्यक्ती* पुसली जाते आणि निखळ कलाकृती समोर येते. *व्यक्ति पुसली जाणे* हेच मान्य करायला अवघडजाते, इतके सगळे स्वकेंद्रित असतात आणि आस्वादाच्या कक्षा विस्तारायच्या ऐवजी संकुचित करून टाकतात.
Thursday, 21 October 2021
शाम शेठ!!
वास्तविक शाम शेठ हा काही हेमराज वाडीत रहाणारा नव्हता. मोहन बिल्डिंग मध्ये रहात होता. बरे त्याचे वय आमचे वय, यात महदंतर होते. वास्तविक पाहता माझी, त्याच्याशी ओळख त्यामानाने उशिरा झाली. माझ्या अंदाजाने प्रदीपची ओळख आधीची आणि नंतर मग, मी,सुरेश, उदय इत्यादींची ओळख झाली पण ओळख झाली ती मात्र अतिशय घट्ट. त्याकाळात रोजच्या रोज आमच्या त्याच्याशी भेटीगाठी व्हायच्या.
अंगाने गलेलठ्ठ, वर्णाने काळा, डोळ्यांवर जाड काचांचा चष्मा उंची साधारणपणे साडे पाच फुटाच्या आसपास!! आम्ही तरी त्याला, त्याच्या हॉटेलच्या गल्ल्यावरच बसलेला बघितला, इतका की तो कुठल्या रंगाची पॅन्ट घालायचा, हे देखिल बघितले नाही. आवाज बराचसा खर्जातला होता पण आमच्याशी बोलताना मात्र अत्यंत खट्याळ असायचा. वास्तविक ती केरळीय हिंदू - मातृभाषा अर्थात मल्याळम परंतु सगळे आयुष्य मुंबईत गेल्याने (त्यातून मोहन बिल्डिंग सारख्या मध्यम वर्गीय लोकांच्यात गेल्याने) मराठी भाषा चांगलीच अवगत होती, विशेषतः "जहाल" मराठी शब्द इतके अस्खलित बोलायचं की आमची हसून पुरेवाट व्हायची. वास्तविक त्याचे उडपी हॉटेल होते पण त्या हॉटेलमध्ये आमचा ग्रुप तासंतास गप्पा मारीत बसायचा - क्वचित काही खायला मागवले तर, अन्यथा आम्ही निव्वळ चकाट्या पिटीत बसत असू. तेंव्हा आम्ही सगळे विशीच्या आसपास होतो त्यामुळे अंगावर फारशा जबाबदाऱ्या नव्हत्या. संध्याकाळी, तेंव्हा आम्ही सगळे खाडिलकर रोडवरील एका मठात जात असू. तेंव्हा मी थोडासा आस्तिक होतो, असे म्हणता येईल. आता त्या मठात कुणी जाते का? काही कल्पना नाही. एका महाराजांचा मठ आहे (आता तर मला त्या महाराजांचे नाव देखील आठवत नाही, इतका मी परका झालो)
मठात जाऊन दर्शन घ्यायचे आणि शामशेठच्या हॉटेलात ठिय्या मांडायचा. अर्थातच, सुरवातीचे बोलणे, साधारणपणे दिवसभराचा ताळा मांडणे असाच असायचा. पुढे गप्पांची गाडी वर्गातील मुलींवर यायची किंवा नुकत्याच बघितलेल्या चित्रपटातील अभिनेत्रीवर यायची. गिरगावकर म्हटल्यावर भाषा रासवट असणे क्रमप्राप्तच होते. त्यातून कुणातरी जरा एखाद्या मुलीबद्दल सलगीने बोलायला लागला कि लगेच त्याची मनसोक्त टर नेहमीच व्हायचे. अर्थात सलगी दाखवायची म्हणजे त्या मुलीच्या शारीर सौंदर्याबद्दल शाब्दिक उधळण व्हायची!! अभिनेत्री असेल तर भाषा अधिक चेकाळली जात असे. शामशेठ शांतपणे ऐकत बसलेला असे. कधी कधी आमच्यात भांडणे व्हायची,अगदी आय, माय काढली जायची!! परंतु सगळी पेल्यातील वादळे असायची. शामशेठ हसत असे आणि त्याची मजा घेत असे. अर्थात काहीतरी टवाळी अति वाह्यात व्हायला लागली (तशी वाह्यात भाषा रोजच्यारोज आमच्या तोंडून बाहेर पडायची. गिरगावकर म्हटल्यावर अशी भाषा अध्याहृतच असते म्हणा) की मग शामशेठ त्याच भाषेत आमच्याशी संवाद साधायचा परंतु जरा हलक्या आवाजात कारण काही झाले तरी तो, त्याच्या धंद्याच्या गल्ल्यावर बसलेला असायचा आणि त्या हॉटेल मध्ये इतर बरेचजण खायला येत असत. त्याला तशा शिवराळ भाषेत बोलायला कसलाच किंतु वाटत नसे आणि याचे आम्हा सगळ्यांना कौतुक होते.
