Monday, 20 July 2015

दयार्द्र पिलू

आदल्या रात्रीच्या जागरणाने डोळ्यांवर गुंगी यावी पण झोप दूर असावी, आसमंत निरव शांत असावा, आकाश निरभ्र असावे आणि कानावर "पिलू" रागाचे स्वर यावेत!! आपोआप डोळे मिटण्याची क्रिया सुरु होते. पिलू रागच असा आहे,, स्वर ऐकताना मनावर गुंगीचे साम्राज्य पसरते. "रिषभ" वर्जित स्वर (आरोही सप्तकात) परंतु "गंधार","मध्यम" आणि "निषाद" दोन्ही प्रकारे लागतात. "धैवत" स्वराचा किंचित वापर. शास्त्रात हा राग "औडव-संपूर्ण" असा दर्शविला आहे आणि तो केवळ, या "धैवत" स्वराच्या स्पर्शाने!! "गंधार" आणि "निषाद" हे वादी-संवादी स्वर. अर्थात हा झाला रागाचा  तांत्रिक भाग. रागाचे स्वर आणि लिपी कितीही अर्थवाही असली तरी त्याला एक ठराविक मर्यादा असते. म्हणजे ज्यांना स्वरज्ञान आहे, त्यांनाच ही भाषा समजून घेता येते अन्यथा इतरांना ही भाषा अगम्य असते. खरतर पिलू रागाचे "टेक्श्चर" बघायला गेले तर इथे प्रणय, करुणा, भक्ती समर्पण इत्यादी सगळ्या भावनांचा कल्लोळ ऐकायला मिळतो. 
गमतीचा भाग असा आहे, हा राग फारसा मैफिलीत गायला जात नाही म्हणजे जसे यमन, भूप हे राग सलग तासभर आळवले जातात, तशा प्रकारचे सादरीकरण या रागाचे होत नाही, बहुतांशी, ठुमरी, दादरा, होरी अशा उपशास्त्रीय संगीत प्रकारातून हा राग मांडला जातो. अर्थात, चित्रपट गीत आणि भावगीत, यांत मात्र अपरिमित पसरलेला आहे. 


बेगम परवीन सुलताना यांची एक रचना इथे ऐकता येईल. बेगम साहिबांचा आवाज म्हणजे तानेला कुठेही अटकाव म्हणून नाही. तरीही तार सप्तकात अधिक आनंद घेणारी गायकी. ज्या सहजतेने, ताना आणि त्याच्या जोडीने हरकती येतात, ते खास ऐकण्यासारखे आहे. एकतर तार स्वरात जाणे, हीच गळ्याची एक कसोटी मानली जाते पण इथे तर, तार स्वरात जाताना आणि तिथे ठेहराव घेताना, त्यालाच जोडून एखादी हरकत घेण्याची असामान्य करामत करण्याची क्षमता थक्क करते. या रागात आणखी एक मजा आढळून येते. मैफिलीत हा राग, फारसा गायला जात नाही, वादक मात्र वाजवताना आढळतात. 


इथे आपण उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांची या रागातील एक रचना ऐकुया. उस्तादांचा लडिवाळ स्वर तसेच सगळ्या सप्तकात सहज फिरणारा गळा, त्यामुळे ही रचना केवळ संस्मरणीय झाली आहे. क्षणात मंद्र सप्तकात तर पुढल्या क्षणी तार सप्तकात जाउन, परत समेवर ठेहराव घेण्याची पद्धत तर लाजवाब!! "सैय्या बोलो" ही रचना म्हणजे पिलू रागाची ओळख, इतकी प्रसिद्ध रचना झाली आहे, ती काही उगीच नव्हे. उस्तादांच्या गायकीची सगळी वैशिष्ट्ये या सादरीकरणात ऐकायला मिळतात. या रचनेतील, हरकती तर इतक्या विलोभनीय आहेत की प्रत्येक वेळेस, फार बारकाईने ऐकाव्या लागतात. तेंव्हाच स्वरांचा "डौल" समजून घेता येतो. "पतियाळा" घराण्याची सगळी सगळी "खासियत" या गायनातून स्पष्टपणे ऐकायला मिळते. 


आत्ता मी जे गाणे इथे टाकले  आहे,ते एकूणच "पिलू" रागाच्या स्वभावात बसणारे नाही. खरतर हेच खासियत, सुगम संगीताची आहे. रागातील एखादी हरकत,  एखादा स्वर, संगीतकाराला नेमका भावून जातो आणि गाण्याची "तर्ज" निर्माण होते. त्यामुळेच गाण्याची चाल आणि त्याचे "मूळ" शोधणे, बरेचवेळा आवाक्याबाहेरचा शोध होतो. मुळात, मन्ना डे यांचा अत्यंत सुरेल स्वर आणि त्याला मिळालेली कव्वालीबाजाची चाल. त्यामुळे हे गाणे फारच सुरेख जमून गेलेले आहे. गाण्याच्या पहिल्या हुंकारापासून हे गाणे सुंदरपणे "चढत" जाते. प्रत्येक स्वर खणखणीत, सुरेल आणि योग्य त्या शब्दावर अचूक वजन, त्यामुळे कव्वाली असली तरी अतिशय खेळकर रचना होऊन जाते. 


लगान चित्रपटातील गाणे आहे. गाण्याचा बाज, लोकसंगीतावर आधारित आहे. तसे थोडे बारकाईने बघितले तर, पिलू रागात, चैती, ठुमरी, होरी किंवा पुरबी सारख्या असंख्य रचना ऐकायला मिळतात. एका दृष्टीने बघितल्यास, चैती, पुरबी किंवा होरी, ह्या सगळ्या उत्तर भारतातील लोकसंगीतातून पुढे शास्त्रीय स्वरूपात, स्थानापन्न झालेल्या आहेत. त्यामुळे, पिलू रागात, या रचनांचा "मूलस्त्रोत" सापडणे साहजिक आहे. अर्थात, गाण्याची चाल रेहमानची आहे आणी अर्थात, त्याच्या प्रकृतीनुसार गाण्याची  बांधणी केली आहे. सुरवातच लोकसंगीताच्या आधारावर झाली आहे. गाण्यात, रेहमान, अलका याज्ञिक, उदित नारायण, सुखविंदर सिंग, शंकर महादेवन असे दिग्गज आवाज आहेत. गाण्याच्या पहिल्या अंतऱ्यानंतर पिलू रागाची सावली ऐकायला मिळते. 
गाणे केरवा तालात आहे पण तालाचे वादन अगदी अनोखे आहे. वास्तविक आपण, भारतीय ताल म्हणजे पारंपारिक तबला नजरेसमोर ठेऊन अदमास घेत असतो परंतु संगीतकार , जर व्यासंगी, अभ्यासू असेल तर, गाण्यात वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि या गाण्यात रेहमानचे हेच वैशिष्ट्य ऐकायला मिळते. साधारणपणे समूह गीत म्हटले की वैय्यक्तिक गायकीला अवसर कमीच मिळतो पण इथे संगीतकाराने त्याची योग्य ती काळजी घेतली असल्याने गाणे श्रवणीय होते. 


पिलू रागातील हे आणखी असेच आनंददायी गाणे. चित्रपटातील प्रसंग ध्यानात घेऊन, त्यानुरूप गाण्याची रचना  करण्यात, जे फार थोडे संगीतकार आहेत, त्या यादीत एस. डी. बर्मन यांचा  क्रमांक लावावा लागेल. विशेषत: हाती असलेली चाल, फुलवायची कशी याचे असामान्य भान या संगीतकाराकडे होते त्या दृष्टीने, हा  संगीतकार,हाडाचा चित्रपट गीतांचा संगीतकार होता, असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. आता हेच गाणे बघूया. सुरवातीला किती लडिवाळ आलाप आहे आणि त्यातूनच पिलू रागाचे सूचन होते. पुढे चाल वेगळी सरते आणि स्वतंत्र जन्म घेते, हा भाग वेगळा. गाण्यातील सतारीची गत देखील फार वेधक आहे. गाणे तसे मध्य लयीत सुरु होते पण, पुढे चाल विस्तारित होताना, लय देखील जलद होते आणि पार्श्वभागी असणारा वाद्यमेळ देखील. अर्थात असे कितीही वेगवेगळे बदल झाले तरी समेवर येताना, जो सूर पकडून गाणे परतते, तो भाग विलक्षण सुंदर आहे. 

आता पर्यंत आपण या रागाची अनेक रूपे बघितली, काही रागाच्या स्वरावलीशी थोडे फटकून तरीही श्रवणीय रचना ऐकल्या. या लेखाच्या सुरवातीला, मी म्हटले होते, या रागाचे स्थूल स्वरूप हे शांत, रमणीय असे आहे. प्रणयी भावना या रागात फार खुलून येते. अशीच अतिशय शांत आणि केवळ अजोड रचना म्हणावी, असे एक गाणे ऐकणार आहोत. ही गाणे म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील अंगाईगीतातील "मानदंड" आहे आणि आज इतकी वर्षे झाली तरीही या गाण्याची खुमारी रतिभर देखील ओसरत नाही. गाण्यातील, लय, गोडवा इतका अश्रूत आहे की, आपणही या गाण्यात कधी गुंगून जातो, याचा पत्ताच लागत नाही. 


"धीरे से  आजा री अखियन मी निंदिया" हेच ते अजरामर गाणे. या गाण्याचा ठेका - दादरा आहे पण, तालाचे बोल आणि वापर किती वैशिष्ट्यपूर्ण आहे बघा. अंगाईगीत आहे तेंव्हा गाण्याचा ताल देखील डोक्यावर हळुवार थोपटल्यासारखा आहे, जेणे करून झोपी जाणारी व्यक्ती विनासायास झोपेच्या आधीन होईल. गाण्याचे शब्द देखील सहज, सुंदर, कुणालाही कळण्यासारखे आहेत. "निंदिया" आणि "निन्दियन" या शब्दातील श्लेष बघण्यासारखा आहे. पिलू राग किती अप्रतिम आहे, याचे हे गाणे म्हणजे अप्रतिम उदाहरण ठरेल. तसे पाहिले तर, पिलू रागाचे स्वर, चलन हे, या गाण्यापासून फारकत घेणारे आहे पण तरीही नाते जोडणारे आहे. चाल, गायन, वाद्यमेळ या सगळ्याच दृष्टीने हे गाणे अभ्यासनीय आहे. 
लेखाच्या सुरवातीला, मी झोपेच्याच अंगाने चार शब्द लिहिले आणि आता, अशाच असामान्य अंगाईगीताने, या लेखाचा समारोप करणे योग्य ठरेल. 
पिलू रागात आणखी काही सुंदर गाणे आहेत. त्याच्या लिंक्स खाली देत आहे. 

१] अब के बरस भेज 

२] चंदन का पलना 

३] मैने शायद तुम्हे पहले भी कभी 

निसर्गरम्य पहाडी!!

डोंगर उतरणीवरून खाली येताना, मागून चंद्र उगवावा आणि पायाखालची वाट उजळून जावी. आजूबाजूला हिरवी झाडी आणि प्रचंड वृक्षांची साथ असावी आणि बाजूनेच एखादा पाण्याची ओहोळ आपल्या निरव आवाजाने साथ देत असावा. आसमंतात अन्य कुठलाच आवाज नसावा. अशा वातावरणात बहुदा "पहाडी" रागाचा जन्म झाला असावा. अर्थात, निसर्ग आणि प्रदेश याचे ओतप्रोत दर्शन या रागातून सतत झुळझुळत असते. किंबहुना लोकसंगीताशी इतके जवळचे नाते राखणारे जे थोडे फार राग आहेत, त्यात पहाडी राग, फार वरच्या क्रमांकावर आहे. हिरव्या जर्द झाडीतून स्त्रवणाऱ्या आणि त्याला मिळणाऱ्या खळखळणाऱ्या पाण्याच्या नादाशी नाते जुळवणाऱ्या सुरांशी या रागाचे फार जवळचे साहचर्य आहे. मुळात निसर्ग  काहीतरी सुचवित असतो आणि अशावेळी जर का आपण निसर्गाशी जवळीक निर्माण करण्याची इच्छा दाखवली तर निसर्गच जणू, आपल्याला पहाडी रागाचे सूर पुरवित असतो. इतके या रागाचे निसर्गाशी अतूट नाते आहे. 
थोडे तांत्रिक भाषेत लिहायचे झाल्यास, "भूप" रागातील "मध्यम" स्वराला "षडज" मानून पुढे सगळी स्वरावली निर्माण होते. या रागात सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागत असले तरी बरेचवेळा "कोमल धैवत" वापरून, या रागात गंमत आणि वैविध्य निर्माण केले जाते. या रागाचे चलन पाहिल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते. हा राग मंद्र सप्तकात किंवा शुद्ध स्वरी सप्तकात अधिक खुलतो. अर्थात, लोकसंगीतात बरेचवेळा स्वरांच्या आकृतीबंधाबाबत जसे स्वातंत्र्य घेतले आज्ते तसाच प्रकार या रागाबाबत घडतो. याचा परिणाम असा झाला, चित्रपट गाणी किंवा एकूणच सुगम संगीतात, या रागावर आधारित गाणी भरपूर आढळतात. काही नकलाकार यात "कोमल गंधार" आणि "कोमल निषाद"  वापर करतात आणी या रागाचे सौंदर्य अधिक खुलवून मांडतात. 
इथे आणखी एक मत मांडावेसे वाटते. तसा पहाडी राग "अटकर" बांध्याचा आहे. यमन, मालकंस प्रमाणे याचा विस्तार अफाट पसरलेला नसल्याने, बरेचवेळा हा राग "धून" स्वरूपात ऐकायला मिळतो. याच मुद्द्याला धरून आपण इथे पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी सादर केलेली पहाडी ठुमरी ऐकुया. 


