Thursday, 7 March 2019

हे बंध रेशमाचे

मराठी रंगभूमीला संगीत नाटकांची विलक्षण अशी समृद्ध परंपरा लाभलेली आहे. जवळपास ९० ते १०० वर्षांपासून मराठी रंगभूमी संगीत नाटकांनी गाजत आलेली आहे आणि आजही तुरळक का होईना, मराठी रंगभूमीवर संगीत नाटकाचे प्रयोग चालत असतात. अर्थात, सुरवातीच्या काळात, संगीत रंगभूमीवरील संगीत हे प्रामुख्याने शास्त्रोक्त रागांच्या चीजेवर आधारित बांधलेले असायचे आणि त्यालाच अनुरूप अशी काव्यरचना होत असे. याला पहिला छेद मिळाला, १९४० च्या दशकातील "आंधळ्यांची शाळा" या नाटकाने आणि पुढे १९६० च्या सुमारास आलेल्या "संगीत मत्स्यगंधा" या नाटकाने नवीन पायवाट रुजवली. पंडित जितेंद्र अभिषेकीबुवांनी मराठी संगीत रंगभूमीला संपूर्ण नवीन असे स्वरूप प्रदान केले. नवीन प्रकारच्या काव्यरचना - ज्याला रूढार्थाने कविता म्हणता येईल अशा रचनांना त्यांनी नव्या धाटणीच्या चालीने रंगभूमीवर सादर केले आणि एक नवे मन्वंतर घडवले. आपले आजचे गाणे " हे बंध रेशमाचे" गाणे, याच धाटणीवर पण तरीही मराठी भावगीतांच्या अंगाने बांधलेले आहे. सक्षम कविता, समृद्ध स्वररचना आणि आणि आशय अधिक खोलवर मांडणारी गायकी, असे वर्णन करता येईल. किंबहुना आपल्याला या गाण्याच्या निमित्ताने असे विधान करता येईल, पंडित जितेंद्र अभिषेकीबुवांनी मराठी संगीत रंगभूमीवर गायकी अंगाचाच पण भावगीतांचा नवीन आविष्कार सादर केला.  
नाट्यगीताच्या पारंपरिक ढंगाने, सुरवात केली आहे. मुखड्याच्या आधीच आलाप भैरवी रागिणीवर आधारित आहे पण, मुखड्याच्या शेवटच्या ओळीतील "रेशमाचे" शब्दातील "मा" अक्षरावरून पुढे सिंध भैरवी ऐकायला मिळते!! अर्थात आपण आशयाच्या दृष्टीने ऐकायला गेल्यास, एक गंभीर आणि सदृढ रचना ऐकायला मिळाल्याचा आनंद मिळतो. 
अभिषेकी बुवांनी मराठीतील काही उत्तम कवींच्या कवितांना रंगभूमीवर सादर केले. इथे, प्रस्तुत शब्दरचना ही शांताबाई शेळक्यांची आहे. शांताबाई शेळके, या मुळातल्या अतिशय गेयताप्रधान रचनाकार. शब्दार्थात शक्यतो कुठेही गूढार्थ अजिबात न आणता, सखोल आशयाची प्रचिती देण्यात अगदी हातखंडा म्हणावा, इतके प्रभुत्व मिळालेल्या कवियत्री. कविता म्हणून वाचायला गेल्यास, शब्द आणि ओळींतून अमुर्तपणे दिसू शकणारा लय, ही महत्वाची बाजू दिसते. खरतर शांताबाईंच्या कविता या, कविता या पातळीवर स्वतंत्रपणे आस्वादता येतील, इतक्या ताकदीच्या आहेत. त्यांच्या कवितेतुन नादाची, घाटाची आणि आशयाची अनंत चित्रे उभी राहतात आणि प्रत्येकवेळी त्यांची कविता नवनिर्मितीचा आनंद मिळवून देते. इथे पहिल्याच ओळीत प्रेमाची माहिती मांडताना, निरपेक्ष वृत्ती आढळते आणि तीच वृत्ती संपूर्ण कवितेभर कायम राखलेली दिसते परंतु तशी मांडणी  करताना,अंतर्मनातील वादळे दर्शविताना, काहीसे गूढ वर्णन केले आहे. ही तर सक्षम भावकवितेचीच लक्षणे म्हणायला हवीत. अर्थाचे अनेक पदर सुटतात तरीही नव्याने अर्थ गवसतात!! 