वास्तविक शामशेठ तेंव्हाच पन्नाशीच्या आसपास होता पण आमच्यातील एक मित्र, असाच वागायचा. त्याने, त्याच्या हॉटेलमध्ये स्पष्ट सांगितले होते, ही मुले हॉटेल मध्ये की एखादे रिकामे टेबल त्यांना द्यायचे आणि तिथे कुणीही "ऑर्डर" घ्यायला जायचे नाही. शामशेठ खरंतर प्रदीपच्या अधिक जवळ असायचा.
अक्षरश: कित्येक दिवस, कितीतरी तास आमच्या गृपने त्या हॉटेलात आणि तद्नुषंगाने, शामशेठ बरोबर घालवले. आमची ती मानसिक गरज झाली होती. पुढे मी हळूहळू नास्तिक झालो आणि मठात जाणे बंद झाले तरी देखील मी दर संध्याकाळी इथेच आमच्या गृपला भेटायला येत असे. मला आज नवल वाटते कारण व्यावहारिक दृष्टीने बघितल्यास, आम्ही काही त्याच्या हॉटेलचे रोजचे गिऱ्हाईक नव्हतो तेंव्हा आमच्याकडून त्याला कपर्दिक फायदा होण्याची शक्यता नव्हती तरीही त्याला आमच्या गृपचा लळा लागला होता.
कधीकधी कुणीतरी काही दिवस त्या "अड्ड्यावर" यायचा नाही पण जेंव्हा तो परतायचा, तेंव्हा शामशेठ न चुकता त्याची चौकशी करायचा!! असा हा आमचा अत्यंत लोभस मित्र होता. आम्ही तिथे त्या हॉटेलात फार तर चहा मागवायचो कारण आम्हाला सिगारेट फुंकायची असायची. माझ्या आठवणीत, ३,४ वेळाच आम्ही तिथे "वडा सांबार" मागवल्याचे अंधुकसे आठवत आहे. अर्थात प्रत्येकाची आपले पंख पसरून आकाशात झेप घ्यायची वेळ येणारच असते आणि तशी वेळ आली. माझे संबंध हळूहळू दुरावले. एकदा अचानक प्रदीपचा फोन आला - शामशेठ अत्यवस्थ आहे. मी आणि सुरेश त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला जात आहे. करणे देण्यात आता काहीच अर्थ नाही पण मी जाऊ शकलो नाही आणि काही दिवसातच शामशेठ गेल्याची बातमी, प्रदीपनेच मला दिली. तारुण्याचा एक तुकडा घेऊन शामशेठ पुढे निघून गेला. पुढे आम्ही सगळेच आपापल्या आयुष्यात इतके रममाण झालो की त्याची आठवण विस्मृतीत गेली. मध्यंतरी, फोनवर बोलताना सुरेशने एकदम आठवण काढली आणि सगळ्या आठवणी रांगोळीप्रमाणे स्वच्छ दिसायला लागल्या. मन कुठेतरी कातर झाले. शामशेटच्या अखेरच्या दिवसात, त्याला भेटायला हवे होते, ही रुखरुख मनात जागी झाली आणि त्यातूनच असा लेख लिहावा, मनात आले.