भारतीय संगीतातील जी प्राचीन वाद्ये आहेत, त्यात बासरीचा समावेश होतो. मुळातले हे सुषिर वाद्य, भारतीय रागदारी संगीतात स्थिरावले, ते पंडित पन्नालाल घोष यांनी पण त्याचा जागतिक विस्तार केला तो मात्र पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी. पंडितजींची वाद्यावरील पकड इतकी असामान्य आहे की, ऐकताना माणसाला चक्क गुंगी येते!! इथे त्यांनी जी ठुमरी सादर केली आहे, त्यात, ठुमरीचा नखरा तर आहेच पण त्याचबरोबर सूरांतील हळवेपण देखील लगेच दृग्गोचर होते.सुरवातीची जी आलापी आहे, ती बारकाईने ऐकले तर ध्यानात यावे. पुढे जेंव्हा गत सुरु होते तेंव्हा मात्र एका असामान्य गायकाच्या ठुमरीची आठवण येते. अर्थात, त्या ठुमरीच्या अंगाने जरी वादन झाले असले तरी देखील, त्यात स्वत:चा असा खास विचार दिसतो. सुरवातीच्या समेवरील आलापीनंतर, एकदम "कोमल गंधार" जो लागतो, तो विलक्षण आहे. 

आता, मघाशी मी ज्या असामान्य गायकाची आठवण करून दिली, त्या उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांच्या "तोरे तिरछी नजरिया के पार" या ठुमरीचा आस्वाद घेऊया. 


पतियाळा घराण्याचे अध्वर्यू म्हणून या गायकाचे वर्णन करता येईल. आवाजात थोडासा खर्ज पण तरी वरच्या सप्तकात सहज विहार करणारा गळा!! ठुमरी या गायनाला मैफिलीचा दर्जा देण्यात या गायकाचा महत्वाचा वाटा. खरे तर तीनही सप्तकात या गायकाला लीलया गाता येत असे आणि याचा परिणाम, परिणामकारक ठुमरी गायन. जरा बारकाईने ऐकले तर या गायकाने, ग्वाल्हेर, जयपुर गायकी देखील आत्मसात केल्याचे समजून घेता येईल. 
प्रस्तुत ठुमरी गायनात देखील याच वैशिष्ट्यांचा आढळ सापडेल. गळ्याची लवचिकता, हे खास वैशिष्ट्य सांगता येईल. याचा फायदा असा झाला, गायकीत "अनपेक्षितता" नेहमीच कायम राहिली आणि त्यामुळे गाणे अतिशय रंगतदार झाले. आणखी वेगळेपण सांगायचे झाल्यास, आपल्या शास्त्रात "प्रसादगुण" हे खास वैशिष्ट्य मानले आहे आणि उस्तादांच्या गायकीत याचे ओतप्रोत दर्शन घडते तसेच सरगम, बहुतेक गायकांच्या बाबतीत, तानेचा तांत्रिक आविष्कार अशा स्वरुपाची असते परंतु या ठुमरीत सरगम हही इतकी ओघवती आहे की कुठे ताण संपते आणि परत सुरु होते, याचा सत्कृत्त्दर्शनी पत्ता लागत नाही

हिंदी चित्रपट गीतांत, खैय्यामने जितका या रागाचा उपयोग करून घेतला आहे, तितका इतर कुणी केल्याचे आठवत नाही. पहाडी रागात ज्या कुठल्या भावनांचा आढळ होईल, त्या सगळ्या भावनांचा, त्याने आपल्या गाण्याच्या "तर्ज" बांधण्यासाठी उपयोग केला आहे. प्रणय, विरह, व्याकुळता, आनंदविभोर अवस्था, या सगळ्या छटा त्यांनी आपल्या चालीत गुंफलेल्या आढळतील."जाने क्या धुंढती रहती है ये आंखे  मुझ मे" ही गाणे आपण इथे ऐकू. खरतर हे गाणे म्हणजे अनन्यसाधारण कुवतीची कविता म्हणून देखील आस्वाद घेता येईल. कैफ़े आझमी काय प्रतिभेचा कवी होता, याचे ही कविता, उत्तम निर्देश करता येईल. पहाडी रागात विरहाची अशी भावना देखील दाखवता येते, हे खैय्यामने फार सुंदररीत्या दाखवून दिले आहे.  


गाण्याचे सुरवातीचे शब्दच बघा किती प्रत्ययकारी आहेत. 
"जाने क्या धुंढती रहती है ये आंखे मुझ मे, राख के ढेर मे शोला है ना चिंगारी है"
खरतर सगळी कविता हाच वाचिक अनुभव आहे आणि अशा कवितेला खैय्यामने जो स्वरसाज चढवला आहे, त्याने या कवितेचा आशय अधिक अंतर्मुख होतो. रफीच्या गायकीचा अनोखा आविष्कार आपल्याला ऐकायला मिळतो. गाण्यात कुठेही तालवाद्य नसून, गाण्यात गिटार आणि इतर "धून" वाद्यांनी ताल पुरवलेला आहे त्यामुळे, झाले असे, कवितेवर कुठेही स्वरांचे आक्रमण झाल्याचे दिसत नाही पण तरीही स्वरांनी आपली "जादू" दाखवून दिली आहे. अर्थात, ही किमया सगळी संगीतकार म्हणून खैय्याम यांचीच यांचीच.  

असेच एक गाणे, कविता म्हणून फार अर्थपूर्ण आहे. जावेद अख्तरची ही कविता आहे. खरतर हे गाणे वाचताना, चित्रपटासाठी हे गाणे लिहिले आहे, हे वाटतच नाही. साधारणपणे, गाण्यातली शब्दरचना, ठराविक "मीटर" मध्ये लिहिलेली असतात, ज्यायोगे संगीतकारांना चाल बांधण्यास अवघड होऊ नये. 


सिलसिला चित्रपटातील हे गाणे अतिशय श्रवणीय आहे. "नीला आसमान सो गया" संगीतकार शिव-हरी या जोडगोळीने फारसे चित्रपट केले नाही पण, तरीही ह्या गाण्यासारखे चिरस्मरणीय गाणे मात्र दखल घेणारे निर्माण केले. 

याच रागात अशीच एक चिरस्मरणीय रचना ऐकायला मिळते. मुळात मेहदी हसन यांचे गायन, हाच श्रवणानंद असतो. उर्दू शायरी जरी गेयातापूर्ण असली तरी प्रत्येक शायरीबद्दल हेच म्हणता येणार नाही पण, या गायकाचे खास विशिष्ट्या असे, गाताना, समजा कवितेत असा शब्द आला, तर तिथे गायकी " मुडपून"घेण्याची तयारी दाखवत आणि शब्दांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत असत. 


मेहदी हसन साहेबांची खासियत अशी आहे, ऐकताना सहज, सोपे वाटणारी गायकी, कधी अवघड वळणाकडे जाते, त्याचा लगेच पत्ता लागत नाही. "बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसे" हीच ती रचना आहे. पहाडी रागात आहे पण, रागातील अवघड हरकतींना पूर्ण फाटा  देऊन,अर्ध्या ताना घेणे, किंवा एखादी हरकत इतकी जीवघेणी घेतात की, ऐकताना आपण स्तिमित होऊन जातो. अत्यंत मुलायम आवाज, साधारणपणे मंद्र सप्तक किंवा शुद्ध स्वारी सप्तकात गायकी ठेवायची आणि लिहिलेल्या शायरीला पूर्ण न्याय द्यायचा, हीच त्यांची नेहमी भूमिका राहिली. पहाडी रागाचे इतके विलोभनीय रूप इतर गाण्यांत फार तुरळक आढळेल. 
आता मी इथे, आणखी काही गाण्यांच्या लिनक्स देत आहे, ज्यायोगे या रागाच्या आणखी छटा आपल्याला समजून घेता येतील. 

१] परबतो के पेडो पार शाम का बसेरा है 

२] जो वाद किया वो निभाना पडेगा 

३] सहज सख्या एकटाच येई सांजवेळी 

४] फुलले रे क्षण माझे फुलले रे 

संयत वेदनेचा मारवा

"तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे ". ही ओळ जेंव्हा आरतीप्रभूंनी लिहिली तेंव्हा त्यांनी  मारवा ऐकला होता की नाही, याची कल्पना नाही. परंतु मारवा रागाचा "स्वभाव" मात्र या ओळीतून चपखलपणे दिसून येतो, हे नक्की. या रागात सुखाची सावली नाही किंवा बरेचवेळा असेच वाटते, काही आशा ठेवायला तरी जागा आहे का? महाभारतातील अश्वत्थाम्याची कपाळावरील चिरंतन जखम जशी सतत वाहती असते त्याप्रमाणे या रागात सतत वेदनेचा सूर कायम स्त्रवत असतो. 
वास्तविक भारतीय संगीतात "षडज" स्वराचे महत्व अपरिमित आहे, किंबहुना बहुतेक सगळे राग याच स्वराने सुरु होतात किंवा या स्वराचा आधार घेतात. असे फार थोडे राग आहेत, ज्यात या स्वराला तितके महत्व नाही आणि त्या रागांच्या नामावळीत, मारवा राग अग्रभागी आहे. या रागात "सा" लागतो पण, त्याचे अस्पष्ट असणे, इतपतच त्याची खूण. (कोमल) रिषभ आणि धैवत हेच सूर, या रागाची ओळख आहे. खरतर, "ध नि (को) रे नि ध" हा स्वरसमूह आणि यातच या रागाचे "चलन" आहे. षडज जवळपास नसल्यातच जमा आणि पंचम स्वराला स्थान नाही!! गंधार स्वर आहे पण तरीही कोमल रिषभ आणि धैवत, यांच्यासमोर "स्वत्व" हरवलेला!! 
या मुळेच हा राग गायला किंवा वाजवायला घेणे, ही कलाकाराची परीक्षाच असते. अत्यंत मर्यादित स्वर हाताशी आहेत पण, जे स्वर आहेत. त्याच स्वरांतून वेदनेचा संपूर्ण अवकाश उभा करायचा, हे तर शिवधनुष्य हाताळण्यासारखे आहे. याचे वादी-संवादी स्वर बघितले तरी आपल्याला समजून घेता येईल. (को) रिषभ आणि (शुद्ध) धैवत, या दोन स्वरांच्या संगतीने, राग मांडावा लागतो. संध्याकाळ संपत असताना परंतु रात्रीचा प्रभाव पडण्याआधीचा जो समय आहे, ती वेळ शास्त्रकारांनी या रागासाठी योजलेला आहे. 
प्रत्येक कलाकाराचा स्वत:चा असा खास आवडीचा राग असतो आणि तो सादर करताना, त्याची तन्मयता अनुभवण्यासारखी असते. उस्ताद अमीर खानसाहेबांचा मारवा ऐकताना, अशी आपली एकतानता होते. 


रागाच्या पहिल्या सुरापासून "पिया मोरे आनत देस" ही चीज अत्यंत ठाय लयीत चाललेली आहे आणि प्रत्येक सूर कसा स्वच्छ, सुरेल लागलेला आहे. कुठेही तानांचे आडंबर नाही, उगीच कुठे मूर्च्छना नाही. प्रत्येक सुराचा "मझा" घेता येतो आणि त्यायोगे लयीची मोहकता!! माझे तर नेहमीच म्हणणे असते, रागदारी संगीताची खरी मजा आणि ओळख ही नेहमीच ठाय लयीत घेता येते. तिथे प्रत्येक स्वर अवलोकता येतो, "ऐकून" कानात साठवता येतो. या सादरीकरणात, नेमका हाच आनंद घेता येतो. साथीला तबला आहे पण, तो देखील अगदी खालच्या सुरात लावलेला आहे आणि त्यामुळे गायनाला एक वेगळेच परिमाण मिळते. चिरदाह वेदनेचा असामान्य अनुअभव या गाण्यातून आपल्याला मिळतो. रागदारी संगीतात कायमचे स्थान मिळवणारी रचना आणि मानदंड म्हणून प्रस्थापित झाली. 

