Monday, 20 July 2015

सुरमई रात - जयदेव

काही गाणी पटकन एकाच बैठकीत मोहित करत नाहीत, किंबहुना परकीच  वाटतात!! त्याची चाल लगेच मनाची पकड घेत नाही!! एखादी हरकत चकित करते किंवा मधलाच एखादा संगीताचा वाक्यांश लक्षात येतो. मुळात, जर का त्या संगीतकाराचे नाव झालेले नसेल तर ऐकतानाच मनात नाखुशी असल्याने गाण्याकडे थोडेसे दुर्लक्ष होते. हिंदी चित्रपट गीतांच्या बाबतीत "नाममहात्म" फारच महत्वाचे ठरते. लताबाईंच्या अनेक गाण्याविषयी असे  म्हणता येईल. १] प्यार की ये तलखिया, २] तारे वोही है, ३] सपना बन साजन आये, ही सहज सुचलेली गाणी उदाहरण म्हणून दाखवता येतील. या गाण्यांचे संगीतकार आता फारशा कुणाच्या लक्षात नाहीत,ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचबरोबर या गाण्यांच्या बाबतीत लोकप्रियतेची झुळूक देखील वाटेला आली नाही!! प्रस्तुत  गाणे,याच पठडीतले म्हणता येईल. जयदेव, हल्ली किती लोकांच्या स्मरणात आहे,मला शंका आहे (फार तर "अल्ला तेरो नाम" किंवा "अभी ना जाओ छोडकर" ही गाणी लक्षात असतील!!) तसा हा संगीतकार कधीच लोकप्रिय नव्हता किंवा त्याने लोकांच्या पुढे येण्यासाठी कधीही क्लुप्त्या लढविल्या नाहीत!! सत्तरीच्या दशकात जेंव्हा पाश्चात्य वाद्यमेळ भरात होता, तेंव्हा देखील अस्सल भारतीय पठडीत रचना करण्याचा अट्टाहास, जयदेव यांना चित्रपट सृष्टीच्या बाहेर ठेवत होता!! यात, नुकसान आपल्यासारख्या रसिकांचेच झाले!! 
साहिर लुधीयान्वी कवी म्हणून नेहमीच असामान्य होता. इथेच बघा, "सुरमई रात" हे शब्दच किती अप्रतिम आहेत, तिथे दुसरे कुठलेच शब्द योजता येणार नाही, रात्र ही "सुरमई" असण्यात जी लज्जत किंवा विखारी जाणीव आहे, त्याला तोड नाही. अशीच गंमत "महक" आणि "गेसू" या दोन शब्दात आहे. उर्दू भाषेचे असे खास वैशिष्ट्यपूर्ण शब्द!! या गाण्याची सुरवात फक्त लताबाईंच्या आवाजाने होते, "सुरमई रात है, सितारे है; आज दोनो जहां, हमारे है", इथे "रात" शब्द सुरांतून काढताना, स्वराला जी "वेलांटी" दिली आहे ( अर्थात लताबाई) ती अतिशय अनुपम आहे, त्या वेलांटीत मृदू आर्जव आहे. हल्ली अशी भाषा नेहमी ऐकायला येते, "गाताना, शब्दांना expression देणे आवश्यक आहे आणि ते आम्ही करतो" याचा अर्थ, पूर्वी कुणी लक्ष देत नव्हते का? त्यानंतरच्या वाक्यावर "सुबह का इंतजार कौन करे" गाण्याचा ठेका सुरु होतो. म्हणजे, पहिल्या दोन ओळींतून रचनेचे सूचन आणि नंतर त्याचे वजन आपल्याला ऐकायला मिळते. "सुबह का इंतजार कौन करे" ही ओळ दोनदा गायली गेली आहे, याचे मुख्य कारण, तोच त्या कवितेच्या आशयाचा प्रमुख विशेष आहे. कवितेत ही ओळ एकदाच लिहिली गेली आहे!! 

गाणे, प्रेम विरहाचे आहे, हे तर लगेच ध्यानात येते. प्रेमी जीवांची ताटातूट आणि तडफड, हे हिंदी चित्रपट गाण्यांचा खास आवडीचा विषय तरीही त्यात वेगळ्या प्रतिमा मांडून आशय अधिक पक्व करण्यात ज्या थोड्या कवींचा सहभाग आहे, त्यात साहिर अग्रभागी!! "सुबह का इंतजार कौन करे" अशी विफलता जाणवण्यासाठी "सुरमई रात" हे शब्द योग्य!! मेंडोलीन, व्हायोलीन याच वाद्यांचा प्रमुख उपयोग करून, पहिला अंतरा सजवला आहे. जयदेव यांची ही नेहमीच खासियत राहिली आहे, कमीत कमी वाद्ये वापरून गाणे सजविणे, जेणेकरून कवीच्या शब्दांना कुठेही धक्का बसणे शक्यच नाही!! वास्तविक, ५०,५० व्हायोलीन वादकांचा ताफा बाळगणे तेंव्हापासून भूषणास्पद ठरत होते ( काही अपवादात्मक गाणी वगळता इतका प्रचंड ताफा बाळगणे गरजेचे होते/आहे का? पण हा प्रश्न कधीच कुणी विचारात नाही!!) 
पुढील ओळीत शेवटाला "वक्त का ऐतबार, कौन करे" यातील, "कौन" शब्द जरा बारकाईने ऐकावा. ""कौ' आणि "न" यातील, "कौ" नंतर स्वरांत बारीकशी थरथर आहे, सहज ऐकताना, ध्यानात येणार नाही अशी हरकत आहे पण ती केवळ लाजवाब आहे. वास्तविक, कडव्याची सुरवात वरच्या सप्तकात सुरु होते, अगदी ध्रुवपदाच्या चालीपासून पूर्ण फारकत घेणारी स्वररचना सुरु होते, (जयदेव यांच्या बहुतेक गाण्यांत हे वैशिष्ट्य आढळते ) आणि हळूहळू स्वर मंद्र सप्तकात येतात, जणू शांतपणे झऱ्याचे पाणी, डोंगरउतारावरून खाली यावे!!  उच्चाराचेच आणखी एक उदाहरण. या कडव्यात, दुसरी ओळ " आरजू का चमन खिले ना खिले" ही आहे आणि यातील "खिले"हा शब्द असाच उद्मेखून ऐकावा असा आहे. उर्दू भाषेतील "ख" हा मराठी भाषेतील "ख" सारखा "खणखणीत" उच्चारत नसून, "क" अक्षराला "ह"चा निसटता स्पर्श दिला जातो. लताबाई गायिका म्हणून कुठे श्रेष्ठ ठरतात, ते इथे दिसते. बरे, असा अस्पष्ट "खिले" स्वरातून काढताना, लयीचा बिकट बोजा, कुठेही विसविशीत होत नाही, किंबहुना, समेच्या मात्रेशी होणारी जोड, ही जोड न वाटता, एकाच भागाची दोन दर्शने वाटतात. जयदेव आणि लताबाई यांचे हे कर्तृत्व!! 
चित्रपट गीतात तुम्हाला प्रयोग करायला तशा फारच थोड्या संधी प्राप्त असतात परंतु जाणकार संगीतकार, त्या नेमकेपणाने हुडकून काढतो आणि तिथे स्वरविस्ताराला जागा निर्माण करतो. पुढील कडव्यात हेच आपल्याला दिसून येते. शब्दोच्चार आणि त्याबरोबर पार्श्वभागी वाजणारी वाद्ये, याचा एकत्रित संकर  घडविणे,ही संगीतकाराची खरी मर्दुमकी!! बासरीचे सूर (बासरीचे सूर किती वेगळ्या पद्धतीने वाजविले आहेत, ते खास ऐकण्यासारखे आहे) जिथे संपतात, तिथे परत मेंडोलीन सुरु होते ( वास्तविक हे शब्द अधिक मोठे होतील, इतकेच ४ सूर आहेत) आणि तो सांगीतिक वाक्यांश भरीव होतो. दुसऱ्या कडव्याच्या शेवटच्या ओळीत , साहीरने "इल्तेजा बारबार कौन करे" असे लिहिले आहे. वास्तविक "इंतजार" आणि "इल्तेजा" एका दृष्टीने सारख्याच अर्थाचे शब्द आहेत पण तरीही "इल्तेजा" हा शब्द फारसा इतर गाण्यांत वापरलेला दिसत नाही आणि पर्यायाने फारसा कुणाच्या लक्षात येत नाही. खरा कवी दिसतो. तो इथे. माझ्या  अंदाजाने, "इल्तेजा" शब्द मुळचा फारसी!! प्रश्न कुठल्या भाषेतला नसून, जुना शब्द परंतु अमूर्त आशयासाठी योजणे, ही साहीरची खासियत. 
या गाण्यात, "सुबह का इंतजार कौन करे" ही  ओळ बरेचवेळा येते आणि याचे मुख्य कारण असे दिसते, कवितेचा मूळ आशय याच वाक्याभोवती आहे, "सकाळची वाट बघण्याची काहीही गरज नाही, कारण आता सगळी नाती तुटलेली आहेत!!" जयदेव यांची दृष्टी इथे दिसते, हे वाक्य जरी प्रत्येक कडव्याच्या शेवटी येते तरी ज्या सुरांवर हि ओळ फिरते, ती सुरवात मात्र वेगळी असते आणि तरीही भारतीय संगीताच्या नियमानुसार "समेचा' सूर मात्र नेमका पकडून ठेवते. वास्तविक, या गाण्यात, "अल्ला तेरो नाम" प्रमाणे चालीत वरखाली होण्याइतकी स्पष्टता नाही किंवा, "ये दिल और उनकी निगाहो के साये" प्रमाणे अवर्णनीय संतूरचे सूर आणि वरच्या सप्तकातील चाल, असे कान दिपवणारे काहीही नाही. ऐकताना, एका सरळ रेषेत गाणे चालले आहे, असेच वाटते पण प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. अतिशय फसवी चाल आहे परंतु प्रथमदर्शनी काहीच दिपवणारे नसल्याने, गाणे थोडे विस्मृतीत गेले आणि पर्यायाने जयदेव देखील तसाच विस्मृतीत गेला!! वास्तविक ही कविता आणखी दोन कडव्यांची आहे पण बहुदा चित्रपट गीताची लांबी वाढली असती, म्हणून बहुदा रचनेत घेतली गेली नसावी.  