पथ जात धर्म किंवा नातेही ज्या न ठावे 
ते जाणतात एक, प्रेमास प्रेम द्यावे 
हृदयात जागणाऱ्या अति गूढ संभ्रमाचे 
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे 

वर म्हटल्याप्रमाणे अभिषेकीबुवांनी मराठी संगीत रंगभूमीवर अनेक प्रयोग केले. स्वररचनांची नवीन धाटणी निर्माण केली तसेच अनेक अनवट रागांचा वापर करून शास्त्रोक्त संगीतावरील प्रभुत्व सिद्ध केले. अगदी पाश्चात्य संगीताचा वापर देखील केला. मुळात, नाटकाची प्रकृती ध्यानात ठेऊन, त्यातील गीतांना चाली बांधल्या. नाट्यगीतांचा पारंपरिक ढाचा बदलून, स्वररचना "गीतधर्मी" केली. आता प्रस्तुत गाण्याची चाल ही भैरवीच आहे आणि या रागात असंख्य रचना तयार होऊन देखील, त्यांनी या गाण्याची चाल बांधताना स्वतंत्र वैशिष्ट्य राखले. 

विसरून जाय जेंव्हा माणूस माणसाला 
जाळीत ये जगाला, विक्राळ एक ज्वाला 
पुसतात डाग तेही धर्मांध आक्रमाचे 
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे 

नाट्यगीतांत बरेचवेळा एक दोष कायम आढळतो आणि तो म्हणजे शब्दांची मोडतोड करणे आणि याचे महत्वाचे कारण नाट्यगीत म्हणजे रागदारी चीजेचा लघुत्तम आविष्कार, अशी चुकीची असलेली समजूत. त्यामुळे रागदारी संगीतात जसे शब्दांना खुंटीवर टांगले  जाते,त्याचाच प्रभाव नाट्यगीत गायनात फार पडला. परिणामी, शब्दांचा कवितेच्या अंगाने आस्वाद घेणे जवळपास दुर्लक्षिले गेले. अभिषेकीबुवांनी याला संपूर्णपणे फाटा दिला. अर्थात, कुणीही उठावे आणि अभिषेकीबुवांची गाणी गावे, इतका फोफशेपणा कधीच आढळत नाही. स्वरविस्ताराच्या विपुल जागा सापडतात परंतु गायकी अंगाने गायचे म्हणजे संपूर्ण सप्तक आवाक्यात घ्यायचे किंवा अति जलद ताना, चक्रिकार ताना, मुर्घ्नी स्वर लावणे इत्यादी शास्त्रीय अलंकार न  वापरता,देखील गायन प्रभावीपणे करता येते, याचा आदिनमुना पेश केला. 

हे बंध रेशमाचे, ठेवी जपून जीवा 
धागा अतूट हाच, प्राणात गुंतवावा 
बळ हे दुर्बळांना देती पराक्रमाचे 
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे

गायक म्हणून मूल्यमापन करायचे  झाल्यास, ठाशीव शब्दोच्चार तसेच गाताना, अर्ध्या ताना तसेच भावगीतांच्या अंगाने केलेले गायन. प्रस्तुत गाणे तर फक्त ४ मिनिटांचे आहे - याचाच अर्थ भावगीताचा रंगमंचीय आविष्कार. गळ्याचा तारता पल्ला फार विस्तृत नाही तसेच शक्यतो ठाय लयीत आणि मंद्र आणि मध्य सप्तकात आवाज लावणे. अगदीच गरज पडली तर तयार सप्तकाला स्पर्श करायचा. हे गाणे  ऐकताना,स्वरविस्ताराच्या शक्यता जाणवतात आणि तरीही भावार्थाला अधिक महत्व दिल्याने, फक्त चालीतूनच गायकी आविष्कृत केली आहे. गायन अतिशय संयमित पद्धतीने केले आहे. परिणामी शब्दांचा मनावर गाढा परिणाम होतो.  या सगळ्याचाच दुसरा परिणाम म्हणजे भैरवी असून देखील पारंपरिक ठसा मनावर न उमटता, एखादी विदग्ध, संयत दु:खाची भावना जागृत होऊन,  मन भारून जावे, हेच खरेतर या गाण्याचे खरे वैशिट्य मानावे लागेल. 