आता आपण, एक खासगी रचना ऐकुया. लताबाईंचा आवाज देखील किती सुंदर लागला आहे, बघा. 


के. महावीर या संगीतकाराची चाल आहे. संगीताच्या क्षेत्रातील हे एक अगम्य कोडे आहे. अंगात प्रतिभा आहे, नवनवीन चाली निर्माण करण्याची क्षमता आहे, प्रयोगक्षम बहुश्रुतता आहे पण तरीही म्हणावी तशी लोकमान्यता नाही, कौतुकाचा वर्षाव नाही. अर्थात, ज्यांना संगीताची जाण आहे, त्या लोकांच्यात मात्र, मान्यता आहे. "सांज भयी, घर आजा रे पिया". "सांज: शब्द बघा उच्चारला आहे, किंचित स्वरांत थरथर निर्माण करून, गाण्याची सुरवात केली आहे आणि ओळ संपवताना, "पिया" शब्दातून जी व्याकुळता निर्माण झाली आहे, ती तर केवळ लाजवाब!! गाण्यात पुढे, "सांज" याच शब्दावर आणखी वेगवेगळ्या हरकती घेऊन, त्याच शब्दाचे सौदर्य वाढवले आहे.  

मराठीत जर का अजरामर गाणी शोधायची झाल्यास, एकूणच तसे अवघड जाईल पण, तरीही काही गाणी घ्यावीच लागतील. अशा काही गाण्यांपैकी. "मावळत्या दिनकरा" हे गाणे आहे. कवी भा.रा. तांब्यांची कविता वाचणे, हा नेहमीच राजस अनुभव असतो. इंदूरच्या त्यावेळच्या सरंजामशाहीचा परिणाम त्यांच्या कवितेवर ठळकपणे दिसून येतो तसेच संस्कृत साहित्याचा. असे असून देखील, त्यांच्या कवितेतील लय, ही नेहमीच "गीतधर्मी" असते. सहज चाली लावण्यास, योग्य अशा त्यांच्या कविता आहेत आणि मराठी संगीतकारांनी या वैशिष्ठ्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. हृदयनाथ मंगेशकर, चाल बांधताना, त्यातील "काव्य" नेहमीच सकस, दर्जेदार असावे, म्हणून आग्रही असतात आणि अशा वेळेस, त्यांना तांब्यांची कविता मोहवून गेली, यात नवल ते काय!! 


सतारीच्या पहिल्याच सुरांतून, मारवा रागाची ओळख निर्माण करून, चालीचे वळण, कसे असेल, याचे निर्देशन होते. कवितेचा आशय बघितला तर आपल्याला सहज समजून घेता येईल, सूर्यास्ताचे अप्रतिम वर्णन आणि  सतार व बासरीच्या सुरांची अप्रतिम जोड आहे. मी मघाशी, तांब्यांच्या कवितेत संस्कृत साहित्याच्या प्रभावाविषयी लिहिले आहे, त्याचे सुंदर उदाहरण म्हणजे, "अर्घ्य तुज जोडोनी दोन्ही करा" ही ओळ. सूर्याला अर्घ्यदान ही आपल्या संस्कृतीमधील असामान्य कल्पना आहे, ज्यात समर्पणाची कल्पना सामावलेली आहे आणि तोच संदर्भ या कवितेत नेमकेपणी  वाचायला मिळतो. कविता आणि चाल, याचा अप्रतिम संगम या गाण्यात झालेला दिसून येतो. 
हा राग सादर करायला अतिशय अवघड आहे, बहुदा असे असेल म्हणून या रागावर आधारित तशी फारशी गाणी बांधायचे धाडस फारसे कुणी करीत नाही. रागाचे चलन(च) तसे सहज गुणगुणावे इतके सरळ, सोपे नाही आणि याचे कारण असे आहे, मारवा सादर करताना, जरा सूर इकडे, तिकडे हलला तर त्याच सावलीत, "श्री","सोहनी" किंवा "पुरिया" रागात शिरण्याचा धोका असतो. 


वरील लिंक ही "पायलीया बावरी बाजे" या गाण्याची आहे. खरतर, या गाण्यात मारवा रागाची झलक आहे पण तरीही गाणे म्हणून अतिशय सुश्राव्य आहे. 
असेच आणखी एक मराठी गाणे आठवले. शंकर वैद्यांची "स्वरगंगेच्या काठावरती". अरुण दात्यांनी अजरामर केलेली कविता. 


परत एकदा हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेले असेच अप्रतिम गाणे. वास्तविक, शंकर वैद्य, ही कुणी भावगीते वगैरे लिहिणारे कवी नव्हेत परंतु एखाद्या कवितेत, गाणे होण्याची असोशी असते आणि ती नेमकेपणी संगीतकाराला ओळखता येणे महत्वाचे. 

अशीच एक असामान्य लिंक आपल्याला आवडेल. वसंतराव देशपांड्यांनी गायलेला मारवा. ही लिंक जवळपास ४६ मिनिटांची आहे म्हणजे इथे संपूर्ण मारवा आपल्याला  ऐकायला मिळतो. मारवा राग, ही वसंतरावांची मर्मबंधातली ठेव होती. मी स्वत: ३,४ मैफिलीत वसंतरावांकडून हा राग ऐकलेला आहे आणि  त्यांच्या अचाट कल्पनाशक्तीपुढे मान तुकवली आहे. 


आपल्या आयुष्यात तसे बघितले तर दु:खाचा अंश बराच असतो आणि त्याला टाळून तर पुढे जाणे, सर्वथैव अशक्य.  तुकारामांनी एके ठिकाणी म्हटले आहे  त्याप्रमाणे,"सुख जवाएवढे, दु:ख पर्वताएवढे" त्याप्रमाणे आपले आयुष्य असते. याच दु:खाचा अंश या रागात आपल्याला गोठवून ठेवला आहे!! 

तोड नसलेला "तोडी"

उत्तररात्र कलत असताना पण पहाटेच्या किरणांची चाहूल अस्पष्ट जाणवत असताना, दुरून एखाद्या  मंदिरातून,एकतारीचे मंद स्वर ऐकायला येतात. त्या स्वरांना कुठल्याच वाद्याची, तालाची जोड नसते, वाजत असते आपल्याच तंद्रीत आणि त्या स्वरांची बेहोशी आपल्या मनाला वेढून टाकत असते. तोडी रागाबाबत असेच काहीसे म्हणता येते. उत्तरांगातील हा तोडी राग आणि त्यातील स्वरसमूह, खरतर केवळ भक्तिमार्ग हा एकच भाव दाखवतो, हे थोडेसे एकांगी होईल पण तरीदेखील, शांत,गंभीर अशा छटा देखील या रागातून मिळतात. मघाशी मी "उत्तरांग" हा शब्द वापरला, त्याबाबत थोडक्यात. सप्तकाचे २ भाग केले असता, त्यातील पहिल्या भागाला "पूर्वांग" तर दुसऱ्या भागाला "उत्तरांग"  म्हटले जाते आणि त्यानुसार रागातील स्वरांचे महत्व अधोरेखित केलेले असते. आता, २ भाग म्हणजे - " सा"ते "प" स्वर हा पूर्वांग भाग तर "प" पासून "वरचा "सा" हा उत्तरांग भाग. प्रत्येक रागात, स्वरांची अशी ठेवण असते आणि त्यानुरूप रागाचा तोंडावळा ठरत असतो. 
आता तोडी रागापुरते लिहायचे झाल्यास, या रागात, वादी स्वर "(कोमल) ध" आणि संवादी" स्वर आहे "(कोमल) ग". वरील मांडणीप्रमाणे, "ध" स्वर हा सप्तकाच्या दुसऱ्या भागात येत  असल्याने,रागाचे स्वरूप "उत्तरांग" ठरते. तोडीमध्ये, (कोमल) रे, आणि (तीव्र) म वगळता सगळे स्वर शुध्द स्वरूपात लागतात,  निर्देशिलेले संवादी स्वर (कोमल) ग आणि वादी स्वर (कोमल) ध, यातच समाविष्ट आहे. अवरोही सप्तकात मात्र, "पंचम" स्वर येतो आणि खऱ्याअर्थी संपूर्ण सप्तक ऐकायला मिळते. याचाच दुसरा भाग असा, हा राग, "षाडव - संपूर्ण" असा आहे. थोडक्यात याचे विवेचन असे, पाच स्वरी आरोह किंवा अवरोह असेल तर "औडव", सहा स्वरी आरोह किंवा अवरोह असेल तर "षाडव" आणि साती स्वर लागत असतील तर "संपूर्ण" अशी रागाची वर्गवारी शास्त्रात मांडलेली आहे.  म्हणूनच मी वरती, तोडी रागाबद्दल, "षाडव - संपूर्ण" असे म्हटले आहे, ते  नियमाच्या अनुषंगाने. 
तोडी रागाचे आणखी सुंदर वैशिष्ट्य असे सांगता येईल, हा राग "मंद्र" सप्तकापासून "तार" सप्तकापर्यंत,अनंत प्रकारे विहार करू शकतो, कुठेही अटकाव नाही. त्यामुळे, ज्या गायकाची जशी तयारी असेल त्या कुवतीनुसार हा राग खुलवता येऊ शकतो. 
इथे आपण, प्रथितयश गायक,भीमसेन जोशी यांची एक प्रसिद्ध रचना ऐकू. 


मी मुद्दामून १९६३ साली गायलेली रचना घेतली आहे. अत्यंत तरुण वयातील पंडितजी, काय बहारीने आणि तबियतीने राग पेश करतात, याचा अप्रतिम अनुभव आहे. रचना  ऐकताना,प्रत्येक स्वर, त्या स्वरामागील  नजाकत,पीळ आणि त्या जोडीला येणाऱ्या हरकती, खास ऐकण्यासारख्या आहेत. अर्थात, जरा बारकाईने ऐकले तर सहज ध्यानात यावे, त्यावेळी देखील गायनाची शैली, स्वरोच्चार, दमसास इत्यादी वैशिष्ट्ये तीच होती, जी पुढे जाउन, त्यांच्या गायकीची "ओळख" ठरली.
आता आपण, रागाच्या "ललित" स्वरूपाकडे बघूया. इतक्या प्रचंड आवाक्याच्या राग हाताशी असल्यावर, अर्थात या रागात भक्तीसंगीत खुलले नसते तर नवल. श्रीनिवास खळेकाकांनी या रागाचा अतिशय बहारीचा उपयोग केलेला आढळतो. "अगा करुणाकरा" ही रचना या दृष्टीने ऐकण्यासारखी आहे. तुकारामांचे शब्द आणि खळेकाकांची चाल!! 


खळ्यांच्या सांगीतिक कौशल्याचा अर्क म्हणजे हे गाणे  म्हणता येईल. ओळीची सुरवात, परिचित सुरांनी होते पण पुढे विस्तार मात्र इतका वेगळ्या प्रकारे होतो की सुरवातीचे सूर बाजूला पडून त्याक्षणी ऐकायला येणाऱ्या सुरांनी आपण चकित होतो. अस्सल गायकी अंगाने जाणारी चाल आहे त्यामुळे गाणारी गायिका तितक्याच तयारीची असल्याशिवाय, या गाण्याला "न्याय" मिळणे अवघड!! तेंव्हा तिथे केवळ लताबाई(च) आणि दुसरा कुठला "गळा" न्याय देऊ शकणार!!  
पारंपारिक भजनाचा "थाट" बाजूला सारून, आधुनिक पद्धतीची रचना केली आहे पण, तसे करताना, तुकारामांनी अभंगात जो विचार मांडला आहे, त्याला न्याय देण्याची दुहेरी जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याचे  दृष्टीला पडते. 
या गाण्यात लय किती वेगवेगळ्या स्तरावर फिरत असते, हे बघणे, खास अभ्यासाचा विषय आहे. क्षणात मंद्र सप्तकात तर पुढील क्षणात चाल तार सप्तकात जाते पण इतकी झपाट्याने जात असताना देखील गाण्याचा  आशय कुठेही एकमेकांशी जरादेखील फारकत घेत नाही, हे विशेष. संगीतकार म्हणून खळेकाका किती श्रेष्ठ होते, याचा हे गाणे म्हणजे पुरावा दाखवता येईल. 

आता, आपण एक हिंदी गाणे बघूया. "संत ज्ञानेश्वर" या चित्रपटातील "हर नयी किरन से मंगल  संदेसा  लायी, जागो रे, प्रभात आई". वास्तविक  गाणे पण, काळाच्या ओघात  थोडे मागे पडले!! का? या प्रश्नाला काही उत्तर नाही. या गाण्याचा पहिला "आलाप" तोडी रागाची ओळख करून देतो. मन्ना डे सारखा असामान्य गायक हाताशी असल्यावर, संगीतकाराला देखील चालीत वेगवेगळ्या जागा, नवीन हरकती किंवा चालच एकदम नव्या लयीत गुंफायची, असले अवघड प्रकार करतात. 