शब्द शब्द जपून ठेव!!

गाण्याची चाल बांधताना, बरेचवेळा एक मुद्दा ठामपणे ,मांडला जातो. गाण्याची चाल "ओरिजिनल" आहे का? निर्मिती किती "स्व"तंत्र आहे?  संगीताच्या बाबतीत असा शोध  घेणे,बरेचवेळा व्यर्थ ठरते. एकतर कुठलेही गाणे घेतले तर त्याच्या चालीचा संबंध कुठे ना कुठेतरी रागदारी संगीताशी जुळलेला आढळतो. याचाच वेगळा  अर्थ,चाल त्या रागाशी संबंधित असते. मग, संगीतकाराची सर्जनशीलता कितपत सृजनाशी जवळीक साधते? हा उपप्रश्न उद्भवतो. तेंव्हा, एकूणच असे एक ढोबळ विधान करता येईल, "नव निर्मिती" याला अतिशय मर्यादित अर्थ असतो. खरेतर, मला नेहमी असेच वाटते, गाण्याची चाल, ही शब्दांशी किती संवाद साधते यावर त्या चालीचे स्वरूप आणि दर्जा जोखावा. कुठल्या रागावर, चाल आधारित आहे आणि त्या रागाचे "मूळ" स्वरूप गाण्यात कितपत राखले गेले आहे, हे प्रश्न काहीप्रमाणात गैरलागू ठरतात.  प्रस्तुत गाण्यात हाच प्रकार बरेचवेळा घडलेला आहे. वास्तविक, या गाण्यात, १ नाही तर चक्क ४  छटा दिसतात. १]  पुरिया,२]पुरिया धनाश्री, ३] मारवा आणि ४] सोहनी!! असे असून देखील, गाण्याची चाल म्हणून स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य अधोरेखित होते, ते वेगळेच. मुळात, केवळ एखाद्या रागावर गाण्याची चाल आहे, म्हणून ते गाणे चांगले, हा विचारच अर्धवट आणि पर्यायाने गाण्यावर अन्याय करणारा आहे. 
तसेच, कुठलेही गाणे, कवितेच्या अंगाने बघणे जरुरीचे आहे. मंगेश पाडगावकर, हे नाव निदान मराठी वाचकांना अजिबात अपरिचित असू नये. थोडा विचार केला तर, पाडगावकरांच्या गाण्यातील "गीतमयता" आणि त्याचे नाते अगदी भाऱा. तांब्यांच्या कवितेशी पोहोचते. तांब्यांची कविता, त्याचा पुढील विस्तार, बा.भ. बोरकरांच्या कवितेत आढळतो आणि त्याचेच आधुनिक स्वरूप पाडगावकरांच्या कवितेत दिसून येते!! अर्थात काळानुरुप, विषय, प्रतिमा इत्यादी बाबींत फरक पडणे, साहजिक आहे. तांब्यांच्या कवितेत, त्या काळातील इंदूरच्या सरंजामी संस्कृतीचा आणि काहीशा संस्कृतप्रचुर भाषेचा प्रभाव दिसतो, तर बोरकरांच्या कवितेत पोर्तुगीज संस्कृतीचा आढळ येतो आणि यातूनच पाडगावकरांची कविता सिद्ध होत गेल्याचे दिसून येते. 
कविता वाचताना, कवितेतील आशय सहज समजून घेता येतो तरीही काही प्रतिमा पटकन मनात चमकून जातात.
शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी

काय बोलले न कळे, तू समजून घे सगळे
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी

दुःख नको सुटताना, अश्रू नको वळताना
मी मिटता लोचन हे, उमलशील तू उरी

साक्ष लाख तार्‍यांची, स्तब्ध अचल वार्‍याची
ज्योत बनून जळले रे, मी तुझ्या पथावरी
इथे आपण शेवटच्या ओळी उदाहरणादाखल बघूया. 
"साक्ष लाख ताऱ्यांची, स्तब्ध अचल वाऱ्याची 
ज्योत बनून जळले रे, मी तुझ्या पथावरी" 
वास्तविक, हा कवितेतील शेवटचा चरण आहे पण, इथे ज्योतीची प्रतिमा कशी एकूणच कवितेच्या आशयाशी चपखल नाते जुळवून आली आहे.  चांगले गाणे  बघताना,गाण्याच्या चालीत शब्द किती सहजतेने बसले आहेत, हे बघणे अत्यावश्यक ठरते. 
भावगीतात कविता असणे जितके अत्यावश्यक तितकेच ती कविता, आशय, घाट, प्रतिमा इत्यादी घटकांनी समृद्ध असणे महत्वाचे ठरते. गाण्यातील शब्दात दुर्बोधता असावी का? हा एक उपप्रश्न इथे येऊ शकतो पण त्याबाबत फार विचार न करता, कवीच्या अभिव्यक्तीला मान देऊन, आपण पुढे जाऊया. एखादा वैय्यक्तिक अनुभव जेंव्हा काव्यरूप घेतो, तेंव्हा तो कवीच्या जाणीवेपासून मुक्त झाल्याखेरीज स्वत:चे रूप घेऊन,स्वत्वाने उभा राहणे अशक्य !! याच  दृष्टीकोनातून, "कवीची स्वत:ची भाषा" निर्माण होऊन अभिव्यक्तीवरही परिणाम होतो. कविता ही एका पातळीवर संवादच असतो आणि या संवादाचे वाहन भाषेतून निर्माण झालेले मान्य सामाजिक संकेत हेच आहेत. याच बाबींतून, कवीला संवाद घडविता येतो. या संदर्भात, या बघितले तर, कवितेतील भावनाशय हा सर्वस्वी पाडगावकरांचा आहे. पण अभिव्यक्त होताना, संवादाच्या वर उल्लेखिलेल्या अपरिहार्य स्थितीतून तो साकार होत असल्यामुळे रसिकांपर्यंत पोहोचतो आणि याच अर्थाने शब्दरूप घेऊ शकणार नाहीत, असे वाटणाऱ्या भावनाशयाच्या छटाही, आपल्याला निकटतेने जाणवाव्यात अशा रीतीने कवितेत शब्दरूप होतात. 
आता आपण गाण्याकडे वळूया. कवितेतील हळवी, आर्त अभिव्यक्ती लक्षात  ठेऊन,संगीतकार विश्वनाथ मोऱ्यांनी, सुरवातीलाच बासरीचे सूर घेतले आहेत. मारवा रागाची छटा दाखवत, कोमल निषाद स्वरावर, स्वररचनेची सम घेतली आहे आणि ती देखील, तबल्यावर मात्रेचे पूर्ण वर्तुळ घेऊन!! तिथेच चालीचे स्वरूप आणि गती दृष्टीस येते.  
"शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलांपरी" 
शब्दातील बकुळीच्या फुलांची प्रतिमा आणि तो नाजुकपणा, नेमका स्वरांतून व्यक्त व्हावा, हीच जाणीव दिसून येते. अत्यंत ठाय लयीत सुरवात आहे पण संथ नाही. सुगम संगीतात चाल अति संथ असून देखील चालत नाही. सुरवातीचे शांत स्वर आणि पुढे एकदम, "बकुळीच्या फुलांपरी" इथे वरचे स्वर, जे मारवा रागात येत नाहीत म्हणजे सुरवात जरी या रागाच्या  तरी क्षणात चालीचा मार्ग बदलतो आणि तालाच्या समेवरील मात्रेत विसर्जित होतो. साधी बाब आहे, "शब्द शब्द" हे शब्द ज्या सुरांवर सुरु होतात, त्याच सुरांवर ओळ संपते पण, रागाला बाजूला सारून!! 
संपूर्ण गाण्यात विषण्ण भाव पसरलेला आहे आणि तोच भाव शेवटपर्यंत रहातो. इथे गाण्यात, रूढ अर्थाने २ ओळीचे ध्रुव पद नाही त्यामुळे चालीचा जो "मीटर" आहे, त्यात सुरवातीची पहिली ओळ  दोनदा घ्यावीच लागते. त्यातून आणखी एक गोष्ट साध्य होते, चालीचा आराखडा रसिकांच्या मनात पक्का ठसतो. पहिल्या अंतरा घेताना परत बासरीचे सूर येतात आणि सोबत पुन्हा वेगळ्या रागाचे रूप घेऊन येतात पण कसे येतात, हे ऐकण्यासारखे आहे. गाण्यात अनेक राग वापरणे, हे काही नवीन नाही पण, दुसऱ्या रागाचे स्वर आधाराला घेताना, पहिल्या सुरांशी तितकेच तलम नाते, जोडावेच लागते अन्यथा चाल सगळीच फसण्याचा संभाव असतो. संगीतकार इथे समजून घेता येतो. स्वरांची जोडणी करताना, स्वरांचा  पोत, त्याचा आकार आणि  वजन,सगळे ध्यानात ठेउनच, रचना तयार करायची असते आणि त्याचा पुढे विस्तार करायचा असतो.
"काय बोलले न कळे, तू समजून घे सगळे;
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी"
"काय" या शब्दावरील किंचित साधलेली "हरकत" आणि लगेच "बोलले न कळे" या सुरांशी जुळलेले नाते!! चालीतील स्वर कसे फिरतात आणि पुन्हा मूळ चालीशी कसे नाते जुळवतात, ते इथे बघण्यासारखे आहे. "लाविलीस ज्योत तूच " यातील, "लाविलीस" शब्द परत वरच्या सुरांत घेतले आहेत - म्हणजे "बकुळीच्या" म्हणताना घेतलेला वरचा स्वर आणि "लाविलीस" म्हणताना घेतलेला वरचा स्वर, यात सत्कृतद्दर्शनी साम्य दिसते पण तसे अजिबात नाही आणि इथे स्वरांचे वजन, हा गुळगुळीत झालेला शब्द अवतरतो. अर्थात, इथे सुमन कल्याणपूर यांनाच "मार्क्स" द्यायला हवेत कारण स्वर कसे, किती प्रकारे घ्यायचे, हे गायकाचे स्वातंत्र्य. संगीतकार फक्त, कुठला स्वर कुठे घ्यायचा इतपत दिग्दर्शन करीत असतो पण पुढे त्याचे प्रकटीकरण अर्थात गायकाच्या गळ्यातून !! "लाविलीस" या शब्दावरील वरचा स्वर पुढे हळूहळू कसा खर्जात येतो आणि मूळ चालीशी जुळवून घेतो, हे  ऐकणे, म्हणजे स्वरांचा अननुभूत आनंद घेणे होय. "उदास अंतरी" इथे स्वर "उतरी" आहे आणि  हा जो स्वर आहे, तो "शब्द" इथे जुळतो.
"दु:ख नको सुटताना, अश्रू नको वळताना; 
मी मिटता लोचन हे, उमलशील तू उरी " 

