Tuesday, 16 April 2019

एक अविस्मरणीय गुड फ्रायडे.



अर्थात मी परदेशात (साऊथ आफ्रिका) रहात असतानाचा हा अनुभव आहे. भारतात अजूनतरी "इस्टर मंडे" अशी सुटी मिळत नाही त्यामुळे सलग ४ दिवसांची रजा म्हणजे भटकायला गाडी काढणे  आणि लांब फिरायला जाणे नेहमीचेच असायचे. एप्रिल महिना म्हणजे थंडीच्या मोसमाला सुरवात. हवा बोचरी नसली तरी अंगात स्वेटर घालणे आवश्यक. १९९८ मध्ये मी डर्बन इथे नोकरी करीत होतो. या देशात येऊन, ४ वर्षे आली तरी केप टाऊन झालेले नव्हते म्हणून इस्टर मंडे ला जोडून आणखी ३ दिवस रजा घेतली आणि एका मित्राला बरोबर घेऊन, गुरुवारी संध्याकाळीच केप टूर सुरु केली. रात्री ब्लूम  फॉन्टेन शहरात वस्तीला राहिलो. ब्लूम  फॉन्टेन शहर हे समुद्र सपाटीपासून खूपच वर असल्याने थंडीचा कडाका जाणवत होता. आम्ही दोघे मित्रच असल्याने तशी राहण्याची काही फारशी व्यवस्था केली नव्हती, जिथे मिळेल तसे राहायचे, असेच ठरवले होते. एकतर आयत्यावेळेस ठरवले त्यामुळे बरीचशी हॉटेल्स आधीच भरलेली होती तरी देखील ब्लूम फॉन्टेन शहराच्या उपनगरात, सुदैवाने "सिटी लॉज" सारख्या उपयुक्त हॉटेलमध्ये जागा मिळाली. रात्रीचाच प्रश्न असल्याने, फारसा विचार केला नाही. रात्री शहर फिरायला बाहेर पडलो. तसे शहर फार मोठे नाही पण टुमदार आहे. डर्बन सारख्या शहरात राहिल्यानंतर मग मॉल्स, उंच इमारती वगैरे गोष्टींचे फार आकर्षण रहात नाही. बाहेर पडलो तेंव्हा रात्रीचे ८ वाजून गेले होते. हवेत गुड फ्रायडे असल्याने रस्त्यावर थोडीफार गर्दी होती. रस्त्यावरील हॉटेल्स तुडुंब भरलेली होती. हवेत गारवा असल्याने, टेबलांवर काचेचे चषक भरलेले अत्यावश्यक. मग अनिल कशाला मागे राहील? गार थंडीत On the Rocks घेणे म्हणजे काय अप्रतिम अनुभव असतो, हे शब्दात मांडणे फार अवघड आहे. आम्ही रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये एक टेबल पकडले आणि ड्रिंक्स सहित जेवणाची ऑर्डर केली. 
दुसऱ्या दिवशी पहाटेच निघालो आणि सरळ N2 हा हायवे पकडला. इथे सलग ८०० कि.मी. रस्त्यात कुठेही कॅमेरा नाही त्यामुळे गाडी जवळपास १६०, १७० वेगाने हाणली. अशा वेगाने गाडी चालवणे, हे खरोखरच थ्रिल असते. साऊथ आफ्रिकेत फक्त याच रस्त्यावर तुम्ही सलग इतक्या वेगाने गाडी चालवू शकता अन्यथा, १२०,१३० वेग इतकीच मर्यादा!! गुड फ्रायडेच्या दुपारी आम्ही केपच्या प्रवेशाशी आलो, Worsester इथला वाईन पार्क प्रसिद्ध आहे, लगेच गाडी आत घेतली. तोपर्यंत वायनरी अशी बघितलेली नव्हती. साऊथ आफ्रिकेची वाईन जगभर प्रसिद्ध आहे. फाटकातून आत शिरलो आणि साथीला देखणी हिरवळ आली, ती शेवटपर्यंत. सुरेख, निगुतीने राखलेली हिरवळ बघणे, हा अनिर्वचनीय अनुभव असतो. आजूबाजूला वाईन  विकण्याची दुकाने होती. आम्हाला, जिथे वाईन बनवतात, तिथेच जाण्यात अधिक रस होता, वाईन फॅक्टरी सगळ्यांना बघता येते. Worcester मध्ये प्रचंड द्राक्षाच्या बागा आहेत आणि सगळी लागवड ही फक्त वाईनसाठी केलेली असते. आयती बाजारपेठ उपलब्ध असल्याने, उगीच "मालाला पडलेला भाव" वगैरे प्रकार नाही. आणखी महत्वाची  बाब,ही वायनरी खाजगी आहे , जशी आता आपल्याकडे नाशिककडे "सुला वायनरी" झाली आहे. 
फॅक्टरीपाशी गाडी थांबवली आणि आत शिरलो. कारखाना म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर अवजड यंत्रे, खडखडाट आवाज असला सीन डोळ्यासमोर येतो पण वायनरीत यंत्राचा आवाज येतो पण तो कानाला अतिशय सुसह्य असतो. वाईन कशी बनवली जाते, याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. बहुतेक सगळी प्रक्रिया यंत्रांकडूनच पार पाडली जाते. द्राक्षे विशिष्ट प्रकारे आंबवली जातात, त्यात यीस्ट आणि इतर केमिकल्स मिसळली जातात,  गाळली जाते, तिथे खरा "अर्क" बाहेर निघतो. नंतर अवाढव्य पिंपात साठवली जाते ( हे सगळे मी स्कॉच वरील फिल्ममध्ये बघितलेले होते म्हणून फारसा विस्मय वाटलं नाही). इथे तुम्हाला ताजा अर्क घोटाच्या स्वरूपात प्यायला मिळतो. अनिल कशाला असला चान्स सोडणार!! 