अर्थात हे गाणे. तोडी रागाचे लक्षण गीत असे म्हणता येणार नाही. गाण्याचा दुसरा अंतरा जरा नीट  ऐकला,म्हणजे माझे म्हणणे नेमके समजून घेता येईल. इथे एक गमतीचा मुद्दा. वरील दोन्ही गाणी तोडी रागावर आधारित आहेत, हे तर नक्की. परंतु, गाणी जरा नीट लक्ष देऊन ऐकली तर ध्यानात येईल, दोन्ही गाण्यांचे " स्वभाव" वेगळे आहेत!! स्वभाव म्हणजे चालीचा बंध. तिथेच चाल आणि संगीतकार, यांचा गुणधर्म जाणून घेता येतो तसेच गाणे फुलवण्याची पद्धत अभ्यासता येते. 

आणखी एक अनोख्या आणि अवीट चालीचे गाणे बघूया. मागील शतकात - ८० च्या दशकात, राहुल देव बर्मन, गुलजार आणि आशा भोसले, या असामान्य त्रयीने एक सुंदर गाण्यांचा अल्बम  तयार केला होता आणि त्यात, हे गाणे समाविष्ट केले आहे. "भीनी भीनी भोर आयी". 


आता, या गाण्यातील सुरवातीचा "आलाप" ऐका आणि वरच्या गाण्यातील मन्ना डे यांनी लावलेला "आलाप" ऐका. गायक/गायिका जर कुशाग्र बुद्धीमत्तेचे असतील तर एकाच रागातून, अगदी सुरवातीचे "आलाप" वेगळे घेऊन, त्याच रागाचे किती विलोभनीय रूप सादर करतात,  प्रात्यक्षिक देतात. 
गुलजार यांची प्रतिभाशाली कविता, हा नेहमीच सुंदर अनुभव असतो आणि त्याचे या गाण्यात देखील नेमके प्रत्यंतर येते. राहुल देव बर्मन तर नेहमीच काहीतरी "नवीन" करण्याच्या ध्यासाने पछाडलेला संगीतकार. इथे बघा, चाल "गायकी" अंगाची आहे पण, रागाची "प्रतिकृती" नाही. हाताशी आलेली चाल, गाण्यात परावर्तीत करताना, हुशार संगीतकार नेहमीच, स्वत: काहीतरी वैशिष्ट्य त्यात ठेवत असतो. या गाण्यात राहुल देव बर्मनने तेच केले आहे. सुरवातीच्या आलापीनंतर, त्याने समेची मात्रा गाठताना, कुठल्या शब्दावर सम ठेवायची तसेच एकदा सम नक्की केल्यावर, पुढे ती कशा प्रकारे विस्तारित करायची, हे सगळे इतके व्यामिश्र आणि अभ्यासपूर्ण आहे की, केवळ वरवर गाणे ऐकून, आपण या गाण्याला नेमका न्याय देणे शक्यच नाही.  या गाण्यात, दुसऱ्या अंतऱ्यानंतर छोटीशी "सरगम" आहे पण ती देखील लयीच्या अंगाने तसेच त्याने जो "मीटर" ठरवून दिला आहे, त्या  बंधनात ठेऊन घेतलेली आहे. संगीतकार म्हणून राहुल देव आणि गायिका म्हणून आशा भोसले, यांचा नेमका दर्जा दाखवून देणारी, ही "तर्ज" आहे. 


आता आपण शेवटची रचना बघूया. हे गाणे असेच तोडी रागावर आधारलेले आहे. "नंद नंदन दिठू पडिया" हे मीरेचे भजन आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि लता बाईंच्या प्रतिभेचा अर्क असलेली रचना आहे. सुरवातीच्या बासरीच्या आलापित तोडी राग दडलेला आहे आणि पुढे त्याच आलापीचा सुंदर विस्तार केलेला आहे. अर्थात, गाणे अगदी, "टिपिकल" मंगेशकरी वळणाचे आहे. ऐकतानाच ध्यानात येते, ही चाल साध्या गळ्याला पेलणारी नाही. संपूर्ण गाणे म्हणजे खरेतर तोडी रागाची "आळवणी" आहे, असे म्हटले तरी फारसे चुकीचे ठरू नये. 
संपूर्ण गाणे हे समर्पण वृत्तीचे तसेच आळवणीचे गाणे आहे पण असे देखील त्यात, इतक्या बारीक हरकती आहेत, बारकाईने ऐकताना थक्क व्हावेसे वाटते. इथे कुठलाही शब्द सहज, सरळ येत नाही!! प्रत्येक शब्दामागे कमीतकमी एखादी तरी छोटीशी हरकत तरी आहे किंवा दीर्घ आलाप आहे. त्यामुळे गायला गाणे फार अवघड होऊन बसते. तालाच्या प्रत्येक मात्रेची जान आणि किंमत माहित असल्याशिवाय हे गाणे जमणे कठीण. यातील प्रत्येक हरकतीने गाण्याच्या चालीला सौदर्य प्राप्त झालेले आहे.  

खरतर या रागात इतक्या वेगवेगळ्या धर्माच्या चाली आहेत की सगळी गाणे आणि त्यावर थोडे टिपण लिहावे लागेल आणि तरीही  काही निसटून जाइल. तरीही काही महत्वाच्या गाण्याच्या लिंक्स खाली देत आहे. 
१] कशी नशिबाने थट्टा आज मांडली 

२] एक था बचपन 

३] रैना बीती जाये 

वैभवशाली, शांत, निरव...

लखलखती झुंबरं, लालगर्द गालिचा, आजूबाजूला खाशा स्वाऱ्या, प्रशस्त दालनाच्या एका टोकाला; पण मध्यभागी रत्नजडीत सिंहासन. सर्वत्र गंभीर वातावरण. तरीही, अत्तराच्या फवाऱ्यानं सुगंधित. दालनाच्या बरोबर मध्यभागी खास बिछायत अंथरलेली आणि त्यावर वाद्यं मांडून ठेवलेली. दरबारी राग ऐकताना, मनासमोर असंच वैभवशाली चित्र उभं राहतं. संगीतसम्राट तानसेननं अकबर बादशहाच्या विनंतीवरून आणि त्याच्या दरबाराच्या मांडणीतून हा राग तयार केला, असं इतिहासात वाचायला मिळतं. अर्थात, याला तसा शास्त्राधार काही नाही. मात्र, हा राग अतिशय वैभवशाली आहे. यात सगळे स्वर लागत असल्यामुळे या रागात स्वरविस्ताराला भरपूर वाव असतो. म्हणून हा खऱ्याअर्थी ‘संपूर्ण’ राग आहे. यात ‘गंधार’ स्वर इतका ‘कोमल’ लागतो की, कधीकधी आधीच्या ‘रिषभ’ या स्वराशी नातं जाणवून देतो. अर्थात, असा प्रकार ‘अवरोही’ स्वरांत दिसतो, म्हणजे त्याचं ‘मध्यम’ स्वराशी नातं जोडलेलं असतं. या रागाची प्रकृती गंभीर. त्यामुळे तो गाणाऱ्या गायकाची परीक्षाच असते. म्हणून कदाचित बहुतेक गायकांच्या हा राग पचनी पडत नसावा. याची आलापी तर फारच कठीण. मंद्र सप्तकातून सुरुवात होते, ‘गंधार’ स्वर आंदोलित पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे गायकाचा रियाज किती ‘कसदार’ आहे, याचा पडताळा घेता येतो.
सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलेलं. वातावरणात एकांत इतका की, साध्या काजव्याचं कुजबुजणंही अंधारावर ओरखडा उमटवून जाईल. वाराही झुळकीच्या स्वरूपात स्वत:चं अस्तित्व दाखवतोय. त्यामुळे वातावरण थंडगार, स्निग्ध झालेलं. चंद्राचा प्रकाश आपलं नाममात्र अस्तित्व दाखवतोय. अशा वेळी दूरवरून पंडित हरिप्रसाद चौरसियांच्या बासरीचे हलके आलाप (https://www.youtube.com/watch?v=9IxXLsnMiXE) कानावर येतात. सुरांची अनुभूती, या शब्दाची प्रचिती यावी तर अशी! फक्त आलापी! त्याला तालवाद्याचा धक्काही सहन होणं अवघड. अत्यंत नाजूक; पण लपेटदार स्वरांची वळणं... हे सर्व आपल्याला फक्त ‘दरबारी’ रागाचीच आठवण करून देतं. याचा प्रत्येक स्वर इतका शांत, गंभीर असतो की, तिथं स्वत:चा श्वास आणि त्याचा आवाजही नको वाटावा! स्वरांचं ते ‘आत्मगत’ वळण, आपल्याला संमोहित करतं. इथं स्वरांची ‘जात’ कळून येते. याचं तंतोतंत प्रात्यक्षिक या वादनातून समजून घेता येईल. यात, ‘आंदोलित’ गंधार स्वर आणि त्याचं संपूर्ण सप्तकातील अस्तित्व, याची खुमारी जाणता येते. त्याचसोबत स्वरभाषा म्हणजे काहीतरी न कळण्यासारखा विषय आहे, ही समजूत खोडून काढण्यासही मदत होते.
सुगम संगीतात या रागावर आधारित भरपूर गाणी आहेत. शांत, नीरव अंधाराचं नेमकं प्रत्यंतर ‘मीलन’(१९५८) चित्रपटातील ‘हाये जिया रोये’ या गाण्यात (https://www.youtube.com/watch?v=nmpPAtb5dMw&list=PL8B368FF3B76E9A7F&index=1) येतं. वास्तविक हे गाणं तसं प्रसिद्ध नाही; पण लताताईंची गायकी अपूर्व आहे. यात दरबारी रागाची केवळ ‘छाया’ आहे. बहुधा, संगीतकार हंसराज बहेल यांना या रागातील एखादी ‘फ्रेज’ ऐकून, त्यातून या असामान्य गाण्याची चाल सुचली असणार. अर्थात, हा केवळ तर्क आहे. लताताईंच्या सगळ्या सप्तकात सहजगत्या विहार करण्याच्या असामान्य कुवतीचा या गाण्यात पुरेपूर वापर करण्यात आला आहे. या गाण्यातील विरहाची भावना इतकी टोकाची आहे की, आपण ऐकताना थक्क होतो. सुरुवातीच्या ‘हमिंग’मधून या रागाची थोडी कल्पना येते आणि पार्श्वभागी वाजत असलेल्या बासरीनं त्याचं स्वरूप स्पष्ट होतं. चालीचा ‘मुखडा’ बांधताना या रागाचे काही सूर घ्यायचे; पण पुढे चाल आणि राग स्वतंत्रपणे आपापला मार्ग शोधीत जातात. इथे हेच झालं आहे. सुरुवातीला ‘रिषभ’ आणि ‘पंचम’ या दोन स्वरांच्या आधारे इतर स्वर जोडून घेतले, त्याला ‘कोमल’, ‘गंधार’ स्वराची विलक्षण जोड दिली आणि त्यातून चाल  झाली.
संगीतकाराची बुद्धिमत्ता अशा वेळी दिसून येते. पुढे या गाण्याची चाल रागापासून दूर जाते, म्हणजे नक्की काय होतं? त्यासाठी ‘तुमने तो देखा होगा, ई चांद तारो’ ही ओळ ऐकावी. ‘तुमने’मधील ‘तु’ शब्दावर किंचित वजन देऊन तो शब्द उच्चारला आहे... आणि क्षणात लताताईंचा आवाज वरच्या स्वरांत जातो, अगदी टिपेला पोहोचतो, तो ‘तारो’ या शब्दापर्यंत. स्वर सतत ‘चढता’ आहे. हे ‘वळण’ साध्या गळ्याला पेलणारं नाही. या चालीच्या स्वरांत कुठेही नेमका ‘दरबारी’ दिसत नाही. म्हणजे बघा, सुरुवात या रागावर; पण पुढे चाल त्याच स्वरांच्या साक्षीनं; पण वेगळी वाट चोखाळते. सुगम संगीतात प्रयोग करायला तसा वाव कमी असतो, पण तरीही अशा ठिकाणी संगीतकाराला वाव मिळतो.
दुसरं गाणं जरा वेगळ्या धाटणीचं आहे. एकतर त्यात दरबारी ‘शोधायला’ लागतो आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, दरबारी म्हणजे गंभीर, असं जे चित्र निर्माण होतं, ती ओळख आपल्याला पूर्णत: पुसून टाकावी लागते. अर्थात, असा प्रकार अनेक रागांच्या बाबतीत घडला आहे. जुन्या ‘आझाद’ चित्रपटातील ‘कितना हंसी है मौसम, कितना हंसी सफर है’ हे गाणं (https://www.youtube.com/watch?v=EecCzvJkaxM) अतिशय बारकाईनं ऐकलं, तर एक-दोन ठिकाणी दरबारी रागातील स्वरांची झलक ऐकायला मिळते. अर्थात, राग डोळ्यासमोर ठेवून गाण्याची चाल बनवली, तर लगेच त्याचा अदमास घेता येतो. इथं चाल आधी तयार झाली आणि मग त्या गाण्याच्या सुरावटींचं दरबारी रागाशी कुठेतरी नातं जुळलं. अत्यंत हलकीफुलकी आणि त्या गाण्यातील शब्दांच्या भावार्थाशी नेमकी जुळणारी चाल आहे. रागाच्या प्रकृतीशी फटकून वागणारी ही चाल दरबारी रागावर आहे, हे मानायलाच मन तयार होत नाही. ही किमया अर्थात, संगीतकार सी. रामचंद्र यांची. ‘मिलती नही मंझील राही हो जो अकेला’ या ओळीत या रागाशी नातं सांगणारे सूर सापडतात; पण तरीही स्वरांची ‘ठेवण’ भिन्न आहे. म्हणजे या कडव्याची सुरावट दरबारीच्या सुरांशी मिळतीजुळती आहे; पण जेव्हा गाणं पुन्हा मूळ ध्रुवपदाकडे वळतं, तेव्हा हीच चाल आपला नवीन मार्ग सोडून, मूळ मार्गावर येते. हेही संगीतकार म्हणून सी. रामचंद्र यांचंच कौशल्य!
दरबारी रागाचं खरं वैभव दाखवून देणारं आणखी एक गाणं म्हणजे, ‘तू प्यार का सागर है’ (https://www.youtube.com/watch?v=e2D-kjOMNF0). यात दरबारी रागाच्या श्रीमंतीचं पुरेपूर दर्शन घडतं. रागाची गंभीर वृत्ती, शांत स्वभाव आणि स्वरांचं मंद्र सप्तकातील चलन. आंदोलित ‘कोमल गंधार’, तसंच ‘रिषभ’ आणि ‘पंचम’, या दोन प्रमुख स्वरांचं नातं. गाण्याचा सुरुवातीचा जो वाद्यमेळ आहे, पियानो आणि व्हायोलिन, त्यांच्यातून जी सुरावट निर्माण होते, ती दरबारी रागाची खूण. अगदी नेमके सूर या वाद्यमेळातून निघतात. तोच गंभीर भाव, तेच शांत सूर आणि गायक मन्ना डे यांचं अतिशय परिणामकारक गायन. परिणामी हे गाणं अजरामर झालं. भारतीय संगीत किती विविधतेनं नटलेलं आहे, याचा आणखी एक पुरावा.
‘अगर मुझसे मुहब्बत है, मुझे सब अपने गम दे दो’ (https://wwwyoutube.com/watch?v=aBCx4r3HGY8) हे असंच आणखी एक सुंदर गाणं. यात लताताईंच्या सर्वव्यापी गायकीचा पुरेपूर वापर केला आहे. चालीला अतिशय अवघड; पण तितकंच सुश्राव्य. मदन मोहन यांच्या शैलीतील एक प्रातिनिधिक गीत, असं याचं वर्णन करता येईल. गाण्याच्या सुरुवातीला जो व्हायोलिनवरील सुरांचा तुकडा आहे, त्यातून या रागाची ओळख होते. गमतीचा भाग म्हणजे, पुढे ही ओळख पुसट होत जाते. इतकी की, या गाण्याची चाल हे एक स्वतंत्र प्रकरण होतं! हे फार अवघड चालीचं गाणं केवळ लताताईंच्याच गळ्याला साजेसं आहे.