Friday, 1 March 2019

इथेच आणि या बांधावर

काही गाणी का लोकप्रिय होतात आणि काही गाणी विस्मृतीत का जातात, या बाबत तसे ठाम ठोकताळे नाहीत. बरेचवेळा "लोकप्रियता" हा घासून गुळगुळीत आलेला शब्द वापरला जातो पण तरीही ते काही समाधानकारक उत्तर नव्हे. एक तर नक्की, "आता मी सर्वोत्तम चाल बांधतो" असे सांगून कुणीही संगीतकार अप्रतिम चाल बांधू शकत नाही. चाल शब्दांतून उमटते किंवा सुरांशी खेळात असताना अचानक निर्माण होते. त्याचा सुयोग्य पद्धतीने धांडोळा घेणे अशक्य!! बरेचवेळा असे देखील निदान केले जाते, लोकप्रिय झालेली चाल तितकीशी चांगली नसते किंवा सुंदर चाली तितक्याशा प्रसिद्ध होत नाहीत.  याबाबत अनेक शक्यता निघू शकतात. 
आजचे प्रस्तुत गाणे वरील सगळ्या शक्यतांना छेद देणारे आहे. गाणे आजही लोकप्रिय आहे आणि गाण्याच्या सगळ्या अंगाने बघितल्यास, गाणे हे "गाण्याच्या" पातळीवर उतरते. थोडक्यात, गाण्यातील १) शब्द, २) चाल आणि ३) गायन, या तिन्ही मूलभूत घटकांवर गाणे लखलखीतपणे समोर येते. आता या तिन्ही घटकांच्या आधारे या गाण्याबद्दल विचार करायला घेऊया. शब्दरचना कवी सुधांशु यांची आहे. "हणमंत नरहर जोशी" हे मूळचे नाव परंतु कविता लेखनासाठी त्यांनी "सुधांशु" हे नाव स्वीकारले. वास्तविक आयुष्यभर श्री दत्ताची  पूजा,पौराहित्य केले आणि आजही महाराष्ट्रात श्री दत्ताचे कवी म्हणूनच ख्यातकीर्त आहेत. कवी सुधांशु जरी दत्त भक्त होते तरीही त्यांनी "इथेच आणि या बांधावर" सारखी प्रणयरम्य शब्दरचना केली. याचाच वेगळा अर्थ, निर्मितीला कसलेही "लेबल" लावण्यात काहीही अर्थ नसतो. ही कविता लिहिली, तो काळ काहीसा स्वप्नाळू, धुंद असा काळ होता आणि त्यानुरुपच कवी सुधांशु यांनी ही कविता लिहिली आहे. कविता फार अर्थपूर्ण, गूढ वगैरे अजिबात नाही आणि ललित संगीताच्या आकृतिबंधाची तशी फार मागणी देखील नसते. कवितेत आलेली गेयता सहजस्फूर्त आणि काहीशी बाळबोध आहे. 

इथेच आणि या बांधावर अशीच शामल वेळ,
सख्या रे किती रंगला खेळ 

संगीतकार विठ्ठल शिंदे आहेत. विठ्ठल शिंदे वस्तूत: लोकगीतांचे संगीतकार म्हणून अधिक लोकप्रिय तरीही आपल्या पिंडाला बाजूला सारून त्यांनी अशी सुरेख स्वररचना सादर केली आहे. बासरीच्या हलक्या सुरांतून यमन सारख्या लोकप्रिय रागाचे सूचन करीत सुरवातीचा वाद्यमेळ बांधला आहे. जशी शब्दरचना तशीच स्वररचना आहे. संयत प्रणयाविष्कार आणि संध्याकाळची निवांत, शांत वेळ ध्यानात घेऊनच चाल बांधली आहे. चालीत कुठेही अवघड हरकत नाही की अवजड ताना नाहीत. तशा अलंकारांची गरजच नाही. अर्थात त्यावेळची सांगीत संस्कृती लक्षात घेता, भरमसाट वाद्यमेळ वगैरे चैनी मराठी ललित संगीताला परवडणाऱ्या नव्हत्या. त्यावेळची बहुतांश गाणी ऐकली तर एक ध्यानात येईल, गाणे  बांधताना,गाण्याची चाल बांधणे, याकडे संगीतकार आपले लक्ष वेधून घेत असत. चाल सुबोध असणे, ही गरज होती. यमन रागाच्या लडिवाळ सुरांवर हिंदोळे घेत, गाण्याची सुरवात होते आणि रसिकांचे लक्ष तिथेच वेधले जाते. मुखड्याची चाल काहीशी गतिमान ठेवली आहे आणि दुसरी ओळ, पहिल्याच्या दुपटीने घेतली आहे. अर्थात असे  करताना,कवितेतील आशय कुठेही दुर्लक्षिलेला नाही. 
  