दुसरा अंतरा सतारीच्या सुरांनी सजवलेला आहे. पहिलाच सूर थोडासा तीव्र मध्यम आहे पण ती सुरावट संपते ती, कोमल निषादावर!! (परत मारवा) त्याच सुरांवर बासरी सुरु होते, ते स्वरांचे "वळण" किती देखणे झाले आहे. हलकीशी फिरत आहे पण, सामेच्या मात्रेशी नाते दाखवत संपणारी!! "दु:ख नको सुटताना" मधली विखारी भावना पण हताशता व्यक्त होणारी. हे सांगताना, स्वर थोडा मंद्र सप्तकातला आहे आणि तो आशयाच्या दृष्टीने तसाच हवा. हे दु:ख उरस्फोडी, धाय मोकलून रडणारे नसून, अंतर्यामी उन्मळून पडणारे आहे, त्यामुळे त्याची अभिव्यक्ती ही अशीच व्हायला हवी. नंतरच्या ओळीतील "उमलशील तू उरी" हे  जरा वरच्या स्वरात आहे कारण चालीचा "मीटर"!! अन्यथा चाल परत आपल्या घरी कशी परतणार!! 
साक्ष लाख ताऱ्यांची, स्तब्ध अचल वाऱ्याची;
ज्योत बनून जळले रे मी तुझ्या पथावरी"
पाडगावकर, आपल्या कवितेत नैसर्गिक घटकांचा वापर कसा नेमका करतात, हे खरच अभ्यासावे. रात्रीच्या वेळी, शांत आसमंत असताना, सोबत ही आकाशातील ताऱ्यांची आणि शांत वाऱ्याचीच असणार पण कवीने इथे "शांत" शब्द न वापरता "स्तब्ध" वापरून, वातावरणातील  गडद केली आहे.  तिसरा अंतरा बांधताना, मोऱ्यांनी पहिल्या अंतरा मदतीला घेतलेला आहे म्हणजे बासरीचे सूर घेतले आहेत पण, गंमत अशी आहे, जरी सूर सारखे वाटले तरी त्यात श्रुतिमय फरक आहे. भारतीय संगीतात, श्रुती हा विषय अति अगम्य, किचकट विषय आहे पण, त्याला डावलून पुढे जाणे अशक्य!! अर्थात, या श्रुतींमुळे(च) प्रत्येक रागात फरक पडतो. बासरीचे सूर ऐकताना, याचाच आपल्याला पडताळा येतो. परिचित सूर वाटत असताना, एखाद्या सुराचा किंचित बदल तसा आपल्या ध्यानी येत नाही पण, पुढे स्वरविस्तार त्या बदलाला अनुलक्षून होत असल्याने, नंतर तो बदल जाणवतो. हे अति सूक्ष्म बदल लगेच जाणवत नाहीत आणि आपले अक्षम्य असे दुर्लक्ष होते. इथे तोच प्रकार घडतो. 
तसे बघितले तर मध्येच सोहनी रागाची छटा दिसते पण किती? एखाद, दुसऱ्या स्वरांच्या वळणांतून!! रागदारी संगीतावर प्रभुत्व असल्याशिवाय असली सांगीतिक वाक्ये सुचणे केवळ अशक्य!! वरवर ऐकले तर  आणि पहिले कडवे आणि या चालीत फारसा फरक दिसत नाही पण तो आहे. आपण फार बारकाईने ऐकत नाही!! 
या गाण्यात सुरांमधील फरक, हा अतिशय बुद्धीगम्य आहे आणि म्हणून हे गाणे तसे सरळ, साधे आणि श्रवणीय वाटते पण ते फार भासमान आहे. इथे मला, मराठीतील श्रीनिवास खळे आणि विश्वनाथ मोरे, यांचे साम्य दिसते. ऐकताना, सहज गुणगुणता येईल, अशी चाल असते पण प्रत्यक्ष गाताना गळ्याची परीक्षा घेणारी रचना असते. अर्थात खळ्यांच्या चाली अधिक गुंतागुंतीच्या असतात. संगीतात कधीही दोन गाण्याची तुलना  करू नये, असे मला नेहमी वाटते तरीही हे गाणे ऐकताना, मला खळ्यांच्या "या चिमण्यांनो परत फिरा रे" या गाण्याची फार आठवण आली.  कदाचित,दोन्ही गाण्यांत "पुरिया धनाश्री" आणि "मारवा" रागचचा वापर असल्याने असेल!! वास्तविक दोन्ही चाली फार वेगवेगळ्या आहेत तरी देखील!!  
अगदी संथ लय, मोजकी वाद्ये, गायकी ढंगाची चाल आणि अत्यंत गुंतागुंतीची रचना, यामुळे हे गाणे मला अतिशय आवडते. 
https://www.youtube.com/watch?v=fUxZ4HbDo_I

जीवनात ही घडी अशीच राहू दे!!

आपल्याकडे एक समज काहीसा दृढ झालेला आहे. चित्रपटातील गाणी आणि खाजगी गाणी, यात फरक करताना, शब्दकळा, वाद्यमेळ आणि गायकीत फरक केला जातो. थोडक्यात, दर्जा म्हणून बघताना खाजगी गीतात, शब्दकळा समृद्ध तसेच मोजका(च) वाद्यमेळ आणि गरज नसताना गायकीतला फरक दाखवला जातो. जणू काही चित्रपट गीतांत याची कसलीच गरज नसते. यादृष्टीने पुढे जाउन, अशी देखील वर्गवारी केली जाते - खाजगी गाणे म्हणजे शास्त्र आणि चित्रपट गाणे म्हणजे कलात्मकता असला (खरतर खुळचट ) फरक केला जातो!! वास्तविक, चित्रपटात अशी कितीतरी उदाहरणे दाखवता येतील, जिथे या समजाला छेद देता येतील. विशेषत: मराठी चित्रपटातील बरीच गाणी, दर्जा म्हणून फार "उजवी" आहेत. मोजका वाद्यमेळ, सशक्त कविता आणि तितकाच विलोभनीय गायकी आविष्कार. 
"जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गाणे असेच अप्रतिम गोड आहे. सहजसुंदर काव्यरचना, लोभस चाल आणि त्या चालीचे अत्यंत सुश्राव्य सादरीकरण. या गाण्याची एक गंमत आहे. या गाण्याचा कवी आणि संगीतकार एकच आहे - यशवंत देव. तसे बघितले रूढार्थाने यशवंत देव हे काही कवी नाहीत पण, शब्दांची जाण त्यांची निश्चित वाखाणण्यासारखी आहे. " स्वर आले जुळुनी" सारख्या  अजरामर रचनेची शब्दकळा देवांचीच. 
कुठल्याही गाण्यात, गाण्याचे शब्द हे त्याचे बलस्थान असते तरीदेखील, कवितेत किती प्रतिमा घ्याव्यात किंवा कुठल्या छंदात शब्दरचना करावी याबाबत काही संकेत आहेत. मुळात सगळा सुरांचा आविष्कार असल्याने, रचनेत सुरांचे प्राबल्य अवश्यमेव. याचाच वेगळा अर्थ असा होतो, गाण्यातील शब्द हे अति गूढ, दुर्बोध असू नयेत. अर्थात, असा काही नियम मांडणे कठीण आहे. गाण्यातील शब्द अर्थवाही असणे तसेच ओळीच्या सुरवातीला आणि शेवटाला जे शब्द किंवा अक्षरे असतील, ते सुरांशी जवळीक साधणारे असतील तर, तेच गाणे गायला सहज सुंदर जाते.यशवंत देवांनी एके ठिकाणी सुंदर विधान केले होते - "गाण्याची चाल कवितेतच दडलेली असते, आम्ही फक्त ती शोधून काढतो"!! सूत्रबद्ध विचार. इथे तर खुद्द संगीतकारच कवी असल्याने, शब्दातून काय मांडले आहे, याबाबत दुजाभाव संभवतच नाही!! 
सुरवातीलाच सतारीची सुंदर गत आहे. त्या सुरावटीत, गाण्याची चाल दडलेली आहे. यमन रागावर चाल आहे, हे सहज उमजून घेता येते. संगीतकाराला चाल बांधताना, शब्दातील आशय नेमका ओळखून, ओळीतील कुठल्या शब्दाला अधूक महत्व द्यायचे, हे नेहमी ठरवावे लागते, ज्यायोगे कवितेतील आशय अधिक खोलवर ध्यानात येऊ शकतो. इथे बघूया, 
"जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलांवरी वसंत नाचू दे" चाल ऐकताना, लगेच जाणवेल, "जीवनात" हा शब्द स्वरांत मांडताना, "जी" शब्दावर हलकासा जोर दिलेला आहे आणि त्यातून नेमका अर्थ ध्वनित केलेला आहे. संगीतकाराचा कवितेविषयीचा अभ्यास हा अशा प्रकारे समजून घेता येतो. तसेच गाणे एका उत्फुल्ल मनोवृत्तीचे असल्याने, ह्याच ओळी परत घेताना, लय दुगणित घेऊन, चाल थोडी जलद घेतली असल्याने, गाण्याची स्वरावली नेमकी मनात ठसते. चाल थोडी जलद घेतल्याने, गाण्यातील भावविभोर वृत्ती खुलून आली. 
पहिला अंतरा देखील याच अंदाजाने बांधलेला आहे. ध्रुवपद जलद लयीत संपविल्यावर तीच लय कायम ठेऊन, वाद्यमेळ, रचना केली आहे. सतारीच्या जोडीने बासरी आणि व्हायोलीनचे सूर घेतले आहेत. या इथे व्हायोलीनवर जे सूर घेतले आहेत, त्याची "घडण" थोडी यमन कल्याण रागाची आठवण करून देणारी आहे. हे व्हायोलीनचे सूर जरा ध्यानात ठेवणे जरुरीचे आहे कारण पुढील विवेचनात याच सुरांचे थोडे वेगळे संदर्भ आपल्याला बघता येतील. 
इथे जे व्हायोलिनचे सूर आहेत, ते जरा बारकाईने ऐकले तर, अशीच सुरावट "या चिमण्यांनो परत फिरा" आणि "जीवन डोर तुम्ही संग बांधी" या गाण्यातील दुसऱ्या अंतऱ्यात घेतलेली आहे. भारतीय संगीताची ही खास गंमत आहे. वास्तविक, हे गाणे यमन रागावर आधारित आहे पण तरीही यमन कल्याण रागाचा संदर्भ इथे चपखल लागू पडतो. आता, ही तिन्ही गाणी संपूर्ण वेगळ्या धाटणीची आहेत. एकाचा दुसऱ्याशी काहीही संदर्भ नाही पण, स्वरांची भाषाच अशी आहे, तिथे अशी जवळीक साधली जाते. या दोन रागांत प्रमुख फरक एकाच सुराचा आहे, एकात "शुध्द मध्यम" आहे तर दुसऱ्यात "तीव्र मध्यम" आहे. व्यासंग असा दिसतो की या स्वरांची जोड कशी संपूर्ण गाण्यात कशी सामावून घेतली जाते.  
अंतऱ्यातील जलद लय, पहिले कडवे सुरु होताना, परत मुखड्याच्या सुराशी येउन थांबते आणि कडवे सुरु होते. 
"रंगविले मी मनात चित्र देखणे, आवडले वेडीला ते स्वप्न खेळणे;
स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे"
या ओळीतील "चांदवा"   वास्तविक,उर्दूतील "चांद" शब्दाचे वेगळे स्वरूप आहे पण,  रचनेचा "मीटर" लक्षात घेता, तिथे ३ अक्षरांचाच शब्द आवश्यक होता आणि तिथे मराठीतील "चंद्र" शब्द बसवला असता तर गाण्याची लय थोडी बिघडली असती. मघाशी मी, गाण्यातील शब्दांविषयी जे लिहिले, ते याच संदर्भात तपासून घेणे योग्य आहे. 
लताबाईंची गायकी किती "श्रीमंत" आहे, ते बघण्यासारखे आहे. पहिल्या ओळीतील "देखणे" हा शब्द किंवा पुढील ओळीतील अंत्याक्षर "दे" या शब्दावरील हलकी पण वजनदार फिरत ऐकण्यासारखी आहे. ही फिरत, सहज वाढवता येऊ शकेल पण, त्याने शब्दांच्या अर्थाचा "बेरंग" झाला असता आणि याच उद्देशाने, ती हरकत, इतकी थोडक्यात आटोपली आहे की, ऐकताना, जीव कासावीस व्हावा!! सुगम संगीतातील "अलंकार" हे असेच असतात. 
"हळूच तुला बघण्याचा छंद आगळा, लज्जेचा त्यावीण का अर्थ वेगळा;
स्पर्शातून अंग अंग धुंद होऊ दे, जीवनात ही घडी …."
या ओळीची सुरवात "हळूच" या शब्दाने होते. नायकाकडे बघायचे आहे पण त्याला न जाणवून देता, असा मुग्ध शृंगार इथे अभिप्रेत आहे म्हणून याच अर्थाने, "हळूच" शब्द लताबाईंनी उच्चारला आहे. अशा खास अलंकारांनीच गाणे खुलत जाते आणि रसिकांच्या मनात उतरत जाते. "लज्जेचा त्यावीण का अर्थ वेगळा" या ओळीचा पूर्वार्ध, आधीच्या ओळीत असल्याने, शब्दांचा आशय आणि त्याला दिलेली सुरांची जोड, इतकी सुंदर आणि गोड आहे, की परत, परत या स्वर वाक्यांशाचा आस्वाद घ्यावा!! 
"पाहू दे असेच तुला नित्य हासता, जाऊ दे असाच काळ शब्द झेलता;
मिलनात प्रेमगीत धुंद होऊ दे, जीवनात ही घडी……"
हे अखेरचे कडवे म्हणजे एका धुंद क्षणाचा अविस्मरणीय समारोप आहे. वास्तविक, चाल तशीच आहे, त्यात काही वेगळ्या सुरांचा उपयोग नाही पण जर का मुळात चालच अति श्रवणीय असेल तर त्यात काही प्रयोग करण्याची फारशी गरज पडत नाही. त्याचा परिणाम असा होतो, गाण्याचा सुरवातीचा परिणाम, आपल्या मनात अधिक ठाम होत जातो. 
आज इतकी वर्षे मी हे गाणे ऐकत आहे आणि प्रत्येक वेळेस हे गाणे अगदी नव्याने ऐकल्याप्रमाणे मनात झिरपत जाते!!  