Friday, 8 October 2021
एक स्तब्ध गोठलेला क्षण!!
मी १९९२मध्ये प्रथमच घर सोडले आणि नायजेरिया (लागोस) इथे नोकरीला गेलो. नव्हाळीचे ४ दिवस या न्यायाने सुरवातीचे दिवस मजेत गेले. लवकरच आजूबाजूचे बरेच मराठी लोकं ओळखीचे झाले आणि प्रत्येक शनिवार/रविवार आनंदात जायला लागले. वास्तविक लागोस हा माझा पहिलाच परदेश प्रवास तरीही मी आजमितीस काहीही लिहिले नाही.अर्थात त्याला काही कारणे आहेत, फार वैय्यक्तिक असल्याने त्यांचे उल्लेख टाळतो. नायजेरिया म्हणजे काळ्या लोकांचा देश. अपवादस्वरूप आशियाई किंवा गोरे लोकं दिसणार. परिणामी सुरक्षा व्यवस्था टांगणीला लागलेली. संध्याकाळ झाली की घरकोंबडा व्हायचे!! कुठे कुणाकडे भेटायला गेल्यास, शक्यतो रात्री त्यांच्याच कडे राहायचे आणि सकाळी उठून आपल्या घरी परतायचे, हाच बहुतांशी शिरस्ता!! माझ्या आजूबाजूला अनेक केरळीय कुटुंबे राहत होती. काही जण तर जवळपास १५,१६ वर्षे सलग राहत होती. परदेशी राहताना, हा एक गुण नेहमी दिसतो. *आपण भारतीय* इतकी माहितीओळख वाढवायलाआणि मैत्री करायला पुरेसा असतो. याच न्यायाने, माझी अनेक केरळीय लोकांशी हळूहळू ओळख झाली. त्यातील एक केरळीय कुटुंब माझ्याच घराच्या शेजारी राहात होते.त्यावेळी ते वयाने पन्नाशीच्या आसपास होते.फक्त नवरा,बायको होते. मी एकटाच असल्याने, बरेचवेळा शनिवार किंवा रविवार,मला त्यांच्याकडे जेवणाचे आमंत्रण असायचे.अर्थात केरळीय ब्राह्मण,या नात्याने जेवणात *शुद्ध शाकाहारी* पदार्थ असायचे. मी एकटाच नसायचो तर एक २५ वयाचा पद्मनाभन म्हणून केरळीय माझ्या सोबतीला असायचा. अर्थात शुद्ध शाकाहारी असले तरी बियर,व्हिस्की वगैरे सरंजाम व्यवस्थित असायचा!! त्यामुळे, मी तर त्यांच्याकडे घरचा असल्यासारखा वावरत असे. हळूहळू कौटुंबिक माहितीची देवाणघेवाण होणे, क्रमप्राप्तच होते आणि त्यातून समजेल,त्यांची २ मुले मुंबईत शिक्षणासाठी राहात असतात. चेंबूर भागात, भाड्याच्या घरात रहात असतात. वास्तविक त्याचे स्वतःचे असे घर त्रिवेंद्रम इथे होते आणि ते त्यावेळी त्यांनी ते घर भाड्याने दिले होते. पत्नी फक्त घरीच असायची. दोघांचा वर्ण सावळा म्हणता येईल असा होता. त्या दोघांमधील पुरुष बोलका होता पण बाई मात्र मितभाषी होती. त्यांच्या बोलण्यावरून तरी दोन्ही मुले अत्यंत हुशार आणि तल्लख होती आणि याचा त्यांना सार्थ अभिमान होता. एकूण असे म्हणता येईल,सुखवस्तू,सुखी कुटुंब होते. आणि डिसेंबर १९९२ महिना अवतरला!! दुपारच्या सुमारास, पद्मनाभनचा मला ऑफिसमध्ये फोन आला. त्याने जे काही सांगितले ते ऐकून, मी तर अवाक झालो!! *नायर* (हे त्या कुटुंबाचे आडनाव) त्यांची मुले डिसेंबर/जानेवारी