Attachments ar

सौंदर्यासक्त ललत

हिंवाळ्यातील थंडगार पहाटे, घराच्या बाहेर दंवारलेल्या पाकळ्यांतून डेरेदार मोगरा फुललेला दिसावा आणि त्या दर्शनाने पुढ्यातली सकाळ सुगंधित व्हावी त्याप्रमाणे कानावर ललत रागाचे सूर पडले मनाची तरल, काव्यमय अवस्था होते. पहाटेचे स्वागत अशा सुरांनी व्हावे, यापरते दुसरी सौन्दर्यासक्ती दुसरी नसेल. मनावर साचलेले सगळे मळभ दूर करण्याची अपरिमित शक्ती या रागाच्या सुरांमध्ये आहे.
या रागाचे सूर बघितले तर आणखी एक विशेष आपल्या ध्यानात येईल. "कोमल रिषभ" आणि "कोमल धैवत" तसेच "तीव्र मध्यम" हे या रागातील स्वर जर घ्यानात घेतले तर, आपल्याला लगेच आठवेल, दोन आठवड्यांपूर्वी, आपण आस्वादलेला "पुरिया धनाश्री" रागात देखील हेच स्वर आपल्याला आढळले होते. त्या रागात देखील, "गंधार" आणि "निषाद" हे शुद्ध स्वरुपात अवतरतात!! सुरांच्या मांडणीत किती साम्य तरी देखील "ललत" राग, पहाट शुचिर्भूत करणारा तर "पुरिया धनाश्री", वाट्याला आलेली संध्याकाळ अंतर्मुख करणारा!! 
या रागात "तीव्र मध्यम" जरी असला तरी तो स्वर, बरेच कलाकार "आंदोलित" स्वरूपात घेतात, म्हणजे कधी कधी "शुद्ध मध्यम" या स्वराच्या साथीने घेतात आणि रागाचे स्वरूप बऱ्याचअंशी वेगळे करतात. भारतीय रागदारी संगीत किती श्रीमंत आहे, याचा हा एक पुरावा म्हणून दाखवता येईल आणि याचे मुख्य कारण, प्रत्येक रागातील "षडज" वेगळा असतो आणि एकदा या स्वराची स्थापना झाली की मग या स्वराला अनुसरून इतर स्वर सांगाती येतात. आणि इथेच प्रत्येक राग स्वत:चा "चेहरा" घेऊन अवतरतो. यापुढे आणखी साद्धर्म्य दाखवायचे झाल्यास, दोन्ही रागात "पंचम" स्वर अस्तित्वात नाही, म्हणजे बघा, सगळे स्वर तेच आहेत पण, स्वभाव मात्र संपूर्ण वेगळा!!
या रागाची प्रकृती जरी खेळकर, आनंददायी अशी असली तरी आपल्या संगीतकारांनी त्यात, ज्याला विरही, व्याकूळ म्हणाव्यात अशा अप्रतिम रचना बांधलेल्या आहेत. आपण इथे जगजीत सिंगची एक प्रसिद्ध गझल बघूया. "कोई पास आये, सवेरे, सवेरे" या अतिशय ठाय लयीतील आणि तालाला देखील थोडी अवघड अशी रचना ऐकुया. 


या गझलेचा पहिला आलापच ललत रागाची ओळख करून देतो आणि त्याचबरोबर रचनेतील व्याकुळता. रागाच्या चेहऱ्याशी संपूर्ण फटकून वागणारी ही रचना आहे. अर्थात, पहाट म्हटली की नेहमीच शुचिर्भूत वातावरण असतेच असे नसून, त्याच पहाटेला अशी व्याकूळ करणारी विरहणीची व्यथामग्न सकाळ देखील असू शकते. अर्थात ही एक गझल आहे, त्यामुळे प्रत्येक कडव्यात तोच शब्दार्थ असेलच, असे नाही. किंबहुना गझलेचे हे एक अन्वर्थक लक्षण म्हणता येईल. गझलेतील, प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असू शकते आणि त्याच्या अन्वयार्थ गझलेच्या धृवपदाशी असेलच, असा अजिबात नियम नाही. 
जरा नीट ऐकले तर सहज ध्यानात येईल, या सुरवातीच्या पहिल्या आलापीमध्ये, जगजीत सिंगने संपूर्ण रागाचे चलन पेश केले आहे.  तसेच रचनेच्या मध्यंतरात घेतलेली सरगम - ग म ध नि सा रे अशी  घेताना,त्याचा शेवट ग आणि म या स्वरांवर कसा घेतला आहे, ते खास ऐकण्यासारखे आहे. अर्थात पुढे हीच सरगम, गिटारच्या सुरांत कशी बेमालूम मिसळली आहे, हा आणखी आनंदाचा भाग आहे. मुळात, जगजीत सिंगच्या बहुतेक सगळ्या गझला या अतिशय संयत, शांत आणि ठाय लयीत असतात. एकदा एक लय सुरवातीला घेतली की शक्यतो त्या लयीतच पुढली रचना बांधायची. असा या संगीतकाराचा विचार असायचा पण तरीही जरा बारकाईने ऐकले तर, त्या लयीतच कितीतरी वेळा अनपेक्षित हरकती, बोलताना घेऊन, तीच रचना श्रीमंत कशी करायची, याचा ही गझल म्हणजे एक सुंदर वस्तुपाठ ठरावा. 
अशीच एक सुंदर रचना संगीतकार मदन मोहनने "चाचा झिंदाबाद" या चित्रपटासाठी केली आहे. "प्रीतम दरस दिखाओ" हे गाणे आपण ऐकू. 


एखादे युगुलगीत कसे सादर करावे आणि गाताना, दोघेही गायक कसे एकमेकांचा सूर "उचलून" गातात आणि गाण्यात वेगळीच खुमारी आणतात, हे या गाण्यात ऐकण्यासारखे. मन्नाडे आणि लताबाई, दोघेही तालेवार गायक आणि अशावेळी जर का त्यांना अशी "गायकी" ढंगाची रचना गायला मिळाली,की कसे असामान्य गाणे जन्माला येते, याचा हा अनिर्वचनीय श्रवणानुभव आहे.  सुरवातीचा "आकार" युक्त आलाप आणि पुढे त्याचा स्वरांचे. सतारीच्या सुरांतून प्रात्यक्षिक ऐकायला मिळते. ललत रागावर आधारित गाणे आणि पण, ललत रागाची प्रतिकृती नव्हे. सुगम संगीतात, अशा प्रकारचे स्वातंत्र्य नेहमीच संगीतकार घेत असतात आणि त्यायोगे, गाण्यातील सौंदर्य अधिक खुलवतात. "तुम बीन रो रो रैन बिताये" ही ओळ लताबाई वरच्या पट्टीत गटात आणि तोच स्वर पकडून मन्नाडे , लताबाई ज्या "रो" शब्दाचा सूर घेतात, तोच सूर पकडतात आणि गाणे पुढे नेतात. युगुलगीत कसे गावे, याचा हा सुंदर धडा आहे. या गाण्यातील, लताबाईच्या हरकती ऐकाव्यात. संपूर्ण सप्तक आवाक्यात घेऊन, चकित करण्याचा अजिबात हव्यास नसून, गाण्याच्या सौदर्याच्या दृष्टीने कितपत हरकत घ्यायची, याची नेमकी जाण ठेऊन, ती हरकत घेतली आहे. केवळ अप्रतिम. प्रत्येक सूर कसा स्वच्छ, नितळ लागला आहे. 
भारतीय संगीतकारांनी काहीवेळा अशी गाणे बनवली आहेत, त्या रचना, त्या रागाचे लक्षण गीत म्हणून मानता येईल. प्रत्येक रागाचे स्वत:चे असे "चलन" असते आणि त्यानुसार त्या रागाचा "तोंडावळा" ठरत असतो. त्यामुळे, एखादी रचना, हेच त्या रागाचे "चलन" तसेच ओळख ठरून जाते. "एक शहेनशाह ने बनवाके हंसी ताजमहल" हे संगीतकार नौशाद यांनी बनवलेले गाणे, ललत रागाची प्राथमिक ओळख म्हणून नक्की ओळखले जावे. गाण्याच्या पहिल्या सुरापासून ते अखेरच्या सुरापर्यंत, नखशिखांत ललत राग. 


गाण्याची सुरवात सारंगीच्या सुराने होते पण त्यात संतूरचे स्वर मिसळले आहेत. अर्थात पार्श्वभागी नितांत रमणीय ताजमहाल आणि तिथली बाग!! हेच सूर, ललत रागाची "तोंडओळख" करून देत असताना, एकदम, सतारीचे सूर झमझमत येतात पण येताना, आपल्याबरोबर जलतरंग वाद्याला घेऊन येतात आणि तिथे ललत रागाचा चेहरा समोर येतो, तो अवर्णनीय आहे. गाण्यातून, रागाचे सादरीकरण करताना, रागदारी संगीतातील क्लिष्टता बाजूला सारून, त्यातील "ललित" भाग निवडून सादर केला म्हणजे मग सगळ्या रसिकांना तोच राग "आपला" वाटायला लागतो आणि त्या रागाबद्दल ममत्व वाटायला लागते. या गाण्याने नेमकी हीच किमया केली आहे. 
वाद्यमेळ संपत असताना, रफीचा छोटासा आलाप कानावर येतो आणि त्या "आकारा" मध्ये त्याच तोडीचा समृद्ध "आकार" लताबाईंच्या आवाजात ऐकायला मिळतो.रफीचा बुलंद आवाज आणि त्याला मिळालेली लताबाईंची असामान्य गायकी, याचा अतिशय सुंदर मिलाफ या गाण्यात ऐकायला मिळतो. खरतर शकील बदायुनीच्या शब्दांनी तरुण मनाच्या प्रणयी भावनेचा अनोखा आविष्कार केला आहे. केवळ कविता म्हणून देखील, हे गाणे वाचण्यासारखे आहे.  