पांढरी, सोनेरी आणि याच रंगाच्या आणखी छटांमधून वाईन तयार होते. गाळलेली वाईन, बाटलीत भरलेली बघणे - अप्रतिम सोहळा. तिथेच तुम्हाला वाईन कशी  घ्यावी,हे देखील शिकवले जाते. प्रत्येक वाईनचे स्वतः:चे असे स्वतंत्र काचेचं ग्लासेस असतात आणि त्यात ओतून, घोटाघोटाने तोंडात घोळवत वाईन घेतली म्हणजे तुम्ही खऱ्याअर्थी वाईनचा आस्वाद घेता. नाझी एक गमतीचा भाग लक्षात  आला,वायनरीतील वाईनची चव आणि बाहेर विक्रीला ठेवलेल्या बाटलीतील वाईनची चव, यात फरक पडतो. ताजी वाईन, म्हणून तिचा गुणधर्म वेगळाच असतो. 
आजतर गुड फ्रायडे, त्यामुळे तर तिथे उत्सवच होता. संध्याकाळी, तिथल्या क्लबमध्ये खास पार्टीचे आयोजन केले होते. वास्तविक तिथे जागा आधीच आरक्षित केलेल्या असतात पण निव्वळ नशिबाने आम्हा दोघांना प्रवेश मिळाला. वास्तविक तिथून केप टाऊन २५० कि.मी. दूर आहे आणि तिथे राहण्याची सोय बघायला हवी होती. तरी देखील आम्ही या पार्टीत सामील झालो. वास्तविक पार्टीचा खर्च तसा महागडा होता पण तरीही सगळे सोसायचे ठरवले. क्लब पार्टीला जायचे तर तुम्हाला पार्टी ड्रेस कोड पाळणे अत्यावश्यक अन्यथा प्रवेश मिळत नाही. आम्ही दोघे तर सडाफटिंग कपड्यात!! तिथल्याच एका गोऱ्या आयोजकाने आमची अडचण समजून घेतली आणि त्याने त्याच आवारातील एका दुकानात नेले. तिथे पार्टी ड्रेस भाड्याने मिळत होते. अशा प्रकारे इथे काही  मिळते,याचीच आम्हाला कल्पना नव्हती. लगोलग सूट,टाय आणि पॅन्ट भाड्याने घेतल्या आणि तिथल्याच एका लॉजमध्ये रात्रीची सोय केली. इथे सगळेच तसे आमच्या बजेटच्या बाहेर बसणारे होते तरी एकदा जीवाचे केप टाऊन करायचे म्हटल्यावर फारसा विचार केला नाही. 
आता हवेत चांगलाच गारठा वाढला होता. रात्री ९ च्या सुमारास पार्टी सुरु झाली. त्या हॉल मध्ये आम्हीच वेगळ्या रंगाचे. बाकीचे सगळे एकतर गौरवर्णीय अथवा कृष्णवर्णीय. सुरवातीला शॅम्पेन फोडली आणि पार्टीला रंग चढायला सुरवात झाली. मंद आवाजात पाश्चात्य जॅझ संगीत सुरु झाले आणि जोडप्यांनी पाय थिरकवायला सुरवात केली. चखणा म्हणून सॉसेजीस आणि चॉप्स होते. हॉलच्या बाहेरच बार्बेक्यू लावला होता. बार्बेक्यूच्या जाळीवर मंदपणे सॉसेजीस भाजले जात होते  आणि जशी गरज असेल त्याप्रमाणे प्रत्येकजण तिथून चॉप्स, सॉसेजीस घेत होते. तिथेच मी, मेयोनीजमध्ये कुस्करून मिसळलेला बटाटा, उकडलेली अंडी आणि बारीक तिखट मिरची आणि मिरीपावडर एकत्रित करून तयार केलेला पदार्थ खाल्ला. काय अफलातून चव होती. आम्ही सडाफटिंग असल्याने नृत्य करण्याचा प्रश्नच नव्हता त्यातून ओळखीचे कुणीही नाही. त्यामुळे कुणाला नृत्यासाठी विचारायचे? हा प्रश्नच होता. एक, दोनदा आमच्या बाजूच्या एका गोऱ्या जोडप्याने, आम्ही नृत्य करत नाही, म्हणून आश्चर्यच व्यक्त केले (यात एक बाब अशी होती, तोपर्यंत तरी मला पाश्चात्य नृत्य कसे करायचे, याची सुतराम कल्पना नव्हती) गोरा माणूस अशा वेळी किती खेळकर असतो याचा सुरेख अनुभव आला. आमच्याकडे "पार्टनर" नाहीत हे बघितल्यावर, त्याने त्याच्या बायकोलाच माझ्याबरोबर नृत्य करावे, अशी विनंती केली. इथे मात्र अनिल गांगरला!! वास्तविक मी बावळट होतो, हेच खरे. मी काहीच बोलत नाही, हे बघितल्यावर तीच माझ्याशी बोलायला आली. तेंव्हा मीच कबूल केले, मला पाश्चात्य नृत्य येत नाही. तिला थोडे आश्चर्यच वाटले कारण मी या देशात येऊन एव्हाना ४ वर्षे झाली होती आणि मला पाश्चात्य नृत्य येत नाही!!  शेवटी तिनेच पुढाकार घेतला आणि माझा हात हातात घेतला. मी पण मनात  म्हटले,च्यायला होतोय राडा तर होऊ दे. उद्या इथे कोण कुणाला भेटणार आहे. 
अर्थात  सुरवातीची १०मिनिटे अनिल बावचळला. पाय कशा लयीत कसे मागे, पुढे करायचे, काहीच समजेना पण तरीही पुढे रेटायचे ठरवले. हळूहळू अंदाज यायला लागला आणि सफाईदार जरी नसले तरी नवखेपणा निघून गेला. मुळातला बुजरेपणा कमी झाला आणि थोड्या आत्मविश्वासाने पाय हलायला लागले. जवळपास, अर्धा तास नृत्य करीत होतो, मनात कुठेही वासना डोकावली नाही - त्यावेळी याचे देखील आश्चर्यच वाटले. आणखी गंमत म्हणजे मी फक्त एकच ग्लास वाईन घेतली होती पण मुद्दामून घ्यावीशी असे पण वाटले नाही. रात्री ११ च्या सुमारास टर्की आली आणि आता आम्ही चौघांनी एक टेबल पकडले. रात्रभर संगीताचा धुडगूस चालू होता. 
आम्ही दोघांनी मात्र रात्री २ च्या सुमारास काढता पाय घेतला.   