https://www.youtube.com/watch?v=V5xeOa8Ufv4

"त्रिधा राधा" निमित्ताने

शृंगार आणि स्त्री म्हटली की मराठी मन, कितीही पुढारलेले असले तरी कुठेतरी बुजते. आपण आपल्या मनाला तशी शिकवण घालून घेतलेली आहे.  केवळ मनातल्या मनात करायचे आणि कितीही "उबळ" आली तरी अत्यंत त्रोटक भाषेत त्याचा उल्लेख करायचा!! आधुनिक काळात, विशेषत: कवितेच्या माध्यमातून, स्त्री आणि स्त्री मन, याचा शृंगाराच्या दिशेने अतिशय मोकळा, आविष्कार पु.शि. रेग्यांनी केला. त्यांच्याइतकी "अम्लान" कविता मराठीत फारच तुरळक आढळते. स्त्री या व्यक्तीची "स्त्री" म्हणून ओळख करून देताना, सौंदर्यवादी दृष्टीकोन आत्मसात करून, मराठी माणसाला अधिक "मोकळे" केले आहे. "दुसरा पक्षी", "पुष्कळा", "दोला" किंवा "गांधारेखा" या सगळ्याच कविता संग्रहातून, प्रामुख्याने दर्शन घडते, ते "स्त्री" चे आणि जे दर्शन घडते, ते अत्यंत रसपूर्ण, सकस असे घडते. 
मुळात कविता ही नेहमी काही संकल्पनेतून घडत असते आणि व्यक्त होते, ती शब्द माध्यम हाताशी घेऊन. आशयाची  व्याप्ती,सखोलता, तरलता हे सगळे आवश्यकच असते पण, ते सगळे गृहीत धरावे लागते आणि त्याचीही जाणीव व्हायची, ती  अखेर शब्दांच्याच द्वारे!! आशय गृहीत धरल्यावर पुढे काय घडले, हे महत्वाचे आणि तिथे भाषेला सामोरे जावे लागते. जोपर्यंत आशय हा पूर्णपणे भाषेतून वेढला  आहे, प्रत्येक शब्द,हा "शब्द" होऊन आला आहे, अभिव्यक्तीचे हेच रूप अपरिहार्य आहे आणि आशयाला वेढून घेताना माध्यमाच्या सगळ्या शक्ती पणास लागल्या आहेत, असे जोपर्यंत जाणवत नाही, तोपर्यंत "कविता" पूर्णपणे सिद्ध होत नाही!!
"रेषा…. 
मिळत्या, उलगडत्या,
अधिकाधिक उमजवित्या, 
उमजत्या,
अबाखल सांखळत्या, मोकळ्या 
हलके हिंदोळत्या,
लवचिक गिरकींत 
घन संयत खेळवित्या,
भरलेपण भरहर्षे 
भोगवित्या…"
वरील विवेचनाला आधार म्हणून, मला ही कविता आठवली. कविता वाचताना, शब्दाचे रूप, आकार, आणि त्यातून प्रत्ययास येणारी भाषा, याचे हेच स्वरूप अपरिहार्य आहे का? यापेक्षा वेगळा आविष्कार शक्य नाही का? वापरलेल्या शब्दांपैकी तिथे दुसरा शब्द चालू शकला असता का? या सगळ्या प्रश्नांना ज्या कवितेत पूर्णविराम मिळतो, तिथे कवितेचे सकसपण सिद्ध होते, असे मला वाटते. 
ही कविता, सर्वस्वाने रेग्यांची आहे, तिचा तोंडावळा निराळा आहे, अंगकाठी निराळी आहे पण तरीही ते सगळे त्या कवितेचे आणि पर्यायाने रेग्यांचे आहे. रेग्यांची कविता वाचताना, नेहमी असेच वाटत राहते, या " पिंड" ओळखला आहे. या कवितेचा स्थायीभाव हा रतिक्रीडा आहे आणि त्या रतीक्रीडेचे लक्ष्य केवळ स्त्री शरीर आहे. सगळी कविता साकल्याने वाचताना, त्याच्यात सतत दिसणाऱ्या आशयात जाणवत राहते ते, स्त्रीरूपाबद्दलच्या विलक्षण अशा संमोहनाचे. 
"तापल्या सोन्यासारखी 
रसरशीत ती कांती 
तिथे कशी ग फुलली 
फिकी पिवळी शेवंती?" 
या रतीक्रीडेला प्रकृतीच्या दुसर्या आविष्काराशी काहीही देणेघेणे नाही. 
सामान्यत: कवीला कुठलाही अनुभव हा प्रथम बहुदा अस्पष्ट, अमूर्त, धुसर असा जाणवतो आणि त्याला रूप देण्याच्या, शब्दांकित करण्याच्या प्रयत्नातून तो अधिकाधिक स्पष्ट, आरेखित, मूर्त होत जातो. योग्य आणि नेमके शब्द सापडत जातात आणि ती मूर्ती भरीव होत जाते!! पण, हा झाला सर्वसामान्य अनुभव!! रेग्यांची कविता वाचताना, नेमका उलट अनुभव येतो. शब्दातून रतीक्रीडेचे कुठले तरी "अंग" जाणवत असताना, एखादा शब्द आणि त्यातून येणारा अनुभव, त्या रसरशीत अनुभवाचा आशय असे सगळे आकारीत होत आहे, असे जाणवते!!
अर्थात, इथे मी हे सगळे लिहित आहे, ते ही कविता वाचताना, माझ्या मनावर झालेल्या संस्काराच्या तसेच अनुभवाच्या आधारे. कुठलीही निर्मितीक्रिया ही नेहमीच अर्धुक, धुसर अशीच असते. आपण फक्त तर्काच्या आधारे त्याची व्याप्ती जाणू शकतो. ही कविता शृंगारिक असली तरी चाळवणारी, उथळ वाटत नाही. It is a peculiarly non-erotic eroticism!! जो अनुभव, खजुराहो, कोणार्क इथल्या लेण्यांतून मिळतो, त्याचीच कविता होते!! 
ही कविता वाचताना, मनावर नेहमी परिणाम होतो, तो अत्यंत अनुरूप अशा शब्दांचा, शब्दांच्या योजनेचा, अभिव्यक्तीच्या घडणीचा, बांधणीचा. इथे कविता शब्दांच्याच आधारे अस्तित्वात येते, वाढते आणि शेवटचा ठसा उमटतो, तो देखील शब्दांचाच!! चांगल्या अभिव्यक्तीचा एक विशेष असतो आणि तो म्हणजे, तिचे स्वतंत्र अस्तित्वच भासू नये.  आशयात विलीनत्व, हेच अंतिम सत्य!! 
"त्रिधा राधा" या त्यांच्या अतिशय अप्रतिम कवितेच्या आधारे, आपण, पुढला विचार करूया. 
"आकाश निळे तो हरी,
अन एक चांदणी राधा ---
बावरी 
युगानुयुगींची मन-बाधा,

विस्तीर्ण भुई गोविंद 
अन क्षेत्र साळीचे राधा ---
संसिद्ध 
युगानुयुगींची प्रियंवदा,

जलवाहिनी निश्चल कृष्ण, 
घन झुकले कांठी राधा ---
विप्रश्न 
युगानुयुगींची चीर-तंद्रा. 