अशाच प्रणयी रंगाचे अत्यंत "अनोखे" रूप, काही वर्षांपूर्वी आलेल्या "ईश्किया" या चित्रपटात विशाल भारद्वाज या संगीतकाराने पेश केले आहे. रेखा भारद्वाज या गायिकेने हा अनोखा आविष्कार सादर केला आहे. तंबोऱ्याच्या सुरांत सुरवातीला रेखा भारद्वाज, नि ग नि रे सा या सुरांने सुरवात करते. इथे जो "निषाद" लागला आहे, ते खास ऐकण्यासारखा आहे. थोडे वेगळे मांडायचे झाल्यास, हा जो सुरवातीचा आलाप आहे, त्यावर किंचित किशोरी आमोणकरांच्या गायकीचा असर दिसतो पण, तितकाच. पुढे सगळे गायन वेगळ्या थाटात सुरु होते. 


गाण्याची चाल "बंदिश" असल्याचा भास होतो पण, तालाचे वळण बघितले तर लगेच फरक कळून येतो. या गाण्याची आणखी गंमत म्हणजे, गाण्यात "केहरवा" ताल आहे पण तो अशा पद्धतीने आपल्या समोर येतो की पारंपारिक मात्रांचे वजन लक्षात घेता, इथे ताल, वेगवेगळ्या वाद्यांतून ऐकायला मिळतो आणि तेच सादरीकरण लगेच आधुनिक स्वरूप घेते. 
आपण वरती बघितलेल्या "कोई पास आया सवेरे सवेरे" या रचनेतील शब्दभावाशी जुळणारी भावना इथे दृग्गोचर होते आणि तशीच व्याकुळता, या गाण्यात प्रतिबिंबित होते पण, तरीही चालीतील फरक आणि वाद्यमेळातील गुंतागुंतीची रचना ऐकताना, साम्य बाजूला पडून, संपूर्ण नवीन रूप आपल्यासमोर येते. 
ललत राग आहेच असा, सकाळ सकाळी सूर कानावर पडावेत आणि उगवलेली पहाट मनातील सगळे किल्मिष बाजूला सारून, नव्याने सामोऱ्या येणाऱ्या दिवसाचे स्वागत उत्साहाने तयार व्हावे, असेच प्रत्येकवेळी वाटत रहाते आणि हेच रागाचे खरे वैशिष्ट्य मानावे लागेल. 