Sunday, 14 April 2019

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा

मराठी संगीत रंगभूमीवरील रचनाकार नेहमीच असा दावा करतात की ते भारतीय कलासंगीताचा यथायोग्य वापर, आपल्या स्वररचनेतून दाखवतात. ही भूमिका आणि हा दावा निश्चितच योग्य आहे. मराठी संगीत रंगभूमीचा जवळपास शतकभरातला इतिहास पडताळून बघितला तर या दाव्यातील सत्यता स्पष्टपणे दिसते. अण्णासाहेब किर्लोस्करांपासून सुरु झालेला प्रवास हा आजतागायत भारतीय कलासंगीताचे बोट धरूनच झाला आहे. किंबहुना असे म्हणता येईल, रागदारी संगीताची ओळख आणि जवळीक, सामान्य रसिकांना मराठी संगीत रंगभूमीने समर्थपणे करून दिली. अर्थात, संगीत रंगभूमीवरील रचनाकार हे मुळातून कलासंगीताचे व्यापक अभ्यासक, मीमांसक होते आणि याचा परिणाम, रसिकांना झालेले रागदारी संगीताचे परिपूर्ण आकलन. याच प्रदीर्घ परंपरेतील एक प्रतिष्ठित नाव - पंडित जितेंद्र अभिषेकी. मुळात "आग्रा" घराण्याची यथास्थित तालीम घेऊन, अभिषेकी बुवा रंगभूमीवर अवतरले. याचा परिणाम असा झाला, त्यांच्या बहुतेक स्वररचनांना रागदारी संगीताचे अधिष्ठान लाभले. आजचे गाणे " अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा" हे सरळ सरळ "भटियार" रागावर आधारलेले आहे पण तरीही अस्ताईच्या शेवटाला "ललत" रागाचा शिडकावा झालेला दिसतो. 


अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा 
धर्म न्याय निती सारा खेळ कल्पनेचा 

"संगीत मत्स्यगंधा" नाटकातील गाजलेली रचना. विशेष मुद्दा विचारात घ्यायचा झाल्यास, प्रस्तुत गाणे कविता म्हणून विचारात घ्यावे, असे आहे. थोडा बारकाईने विचार केल्यास पूर्वीच्या काळातील संगीत नाटकांतील शब्दरचना ही शब्दबंबाळ, संस्कृतप्रचुर अशी असायची. काव्य म्हणून आस्वाद घेणे निरातिशय अवघड असायचे आणि या पार्श्वभूमीवर, प्रस्तुत कविता ही सुबोध, गेयतापूर्ण, लालित्यपूर्ण अशी वाचायला मिळते. वास्तविक, वसंत कानेटकर हे गद्य नाटककार म्हणून प्रसिद्ध तरीही या नाटकातील काही गाणी त्यांनी लिहून थोडा आश्चर्याचा धक्काच दिला असे म्हणता येईल. वास्तविक कविता म्हणून वाचताना एक,दोन ठिकाणी शब्द डाचतात परंतु वसंत कानेटकर हे कुणी सिद्धहस्त कवी नाहीत, ही बाब इथे ध्यानात ठेवलेली बरी. 

ध्यास एक हृदयी धरुनी स्वप्न रंगवावे 
वीज त्यावरी जो पडूनी शिल्प कोसळावे 
सर्वनाश एकच दिसतो नियम जगाचा 