इथे बघा, आशयाची घनता दर्शवताना, क्रियापदांच्या वापरातून ज्या अंधुक गतिशिलतेचे सूचन आशयाला मिळाले असते, परंतु इथे क्रियापद अजिबात नाही!! राधाकृष्णाच्या ३ भावबंधाची रूपे. पहिल्या कडव्यात नाते जाणवते, दुसऱ्यात अत्यंत निकट अशा समिपतेचे तर तिसऱ्यात जवळ येऊनही किंचित दूर होऊन न्याहाळणारे!! हे सगळे देखील आपल्याला जाणवते, ते एखाद दुसऱ्या प्रतिमेतून.  सगळी कविता ही जवळपास स्थिरचित्रण वाटावे अशा स्वरूपाची आहे तरीही अंतर्गत मनोरुपांचे मनोहारी चित्रण!! "आकाश निळे", "चांदणी राधा". पुढील कडव्यात, राधेची भावस्थिती दर्शविताना मिळणारे "क्षेत्र  साळीचे". इथे हाच शब्द योग्य आहे. एक गंमत आठवली, उर्दू भाषेत स्त्री केसांना "गेसू" म्हणतात आणि तिथे येणारी "महेक" ही "गेसू" याच शब्दाने परिणामकारक होते. या शब्दांभोवती जो अनुभव, संस्कार याची सांगड घातलेली असते, तिथे त्याच शब्दाने अभिव्यक्तीची पूर्तता होते. तिथे दुसरा कुठलाच शब्द संभवत नाही, किंबहुना संपूर्ण उपरा ठरतो. या साळीच्या क्षेत्राने, शब्दांच्या नादात झुकण्याची, लवण्याची, डोलण्याची सूचना, कुठल्याच दुसऱ्या शब्दाने आली नसती. 
या कवितेत, प्रत्येक कडव्यातील दुसऱ्या ओळीनंतर येणाऱ्या थोड्या थांबण्याचा क्रियेतून, ही विशेषणे अधिक अर्थवाही होतात. मराठीत, पुराणकाळातील व्यक्तींना दोनच कवींनी कायमचे चिरस्थान प्राप्त करून दिले आहे. १] त्रिधा राधा आणि २] कुब्जा (इंदिरा संत) या कवितेतून जे भावदर्शन घडते, ते केवळ अपूर्व असे आहे. 
रेग्यांच्या कवितेत "प्रतिमा" ही अशाच सर्वस्वी अंत:केंद्रित होऊन येतात. कधी,कधी एखादे कडवे, एखादी ओळ तर कधी दोन शब्दांमधील अंतर, इतक्या पूर्णपणे अनुभवाच्या रूप,रंग,नाद इत्यादी घटकांशी एकरूप होते  त्यातूनच प्रतिमेची गुणवत्ता सिद्ध होते. 
"पहुडली जरा ही स्वस्थ 
चोरुनी अंग सत्वस्थ,
    बिलगेलहि लगबग…. जळी 
    उसळते जशी मासळी."
आता यामध्ये दोन ओळींतील शेवटच्या शब्दांचे ("स्वस्थ", :सत्वस्थ") ध्वनी ओढलेले आणि "लगबग" नंतर एक विराम येतो आणि यातून मासळीच्या उसळीतील अनपेक्षितता प्रत्ययास येते. 
कवितेत प्रतिमेचे घटक अनेक असतात आणि ते एकमेकांशी आणि केंद्राशी घट्टपणे बांधलेले असतात. 
"पक्षी जे झाडावर गाणे गातो 
    आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात 
    पक्षी जे झाडावर गातो. 

झाडावर जे गाणे पक्षी गातो 
    आहे पक्षी दुसरा गाण्यांतच त्या पुन्हा 
    झाडावर जे पक्षी गातो."

वैदिक ऋचांच्या मंत्रध्वनीत ओढलेले स्वर, उच्चारात विशिष्ट ठिकाणी दिलेला आघात आणि काही स्वरांवरून घसरणे या सर्वांना रेग्यांच्या कवितेत अंगभूत महत्व असते. 
"तुझ्या उभार वक्षाची 
नेहमीची ती थोरवी 
नाहीं पटतच होतां 
    शेजेवर तू आडवी"

वर वर  पहात,अत्यंत शृंगार सूचक अशी ही कविता पण इथे असं लक्षात येतें की या अनपेक्षित आणि चावत खेळाचे दोन भाग आहेत. मनाची "थोरवी" वगैरे ठीक आहे पण उभार वक्षाची "थोरवी" हा परिचित शब्द एकदम इतक्या अनपेक्षित संदर्भात येतो की  कल्पनाच आडव्या होतात!! 
"लिलीची फुलें 
  तिने एकदां 
चुंबिता, डोळां
   पाणी मी पाहिलें. 

लिलीची फुलें 
   आतां कधिही 
     पाहतां, डोळां 
        पाणी हें सांकळे."

शब्दांच्या अशा उपयोगांत "Less is More" हे पटते. मोजकेच शब्द पण तरीही अत्यंत वेगळा आशय, शब्दांशी खेळणे, शब्द नव्या नजरेतून न्याहाळणे इत्यादी खास वैशिष्ट्ये या कवितेची सांगता येतील. 
भावनाशयाचा स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे प्रवास सुरु झाला आहे. कवितेतील भाववृत्तीची जाणीव अगदी निराळ्या पातळीवरची आहे, इतकी की कवितेसंबंधी लिहिताना भाववृत्तीचे वर्णन  आले  जाणवण्यासारखे नाही. प्रतिमेच्या जाणीवेतून अनुभव, तो अनुभव हीच भाववृत्ती. इथे संवेदना कल्पनास्वरूपात नसून, संवेदना हाच अनुभव आहे. रेग्यांची भावकविता ही अशा प्रकारे मनाला आकळत जाते.    

सबा से कहे दो ये

असे नेहमी म्हटले जाते, प्रत्येक गाणे, त्याचे भागदेय घेऊनच जन्माला येत असते आणि त्यानुरूप त्या  प्रसिद्धी मिळते. मला आजही नवल वाटते, काही गाणी खरोखरच असामान्य असतात पण ती विस्मृतीच्या गर्तेत सापडतात. कधी, कधी काही गाण्यांचे भाग्य उशिरा उजळते तर काही गाणी कायमची विस्मरणात जातात. गाणे उत्तम असेल तर ती विस्मृतीत का जातात? या प्रश्नाला तसे सुसंगत उत्तर मिळत नाही. मदन मोहनच्या बाबतीत आयुष्यभर असेच घडत राहिले - गाणी अप्रतिम पण ती गाणी विस्मृतीत गेलेली!! विशेषत: चित्रपट गीतांच्या बाबतीत हे बरेचवेळा आढळते. प्रस्तुत गाणे असेच काळाच्या ओघात हरवलेले पण जर का गाणे म्हणून बघायला गेले तर केवळ अप्रतिम, असे म्हणावे लागते. आशा भोसले आणि मदन मोहन यांनी एकत्रित फार कमी गाणी केली आणि ती गाणी आठवायला गेलो तर "झुमका गिरा रे" यापलीकडे फारशी मजल जात नाही. "तकदीर" या शब्दावर विश्वास ठेवावासा वाटतो, तो "सबा से ये कहे दो" या गाण्याबाबत!!
अतिशय ओघवती कविता, तितकीच सक्षम चाल आणि अर्थात आशा भोसलेचे सुंदर गायन, असा त्रिवेणी संगम या गाण्यात दिसून येतो. सुगम संगीतात, कविता करताना, शब्दरचना ही शब्दबंबाळ झाली तर कवितेकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे कविता लिहिताना, आपण सामान्य माणसासाठी लिहित आहोत, याचे भान राखणे अत्यावश्यक ठरते. अर्थात, जरी गूढ शब्दकळा नसावी, असा जरी प्रघात असला तरी त्यातही "काव्य" गुण असणे अत्यावश्यक असते. 
तसे बघितले तर ही तारेवरील कसरत असते आणि इथेच गाण्यातील काव्य बघताना, काही प्रसिद्ध गाण्यात अत्यंत टुकार शब्दकळा वाचायला मिळते. त्याला अनेक कारणे असू शकतात, म्हणजे चित्रपटातील प्रसंग, किंवा जर आधीच स्वररचना झाली असेल तर त्या रचनेत सहज बसवण्याचा हव्यासापोटी करावी लागणारी तडजोड इत्यादी… 
"सबा से ये कहे दो के कलीया बिछाये 
वो देखो, वो जान ए बहार आ रहा है, 
चुरा ले गया जो, इन आंखो की निंदे 
वोही लेके दिल का करार आ रहा है;
 सबा से ये कहे दो" 