महिन्याच्या सुटीत आपल्या आई/वडिलांकडे येणार होते आणि त्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये आपले पासपोर्ट घ्यायला आले होते आणि तेंव्हाच तिथे *बॉम्बस्फोट* झाला आणि त्यात ही दोन्ही मुले दगावली!! पद्मनाभनकडे फॅक्स आला होता आणि त्याला ही बातमी नायर कुटुंबाला सांगायची होती!! सांगायला लागणारच होती पण पद्मनाभनचा धीर होत नव्हता म्हणून त्याने मला, त्याच्याबरोबर यायची विनंती केली होती. ऐकताना, मलाच कळत नव्हते, आम्ही त्यांना कसे सांगायचे? मी त्याला इतकेच सांगितले, बाईला आधी सांगायचे नाही. त्याला बाजूला घ्यायचे आणि पद्मनाभनने मल्याळी भाषेत, अतिशय थोडक्यात सांगायचे आणि लगोलग तिथून बाहेर पडायचे. वास्तविक वीकएंड नसून देखील आम्ही त्यांच्या घरी आल्याचे, त्यांना नवल वाटले होते. मी पद्मनाभनला खूण केली आणि अक्षरश: तोतऱ्या, चाचरत्या आवाजात त्याने बातमी सांगितली. नायर ऐकूनच थिजले. त्यांनी बायकोला बाहेर बोलावले आणि त्याच मल्याळी भाषेत, बायकोला सांगितले!! पुढल्या क्षणी त्या बाईंची दातखीळ बसली!! स्वतः नायर यांची अवस्था फार वेगळी नव्हती पण अखेरीस *पुरुष* म्हटल्यावर आणि बायकोची अशी अवस्था झाल्यावर, लगोलग डॉक्टर गाठला आणि नशिबाने १० मिनिटांत दातखीळ सुटली!! *हाच तो स्तब्ध गोठलेला क्षण* जिथे शब्द पूर्णपणे व्यर्थ होते!! रात्री डॉक्टर कडून आम्ही चौघे, त्यांच्या घरी आलो. बोलण्यासारखे आणि धीर देण्यासारखे काहीच सुचत नव्हते. वास्तविक मीच त्यावेळी माझ्याच कौटुंबिक धक्क्यातून थोडाफार सावरत होतो. त्या क्षणापासून ती बाई *मुकी* झाली. तिने बोलणेच टाकले. लगोलग, श्री.नायर यांनी भारतात परतायचा निर्णय घेतला.आता कशासाठी पैसे मिळवायचे? आयुष्याचा उद्देश(च) संपला. त्यांचे म्हणणे योग्यच होते. त्यांनी लागोस, फेब्रुवारीमध्ये सोडले आणि सरळ त्रिवेंद्रम गाठले. पुढील वर्षभर माझा त्यांच्याशी संपर्क होता आणि त्यातून समजले, त्या बाईला थोडे वेड लागले होते!! पुढे मी देखील लागोस सोडले आणि साऊथ आफ्रिकेला जायचा निर्णय घेतला. निघायच्या काही दिवस आधी मी त्यांना कळवण्यासाठी फोन केला तेंव्हा, आदल्या दिवशीच त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याचे कळले!! बातमी ऐकल्यावर, का कुणास ठाऊक पण मलाच थोडे हायसे वाटले. ही भावना चुकीची असू शकते पण उरलेले आयुष्य वेडसर व्यक्तीशी संसार करीत काढणं,या जीवघेण्या वेदना होत्या आणि त्या वेदनांमधून श्री. नायर यांची सुटका झाली. आता मात्र माझा त्यांच्याशी काहीही संपर्क नाही. किंबहुना ते जिवंत असण्याची शक्यता देखील कमीच वाटते!!
Subscribe to:
Posts (Atom)