Attachments area

लताबाईंची गायकी आणि नंतरची गायकी

हिंदी चित्रपट संगीतावर गेली कित्येक दशके लताबाईंचा प्रभाव टिकून आहे आणि हे मान्य करायला प्रत्यवाय नसावा. साधारणपणे, १९४५ पासून सुरु झालेली कारकीर्द जवळपास ५ दशके अव्याहतपणे हिंदी चित्रपट संगीतावर गाजवायची, ही काही लहान सहान कामगिरी नव्हे. त्यांच्या आधी काही सुरेल गायिका नक्कीच होत्या, उदाहरणार्थ नूरजहान. नूरजहानच्या गायकीचा प्रभाव लताबाईंवर स्पष्टपणे जाणवत होता, अगदी महल चित्रपटातील "आयेगा आनेवाला" हे गाणे जरा बारकाईने ऐकले तर ध्यानात येईल. मी हेच गाणे इथे घेतले कारण याच गाण्याने, लताबाईंची कारकीर्द खऱ्याअर्थाने सुरु झाली आणि लोकप्रियता वाढायला लागली. 
लताबाईंच्या गायकीचा इतका जो दीर्घ प्रमाणावर स्त्री गायीकांवर प्रभाव राहिला, त्याची इथे थोडीफार कारणमीमांसा करणे जरुरीचे आहे. लताबाईच्या प्रभावातून बऱ्यापैकी वेगळे स्थान आणि गायकी प्रस्थापित करण्यात, आधी गीता दत्त आणि नंतर आशा भोसले यशस्वी झाल्या, असे म्हणता येईल. परंतु गीता दत्तच्या आवाजाला बऱ्याच मर्यादा होत्या. शास्त्रीय रागदारी संगीतावरील गाणी गाताना, या मर्यादा ठळकपणे दिसून येतात. गीता दत्तने, हॉटेल मधील नृत्यगीते, उदास आणि विरही गाणी गाणी, अशा गाण्यांवर नक्कीच स्वत:च्या शैलीची छाप निर्माण केली परंतु गळ्याच्या अंगभूत मर्यादा असल्याने, मंद्र सप्तकात किंवा अति तार सप्तकात गाताना, तिच्या मर्यादा उघड्या पडायच्या. तिच्या गळ्यातील तारता पल्ला मर्यादित असल्याने, लताबाईंच्या गायकीसमोर तोकडेपण जाणवायचे. दुसरा भाग असा, जरी शैली वेगळी निर्माण केली (बंगाली गायकीची) तरी काही हरकती किंवा काही प्रकारच्या मुरकी ऐकताना, त्यात नि:संशयपणे कुठेतरी लताबाईंची छाप दिसते. लताबाई, गाण्याची ओळ संपविताना, बरेचवेळा छोटीशी हरकत, किंवा हलकासा खटका घेऊन संपवितात आणि त्याचेच थोडेसे अनुकरण काही गाण्यांतून, गीता दत्तकडून झाल्याचे दिसून येते. 
याबाबतीत आशा भोसल्यांनी मात्र, लताबाईंच्या सावलीबाहेर राहून, स्वत:ची गायकी निर्माण केली, हे मान्यच करावे लागेल. लताबाईंच्या बाबतीत, वर एक विधान केले आहे, लताबाईच्या आवाजाचा पल्ला, किंवा तारता मर्यादा, या बाबतीत आशा भोसले यांची गायकी निश्चित असामान्य आहे. श्वासावरील नियंत्रण, हे वैशिष्ट्य लताबाई आणि आशा भोसले, दोघांनाही सारख्या प्रमाणात लागू पडते. तसेच भावूक न होता भावनांचे सूचन करणे, तसेच लिखित शब्दांच्या पलीकडील आशय सुरांतून व्यक्त करण्याची असामान्य ताकद, यात या दोन्ही गायक जवळपास तुल्यबळ म्हणाव्यात, इतक्या अप्रतिम आहेत. गाताना, सुरांतून बरेचवेळा "अतिनाट्य" दिसू शकते आणि त्यामुळे गाण्याचा अकारण रसभंग होऊ शकतो आणि तसा होऊ नये, याची नेमकी जाणीव, या दोघींच्या गायकीत स्पष्ट दिसते. कुठल्याही पट्टीत गाताना, स्वरांचे स्वरत्व टिकवणे आणि ते टिकवताना, शब्दातील आशयाला धका न बसू देणे, ही खासियत लताबाई आणि आशा भोसले, दोघींच्या गायकीत पुरेपूर आढळते. 
मग, प्रश्न आहे, जर का आशा भोसले यांची गायकी इतकी समृद्ध आहे तर, त्यांच्या काळातदेखील लताबाईंच्या गायकीचा प्रभाव कसा टिकून राहिला? इथे मला वाटते, यापलीकडे जाऊन, लताबाईंच्या गायकीची थोडी छाननी करावी लागेल. जर का लताबाईंच्या गायकीचे बारकाईने निरीक्षण केले तर असे  सहज दिसेल, १९४५ सालची गायकी, पुढे १९५५ साली थोडी बदलली, ती १९६५ च्या सुमारास आणखी वेगळे वळण घेऊन प्रकटली. १९७५च्या सुमारास त्यात आणखी वेगळे रंग भरले. याचाच अर्थ, लताबाईंनी काळानुरूप गळ्यावर जे नैसर्गिक परिणाम घडतात, त्या परिमाणांची जाणीव ठेऊन, सतत गायकीत बदल घडवत आणला आणि त्यामुळे आपसूकच त्यांची गायकी नेहमी "उन्मेषशाली" राहिली. अर्थात, हा प्रकार, कमी अधिक प्रमाणात आशा भोसल्यांच्या गायकीत देखील दिसून येतो. तारुण्यातील आवाजातली ताजगी ही सरत्या तारुण्याबरोबर लयाला जात असते आणि तिथेच गायकीचा "बौद्धिक" भाग सुरु होतो आणि याचे भान, या दोन्ही गायिकांनी नेमकेपणी लक्षात ठेवल्याचे समजून येते. 
लताबाईंनी, सुरवातीच्या काळात, गायकीत जी नवीन वैशिष्ट्ये आणली, त्यात "वास्तववाद, प्रयोगशीलता याबाबत सांगीत सौंदर्याचा अनुनय करताना, एक संपूर्ण वेगळी प्रणाली बनवली.". त्यांच्या आवाजातील "प्रसादगुण" केवळ असामान्य आहे. तारता पल्ला अतिशय विस्तृत असल्याने, लयीच्या सर्व दिशांनी त्यांना चपलगती चलन सहज शक्य आहे. याचाच वेगळा अर्थ, सगळ्या सप्तकात गळ्याचे अव्याहत विहरणे, सहज शक्य होते. त्यामुळे गायकीच्या अनेक आविष्काराच्या ज्या शक्यता आहेत, त्या लताबाईंच्या गायकीत मूर्त स्वरूप घेतात. मला वाटते, इथे आशा भोसले आणि लताबाई, यांच्या गायकीतील फरक थोडाफार स्पष्ट व्हावा. असे असून देखील, गाताना, ज्या हरकती घेतल्या जातात तिथे नकळत का होईना, लताबाईंची छाप जाणवते आणि हा जो लताबाईंच्या गायकीचा प्रभाव आहे, त्याने अविरतपणे, ५० वर्षे अधिराज्य गाजवले, असे म्हणावेच लागेल. 
गाताना, शब्द संपविताना, तो शब्द, सुरांच्या सहाय्याने अधिक "टोकदार" कसा होईल, तसेच गाण्यातील ओळ संपविताना, शेवटचे अक्षर उच्चारताना, इथे एखादी "सुरेल" जोड देऊन, रचनेचे मूळ सौंदर्य अधिक खुलवायचे, हे जे विचार आहेत, याचा वेगळ्या अर्थाने आशा भोसल्यांच्या गायकीवर परिणाम काही प्रमाणात जाणवतो. इथे मी "वेगळ्या अर्थाने" हे शब्द मुद्दामून वापरलेत. कुठलीही सांगीतिक कृती जेंव्हा नव्याने निर्माण होते, तेंव्हा त्याचवेळी तिथे त्याच्या आणखी वेगळ्या सांगीतिक वाक्यांशाची अनुभूती होत असते, म्हणजेच, एखादे improvisation जिथे घेतले जाते, तिथे त्याच्याबरोबरीने, त्यापेक्षा अधिक improvisations होण्याच्या शक्यता निर्माण होत असतात आणि तिथे आशा भोसले, यांची गायकी वेगळी होते. 
आता, लताबाईंच्या अशा असामान्य गायकीचा प्रभाव पुढील गायीकांवर पडणे सहज शक्य होते आणि तसा दीर्घकालीन पडला देखील. सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल पासून ते हल्लीच्या श्रेय घोशाल, कविता कृष्णमुर्तीपर्यंत सगळ्या गायिका ध्यानात घेतल्या आणि त्यांची गायकी, जरा बारकाईने ऐकली तर माझे म्हणणे पटू शकेल.  वास्तविक,इथे उल्लेखिलेल्या प्रत्येक गायिकेची स्वत:ची अशी शैली आहे पण तरीही काही अवघड रचना गाताना, लताबाईंनी जे "मानदंड" निर्माण केलेत, त्याची "पडछाया" कुठेतरी पडते. कुणी, १९६५ सालची गायकी अनुसरली तर कुणी १९७५ नंतरची गायकी मान्य केली परंतु यांच्या गायकीत लताबाईंचा विचार अस्पष्ट हा होईना दिसून येतो. 
आता प्रश्न असा आहे, लताबाईंनी जी गायकी निर्माण केली, त्यापलीकडे गायकी आहे का? तर तशी निश्चित आहे. इथे मला चुकूनही लताबाईंच्या प्रभावाला आव्हान द्यायचे नसून, त्या गायकीपलीकडील सांगीतिक शक्यता आणि त्या शक्यतांचे प्रकटीकरण, याचा उहापोह करायचा आहे. गेली काही वर्षे, लताबाईंनी गाणी गाण्याचे सोडून दिले आह. आपण असे म्हणू,साधारणपणे, १९९० नंतर लताबाई फार तुरळक गायल्या आहेत. याचाच वेगळा अर्थ असा काढता येईल, १९९० नंतर ज्या गायिका उदयाला आल्या, त्यांच्यावर लताबाईंच्या गायकीचा प्रत्यक्ष ठसा उमटणे तसे अवघड. अर्थात, १९९० नंतर हिंदी चित्रपट संगीताने देखील बरीच वेगवेगळी वळणे घेतली, Recording ची अनेक अद्ययावत साधने उपलब्ध झाली आणि चित्रपट गीत गाणे, तसे सोयीस्कर व्हायला लागले. याचे फायदे नवीन कलाकारांना निश्चितच होत आहेत. देशाच्या प्रत्येक भागातून गायिका उपलब्ध झाल्याने, गायनातील "टोनल क्वालीटी" बदलली, काहीशी लोकसंगीताकडे झुकली आणि गायकीत थोडे "रांगडेपण" दिसायला लागले. 
पूर्वी कितीही नाकारायचे ठरविले तरी, गायकाला किंवा गायिकेला,थोडेफार शास्त्रोक्त संगीत यावे किंवा किमानपक्षी त्याची माहिती अथवा जाणीव असावी, हा एक विचार प्रबळ होता. आता, सध्या Recording ची अत्याधुनिक साधने उपलब्ध झाल्याने, बरेचवेळा "कणसूर" गायकी देखील "सुरेल" भासवण्याची करामत शक्य झाली आहे. इथे मला "कणसूर" म्हणजे काय आणि "सुरेल" या शब्दापासून त्याची फारकत कशी होते, हे मांडणे जरुरीचे वाटते. एखादा गायक "बेसूर" असतो म्हणजे, तो ज्या स्वराचा निर्देश करीत असतो, त्यापेक्षा वेगळ्या कक्षेतील सूर लावत असतो!! थोडक्यात, "गंधार" स्वर लावताना, त्याच्यावर "रिषभ" किंवा "मध्यम" स्वराची छाया पडणे, म्हणजे "बेसूर" होणे. परंतु, "गंधार" लावताना, "मध्यम" स्वराच्या इतके जवळ जायचे की त्याचे केवळ सूचन व्हावे, याला "कणसूर" म्हणतात.दोन्हीत फरक सूक्ष्म आहे पण आहे, हे नक्की. आता, उदाहरण द्यायचे झाल्यास, मुकेश या गायकाचा आवाज घेऊया. मुकेशचे नाव मुद्दामून लिहिले कारण, एकेकाळी मुकेश प्रचंड लोकप्रिय गायक होता आणि आजही त्याचे रसिक जागोजाग भेटतात. "मतवाली नार ठुमक ठुमक चली जाय" हे गाणे वरील संदर्भात ऐकावे. मुकेश बाबत लिहायचे झाल्यास, संपूर्ण सप्तक, त्याच्या गळ्याच्या आवाक्यातील बाब नव्हती तसेच तार सप्तकात, त्याचे चाचपडणे सुरु व्हायचे. जास्तीजास्त "पंचम" स्वरापर्यंत त्याचा गळा सुरेल व्हायचा पण पुढे मात्र अडखळणे सुरु व्हायचे आणि कधीकधी, अगदी "बेसूर" जरी नसले तरी गायन "कणसूर" व्हायचे. पुढील काळात, "शब्बीरकुमार" सारखे काही गायक नव्याने उदयाला आले परंतु दुर्दैवाने गळ्यावर "मेहनत" घेतली नसल्याने, "बेसुरे गायक" या उदाहरणासाठी त्यांची नावे घ्यायला लागली. तेंव्हा, पूर्वीचे सगळे गायक/गायिका सुरेल होत्या आणि आजच्या नाहीत, हे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु पूर्वी साधनांच्या अपुरेपणामुळे, गायनातील अपुरेपण "लपविणे" अवघड असायचे!! पूर्वीच्या कितीतरी आवाजांना "सुरेल" म्हणणे म्हणजे स्वत:च्या हाताने, स्वत:च्या रसिकतेची कबर खणण्यासारखे आहे!! 
मघाशी मी, नवीन आलेल्या गायक/गायिकांत, त्यांच्यावर असलेला लोकसंगीताचा प्रभाव आणि थोडे "रांगडेपण" अधिक आढळायला लागले, असे विधान केले होते आणि त्या संदर्भात थोडा विचार करूया. अगदी, सुरवातीपासून हिंदी चित्रपट संगीताचा विचार केला तर बहुतेक गायक/गायिका या शहरातून आलेल्या दिसून येतात, जरी काही मुस्लिम कलाकारांवर उत्तर भारतीय संगीताचा प्रभाव असला तरी. तसे बघितले तर शमशाद बेगम, मुबारक बेगम यांचे आवाज निश्चितपणे  "रांगडा" आवाज असे म्हणता येईल. परंतु एकूणच त्यावेळचा चित्रपट संगीताचा "ढाचा" आणि संगीत रचना पाहिल्या तर असे आढळून येईल, बहुतेक गाणी ही रागदारी संगीताचा आधार घेऊन बनवली आहेत. शमशाद बेगम, प्रामुख्याने, नौशाद, ओ.पॆ. नैय्यर यांच्याकडे गायली. नौशाद तर उघडपणे शास्त्रोक्त संगीताचा पुरस्कार करणारे संगीतकार. त्यामुळे त्यांच्या रचनेत नेहमी कुठेतरी गाण्यात रागाचे "तरळणे" आढळून यायचे आणि अगदी उत्तर प्रदेशातील लोकसंगीताचा वापर केला तरी शास्त्रोक्त संगीताचा प्रभाव सहज दिसून यायचा. 
ओ.पी. नैय्यर तर अत्यंत मोकळेपणी, लोकसंगीताचा मुबलक वापर करीत असत आणि त्या ढाच्यात शमशाद बेगम चपखल बसली. असे असले तरी एकूणच तिचे गायन फार स्तरावर चित्रपटात वापरले गेले. अन्यथा बहुतेक गायिका, या थोड्याफार "प्रशिक्षित" गायिका असायच्या. १९९० नंतर, एकूणच चित्रपट संगीताचा तोंडावळा बराच बदलत गेला आणि त्यामुळे, नवनवीन आवाजाची गरज भासू लागली आणि त्यातूनच हल्लीच्या अनेक गायिका उदयाला आल्या. या नव्या गायीकांत उषा उथुप (पाश्चात्य ढंग), रेखा भारद्वाज (प्रशिक्षित गायिका) सुनिधी चौहान (प्रशिक्षित तरीही लोकसंगीताची डूब असलेला) हेमा सरदेसाई (पाश्चात्य धाटणीचा गळा) जसपिंदर नरूला (पंजाबी लोकसंगीत) या आणि अशा अनेक गायिका उदयाला आल्या आणि कितीही नाकारायचे म्हटले, गायनातील Tonal Value या संकल्पनेला अपरिमित महत्व आले. 
या गायीकांबाबत सुरु करायच्या आधी एक बाब स्पष्ट करतो. या नवीन गायिका आणि लताबाई, अशी तुलना इथे अजिबात अभिप्रेत नाही. हे नवीन आवाज प्रकाशात आले आणि संगीत रचनांची धाटणी बदलली. अर्थात, इथे अनेक पुरुष गायकांची देखील नावे येऊ शकतील, जसे, सोनू निगम, शान, मोहित चौहान इत्यादी. जोपर्यंत लताबाईंचा आवाज आसमंतात होता, तोपर्यंत अत्यंत वेगळ्या धाटणीची गायकी फारशी अस्तित्वात आली नव्हती. बहुतेक संगीतकार, एकतर लताबाई  किंवा आशाताई, यांनाच नजरेसमोर ठेऊन, रचना तयार करीत असत. 