"संगीत मत्स्यगंधा" नाटकाचे संगीत हा खरे तर दीर्घ निबंधाचा विषय आहे. संगीतकार म्हणून पंडित जितेंद्र अभिषेकींचे पहिले नाटक पण पहिल्याच नाटकात बुवांनी आपल्या प्रतिभेची झलक दाखवली. संगीत नाटकातील संगीतात संपूर्ण परिवर्तन घडवून आणले. नाटकातील गाणी सहजपणे गुणगुणता येतील, अशा चाली बांधल्या पण तसे करताना, स्वरविस्ताराला भरपूर जागा ठेवल्या. गाणारा गायक/गायिका प्रशिक्षित असेल तर अशी स्वररचना गाताना त्याच्या प्रतिभेला वाव मिळेल, अशा प्रकारच्या चाली बांधल्या. मुळात, लिखित शब्दाला प्राधान्य देऊन आणि शब्दांचे औचित्य राखणाऱ्या चाली निर्माण केल्या आणि हे पंडित जितेंद्र अभिषेकींचे निर्विवाद आणि निखळ यश होय. चालींमध्ये लालित्य तर आहेच पण गायकीला आव्हान देखील आहे. हे सगळे करताना, स्वतः: संगीतकार हे आग्रा घराण्याचे प्रशिक्षित गायक असूनही बहुतेक स्वररचनांचा पिंड आणि बाज, त्यांनी ललित संगीताच्या अंगाने फुलवला. रागदारी संगीतातील लालित्य नेमके वेचून काढून, आपल्या रचना करताना, त्या संगीताचा सढळ उपयोग करून घेतला, मराठी संगीत रंगभूमी श्रीमंत केली. त्यांनी चालीचा धर्म, नेहमीच "गीतधर्मी" ठेवला. गाणे तयार करताना, कवीच्या शब्दांना सुद्धा तितकेच महत्व द्यायचे, हा विचार रुजवला. 
प्रस्तुत स्वररचना ही केवळ ३,४ मिनिटांत संपते परंतु त्यातही आपले सांगीतिक कौशल्य तितकेच प्रभावीपणे सादर होईल आणि संगीताबरोबर शब्दांचे औचित्य सांभाळले हा विचार प्राधान्याने ठेवला. यापूर्वी काही अपवाद वगळता, असा विचार जोरकसपणे मराठी संगीत रंगभूमीवर कुणीही मांडलेला नव्हता. चाकोरी मोडण्याचे प्रयत्न झाले परंतु चाकोरी मोडून, पुन्हा नवीन विचारांची पुनर्स्थापना करताना, जुन्या वळणाची काही अंगे कायम ठेऊन, नावीन्य सादर केले. ही एक प्रकारची बंडखोरीच होती. 
दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा 
दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा 
वाहणे प्रवाहावरती धर्म एक साचा 

गायिका म्हणून आशालता वाबगावकर यांचे मूल्यमापन करायचे झाल्यास, गेल्यावर रागदारी संगीताचे ठळक संस्कार दिसत नाहीत परंतु छोट्या हरकती, हलक्या ताना इत्यादी अलंकारांनी गायन फुलवण्याचे कौशल्य मात्र सुरेख, असेच म्हणायला लागेल. गळ्याचा तारता पल्ला मर्यादित, स्त्री गळा असल्याने तार सप्तकात निसर्गत: निमुळत्या स्वरांत जाणे शक्य. इथे या रचनेची लय थोडी द्रुत असल्याने, तालाच्या मदतीने गायन ठसठशीत झालेले आहे. मुखड्याचीच चाल पुढील दोन्ही अंतऱ्यांना असल्याने, कुठेही अवघडलेपण आढळत नाही. संगीतकाराने जो "नकाशा" आखलेला आहे, त्यातून मार्ग काढून इप्सित स्थळी भाव व्यवस्थित पोहोचवला आहे. पहिला अंतरा आणि दुसरा अंतरा घेताना, दुसऱ्या ओळींनंतर चाल वरच्या स्वरांत जाते आणि तो प्रवास नीटसपणे गायिकेने निभावला आहे. परिणामी ,गाण्याचा स्वतः:चा म्हणून एक खास परिणाम घडतो, त्यात गायिकेला यश मिळाले, रसिकांना सुद्धा एक समृद्ध संगीत रचना ऐकल्याचे दीर्घकाळ समाधान मिळते. ललित संगीताची व्याप्ती यापेक्षा फार वेगळी नसते. 


Friday, 12 April 2019

पिकल्या पानाचा देठ

आपल्या मराठी संस्कृतीत "शृंगार रस" याला फार मर्यादित अर्थ आहे. शक्यतो चव्हाट्याबाहेर शृंगार जाऊ नये, अशीच बरीचशी धडपड असते. त्यातून "रांगडा श्रुंगार" बाबत तर चोरटेपणाच अधिक!! अगदी मराठी लोकांच्या इतिहासात थोडे डोकावले तर "बाजीराव-मस्तानी" सारखी प्रकरणे अभावानेच आढळतात. याच पार्श्वभूमीवर "लावणी" चा आस्वाद घेतला जातो. त्यातून "बारीवरची लावणी" तर उघड उघड शृंगारिक आवाहन करीत असते ( अपवाद म्हणून काही रचना सापडतात तरीही..) वास्तविक लावणी गायन हा अविष्कार नेहमीच "गायकी" अंगाला प्राधान्य देत असतो. कुणीही उठली आणि लावणी गायला घेतली, असे सहसा घडत नाही. "बैठकीची लावणी" हा अविष्कार, त्यातलाच अतिशय महत्वाचा आविष्कार म्हणावा लागेल. प्रख्यात संगीत मीमांसक कै. अशोक रानड्यांनी " बैठकीची लावणी हे महाराष्ट्राने उत्तर भारतीय संगीतातील ठुमरीला दिलेले उत्तर आहे" असे अत्यंत सूत्रबद्ध विवेचन केले आहे आणि जर का थोडे खोलात जाऊन विचार केला तर या विधानाची सत्यता पडताळता येते. "बैठकीच्या लावणी"त श्रुंगाराला प्राधान्य असतेच पण शिसारी किंवा छचोरपणा, याला अजिबात स्थान नसते . शृंगारात आवाहन आणि आव्हान असे दोन्ही असते पण त्यात लाळघोटेपणा नसून निमंत्रण असते.  आजची स्वररचना ही एकाचवेळी चाळवते पण उत्तानपणाची सीमारेषा आखून घेते.  