शांत धरित्री शांत सरोवर 
पवन झुळझुळे शीतल सुंदर  
अबोल अस्फुट दोन जीवांचा अवचित जमला मेळ 

पहिला अंतरा शब्दार्थाने बघितला तर मी वरती जे साधे, सुबोध शब्द वापरले, त्याचीच प्रचिती देणारा आहे. गाण्यातील तिन्ही अंतरे एकाच चालीत बांधले आहेत. तसेच "उठावण" घेताना सुद्धा कुठेही "जोर" लावलेला नाही. "शांत धरित्री, शांत सरोवर" या शब्दांतून मांडलेली शांतता, संपूर्ण चालीतून दृग्गोचर होते. 

रातराणीचा गंध दरवळे 
धुंद काहीसे आतून उसळे 
चंद्र हासला, लवली खाली नक्षत्रांची वेल 

गायिका म्हणून माणिक वर्मांचे विश्लेषण करायचे झाल्यास, या गायिकेने उत्तर भारतीय संगीताचा ढंग सफाईने मराठी ललित संगीतात आणला. त्यांच्या अनेक कृष्णगीतांत याचे प्रत्यंतर येते. पंजाब अंगाची फिरत पण मादकपणाशिवाय. गायनात नखरा आहे पण अगदी लखनवी घराण्याचा नाही. बनारसी ठुमरीच्या ढंगाजवळ जाणाऱ्या प्रसरणशील चालींची भावगीते, हा त्यांचा खास आविष्कार म्हणावा लागेल. मुखडा किंवा अंतरा, खालच्या अंगाचा असला तरी (जसा इथे आहे) पहिली लकेर सफाईने खालून वर जाणार. इथे पहिल्या अंतऱ्यातील " पवन झुळझुळे शीतल सुंदर " नंतर " अबोल अस्फुट दोन जीवांचा अवचित जमला मेळ" ही ओळ घेताना, वरील विधानाचे प्रत्यंतर येते. तसेच " अवचित जमला मेळ " किंवा " नक्षत्रांची वेल " याची द्विरुक्ती करताना छोटासा आलाप घेतलेला आहे, तो बनारसी ढंगाची आठवण करून देतो. 

पहाटच्या त्या दवांत भिजुनी 
विरली हळूहळू सुंदर रजनी 
स्वप्नांसुमांवर अजुनी तरंगे, ती सोन्याची वेळ 

आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास संदिग्ध आणि घरंदाज गोडवा!! माणिक वर्मांच्या गालातच तशी नैसर्गिक देणगी असल्याप्रमाणे, गळ्यातून गोडवा बाहेर पडतो. या गायिकेचे कुठलेही गाणे ऐकायला घेतले तरी कुठेही छचोरपणा, नटवेपणा नसतो. घरगुतीपणाचा सोज्वळ गंध कायम आवाजात राहिला आणि त्यामुळेच बहुदा माणिक वर्मांना भावगीत गायिका म्हणून अमाप लोकप्रियता मिळाली. गायन करताना कुठेही अकारण नाट्यमयता आणण्याचा प्रयास नसतो. किंबहुना सर्वसमावेशकता हाच गुण प्रामुख्याने ऐकायला मिळतो. त्यामुळे गायकीचा "असर" दिसला नाही तरी वृत्तीचा परिणाम दिसतो. याच गुणांचा आढळ या गाण्यातून सर्वत्र पसरलेला दिसतो. म्हणूनच बहुदा आजही या गाण्याची लोकप्रियता तितकीच आहे जितकी अर्धशतकापूर्वी होती. 