आता "टोनल क्वालिटी" म्हणजे काय? असा जर प्रश्न उद्भवला तर, त्याबाबत थोडे विवरण करणे आवश्यक ठरते. ध्वनीशास्त्रानुसार प्रत्येक गात्या गळ्याचे काहीना काहीतरी वैशिष्ट्य हे नेहमीच असते. त्यात काहीना काहीतरी असामान्य आणि काहीतरी न्यूनत्व देखील असते. कुठलाही गायक याला नियमाला अपवाद नाही. गायन सुरेल असणे जरुरीचे आहे, हा अत्यंत ढोबळ विचार झाला कारण त्याशिवाय गाणे सिद्धच होऊ शकत नाही. परंतू प्रत्येक सुरेल आवाजाची प्रत किंवा जातकुळी ही वेगळी असते. शास्त्रोक्त भाषेत लिहायचे झाल्यास, प्रत्येक गळ्याचा "षडज" हा वेगळा असतो आणि त्यानुसार पुढील सप्तक तयार होते. आता या पहिल्या स्वराची जी जातकुळी असते, तिथे "टोनल क्वालिटी" सिद्ध होते आणि पुढे ती गायकी विस्तारत जाते. वर मी जी काही नवीन नावे दिली आहेत, त्यांचा या संदर्भात विचार होणे, जरुरीचे आहे. थोडक्यात, जो तुमच्या गळ्याचा पोत असतो, त्याची गोलाई, त्याचा टोकदारपणा तसेच आवाजाची धार, ह्या सगळ्या बाबी "टोनल क्वालिटी" मध्ये येतात आणि इथेच प्रत्येकाचा "गळा" वेगळा असल्याची सिद्ध होते.तेंव्हा आता, या पुढील विवेचनात, हिंदी चित्रपट संगीतात जे नवीन आवाज उदयाला आले, त्या आवाजाचे थोडे विश्लेषण, काही गाण्याच्या संदर्भाने आपल्याला करायचे आहे. 
सपना अवस्थी:-  "चल छैय्या छैय्या" या गाण्याने विशेष प्रसिद्धीला आलेली गायिका. वास्तविक या आधी तिचे, "तुझे याद ना मेरी आये" हे "कुछ कुछ होता है" या चीत्रापातील गाणे गाजले होते पण तरीही खरी प्रसिद्धी मिळाली ती, "चल छैय्या छैय्या" याच गाण्याने. एका दृष्टीने तिला वरच्या श्रेणीची किंवा प्रसिद्ध गायिका म्हणता येणे अवघड आहे पण तरीही आवाजाची जातकुळी बघायला गेल्यास, काळी तीन किंवा त्या वरच्या पट्टीत तिचा आवाज सुंदर लागतो आणि ती पट्टी, लोकसंगीताच्या दृष्टीने योग्य वाटते. सर्वसाधारपणे लोकसंगीत हे जरा जोमदारपणे म्हटले तर त्याचा आवश्यक तो परिणाम साधला जातो आणि तसा सपना अवस्ठीच्या बाबतीत अवश्यमेव घडतो. कारकीर्दीच्या सुरवातीला तिला "परदेसी, परदेसी जाणा नाही" सारखे लोकप्रिय गाणे मिळाले आणि ते देखील लोकसंगीतावर आधारित असल्याने, तिच्या गायकीला शोभून दिसले. लोकसंगीतात जे रांगडेपण असते, तो बाज होच्या गळ्यातून नेमका निघतो. "कुमाऊ" सारख्या डोंगराळ भागात राहिल्याने, गळ्यावर तिथलेच संस्कार चढले. अर्थात, याचा एक तोटा असा होतो, ठराविक बाजातली(च) गाणी गायला मिळाल्याने, पुढे एकसुरी गायन होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. गायनातील नैसर्गिक देणगीला, रियाझाने आवश्यक ते वळण मिळवून देणे, आवश्यक ठरते. बहुदा याच कारणास्तव, सध्याच्या स्पर्धेच्या युगात हा आवाज मागे पडण्याची शक्यता आहे. 
लोकसंगीतावरील गाण्यात, एक गुण अवश्यमेव असतो. गाण्याच्या ठेक्याने, ती गाणी सहज ओठांवर रुळतात परंतु जर का गाण्याला आयुष्य मिळवून द्यायचे झाल्यास, तुम्हाला गळ्यावर, गायनाच्या निरनिराळ्या "परी" चढवून घ्यायलाच लागतात. हिच्या बाबतीत हा दोष निर्माण होऊ शकतो.तसे पाहिले तर प्रत्येक चित्रपटात, लोकसंगीताच्या बाजाची गाणी मिळतीलच असे नाही, किंबहुना हिची कारकीर्द बघितली तर असे दिसेल, १९९४ साली "क्रांतिवीर" चित्रपटात तिने पहिले गाणे गायले, म्हणजे गाण्याच्या क्षेत्रात येउन आता, २० वर्षे झाली परंतु गाण्याची संख्या त्या मानाने अजिबात लक्षणीय नाही. चित्रपटात अनेक प्रसंग असतात आणि त्यानुरूप आवाजात लवचिकता आणणे जरुरीचे असते. अर्थात, जिथे लोकसंगीत आहे, तिथे मात्र, हिचा गळा अप्रतिम खुलतो. वर म्हटल्याप्रमाणे, काळी तीन पासून चार, क्वचित पाच, या पट्टीत गायन होत असल्याने, रसिकांवर त्याचा लगेच परिणाम होतो. तरीदेखील जेंव्हा, लता युग अस्ताला यायला लागले, त्यानंतरच्या काळातील एक लक्षणीय आवाज म्हणून नोंद करावीच लागेल. 
सुनिधी चौहान:- सध्याच्या काळातील आघाडीची गायिका म्हणून नाव घ्यावे लागेल. दिल्लीत जन्म झाल्याने, आणि वडील थियेटर संबंधित असल्याने, कलाविश्वाची ओळख सहज झाली. टीव्हीवर ज्या गाण्याच्या स्पर्धा होतात, त्यातून चित्रपट सृष्टीला मिळालेला आवाज. "मेरी आवाज सुनो" या गाजलेल्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवल्याने, लहानपणीच लोकप्रियतेच्या झोताचा अनुभव मिळाला. "मस्त" चित्रपटातील "रुकी रुकी सी जिंदगी" हे पहिले गाणे, व्यावसायिक गायिका म्हणून गायला मिळाले आणि चित्रपटसृष्टीत गायिका म्हणून प्रवेश झाला. आवाजाची जात अगदी पातळ नसली तरी अत्यंत लवचिक आहे. लहानपणापासून संगीताचे रीतसर शिक्षण घेतल्याने, गायकी अंगाचे संस्कार लगेच दिसून येतात तसेच पाश्चात्य संगीताचा अभ्यास केल्याने, तिथल्या गायकीचे वळण, गळ्यावर चढलेले आहे. याचा फायदा असा झाला, कुठल्याही प्रकारचे गाणे वर्ज नाही. आवाज, तिन्ही सप्तकात सहज फिरणारा त्यामुळे गाताना, येणाऱ्या हरकती, खटके आणि सतत रियाझाने कमावलेले श्वासावरील नियंत्रण, यामुळे गाण्याला एकप्रकारचा भरीवपणा प्राप्त करून देणे सहज शक्य होते. अतिशय सुरेल आवाज, असे वर्णन करता येईल. 
गाताना, काहीवेळेस, आशा भोसल्यांच्या गायकीचा झाक अस्पष्ट अशी दिसते तरीही स्वत:ची शैली निर्माण करण्यात यशस्वी म्हणता येईल. गाण्यावर जागतिक संगीताचे संस्कार झाल्याने, गळ्याला वेगवेगळी "वळणे" देण्यात वाकबगार. "सनई चौघडे" या मराठी चित्रपटातील "कांदे पोहे" हे गाणे या संदर्भात ऐकावे. गाण्यात चढ-उतार फार आहेत, काही ठिकाणी पाश्चात्य संगीताच्या धर्तीवर हरकती आहेत पण तरीही गाणे फारच श्रवणीय झाले आहे. भारतातील बहुतेक भाषेत गाणी गाण्याची किमया, यामुळेच सहज साधली गेली. "बिडी जलइले" सारखे रांगडे गाणे असो किंवा "शीला की जवानी" सारखे उठवळ चालीचे गाणे असो, दोन्ही गाण्यात, तिच्या गळ्याची "रेंज" कळून येते. "मिशन काश्मीर" मधील "भुमरो" सारखे लोकसंगीतावर आधारित गाणे देखील तितक्याच तन्मयतेने गाण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. चित्रपटात असंख्य प्रसंग असतात आणि प्रत्येक प्रसंगासाठी, रचना वेगळ्या धाटणीच्या असतात. त्या प्रत्येक प्रसंगासाठी, आपला आवाज सहज जुळवता येईल , असा "अष्टपैलू" गळा, असे सार्थ वर्णन करता येईल. 
श्रेया घोषाल:- सुनिधी प्रमाणेच गाण्याच्या (सारेगम स्पर्धेतून) पुढे आलेली गुणवंत गायिका. पश्चिम बंगालमध्ये जन्म, अर्थात गळ्यावर बंगाली गायकीचे संस्कार. तसे पाहिले तर, गीता दत्त देखील मुळची बंगाली आणि तिच्या आवाजावर बंगाली ठसा स्पष्ट दिसायचा परंतु श्रेयाच्या आवाजावर तसा ठसा दिसत नाही, ही मोठी जमेची बाजू. शास्त्रशुद्ध संगीताचे रीतसर शिक्षण झाल्याने, गळा "तयार" आहे. आवाजात "घोटीवपणा" आणि नैसर्गिक गोडवा, याचे मिश्रण आहे. शास्त्रीय संगीताची तालीम असली तरी गळा जड होईपर्यंत नसल्याने, आवाजात लवचिकता आली. अर्थात, अवघड चालींची गाणी, किंवा गाताना, एखादी मुरकी किंवा हरकत, सहजगत्या गल्ल्यातून जाते आणि त्यामुळे गाण्याचे सौंदर्य अधिक खुलते. सुरवातीला, गायनावर लताबाईंच्या शैलीचा प्रभाव जाणवायचा पण लवकरच स्वत:ची शैली निर्माण केली. कारकिर्दीची सुरवात बंगाली गाण्यांनी झाली तरी लवकरच प्रसिद्ध चित्रपट "देवदास" मिळाला आणि अचानक प्रसिद्धीचा झोत अंगावर पडला. या चित्रपटातील गाणी अर्थात, रागदारी अंगाची असल्याने, गाणी श्रवणीय झाली. याच चित्रपटातील गाण्यांनी, तिला प्रादेशिक, तसेच राष्ट्रीय पारितोषिके मिली आणि या क्षेत्रात स्थिर व्हायला मदत झाली. जरी सुरवातीला लताबाईंचा प्रभाव असला तरी, नंतर स्वत:ची वेगळी ओळख करू शकली. आवाज तिन्ही सप्तकात सहज फिरत असल्याने, गळ्याला कसेही "वळण" देता येते. 
रेखा भारद्वाज:- कवी गुलजार लिखित"नमक इश्क है" या गाण्याने प्रसिद्धीस आली. शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास. पुढे, "ओंकारा" चित्रपटातून चित्रपट सृष्टीत प्रवेश. आवाजाची जात जरा जाडसर आणि याचे कारण रागदारी संगीताचा रियाझ. बहुतेक गाणी, विशाल भारद्वाज - नवऱ्याच्या संगीत दिग्दर्शनाखाली. आवाज लयीला पक्का परंतु तरीही लोकसंगीताचा जबरदस्त प्रभाव. मघाशी मी म्हटले त्याप्रमाणे, हिंदी चित्रपट संगीताचा ढाचा १९९० नंतर फार वेगळा होत गेला आणि त्याचा परिणाम रचना, गायन या घटकांवर होत गेला. रेखा भारद्वाज यांची गायकी ऐकताना, याचे नेमके प्रत्यंतर येते. आवाजात थोडा "लखनवी" ढंग तसेच उत्तर प्रदेशाचे लोकसंगीत, असा गळ्यावर ठसा स्पष्ट दिसत असल्याने गायकी वेगळ्याच अंगाने खुलून येते, मग त्यात, खटका, मुरकी असे अलंकार लगेच दिसतात. 
हर्षदीप कौर:- शीख कुटुंबात आणि दिल्लीला जन्म, वडिलांचा संगीत वाद्ये विकण्याचा व्यवसाय. अर्थात, संगीताची आवड लहानपणापासून. सुरवातीला शास्त्रोक्त शिक्षण, पुढे पियानोवर पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा अभ्यास आणि नंतर सुफी संगीताचा गाढा अभ्यास. याचा परिणाम, गायनात स्पष्ट दिसतो. रेहमान, प्रीतम, विशाल भारद्वाज सारख्या वेगवेगळ्या प्रकृतीच्या संगीतकारांकडे गायनाची संधी मिळाल्याने, गळ्यावर जागतिक संगीताचा मनोहर संकर आढळतो. "सानू ते ऐसा माही" आणि "चांद की कटोरी" ही गाणी मुद्दामून ऐकावीत म्हणजे, गाण्याच्या रचनेप्रमाणे गायकीत कसा बदल करता येतो, हे समजू शकेल. 
या लेखाचा प्रमुख उद्देश असा आहे, लताबाईंची गायकी आणि प्रभाव, जवळपास ४ ते ५ पिढ्यांवर टिकून होता आणि या काळात, कुठलीही गायिका, या प्रभावातून स्वत:ला "मुक्त" करू शकली नाही. संगीत हे कधीच एकानुवर्ती किंवा एक केंद्रस्थानी नसते आणि नसावे. या प्रभावातून बाहेर पडणे तसे सहज, सोपे नव्हते परंतु १९९० नंतर, रेहमान, विशाल भारद्वाज, प्रीतम किंवा शंकर/एहसान/लॉय या आणि अशा अनेक संगीतकारांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. अर्थात, या प्रयत्नांना, वरील गायिकां आणि इतर अनेक गायिकांची साथ मिळाली आणि चित्रपट संगीत अधिक रंगतदार, वैविध्यपूर्ण झाले, ही वस्तुस्थिती आहे. आता, यात गुणात्मक बदल किती, दर्जात्मक बदल किती, हा वेगळ्या निबंधाचा विषय आहे. 
जेंव्हा, हिंदी चित्रपट संगीताच्या प्रांगणात लताबाई, आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांची सद्दी होती, तेंव्हा बहुतेक गायिका या शहरातून येत होत्या, बहुतेक सगळ्या प्रशिक्षित होत्या परंतु १९९० नंतर चित्रपट संगीतात जे मन्वंतर होत गेले, त्यात, भारतातील कानाकोपऱ्यातून गायिकांचा शिरकाव झाला, तसेच टीव्हीवरील संगीत स्पर्धेतून नवीन आवाजांना वाव मिळाला आणि संगीताच्या प्रांगणात आवाजाचे वैविध्य अनुभवायला मिळाले. हरदीप कौर सारखी गायिका थेट पंजाबचा गंध घेऊन आली तर हेमा सरदेसाई, उषा उथप सारख्या गायिका पाश्चिमात्य ढंग घेऊन अवतरल्या, रेखा भारद्वाज, उत्तर प्रदेशाचा "नखरा" घेऊन प्रकट झाली. हेमा सरदेसाईचे नाव निघाले आहे, तर "जानम समझा करो" सारखे पाश्चात्य संगीताच्या वळणाचे गाणे आणि "अस्तित्व" चित्रपटातील "कितने किस्से है" सारखे सुश्राव्य गाणे तुलनात्मक दृष्टीने ऐकावे आणि एकाच आवाजातील निरनिराळे "विभ्रम" समजून घ्यावे.  
तसे बघितले तर, यातील बहुसंख्य गायिका, सुरवातीला शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेऊनच आल्या परंतु चित्रपट गीत गाताना, याचा किती उपयोग करायचा आणि मुळात, आपल्या प्रदेशातील लोकसंगीताचा रंग आणि अर्क, गाण्यात कसा उतरवायचा, याची नेमकी दृष्टी घेऊन आल्या. याचा परिणाम असा झाला, चित्रपट संगीत वेगवेगळ्या अंगाने विकसित होत गेले. संगीत वेगवेगळ्या अंगाने विकसित होत गेले कसे? असा प्रश्न इथे उद्भवतो. सुफी संगीताचा प्रवेश आणि त्यानुसार संगीतात आलेला अनोखा रंग आणि गायकी खरोखरच अप्रतिम आहे. 
सुफी संगीताचा विषय आला तेंव्हा, प्रसिद्ध गायिका, कविता सेठने गायलेले "वेक अप सिड" चित्रपटातील "एकतारा" हे गाणे ऐकण्यासारखे आहे. यात, लयीचे किती वेगवेगळे बंध ऐकायला मिळतात. याचा संदर्भात इथे सपना अवस्थी या गायिकेचे नाव आठवले. तिने गायलेले "छैय्या छैय्या" किंवा " कुछ कुछ होता है" चित्रपटातील "तुझे याद ना मेरी आये" सारखी अतिशय प्रसिद्ध गाणी ऐकली तर लगेच लक्षात येईल, तिने चित्रपट संगीतात भोजपुरी संगीताचा नवा रंग आणला आणि नव्या पिढीतील गायिकांत, स्वत:ची ओळख ठाम केली.
ही सगळी गाणी आणि गायिका ऐकताना एक गोष्ट ठामपणे जाणवते, या गायिकांनी चित्रपट संगीतात निरनिराळे रंग आणि ढंग आणून, चित्रपट संगीताच्या कक्षा आणखी विस्तारित केल्या आणि त्याचबरोबर गायकी अंग आणि प्रयोगशीलता, याचे नवीन मानदंड निर्माण केले आणि एकूणच संगीताचा आवाका आणि शक्यता विचारात घेता, असे बदल आवश्यकच होते. 
या निमित्ताने, हिंदी चित्रपट संगीत, १९९० नंतर जी वळणे घेत गेले, त्यामागील नवीन गायिकांचा सहभाग किती वैशिष्ट्यपूर्ण आहे, याचाच आढावा घेतला आहे.