दरबार जुना ह्यो हंड्या झुंबर नवं 
मध्यान्ह रातीला आता लावा अत्तर दिवं 
अंगाअंगी मी रंग खेळते, केसामधी मरवा 
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा 

सुप्रसिद्ध कवी जगदीश खेबुडकर हे नाव मराठी चित्रपट संगीतात मान्यताप्राप्त आहे. सातत्य तसेच प्रसंगी सखोल आशयबद्ध कविता केल्या आहेत. प्रस्तुत शब्दरचना वाचताना, एका बाजूने रांगडा श्रुंगार तर दुसऱ्या बाजूने एक वजनदार खानदानी मांडणी बघायला मिळते. "दरबार", "हंड्या"," झुंबर" या सुरवातीच्या शब्दांनी उच्च पार्श्वभूमी तयार होते. बैठकीला राजसपण लाभले आहे. "पिकल्या पानाचा देठ" हे खरे तर द्वयर्थी शब्द पण तरीही लासवट नव्हेत. आसमंतात मदिर रात्र पसरलेली असताना, तोच गंध माडीवर आणण्याचा प्रयत्न आहे. खेबूडकरांनी सगळे वातावरण नेमक्या शब्दांत टिपलेले आहे. कुठेही छचोरपणा आणलेला नाही आणि ही बाब आस्वादाच्या दृष्टीने फार महत्वाची. 

नख लागल बेतानं खुडा 
केशरी चुना अन काथ केवडा 
लई दिसानं रंगलं विडा 
व्हटाची लाली टिपून घ्याया 
मुखडा असा फिरवा 

संगीतकार राम कदम हे नाव, मराठी चित्रपट क्षेत्रातील फार मोठे आणि प्रतिष्ठित नाव आहे. मराठी लोकसंगीताचा अत्यंत सुयोग्य वापर, हे त्यांच्या स्वररचनेचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. सहज, ओठावर खेळातील अशा चाली तयार केल्या. यमन रागावर आधारित चाल आहे. गायिका शोभा गुर्टू यांनी सुरवातीला घेतलेल्या आलापीतच यमन राग दिसतो. "आ"कारातून ऐकायला मिळणाऱ्या "नि रे ग" आणि "नि रे ग म" या सुरावटीतुन यमन रागाची ठेवण दिसते. एकाचवेळी आर्जवी पण माडीवरील गाणे असल्याने आवाहन करणारी अशी ही सुरावट आहे. "नख लागल बेतानं खुडा" ही ओळ घेताना, "खुडा" शब्द घेण्याआधी किंचित स्तब्धता आहे. खरतर तो चेष्टायुक्त विराम आहे. मुद्दामून ऐकण्यासारखी जागा आहे. तसेच "व्हटाची लाली टिपून घ्याया" ही ओळ  गाताना,त्यात अनुस्यूत असलेला शाब्दिक रांगडा शृंगार ऐकणे देखील तितकाच विलोभनीय.  
अशा प्रकारच्या रचनेला वाद्यमेळ तसा पारंपरिक असाच असतो आणि इथे तसाच आहे. फक्त ऑर्गन आणि तबला. ऑर्गनमधून सतत यमन रागच अवतरत आहे. अर्थात चाल गायकी ढंगांचीच असल्याने हरकती आणि ताना भरपूर आहेत. संगीतकार राम कदमांनी चालीची बांधणी करताना, स्वरविस्ताराच्या अनेक शक्यता निर्माण केल्या आहेत. त्यामुळे एका बाजूने चाल आळवून, पलटे घेत, आर्जवीपणे सादर करता येते. संगीतकार म्हणून राम कदमांचे मूल्यमापन करायचे  झाल्यास, संगीत रचनाकार म्हटल्यावर त्याचा सर्वात मोठा असा पायाभूत  गुण  असतो, तो गुणगुणण्यासारखी चाल बांधता येणे. मराठी ललित संगीताचे आर्थिक गणित हे नेहमीच तोकडे असल्याकारणाने, संगीतकाराला रचना करताना, अनेक व्यवधाने पाळावी लागतात, उदाहरणार्थ वाद्यमेळ आणि वादक यावर येणारे निर्बंध. अर्थात हे सगळे स्वीकारून राम कदमांनी स्पृहणीय कामगिरी  केली आहे. इतर व्यावसायिक रचनाकारांप्रमाणे राम कदमांनीही भारतीय कलासंगीतातील राग, ताल व रूढ प्रकारांपासून दूर सरकण्याचा कल दाखवला आहे. इथेही त्याचा प्रत्यय येतो. तसे करताना देखील, रचनाकारांनी काय  साधले,याचे मूल्यमापन करताना त्यांनी यशस्वीपणे साधले आहे, असे म्हणता येईल. 

थोडी झुकून, थोडी वाकते 
पडला पदर, लाज झाकते 
नेम धरून बाण फेकते 
तुमची माझी हौस इश्काची 
हळूहळू पुरवा 
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा 

गायिका शोभा गुर्टू यांचा गळा  बघता,अशी चाल गायला मिळणे उचित ठरते. गळ्यावर उत्तर हिंदुस्थानी ठुमरी, गझल प्रकारांचा जाड ठसा दिसून येतो. शास्त्रीय संगीताची यथास्थित तालीम झाल्याचे समजून घेता येते. काहीसा जड गळा, त्यामुळे ठसठशीत उच्चार. एका बाजूने रागदारी संगीताची जाणीव दिसते पण ललित संगीताला आवश्यक अशी फिरत गळ्यात असल्याने, अशा प्रकारच्या गायकीत गायन खुलून येते. विशेषतः: ओळ संपवताना, घेतलेल्या हरकती फार लक्षणीय आहेत तसेच विशिष्ट शब्दांवर वजन आणून, आशय अधिक खुलवला आहे. 
आता असे सगळे ललित संगीताचे आवश्यक घटक एकत्र आल्यावर आपल्याला एक "श्रीमंत" स्वररचना ऐकायला मिळणार, हा कयास अचूक बांधता येतो. 