तसे पहिले तर ही रचना अगदी सरळ साधी आहे जिथे शब्दाचा अर्थ कळत नाही, असे होत नाही. वाचतानाच अर्थ समजून घेत येतो पण तरीही, जेंव्हा अशा शब्दांना स्वर मिळतात तेंव्हा हेच शब्द आणखी वेगळा अर्थ प्रतीत करून देऊ शकतात. गाण्याच्या सुरवातीला अगदी अल्प असा हुंकार (Humming) आहे आणि नंतर गाण्याला सुरवात होते. जरा बारकाईने ऐकले तर सहज समजून घेता येईल, या हुंकारातच चालीचा सगळा विस्तार आहे. गाण्याची सम जरी वेगळ्या शब्दावर असली तरी पुढील रचनेचा सगळा ओघ, या स्वरांशी नाते राखणारा आहे. 
सर्वसाधारणपणे गाण्यात, जेंव्हा पहिला शब्द अवतरतो, तिथेच रचनेची "सम" घेतली जाते पण इथे "सबा से ये कहे दो" यातील "दो" शब्दावर पहिली मात्रा आहे म्हणजे पहिले हुंकारात्मक स्वर आणि त्यालाच जोडून, "सबा से ये कहे" पर्यंत गाणे मुद्दाम तालविरहित म्हणजे आलापीच्या अंगाने घेतले आहे. गाणे तयार करताना, संगीतकाराला नेहमी, कुठल्या शब्दावर "जोर" देऊन गाण्याला "उठाव" आणायचा, हे ठरविण्याचे स्वातंत्र्य असते आणि त्यानुरूप, कवितेचा आशय ठरू शकतो. अर्थात इथे मतभिन्नतेला बराच वाव असू शकतो. गाण्यातील पहिली ओळ ही पुढील स्वरविस्ताराची पहिली पायरी असते आणि पुढे याच पायरीचा "आधार" घेऊन, गाणे तयार होत असते. 
"वो देखो, वो जान ए बहार आ रहा है" हि ओळ ऐकताना वरील वाक्याचा पडताळा घेता येतो. कवितेत जो शब्द जसा लिहिला आहे त्या "आकाराने" स्वरांतून प्रतीत होणे अपेक्षित असते. "जान ए बहार" अशी शब्द रचना असल्यावर गाताना देखील, शब्द याच "आघाताने" यायला हवेत तरच त्या कवितेची स्वरांतून पूर्तता होते. इथे थोडा वेगळा विचार मांडावासा वाटतो. गझल लिहिताना, नेहमी पहिल्या दोन ओळीतील "रदीफ" आणि "काफिया" तपासले जातात आणि त्यानुसार त्याची "जमीन" निश्चित केली जाते. गाण्याच्या बाबतीत हाच विचार मांडता येतो. गाण्याचा विस्तार करताना नेमका असाच विचार केला जातो. आता ही वरील ओळ गाताना, :बहार" शब्द किंचित "विलग" करून घेतला आहे म्हणजे "बहा"+"आर" असा घेतला आहे आणि मुख्य कारण, पहिल्या ओळीत जी स्वरांची "जमीन" निश्चित केली गेली, त्याला अनुलक्षून इथे शब्दावर "आकार" घेणे जरुरीचे झाले. अन्यथा परत समेची मात्रा गाठणे अशक्य झाले असते. अर्थात, संगीतकाराचे कौशल्य असे की लयीत हा शब्द घेताना, शब्दातील आशय बिघडू न देता, कायम केला आहे. 
"चुरा के गया जो, इन आंखो की निंदे; वोही लेके दिल का करार आ रहा है" धृवपदातील या पीढील दोन ओळी. तसे बघितले तर पारंपारिक चित्रपट गीतांतील कविता आणि ही कविता, रचनेच्या दृष्टीने फार वेगळी आहे. कवितेचा "मुखडा" हा थोडक्यात आटोपला जातो तर इथे ओळींचा विस्तार तसा बराच मोठा आहे त्यामुळे चाल बांधताना, संगीतकाराला, गाण्याची "लय" कशी ठेवायची, याबाबत निश्चित विचार करावा लागलाच असणार. 
संपूर्ण कविता वाचली तर आपल्याला सहज समजेल, की कविता गझलेच्या "वजनाने" लिहिली आहे पण, गझलेत, प्रत्येक कडवे ही एक स्वतंत्र आणि सार्वभौम अशी कविता असते. चित्रपट गीत हे एखाद्या प्रसंगाला अनुलक्षून असल्याने, प्रत्येक कडव्यात वेगळी कविता असली "चैन" परवडणारी नसते. अर्थात, ही दीर्घ ओळी गाताना देखील, "करार" शब्द संपताना किंचित "आकार" घेतला आहे. यालाच उर्दूत "अलिफ" म्हणतात. शब्दोच्चार किती महत्वपूर्ण असतात, हे अशाच गोष्टींतून ध्यानात येत असते. या बाबी म्हटल्या तर बिनमहत्वाच्या असू शकतात पण जर का उद्मेखूनपणे नजरेस आणल्या तर त्याच गाण्याचे सौंदर्य अधिक खुलते, हे निश्चित. याचाच दुसरा भाग असा आहे, इथे असे किंचित "आकार" घेतल्याने, गाणे लयीला लगेच अवघड झाले. हा स्वराकार अत्यंत अल्प आहे पण, वैशिष्ट्यपूर्ण आहे. 
गाण्याचा ताल देखील ऐकण्यासारखे आहे. ताल लयीला धरून आहे, हे तर प्राथमिक वैशिष्ट्य झाले पण किंचित "दबलेला" ध्वनी ठेवल्याने, गाण्यातील गायकी उठून दिसते. 
"ये कौन आ गया दिल को करता इशारा, के महकी फिझा मुस्कुराये नजारे;
कदम बढके तू चुम ले मुहोब्बत, के दिल को बहुत उनपे प्यार आ रहा है"
आशा भोसले काय ताकदीची गायिका आहे, याचे इथे एक सुंदर उदाहरण. या कडव्यातील पहिली ओळ - "ये कौन आ गया दिल को करता इशारा" गाताना, "करता" "इशारा"  हे दोन शब्द गाताना, शेवटच्या अक्षरावर किंचित "कंप" घेतला आहे आणि ही फार कठीण आहे कारण, याची साधी चाहूल देखील, आधीच्या शब्दातून आपल्याला मिळत नाही!! हा कंप म्हटला तर फार अर्थपूर्ण आहे. त्याआधीचे शब्द बघितले तर कळून घेता येईल. "ये कौन आ गया दिल को" म्हणजे थोडीशी भासमान अवस्था तरीही मृदू प्रणयी भावना, याचा हृदयावर झालेला परिणाम!! हे सगळे भावविशेष त्या "कंपा" मध्ये आहेत. जसे संगीतकार चाल बांधताना, स्वत:चा विचार करीत असतो त्याचबरोबर गायक/गायिका देखील त्याच रचनेतील नेमके सौंदर्य शोधून, त्याच सांगीतिक आराखाड्याचा अधिक लक्षवेधी वेध घेतात. 
"ये माना के मेहफिल मे अनजान है तू, मगर जब भी तुझसे निगाहें मिली है;
मुझे युं लगा है पयाम ए मोहब्बत, नजर से तेरी बार-बार आ रहा है."
कवितेचा दर्जा अप्रतिम असला म्हणजे संगीतकाराला देखील चाल बांधायला हुरूप येतो आणि त्यातूनच आव्हानात्मक. गायकी अंगाच्या चाली निर्माण होतात. या कडव्याची सुरवार वरच्या स्वरावर होते म्हणजे चाल थोडी वेगळे "वळण" घेते. गाण्यातील सांगीतिक बारकावे जाणून घेण्यासाठी आपल्याला नेहमी गाणे अतिशय फुरसतीत ऐकणे आवश्यक असते. सुगम संगीत म्हणजे फुटकळ संगीत व्यवहार, असे जे मानणारे असतात, त्यात त्यांच्या मनाचा कोता विचार दिसून येतो. इथे प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो आणि तो तितकाच अर्थपूर्ण असावा लागतो. त्याचबरोबर रसिकाची देखील जबाबदारी असते, ऐकायला येणारे गाणे देखील तितक्याच गंभीरपणे ऐकण्याची. आपल्याकडे दुर्दैवाने असे फारसे घडत नाही आणि संगीतातील अशा "अलौकिक" क्षणांना हे रसिक कायमचे पारखे होत असतात. वरच्या सुरांत सुरु झालेले कडवे पुढे "मुझे युं लगा है पयाम ए मोहब्बत" इथे मूळ चालीशी सांधा जुळवून घेते. हा जो सांगीतिक विचार आहे, इथे संगीतकाराची बुद्धीमत्ता दिसून येते आणि गाण्याच्या श्रीमंतीत भर पडते. 
इथे थोडे मागे जाऊ. या कडव्याच्या आधी जेंव्हा गाणे परत "मूळ" ओळींकडे  वळते,तिथे आशा भोसलेने "कलिया" शब्द गाताना जो "मूळ" कंप घेतला आहे, त्यात परत किंचित थोडा फरक केला आहे आणि आपल्या गायकीची साक्ष दाखवून दिली आहे. हा कंप फार, फार अवघड आहे. गाण्याची लय तीच ठेवायचे पण स्वरांवरील आंदोलने वेगळ्या "ढंगात" सादर करायची!! 
वास्तविक, कविता म्हणून आणखी एक कडवे आहे पण, आपण चित्रपटातील गाणे, या दृष्टीने विचार करीत असल्याने, त्या ओळी इथे गैरलागू ठरतात.  
अनवट ढंगाची चाल, अप्रतिम शब्दकळा आणि असामान्य गायकी, हीच या गाण्याची नेमकी वैशिष्ट्ये सांगता येतील. अर्थात असे सगळे एकत्रित असून देखील, हे गाणे विस्मरणात जावे, याची कसलीच संगती लागत नाही!!