Sunday, 17 February 2019

अजून त्या झुडुपांच्या मागे

मागील शतकात, आपल्या आयुष्यात दूरदर्शनचा प्रवेश होण्यापूर्वी रेडियोचे, मनोरंजन म्हणून स्थान बरेच वर्षे अबाधित होते - आजही बरेचजण सतत रेडिओ ऐकत असतात पण एकूण प्रमाण कमीच झाले आहे. माझा तेंव्हा देखील ऐकण्याचा भर म्हणजे मराठी गाणी. अशावेळी कधीतरी अचानक, "भावसरगम" कार्यक्रम ऐकला आणि तो कार्यक्रम ऐकायची सवयच लागली. "भावसरगम" कार्यक्रमाने मराठी ललित संगीतात प्रचंड भर टाकली. एक संपूर्ण पिढी घडवली, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा, इतका प्रभाव रसिकांवर पडला होता. कितीतरी नवे संगीतकार, नव्या दमाचे कवी, गायक/गायिका यांना अतिशय विपुल प्रमाणात संधी मिळाली. याच पंक्तीत मानाचे स्थान मिळवणारे संगीतकार - दशरथ पुजारी!! संगीतकार म्हणून त्यांचे मूल्यमापन आपण नंतर करू पण त्याआधी गाण्याकडे वळूया. 
गाण्याची चाल स्पष्टपणे यमन कल्याण रागावर आधारित आहे. गाण्याच्या सुरवातीलाच सतारीच्या सुरांमधून या रागाचे सूचना मिळते. अर्थात, ललित संगीताच्या शिरस्त्याप्रमाणे चाल, रंगापासून काहीशी दूर जाते पण ते तर ललित संगीताचे प्रधान वैशिष्ट्य आहे. सतारीचे सूर किंचित्काळ ऐकायला मिळतात आणि लगोलग, गायक म्हणून खुद्द दशरथ पुजारी अवतरतात. गाण्याची चाल सुबोध आहे पण कविता म्हणून वाचायला गेल्यास, शब्दरचना देखील तशीच  साधी,सरळ आहे. संयत प्रणयाचाच काळ होता आणि त्यानुरुपच गाण्यातील प्रणयाची जी काही धिटाई असायची ती , निसर्गाच्या प्रतिमांतूनच आपल्या समोर यायची. पहिल्याच ओळीत, "सदाफुली" सारख्या सध्या फुलाचे प्रतीक घेतले असल्याने, पुढे त्याच प्रतिकाला धरूनच शब्दरचना येणार, याचा अंदाज घेता येतो. कवितेतील फुले म्हणून जी निवडली आहेत, ती बघितली तर वरील विधानाचा अर्थ समजून घेता येईल. "सदाफुली","शेवंती", "मोगरा" ही फुले तशी सामान्य जनांच्या जिव्हाळ्याची फुले आहेत आणि सहजपणे कुठेही दृष्टोत्पत्तीस पडतात, परिणामी सगळीच रचना ही सुबोध झाली आहे. कुठेही फार प्रयोग केलेले आढळत नाहीत म्हणजे नवीन वाद्ये, लयीचे वेगळे बंध किंवा लयच अति अवघड बांधणे इत्यादी. गाण्यात चालीच्या कुलशीलाला योग्य अशीच शब्दकळा आहे. चाल सहजपणे गुणगुणता येण्यासारखी असल्याने रसिकांच्या मनात बसली.  इथे एक बाब स्पष्ट करावीशी  वाटते,साधी चाल बांधणे हे कधीच साधे, सहजशक्य नसते. त्यासाठी संगीताचा व्यासंग तितकाच भरीव असावाच लागतो. 

अजून त्या झुडुपांच्या मागे 
सदाफुली दोघांना हसते 
अजून आपुल्या आठवणींनी 
शेवंती लजवंती होते 

गाण्यात साधा आणि ललित संगीतात प्रसिद्ध असलेला केरवा ताल वापरलेला आहे. आता यानिमित्ताने संगीतकार दशरथ पुजारीचे मूल्यमापन करायचे झाल्यास, खंत अव्यक्तपणे व्यक्त करणे, अंतर्मुखता आणि हळवी असहायता तसेच मुग्ध व संयत अभिव्यक्तता सिद्ध करणे होय. संगीतकाराचा कां बहुदा पारंपरिक वा रूढ संगीताचे वळण पसंत करतात असे म्हणता येईल - पण त्यातूनच गुणगुणण्यासारख्या चाली निर्माण करतात, ही बाब खास प्रशंसनीय म्हणावीच लागेल. एक बाब स्पष्टपणे जाणवते ,आपल्या श्रोत्यांचे लक्ष  वेधण्यासाठी या संगीतकाराने फारसे काही उलटे-पालटे  केले नाही. 