Wednesday, 10 April 2019

नवल वर्तले गे माये

आपल्या भारतीय संगीतात, भक्तिमार्गी संगीताचे  महत्व अपरंपार आहे. यात स्पष्टपणे २ पोटविभाग दिसतात. १) भक्तिमार्गी संगीत, २) पूजनमार्गी संगीत. वास्तविक श्रद्धांच्या दृष्टीने बरीच सरमिसळ आढळते तरी सूक्ष्म भेद दिसतो. प्रेमाचे नाते हेच ईश्वर-भक्तांच्या दरम्यान असणारे नाते  मानणाऱ्या भक्तीमार्गात लौकिकतेचा प्रवेश सहजपणे शकतो.  माता, पिता, बंधू, सखा इत्यादी अनेक मार्गांनी ईश्वर साकार होणे निखळ पूजनमार्गी श्रद्धेला कदाचित मानवले नसते. पूजनमार्गातील मूर्तीचे आलंबन अंडी एक विशिष्ट मानसिक अवस्था मिळून भक्तिमार्ग सिद्ध होतो. लौकिकतेला मज्जाव न करण्याच्या भूमिकेमुळे भक्तिसंगीतही लौकिक जीवनाशी अधिक जवळीक साधू शकते आणि हाच विचार आजच्या भक्तिसंगीतात प्राधान्याने आढळतो. "नवल वर्तले गे माये" ही रचना "संत निवृत्ती ज्ञानेश्वर" या १९६३ साली आलेल्या चित्रपटातील अतिशय ख्यातकीर्त रचना होय. 

नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु 
मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु 

कवी ग.दि.माडगूळकरांची शब्दरचना आहे. आपण जर का कविता म्हणून आस्वादायचे ठरविल्यास, प्रथमदर्शनी "प्रकाशु","विनाशु" किंवा पुढे "गोठी" (गोष्ट) तसेच "दिनेशु" ( सूर्य) अशा संत साहित्याशी जवळीक साधणाऱ्या शब्दांकडे नजर वळते आणि कवितेचा असा खास विशेष म्हणून शब्दरचना म्हणून मनावर गारुड टाकते. ललित संगीतातील प्रमुख घटकांपैकी "शब्द" घटक जर का इतकी प्रमुख भूमिका घेत असेल तर एकूणच गाण्याच्या संवर्धनासाठी हा घटक अतिशय उपकारक ठरतो. वास्तविक घटना नेहमीचीच आहे, पहाट होत आहे आणि अवकाशातील अंधार हळूहळू लयाला जात आहे. या निसर्गक्रमाचा माडगूळकरांनी मानसिक संक्रमण दर्शविण्यासाठी सुरेख उपयोग करून घेतला आहे. कवितेत निसर्गाचा उपयोग करून घेणे हे नेहमीच घडत असते. किंबहुना निसर्ग हा बऱ्याच कवितांचा कच्चा माल असतो. प्रश्न असतो, या निसर्गाचा कवी कशाप्रकारे उपयोग करून आशयाची सिद्धी साधत असतो. 

हास्यची विलसे ओठी, अद्भुतची झाले गोठी 
रातीचिये स्वप्नी आला, कोवळा दिनेशु  

संगीतकार सी. रामचंद्र, हे नाव हिंदी चित्रपट संगीतातील अतिशय प्रतिष्ठित, मानाचे नाव. वास्तविक, रामचंद्र चितळकर असे मराठमोळे नाव असूनही, केवळ चित्रपटासाठी त्यांनी सी. रामचंद्र नाव धारण केले - परिणाम हे नाव दक्षिण भारतीय वाटले आणि या माणसाकडे लायकीपेक्षा फारच कमी मराठी चित्रपट आले. अर्थात तोटा रसिकांचा झाला, हे सर्वश्रुत आहेच. स्वररचना नीटसपणे तपासली तर मराठी धाटणी स्पष्टपणे अधोरेखित होते पण त्यापलीकडे शब्दरचनेतील आशयघनता आणि गेयता, दोन्हीही या स्वरचनेतून अतिशय गोडपणे दृग्गोचर होतात. 
मुखड्याच्या आधीचा वाद्यमेळ बांधताना, संगीतकाराने दोन स्तरांवर बासरीचा उपयोग केले आहे आणि त्यातून रचना मुखड्याशी कशी येते हे खास ऐकण्यासारखे आहे. चाल सुरवातीपासून काहीशा द्रुत गतीत सुरु होते पण तरीही शब्दांतील आशय कुठेही दोलायमान होत नसून कवितेतील भाव निश्चित आणि ठामपणे  रसिकांपर्यंत पोहोचतो आणि संगीतकार म्हणून ही कामगिरी निश्चितच स्पृहणीय आहे. गायिका आशाबाईंनी, गाताना,शब्दांचे औचित्य आणि स्वररचनेतील गोडवा अचूकपणे टिपला आहे. आपल्याकडे रचना ही नेहमीच गायक/गायिकेच्या गळ्यातून पोहोचत असल्याने, हा घटक खऱ्याअर्थी महत्वाचा!!  
मुखड्यानंतरच्या वाद्यमेळ प्रामुख्याने बासरी, मेंडोलिन  आणि व्हायोलिन या तीनच वाद्यांनी सजवलेला आहे. जरा बारकाईने ऐकले तर कळेल, अंतरा संपताना, तालाची लय दुगणित ठेवलेली आहे पण स्वरिक लय मात्र त्याच लयीत ठेवलेली आहे. 