खेड्यामधले घर कौलारू

चित्रपटातील गाण्याबाबत बाबत एक विशेष जरूर बाळगावा लागतो, त्याची शब्दकळा लिहिताना, ती अधिक "चित्रदर्शी" कशी होईल, याचा विचार प्रभावी असतो. गाणे कितीही गोड  ,त्या गाण्याच्या शब्दातून चित्र , हे कौशल्याचे काम असते आणि त्यामुळेच बहुदा, कविता लिहिताना, प्रतिमांचा वापर हा संयमित असणे तसेच शब्द अधिक गूढ किंवा दुर्बोध नसणे, ही आवश्यक गरज बनते. "चित्रदर्शी" शब्द अशा साठी कारण, अखेर चित्रपट हे दृश्य माध्यम  असल्याने, मर्यादेपलीकडे शब्दांच्या पलीकडील भावाशय चित्रित करणे अशक्य असते. याचा दुष्परिणाम असा झाला, चित्रपटातील गाण्यांना, कविता म्हणून मान्यता मिळण्यास आजही बरेचजण राजी नसतात. आपल्याकडे त्यामुळेच काही खुळचट मानदंड तयार झाले. आपल्याकडे, कवितांचे संग्रह निघतात परंतु चित्रपटातील कवितांचे (काही अपवाद वगळता) संग्रह निघत नाहीत!! तोच प्रकार खाजगी गीतांच्या बाबतीत घडतो. मराठीत, मंगेश पाडगावकरांचा - "तुझे गीत गाण्यासाठी" या कविता संग्रहाचा अपवाद वगळता, फारसे संग्रह दिसत नाहीत!! त्यामुळे, काही कवींवर थोडा "अन्याय" झाला,असे वाटते. ग.दि.माडगुळकर हे त्यापैकी एक असामान्य नाव. मला तर आजही असेच ठामपणे वाटते, माडगूळकरांनी "गीत रामायण" लिहिले नसते ( या कवितांचा संग्रह निघाला आहे !!) तर कदाचित त्यांना आजच्या इतकी लोकप्रियता मिळाली असती का? 
चित्रदर्शी कविता लिहिण्यासाठी, मुळात चित्रपटाच्या पार्श्वभूमीचा सम्यक विचार जरुरीचा असतो आणि त्याबाबतीत माडगूळकरांची ग्रहणशक्ती केवळ "अफाट" म्हणावी अशी होती. 
" आठवणींच्या आधी जाते  
तिथे मनाचे निळे पाखरू  
खेड्यामधले घर कौलारू. 

स्वरावली बाजूला ठेऊन, या शब्दाचा आस्वाद घेतला तर, आपल्याला शब्दातील आशय लगेच समजून घेता येतो. आपल्या गावात आल्यावर अचानक आपल्या जुन्या जीर्ण घरापाशी आल्यावर मनाची जी कातर अवस्था होते, त्याचे स्पष्ट वर्णन आहे. कवितेला "काव्याचे" स्वरूप कसे आले आहे, हे बघण्यासारखे आहे. "एकाकी" अवस्थेत "मनाचे" विरही होणे, ही भावावस्था याच नेमक्या शब्दातून व्यक्त होऊ शकते. इथे इतर दुसरे कुठलेच शब्द खपणारच नाही. "निळे पाखरू" हेच शब्द योग्य. ध्यानीमनी नसताना अचानक नजरेसमोर काहीतरी व्याकूळ करणारे घडले की जी भावावस्था होते, त्याचे हे शाब्दिक चित्रण!! 

"हिरवी शामल भवति शेती ,
पाउलवाटा अंगणी मिळती  
लव फुलवंती,जुई शेवंती,
शेंदरी आंबा साजे मोहरू. 

चौकट तीवर बाल गणपती,
चौसोपी खण स्वागत करती, 
झोपाळ्यावर अभंग कातर, 
सवे लागती कड्या करकरू. 

माजघरातील उजेड मिणमिण 
वृद्ध कांकणे करिती किणकिण,
किणकिण ती हळू ये कुरवाळू  
दूर देशीचे प्रौढ लेकरू". 

सुरवातीलाच मी सगळी कविता मंडळी याचे कारण, एकदा गाणे म्हणून आस्वादाला सुरवात झाली की मग परत शब्दकळेबाबत फारसे लिहिणे थोडे अवास्तव ठरेल. एक गाव, तिथे असे अचानक येणे, त्याच अवस्थेत आपले पूर्वीचे जुने डोळ्यासमोर येणे आणि त्यातून आलेली व्याकूळ अवस्था!! त्यानिमित्ताने मनात उमटलेले भूतकाळाचे तरंग इत्यादी सगळ्या भावना, कवितेच्या रुपात अत्यंत संक्षिप्तपणे मांडणे, नक्कीच सोपे नाही. चित्रपटातील गाणे असल्याने, कवितेत जे मांडायचे, त्याचे चित्रीकरण व्हायचे आहे, तेंव्हा मनाची कातर अवस्था असली तरी ती अवस्था चित्रात दाखविणे अशक्य, तेंव्हा शब्दांचा अव्याहत फुलोरा टाळून, अचूक भावदर्शन घडविणे, याच विचाराने, माडगूळकरांनी शब्दरचना लिहिली आहे. 
हिरवी शेती,अंगण,तिथल्या वेली,घरातील गणपती,झोपाळा,मिणमिण उजेड, आणि शेवटी प्रौढ लेकरू!! असा सगळा आयुष्याचा व्यापक पट, कवितेसारख्या अल्पाक्षरी शैलीत तितक्याच संपृक्ततेने मांडणे, हे सहज येता-जाता जमण्यासारखी बाब नव्हे. माडगुळकर म्हणजे मराठी संस्कृती पचवलेला कवी. या कवितेतील घराचे जे चित्रण केले आहे, ते खरच अभ्यासण्यासारखे आहे. प्रत्येक शब्दातून, ते घर, तिथल्या वस्तू आणि त्या जोडीने आलेला जिवंत मातीचा संदर्भ, यामुळे ही कविता अगदी "आतून" बांधलेली आहे. इथे दुसरा कुठलाही शब्द "उपरा" आहे. 
गाण्याची सुरवात सरळ "गात्या" शब्दाने होते म्हणजे आधी एखादी धून आणि मग शब्द, असा पारंपारिक "घाट" न स्वीकारता, सरळ सुरेल चालीत बांधलेले शब्द कानावर येतात. गायनाच्या दृष्टीने हे तसे अवघड असते. अगदी रागदारी संगीत घेतले तरी रागाला सुरवात होण्याआधी झमझमणारा तंबोरा, गायकाला सूर पुरवत असतो. त्यादृष्टीने अशा पद्धतीने गाण्याची सुरवात करायची म्हणजे डोक्यात सगळे सूर नेमके ठेऊन, सुरवात करावी लागते. 
सुधीर फडक्यांच्या चाली तशा सहज जरी असल्या तरी त्यात, अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या हरकती असतात ज्यायोगे शब्दांना सुरांतून काढताना, वेगळे परिमाण मिळते. इथेच ऐकण्यासारखी एक हरकत आहे. "तिथे मनाचे निळे पाखरू" मधील "निळे" शब्द सुरांत घेताना, त्याला छोटीशी हरकतीची जोड दिली आहे, त्यामुळे तोच शब्द वेगळ्याच अर्थाने आपल्या समोर येतो. ही करामत आधी बाबूजींची आणि नंतर त्याचे प्रत्यंतर देणाऱ्या आशा भोसल्यांची!! 
वास्तविक गाणे गत:स्मृतींच्या संदर्भात आहे तरी आठवणी सगळ्या आनंददायी असल्याने, चाल जलद लयीत बांधली आहे. गाणे जलद लयीत बांधण्याचा एक फायदा, असा होतो, गाण्याला तालाची जोड मिळते आणि तेच गाणे आपल्या मनावर लागेच्ग ठसते. 
बाबूजींच्या रचनेबाबत एक आक्षेप बऱ्याचवेळा ऐकण्यात/वाचनात येतो. या संगीतकाराच्या चाली, "ब्राह्मणी" ढंगाच्या असतात!! म्हणजे काय? संगीतात असा काही "ढंग" आहे का? बाबूजींचा शब्दोच्चारावर विशेष भर असायचा आणि ब्राह्मण लोकं त्याबाबत अधिक दक्ष असतात म्हणून संगीत रचना ब्राह्मणी असतात, असे सुचवायचे आहे का? चाली मराठमोळ्या असतात, तर मग मराठीत इतर संगीतकार देखील या आक्षेपात येऊ शकतात!! त्यातून, चाल ही शब्दांना दिली जाते. जे शब्द हाती असतात, त्या शब्दांना सुरांच्या सहाय्याने न्याय देणे, हे संगीतकाराचे "आद्य" कर्तव्य!! मराठी ही एक संस्कृती आहे आणि त्यानुरूप जर त्याचे प्रतिबिंब कलेच्या सादरीकरणात पडत असेल तर त्यात काय चुकले? केवळ मराठीच कशाला, माझ्या अंदाजाने, जगातील कुठलाच संगीतकार, ज्या प्रदेशात तो वाढतो, त्या संस्कृतीचे जोखड संपूर्णपणे बाजूला टाकू शकत नाही!! त्या संस्कृतीचा प्रभाव, त्याच्या कलेत काही अंशरूपाने आढळत असतो. त्यालाच तर संगीतकाराची शैली म्हणतात. प्रश्न असा असतो, ही शैली त्या संगीतकाराला तारक की मारक? स्वत:ची ओळख ठसविण्यासाठी शैली ही उपकारक असते पण दीर्घकालीन कारकिर्दीत तीच ओळख मर्यादा होऊ शकते!! असो. 
"चौकट तीवर बाल गणपती" इथे "गणपती" शब्दानंतर "ई" कार कसा सुरेख लांबवलेला आहे. जलद लयीत असे प्रयोग करायला तसा थोडाच वाव असतो पण असतो. तालाचे वर्तुळ ध्यानात घेऊन आणि समेच्या मात्रेचे भान ठेऊन(च) अशा हरकती घेता येतात आणि गाण्याचे सौंदर्य अधिक खुलवतात. 
या गाण्याची आणखी एक खास गंमत आहे. शेवटच्या कडव्यातील शब्द "किणकिण ती हळू ये कुरवाळू, दूर देशीचे प्रौढ लेकरू" यातील "किणकिण" हा शब्द आणि नंतरच्या ओळीतील "लेकरू" हा शब्द जरा बारकाईने ऐकले तर कळेल, या दोनच ओळीत माडगूळकरांनी सगळे भावचित्र उभे केले आहे आणि त्यातील हे दोन(च) शब्द निवडून, बाबूजी आणि आशा भोसल्यांनी स्वत:ची स्वरिक भर टाकली आहे. आशय स्वरांच्या सहाय्याने खुलवावा, तो असा. तसे बघितले तर चालीत फारसे अवघड काहीही नाही (फक्त काही शब्दांवरील हरकती सोडल्यास!!) पण चाळीत एक अश्रूत गोडवा आहे त्यामुळे गाणे ऐकताना, आपण त्यात गुंग होऊन जातो. 