तसे पहाया तुला मला  ग 
अजून दवबिंदू थरथरतो 
अर्ध्यामुर्ध्या कानगुजास्तव 
अजून ताठर चंपक झुरतो 

हाच अंतरा ऐकायला घेतल्यास, वरील विधान आपल्याला पटू शकेल. अस्ताईची चाल तशी कायम ठेवली आहे आणि संथपणे, चालीतील मूळ गोडवा कायम ठेऊन, तशीच चालू ठेवली आहे आणि मुळातल्या गोडव्यावर सगळी भिस्त ठेवली आहे. म्हटले तर यात काहीच नावीन्य नाही परंतु त्याचबरोबर चालीत गोडवा निर्माण करणे, हे सृजनाचे लक्षण मानावेच लागेल. त्याचजोडीने आपण कवितेकडे लक्ष वेधले असल्यास, शब्दकळा देखील अतिशय साधी, मुग्ध प्रणयालाच साजेशी आहे. कवी वसंत बापटांची कविता आहे. "दवबिंदू थरथरतो" किंवा "ताठर चंपक झुरतो" यातून आशयाची भावव्यक्तीच समोर येते. सुरवातीलाच मी एक विधान केले  होते,निसर्गातील फुलांचा प्रतिमात्मक वापर करताना, उदाहरण म्हणून नेहमीच्याच वापरातील फुलांचा वापर केला आहे. त्यामुळे असेल पण संगीतकाराने चाल निर्मिती करताना, हाच दृष्टिकोन समोर ठेवला असावा. 

अजून गुंगीमध्ये मोगरा 
त्या तसल्या केसांच्या वासे 
अजून त्या पात्यांत लव्हाळी 
होतच असते अपुले हांसे 

गायक म्हणून दशरथ पुजारी यांचे विश्लेषण करताना, काहीसा सपाट विनावक्र असा गळा म्हणता येईल. गाण्यावर शास्त्रोक्त संगीताचे संस्कार झाल्याचे जाणवत नाही (खरे तर हा मुद्दा विवादास्पद म्हणायला हवा!!) त्यामुळे गाताना एखादीच छोटीशी हरकत घेऊन, मूळ चालीतील काहीसे "वेगळे अंग" दाखवले जाते. कवितेची प्रकृती ध्यानात घेता आणि चालीचे शील लक्षात घेता, गायनात अवघड हरकती घेण्याची काहीच गरज भासत नाही. तांत्रिक बाजूने लिहायचे झाल्यास, आवाजाचा पल्ला फारसा विस्तृत नाही आणि त्याची परिणामकारकता मध्य सप्तकापुरतीच मर्यादित आहे. परंतु आवाजात काहीशी आश्वासकता किंवा सांत्वन करण्याचा धर्म आहे. "अजून गुंगीमध्ये मोगरा" ही ओळ गायल्यावर लगोलग छोटासा आलाप घेतला आहे आणि हा आलापच त्यांच्या गायकीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून मानता येईल. 

अजुनी फिक्कट चंद्राखाली 
माझी आशा तरळत आहे 
गीतांमधले गरळ झोकुनी 
अजून वारा बरळत आहे 

संगीतकार म्हणून आणखी काही विधाने करायची  झाल्यास, त्यांनी आपल्या कारकिर्दीत नेहमीच साध्या, सामान्य श्रोत्यांसाठी रचना करण्यात समाधान मानले. भारतीय व्यापक संगीत परंपरेत वाढलेला साधा श्रोता देखील संतुलित श्रोता असतो. ललित संगीत पारंपरिक की नवीन, याची फारशी चर्चा न करता त्यांची सांगीतिक गरज भागू शकते आणि असा वर्ग आपल्या समाजात फार मोठ्या प्रमाणावर असतो. तेंव्हा या गाण्याचे खरे यश अशा संगीत रचनेत दडलेले आहे, हे मान्यच करायला लागते. 