पहाटली आशा नगरी, डुले पताका गोपुरी 
निजेतुनी जागा झाला, राउळी रमेशु 

संगीतकार म्हणून सी. रामचंद्र यांचे थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास, ते अष्टपैलू रचनाकार निश्चितच होते आणि एकूणच आपल्या कारकिर्दीत अनेक गीतप्रकारांचे त्यांच्या रचनांत चीज झाले. सुरावटींचा खेळता प्रवाह ठेवणे त्यांना जमत असे. प्रस्तुत रचना ऐकताना, रचनेतील गोडव्याबरोबर आंगिक असे खेळतेपण, ज्याला चैतन्य असे म्हणता  येईल,ते सतत ठेवले आहे. त्यामुळेच रसिकांपर्यंत हे "सहजपण"  सहज पोहोचत असे. त्यांचे संगीत सर्वांना सहज समजत असे. संबंधित संगीत फार साधे म्हणून ते समजे असे नसून, पुरेशा तांत्रिक प्रभुत्वामुळे आपले कौशल्य लपवून संगीत पुढे आणण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती म्हणून. आपले भारतीयत्व व आगळेवेगळेपण सिद्ध करून दाखवण्याचा अट्टाहास कधीच रचनांमधून दिसला नाही. 

चैत्रवाऱ्याची वाहली, आली देहाच्या अंगणी
अंग मोहरूनी आले, जसा का पलाशू 

ललित संगीतात गायक/गायिकेची भूमिका नेहमीच अतुलनीय असते. रसिकांना तर गाण्याची प्राथमिक ओळख ही गायन याच घटकांतून प्रथम होते आणि इथे अशा भोसले यांचे कौशल्य खास दिसून येते. माडगूळकरांच्या शब्दांचे औचित्य आणि सी. रामचंद्रांच्या रचनेतील खेळकरपणा तरीही प्रासंगिक गांभीर्य, या गुणांचा तंतोतंत आढळ,आशाबाईंनी या गायनातून दाखवला आहे. खरेतर असे म्हणता येईल, ललित संगीतात जितके म्हणून सर्जनशील होता येईल, त्या सगळ्या शक्यतांचा आढळ त्यांच्या गायनातून अचूकपणे घेता येतो. 


Sunday, 7 April 2019

मज सुचले ग मंजुळ गाणे

मराठी चित्रपट गीतांना अशी अनेक गाणी सापडतात, जी प्रथमदर्शनी चित्रपटातील गाणी वाटतच नाहीत. अत्यंत मोजका वाद्यमेळ, गायकी अंगाने बांधलेली चाल अशी काही खास वैशिष्ट्ये शक्यतो भावगीत संगीतात मिळतात. चित्रपट संगीताचे आर्थिक गणित हे खाजगी गीतांच्या संगीतापेक्षा नेहमीच मोठे असते परिणामी , वेगवेगळी वाद्ये, अनेक वादक कलाकार इत्यादी चैनी चित्रपट संगीताला परवडू शकतात. परंतु ही विधाने अत्यंत ढोबळ, प्रसंगी भोंगळ देखील वाटावीत, अशा स्वररचना मराठी चित्रपटात आढळतात. १९६३ साली आलेल्या "पाहू किती रे वाट" या चित्रपटात असेच एक सुंदर गाणे आहे. "मज सुचले ग मंजुळ गाणे" हेच आजचे गाणे अशा प्रकारचे आहे. सतार, व्हायोलिन याच वाद्यांच्या साहाय्याने सजलेला वाद्यमेळ आणि साथीला फक्त तबला. 
संगीतकार दत्ता डावजेकर हे नाव तसे मराठी ललित संगीतातील एक प्रतिष्ठित नाव, गाण्याची रचना बांधताना शक्यतो थोडीतरी "आडवळणी" बांधायची जेणेकरून गळ्याची "तयारी" दिसावी. तसे या संगीतकाराने फार मोजकेच चित्रपट केले परंतु रचना आणि दर्जा या दृष्टीने बघितल्यास, कामाची निश्चितच दाद द्यावी लागेल. मराठी चित्रपटाला सतत, सातत्याने आणि दर्जेदार शब्दरचना पुरवली असेल तर ती फक्त ग.दि.माडगूळकरांनीच. किंबहुना, चित्रपट गीत कसे लिहावे, याचा आदर्श आदिनमुना माडगूळकरांनी निर्माण केला. शक्यतो मराठी संस्कृतीला धरून आणि तरीही सहज, सोपे शब्द वापरून, गेयताबद्ध शब्दरचना निर्माण केल्या. माडगूळकरांची कुठलीही कविता नेहमीच शाब्दिक लयीत असते. प्रत्येक अक्षरामागे काही ना काहीतरी प्रयोजन असते अर्थात जिथे "घाऊक" मागणी असते अशा चित्रपट संगीतात, प्रत्येक कविता ही त्याच दर्जाची असेल असे नक्कीच म्हणता येणार नाही पण मग दुसऱ्या बाजूने विचार केला तर हेच विधान कुठल्याही कवीबाबत लागू होते. सातत्य आणि दर्जा यात नेहमीच थोडीफार तफावत ही निर्माण होतेच होते. असे असून देखील माडगूळकरांच्या कवितेत विलक्षण आश्चर्य वाटावे इतके सातत्य आढळते. मुळात, असे म्हणता येईल, चित्रपटासारख्या कलाविष्कारात जिथे सामान्यातला सामान्य माणूस देखील गुंतलेला असतो तिथे अर्थपूर्ण शब्दरचना करून, मानाचे स्थान मिळवणे कधीच सोपे नसते आणि ते माडगूळकरांनी सहजपणे सिद्ध करून दाखवले. 
गाण्याच्या सुरवातीच्या सतारीच्या सुरांतून आणि आशाबाईंच्या आलापीतून "अभोगी" रागाची ओळख मिळते. आशाबाईंचा हा अल्पच इतका "घनदाट" आहे की तिथेच रसिकांचे लक्ष वेधले जाते. "कोमल गंधार, मध्यम आणि धैवत"अशा स्वरसंगतीने वेढलेला असा आलाप आहे. सघन मुखडा बांधायला याची मोठी मदत होते. "मज सुचले ग"  गाताना "ग" या अक्षरावर किंचित आंदोलन आहे आणि तोच स्वर लगोलग सतारीवर घेतलेला आहे, गळ्यातील त्याच "वजनाच्या" अंगाने!! लगेच " सुचले मंजुळ गाणे"  इथे पहिली ओळ संपते पण संपताना, पुन्हा याच शब्दांचे स्वरांकित रूप बघायला मिळते. पूर्वीच्या मराठी चित्रपटात शक्यतो चित्रपटातील नायिका हे बव्हंशी सोज्वळ, शालीन आणि सालंकृत स्वरूपाची असायची तद्वत, संगीतरचना देखील याच भावनांना अनुसरून असायच्या. संगीतकाराला शब्दांची वाजवी जाणीव असेल तर हाताशी असलेल्या शब्दांतून अनेक छटा दाखवता येतात. इथे दुसरी ओळ गाताना, " हिंडता डोंगरापाठी, सापडले कोरीव लेणे" त्याचे ठराविक भाग केले आहेत - "हिंडता डोंगरापाठी, सापडले" हे गाताना "सापडले" हा शब्द उच्चारण ऐकण्यासारखे आहे. लय तशी ठेवली आहे, स्वराकार तोच ठेवला आहे पण "सापडले" शब्दातील ध्वन्यार्थ अचूकपणे संगीतकार आणि गायिकेने घेतलेला आहे. ललित संगीत समृद्ध असते, ते अशाच छोटेखानी सौंदर्यातून. अर्थात ध्रुवपदाच्या दोन्ही ओळींतील शब्दरचना बघितली तर दुसरी ओळ दीर्घ आहे. बहुदा गाताना शब्दांची मोडतोड न करता गायन करायचे आणि त्यासाठी तशीच स्वररचना तयार करायची, असा देखील विचार असू शकतो.   