रैना बीती जाये भाग २

आपल्याकडे कुठल्याही व्यक्तीला एखाद्या साच्यात बसविणे किंवा त्याच्यावर एखादे "लेबल" चिकटवणे, ही आवश्यक मानसिक गरज वाटते, जणू त्याशिवाय त्या व्यक्तीची पूर्तता होणे कठीण!! अर्थात, असला प्रकार काही प्रमाणात जागतिक स्तरावर देखील आढळतो आणि मग त्यातून एकमेकांची तुलना ही आत्यंतिक गरज होऊन बसते!! एकदा अशा साच्यात त्या व्यक्तीला बसविले म्हणजे म्हणजे ते व्यक्तित्व पूर्ण होते. याची खरी गरज असते का? असला प्रश्न कुणी विचारत नाही आणि काहीवेळाने, त्या व्यक्तीला देखील, याची गरज भासायला लागते आणि बहुदा तिथेच ते व्यक्तिमत्व खुरटायला लागते. बऱ्याच उमलणाऱ्या कळ्या अशाच उखडलेल्या दिसतात. 
"रैना बीती जाये" हे गाणे प्रकाशात येईपर्यंत, या गाण्याचा संगीतकार, "आर.डी.बर्मन" अशाच सावलीत वावरत होता!! त्याच्यावर, पाश्चात्य चालीवरून रचना करणारा संगीतकार, हे लेबल चिकटले होते, जणू काही या संगीतकाराने वेगळ्या प्रकारची गाणी कधीच दिली नाहीत!! वास्तविक, "घर आजा 
" किंवा "शर्म आती है" सारख्या अनुपम रचना त्याने दिल्या होत्या, हा जणू "इतिहास" झाला होता. "तिसरी मंझील" या चित्रपटाची आणि अशाच प्रकारची गाणी देणारा संगीतकार, हीच ओळख झाली होती. त्यातून, वडील, प्रसिद्ध संगीतकार, एस. डी. बर्मन यांच्या सावलीत वावरल्याने, "स्वयंप्रकाशित्व" थोडे परकेच झाले होते. 
"रैना बीती जाये, शाम ना आये, निंदिया ना आये" या धृवपदाने गाण्याची सुरवात होते. सुरवातीला, सारंगीचे सूर जवळपास ७ सेकंद आहेत पण ते सूर पुढील असामान्य आलापीला जणू बोलावत आहेत, असे वाजलेले आहेत. हा जो सुरवातीचा आलाप आहे, हा इतका जीवघेणा आहे, मंद्र सूर लागतो आणि क्षणात (अर्थ शब्दश: घेणे) तो सूर वरच्या पट्टीत जातो आणि तसाच परत खाली उतरतो!! हा जो आलाप आहे, हीच रचनेच्या अवघडतेची "खूण" आहे, जी खूण, पुढील रचना किती अधिक गुंतागुंतीची होते, त्याचे निदर्शक आहे. आलाप चालू असताना, त्याच्या पार्श्वभागी संतूरचे सूर छेडलेले आहेत आणि आलाप संपल्यावर त्या सुरांची ओळख होते. सुगम संगीताची बंदिस्त वीण, ही अशीच थोड्या थोड्या स्वरांनी बनत जात असते. हा जो जवळपास ३० सेकंदाचा आलाप आहे, हा आलाप जणू लताबाईंच्या गायकीचे अन्वर्थक लक्षण म्हणावे इतका समृद्ध आहे. बाईंची  गायकी, कुठे श्रेष्ठ आहे, त्याचे, हा आलाप, हे निदर्शक आहे. आलाप खर्ज सुरांतून तीव्र सुरत जातो आणि त्याच लयीत खाली उतरतो, फार "मुश्किल" गायकी आहे!! 
आलाप संपल्यावर, लगेच संतूर आणि त्यामागोमाग गिटार व बासरीचे सूर ऐकायला येतात. सुगम संगीतात, वाद्यमेळ स्वत:चे "अस्तित्व" कसे दाखवतो आणि रचनेसोबत लय कशी निर्माण करतो, हे इथे ऐकण्यासारखे आहे. हे संपते, तिथे अत्यंत "ठाय" लयीत, लताबाईंचे शब्द कानावर येतात, "रैना बीती जाये, शाम ना आये, निंदिया ना आये"!! वास्तविक , कोठीवरील गाणे आहे, ज्याकाळी कोठीवर दादरा, ठुमरी, गझल सारख्या गायकीचे सहज अस्तित्व होते!! इथे, "निंदिया ना आये" जेंव्हा दुसऱ्यांदा गायले जाते, त्यावेळची लताबाईंची "मुरकी" ऐकण्यासारखी आहे, स्वरात आर्जव तर आहेच पण त्याचबरोबर संयत आवाहन देखील आहे, जे जाणकार व्यक्तीला कोठीवर येण्याचे आमंत्रण देत आहे!! संगीत रचना,आणि गायकी कुठे समृद्ध होते, याचे हे एक उदाहरण म्हणून दाखवता येईल. "निंदिया ना आये" हे गाताना, "दि" आणि "या" या दोन शब्दांच्यात एक अत्यंत हलक्या सुरात हरकत आहे, ती ऐकावी. 
लताबाईंची गायकी आणि इतरांची गायकी, यातील फरक स्पष्ट होण्यासाठी ही हरकत ऐकावी. इतकी हलकी तरीही शब्दांच्या आशयाला धरून आणि लय अधिक गुंतागुंतीची करून कशी टाकता येईल, हे अनुभवण्यासारखे आहे. दुसरी बाब, संगीतकार म्हणून, इथे नक्कीच मांडवी लागेल. राहुल कधीही गाण्याचा ताल, सरळ रेषेत मांडत नाही. बहुतेक गाणी केहरवा किंवा खेमटा या तालात असतात पण त्याचे सादरीकरण नेहमीच फार वेगळ्या अंगाने रचलेले असते. संगीताचे कालिक परिमाण धुंडाळण्यासाठी तालाची रूढ पद्धत वापरत नाही. समजा गाण्यात, तबला असेल तर तालाची पहिली मात्रा "धा" वाजवताना, उजव्या बोटाने चाटीवर आघात केला जाईल पण त्याचबरोबर डाव्या हाताने डग्ग्यावरील आघात हा गिटार वाद्यातून काढला जाईल!! त्यामुळे तालाचे सादरीकरण पार वेगळे होते, अभारतीय होते. सुगम संगीतात, तालाचे असे विविध प्रयोग या संगीतकाराने अशा पद्धतीने केले असल्याने, चित्रपट संगीतात जी अपूर्व विविधता आली, त्याला दुसरी तोड नाही!! त्यासाठी या संगीतकाराने, पारंपारिक तालवाद्ये न वापरता, धातू त्रिकोण, झायालोफोन, खुळखुळे अशी वाद्ये वापरून, गाण्याचा परिणाम नेहमीच खुलवलेला दिसतो. 
इथे जरी रागावर आधारित गाणे असले तरी, विशिष्ट रागचौकटीपासून दूर सरकूनही रागाचे एकसंधपण आपल्या चालीस देण्याची प्रशंसनीय क्षमता या संगीतकाराकडे होती. म्हणजे, इथे या गाण्यात, राग जणू सारा वेळ पार्श्वभूमीवर तरळत राहतो, पण त्याला राग म्हणून वावरण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही!! इथे संगीतकाराची संगीताबद्दलची जाणकारी दिसून येते. 
"शाम को भुला, शाम का वादा ये, रंग दिये के जागे राधा, निंदिया ना आये, रैना बीती जाये" हे पहिले कडवे. इथे बघा, "शाम को भुला, शाम का वादा ये" ही ओळ दोनदा गायली गेली आहे. परंतु दुसऱ्यांदा गायली जाताना, "भुला" या शब्दावर अशीच स्वरांची लहान नक्षी आहे आणि तसेच क्षणभर विसावणे आहे!! या विसावण्यानंतर "शाम का वादा' यावर हलकीशी हरकत आहे. लताबाईंच्या गायकीचे हेच खरे वैशिष्ट्य आहे, इथे पूर्ण सप्तकी तान, मूर्च्छना वागैते शास्त्रोक्त अलंकार अजिबात वापरलेले नसतात, एखादा "अर्धा" सूर, गायनाची अपूर्व किमया करून जातो आणि ही किमया, इतरांच्या गळ्यातून येणे अवघड जाते. शब्दांचे सौष्ठव तर सांभाळायचे पण त्याचबरोबर लयीच्या अंगाने मध्येच स्वरांत "तिरपागडेपणा" आणायचा!! हे अजिबात सहज आणि सोपे नाही. 
या गाण्यात तसा वाद्यमेळ फारसा नाही. संतूर, गिटार आणि बासरी, हीच प्रमुख वाद्ये आहेत पण तरीही या वाद्यांचे एकत्रीकरण इतके घट्ट आहे की त्याबद्दल वेगळा विचार करावा लागेल. एकदा गाण्याची लय ठरली, तो सूर मिळाला की त्याला जोडून सगळी स्वररचना बांधायची, हे तर सुगम संगीताचे मुलतत्व म्हणायला हवे परंतु त्या पहिल्या सुरापासून, पुढे त्याचा विस्तार कसा करायचा, इथेच तर संगीतकाराचे वैशिष्ट्य दिसून येते. 
"बिरहा की मारी प्रेमदिवानी, तनमन जागा, अन्खियो में पानी, निंदिया ना आये" हे दुसरे कडवे आहे. "बिरहा की मारी" ही ओळ दुसऱ्यांदा गाताना, "मारी" या शब्दावर एक हलकासा "खटका" आहे, जो, या शब्दाचे महत्व अधोरेखीत करतो. सुगम संगीतातील हे खरे अलंकार!!! छोटासा खटका, परंतु त्या शब्दातून व्यक्त होणारा आशय द्विगुणीत करणारा, ही गायिकेची नजर!! हे गाणे संपताना, "शाम ना आये" वरील हरकत मुद्दाम ऐकावीच लागेल. ही हरकत, इतकी अवघड आहे की, या लयीत ती बसलीच कशी, याचा संभ्रम पडावा. पण, ही खरी गायकी!! गाण्याचा इतका अप्रतिम "समारोप" दुसऱ्या कुठल्याच स्वराने होऊ शकणार नाही.