Friday, 1 February 2019

केळीचे सुकले बाग

मराठी भावगीतात स्वररचना करण्यासाठी, अनेक संगीतकारांनी, बरेचवेळा, ज्यांना रूढार्थाने "गीतकार" म्हणता येणार नाही अशा कवींच्या कवितांना स्वरबद्ध करून, भावगीत हा अविष्कार खऱ्याअर्थाने श्रीमंत केला. ही परंपरा फार जुनी आहे पण त्यामुळे रसिकांना अनेक उत्कृष्ट कवितांचा आस्वाद घेणे सहजशक्य झाले, हे मात्र निर्विवाद. निव्वळ कवितेचा आस्वाद घेणे, हे बऱ्याच रसिकांना जमत नाही, अवघड जाते किंवा त्या बाजूला वळतच नाहीत. खरंतर कविता वाचन हा अतिशय तलम, मुलायम आणि अनिर्वचनीय असा वाचनानुभव असतो पण त्यासाठी मनाची एक ठराविक पातळी तयार करणे आवश्यक असते आणि तिथेच बहुतेकजण मागे फिरतात. अशावेळी, अशीच एखादी समृद्ध कविता, स्वरबद्ध होऊन आपल्यासमोर आली तर लगेच त्या कवितेबद्दल मनात आवड निर्माण होण्याची शक्यता असते. इथे आणखी एक मुद्दा मांडता येईल. जे सजग वाचक असतात, त्यांच्या दृष्टीने, संगीतकाराने लावलेला अन्वयार्थ नव्याने आकळून घेण्याची नवीन संधी असू शकते, असते देखील. अखेरीस, संगीतकार हा देखील एक सजग वाचक असतोच. 
कवी अनिल हे मराठीतील एक प्रतिथयश नाव. मराठीत मुक्त छंद रूढ करण्यामागे कवी अनिल यांचे फार मोठे योगदान आहे. एकूणच कवितेबाबत काही लिहायचे झाल्यास, कविता वाचताना, मनावर नेहमी परिणाम होतो तो अत्यंत अनुरूप अशा शब्दांचा, शब्दांच्या योजनेचा, अभिव्यक्तीत घडणीचा, बांधणीचा, कविता नेहमी शब्दांच्याच आधाराने वाढते, किंबहुना तेच कवितेचे अस्तित्व असते. चांगल्या अभिव्यक्तीचा एक गुण नेहमी सांगितला जातो - तिचं स्वतंत्र अस्तित्व भासू नये, त्याने आशयांत पूर्ण विलीन व्हावे. ही कविता वाचताना, याचा प्रत्येक ओळीत आपल्याला असा अनुभव येतो. चांगल्या भावकवितेतील भावनाशयासंबंधी काहीं लिहिणे मुळातच फार कठीण असते कारण तिच्यातून जाणवणारा एखाद्या भाववृत्तीचा अनुभव हा संमिश्र असूनही संश्लेषणात्मक, तरल आणि विशिष्ट स्वरूपाचा असतो. आणि त्यामुळे गद्यात तो अनुभव नेमक्या शब्दांत मांडणे फारच अवघड होऊन बसते. 
कविता म्हणून पहिल्याच ओळीतील "केळीचे बाग" हे प्रतीक घेऊन आणि त्यालाच केंद्रस्थानी ठेऊन, एका अंतस्थ आणि विमनस्क मनोवस्थेचे चित्रण आढळते. भावकवितेबाबत तर ही बाब फारच महत्वाची ठरते. अशा कवितेला स्वरबद्ध करायला घेण्याची उर्मी मनात येणे, इथेच संगीतकार यशवंत देवांनी आपल्या निवडकौशल्याचा मासलेवाईक नमुना पेश केला आहे. यशवंत देव हे जरी हाडाचे संगीतकार असले तरी त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत आणि त्यामुळे कविता निवडीबाबत त्यांची स्वतः:ची अशी खास नजर तयार झाली आहे. यशवंत देवांची कुठलीही रचना ऐकायला घेतली काही बाबी ठळकपणे दिसून येतात. शब्दरचनेतील प्रासादिकता, गेयता तसेच कवितेतील आशय (इथे फक्त देवांचाच विचार!!) ध्यानात घेऊन निर्मिलेली स्वररचना. स्वररचना करताना शब्दांना शक्यतो कुठंही ओरबाडायचे नसून, त्यातील ऋजू भाव नेमकेपणाने स्वरांतून मांडायचे, हा प्रधान विचार दिसतो.  