मज सुचले ग, सुचले मंजुळ गाणे,
हिंडता डोंगरापाठी, सापडले कोरीव लेणे.

पहिला अंतरा थोड्या वरच्या सुरांत सुरु होतो - कवितेतील शब्द वाचल्यावर लगेच चाल का बदलली, याचा उलगडा होऊ शकतो. "विसरल्या उन्हातील वाटा, विसरले पथातील काटे" यामधील उन्हाच्या झळा आणि पायाखालील सापडणारे काटे - या शब्दांची नेमकी जाणीव सुरांतून दिली आहे. माडगूळकर किती अचूक शब्दरचना करतात - पहिल्याच ओळीत "डोंगर" "लेणे" आले असल्याने, पहिल्या अंतऱ्यात "भयावह" वाटणारी "गुहा" आता "स्वप्नासम" वाटते. यात आधीच्या ओळींचा संदर्भ घेऊन, तोच संदर्भ अधोरेखित करून आशय अधिक बांधीव केला. 

विसरल्या उन्हातील वाटा, विसरले पथातील काटे 
ही गुहा भयावह आता, स्वप्नसम सुंदर वाटे 
रसभाव भराला आले, काव्याहून लोभसवाणे 

चालीचा  मूळ गाभा लक्षात घेतला तर दुसऱ्या अंतऱ्याच्या स्वररचनेत फार काही बदल नाही. रचनेच्याच अंगाने काही हरकती वेगळ्या घेतल्या आहेत पण त्या देखील कवितेच्या अनुरोधानेच घेतल्या आहेत. कवितेतील शब्दांची जपणूक कशी करायची, यासाठी देखील हे गाणे एक सुरेख उदाहरण ठरावे. चालीत तोचतोचपणा येऊ नये पण चाल उगीचच अवघड होऊ नये - संगीतकार म्हणून डावजेकर इथे फार स्पृहणीय कामगिरी करतात. शब्दरचना सोज्वळ आहे तेंव्हा चालीचे "कुळशील" सुद्धा त्याच धर्तीवर असणे जरुरीचे आहे, हा विचार प्रधान आहे. 

बोलाविन घुमती वाद्ये तालात नाचते प्रीती 
शब्दाविण होती गीते बेभान भावना गाती 
हा लाभ अचानक झाला, हे कुण्या प्रभूचे देणे 

संगीतकार म्हणून दत्ता डावजेकरांचे मूल्यमापन करायचे झाल्यास, एकूणच समग्र कारकिर्दीचा व्यापक विचार  केल्यास, सांगीत गरजेपोटी शब्दांची ओढाताण वा करुतताच भंग करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी फार कमी वेळा घेतले. ताल शक्यतो पारंपरिक स्वरूपातच वापरले आणि शक्यतो भारतीय वाद्यांवरच भर ठेवला अर्थात अपवादस्वरूप काही गाणी आढळतात. गीताच्या आरंभी किंवा अंती लकेर  त्यांची लकब लक्ष वेधून घेते. अर्थात अशी लकब घेणे हे अगदी आरंभपुर्व कालखंडातील संगीतकारांसारखी आहे. सुरावटींबाबत त्यांनी मोजकेच तसेच लोकप्रिय राग आणि तत्सम वा त्यांच्यापासून सिद्ध होणाऱ्या भावनापूर्ण स्वरचौकटींकडे राहिला. महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण या चौकटी कटाक्षाने व शास्त्रोक्त राग म्हणून वापरतो असे अट्टाहास त्यांच्या चालीत जाणवत नाहीत. 

आकृती मनोहर इथल्या मी एक त्यातली झाले 
लावण्य बरसते येथे सर्वांग तयात मी न्हाले,
सौंदर्य जीवना आले, जन्माचे झाले सोने 
या आणि अशाच विधानांना पूरक असे हे प्रस्तुत गाणे आहे.