केळीचे सुकले बाग असुनिया पाणी 
कोमेजली कवळी पानं असुनी निगराणी 

गाण्याची सुरवात ही लगेच होते म्हणजे मुखड्याआधीचे पार्श्वसंगीत वाजते, असा प्रकार नसून सरळ गायिकेचाच सूर आपल्या कानावर पडतो. गायिका म्हणून हे एका अर्थाने अवघडच असते पण तरीही गाण्याच्या पहिल्या क्षणापासून रसिकांना कवितेची ठाम ओळख पटवून द्यायची, हा देखील विचार समजून घेता येतो. मुखडा बांधताना, संगीतकाराने "केळीचे सुकले बाग" हेच शब्द वारंवार घेतले आहेत - अर्थ एकच, केळीच्या बागांचे जे प्रतीक कवीने मध्यवर्ती ठेवले आहे , त्याचीच सुरांतून रास्त जाणीव करून देणे होय. पार्श्वभागी वाजत असलेल्या सतारीच्या सुरांतून ही जाणीव अधिक गडद करून दिली आहे. नीट ऐकल्यावर कळू  शकेल,हेच शब्द परत घेताना, त्याला वेगवेगळ्या हरकतींची जोड दिली आहे. "शब्दप्रधान गायकी" ही अशी असते. "असुनी निगराणी" हे शब्द सुद्धा दोन वेळा घेतले आहेत. कवितेचा आशय ध्यानात घेतला तर या पुनरावृत्तीचा नेमका अर्थ लक्षात घेता येतो. 

अशी कुठे लागली आग जळती जसे वारे 
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे 

पहिला अंतरा सुरु होण्याआधी सतार आणि बासरी (अर्थात साथीला तबला आहेच) या दोनच वाद्यांनी निर्मिलेला स्वरावकाश ऐकण्यासारखा हे, ज्यातून एकतर पुढील चालीचे सूचन तर मिळतेच पण शब्दातील भावाशयाचे दर्शन घडू शकते. पहिल्या अंतऱ्याच्या ओळीतून, ध्रुवपदाच्या ओळींतील भावना अधिक तीव्र, विखारी होते तेंव्हा अशा शब्दांना त्याच प्रत्ययी सुरांची जोड देताना, तशाच भाववृत्तीची सांगड घातली गेली आहे. यशवंत देव कवितेकडे कशा नजरेने बघतात, याचा हा एक नमुना!! 

किती दूरची लागे झळ आंतल्या जीवा 
गाभ्यातील जीवनरस, सुकत ओलावा 

हा दुसरा अंतरा मात्र अगदी वेगळ्या "उठावणीने" घेतलेला आहे. त्यातही "दूरची" गाताना किंचित लांबवलेला सूर, माझ्या वरील विवेचनाला सिद्ध करतो. पुढील शब्द "झळ" याची हताशता अचूक सुरांतून मांडली आहे. ऐकण्यासारखे आहे - आधीचे शब्द "किती दूरची लागे" + "झळ"!! एकाच भावनेचे प्रकटीकरण परंतु सुरांतून दाखवताना, तीच भावना अधिक तीव्र कशी  होईल,याकडे वेधलेले आपले लक्ष. या अंतऱ्यातील दुसरी ओळ घेताना, "सुकत ओलावा" मधील "शुष्कपणा" तितकाच सुंदर!! 

किती जरी घातले पाणी, सावली केली 
केळीचे सुकले प्राण बघुनी भवताली 

गायिका म्हणून उषा मंगेशकरांनी वेगळी ओळख देण्याचे काहीच कारण नाही. गायिका म्हणून मूल्यमापन करायचे झाल्यास, गळ्याचा पल्ला फार मोठा नाही तसेच दीर्घ, अवघड हरकती घेताना काहीसे चाचपडलेपण जाणवते तरीही शब्दांची अचूक जाण, चालीतील मध्यवर्ती असलेला गोडवा टिपण्याची शक्ती, आणि शक्यतो मध्य सप्तकात अतिशय सुरेलपणे गायन करणे!! ही चाल तर उघडपणे "गायकी" अंगाने वावरणारी आहे तरीही चालीचे "वजन" अचूकपणे गळ्यावर पेलल्याचे समजून घेता येते. अर्थात घरातील दोन बहिणींच्या सावलीतच त्यांनी वावरणे पसंत केले. त्यापेक्षा अधिक काही करता येणे या गायिकेला अशक्यच होते.